मोहन अनपट: परिवर्तनाच्या दिंडीतला वारकरी

०७ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


इतिहास संशोधक, कथाकार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कदम यांचा १९वा स्मृतिदिन शनिवार ७ डिसेंबरला साजरा होतोय. त्यात पंढरपूर येथील श्रमिक मुक्ती दलाचे लढाऊ कार्यकर्ते मोहन अनपट यांना मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्काराने सन्मान होतोय. आदर्श गाव उभं करणाऱ्या `माळकरी कॉम्रेड`ची ही ओळख. 

काही माणसं अशी असतात की जी कायमच सत्याचा आग्रह धरतात. सत्य असत्याशी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमता || असं तुकोबाशी थेट नातं जोडत अन्यायाच्या विरोधात ठामपणे लढायला उभे राहतात. जे न्याय आहे त्याच्यासाठी जिवाची बाजी लावतात. पण ती तितकीच संवेदनशील पण असतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद | आपुलाची वाद आपणाशी || असा स्वतःशी सतत संवाद करत असतात. स्वतःबरोबर स्वतः वाद घालत असतात. 

स्वतःच्या चुका स्वतः ओळखून त्या दुरुस्त करतात. वृक्षवल्लीशी, पशुपक्ष्याशी जिवाभावाच नातं जोडतात. असाच एक तरुण तुकोबाचा हा कणखर आणि तितकाच सुहृदय वारसा जपत मुळापासून उखडलेलं एक दुष्काळी गाव ‘झाडांचं गाव’ म्हणून उभं करीत आहे. त्याचं नाव मोहन अनपट. डाव्या पुरोगामी चळवळीत सक्रिय असलेला मोहन म्हणजे ‘परिवर्तनच्या दिंडीतला वारकरी’ असंच म्हणावं लागेल.              

हिरवाईतून दुष्काळावर फेकलेलं गाव

मोहन अनपट हा श्रमिक मुक्ती दलाचा लढाऊ कार्यकर्ता. महाबळेश्वरच्या पायथ्याजवळ चिंचणी हे मोहन अनपट यांचं छोटंसं गावं. धरणग्रस्त म्हणून ते दुष्काळी भागात विस्थापित झालं. सोलापूर जिल्ह्यातल्या पिराची कुरोली या गावाशेजारच्या माळावर आणून टाकलं गेलं. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांसह सार्‍या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या आधी एकत्र येतात त्या टप्प्याच्या बाजूलाच वसवलेलं. 

हेही वाचाः मनोहर कदमः चळवळीशी एकरूप झालेला कार्यकर्ता संशोधक 

संसाराचा सगळा बाडबिस्तरा घेऊन सगळे चिंचणीकर या माळावर उतरले. तेव्हा अवघं वय वर्षं तीन असलेला मोहन वडलांचं बोट धरून पहिल्यांदा या उजाड माळावर आला. मुळापासून उखडलेलं हे गाव शेकडो मैल दूर उचलून फेकलं गेलं होतं. ही माणसं मूळ गावातल्या निसर्गासारखीच हिरव्या मनाची. इकडे उजाड माळावर दुष्काळाच्या दाहक चटक्यांनी हैराण होऊन गेली. या परख्या मुलखात माणसं, शेती, पीकपद्धत, खाणंपिणं, प्रथा परंपरा, रीतीरिवाज सगळं सगळं वेगळं. 

गावाने जुनी ओळख पुसली

उपरेपणाची भावना घेऊन आजूबाजूच्या गावगुंडांच्या दहशतीखाली वावरणारं गाव पाहत मोहनच्या वयाची अनेक मुलं लहानाची मोठी झालेली. परमुलखात झालेली वस्ती म्हणजे इथल्या धनदांडग्यांची प्रॉपर्टीच. त्यांच्या मर्जीने त्यांनी  कशीही वापरावी. कुणाचाच काही धाक नसलेला. कुणीच तिथे सुरक्षित नव्हतं. वडलांच्या वयाची एक पिढी विस्थापनाची भळभळती जखम घेऊन उद्ध्वस्त झाली. 

हे अगतिक आणि आश्रित गाव मोहन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुन्हा नव्यानं उभा केला. कुणीही यावं आणि विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांना कसंही हाकावं अशी दुबळी ओळख त्यांनी पुसून टाकली. दुष्काळी भागातील एक लढाऊ गावं असा दबदबा निर्माण केला. उजाड माळावर हिरवाई फुलवत ‘झाडांचं गावं’ अशी आपली नवी ओळख कामातून उभी केली. 

हेही वाचाः आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

मुंबईहून आले ते थेट चळवळीत

मोहनचे वडील गिरणीकामगार. अहमदाबादला मीनानगरमधे मोहनचं बालपण गेलं. चौथीपर्यंतचं शिक्षण गुजराथी भाषेत झालं. पुढे आजोळी राहून शिक्षण घेत असताना सातारच्या लढाऊ मातीचे संस्कार झाले. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मोहन अनपट नोकरीच्या शोधात मुंबईला आले. मुंबईत काळ्बादेवीला कापड मार्केटमधे कामाला राहिले. चारपाच वर्षे कापड मार्केटमधे मेहनत केली. 

वडिलांच्या निधनानंतर मोहन अनपट गावी चिंचणीला परतले. या दरम्यान मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडसह अनेक पुरोगामी संघटनांच्या ते संपर्कात आले. याच काळात महाराष्ट्रात विद्रोही चळवळ जोर धरू लागली होती. पंढरपूर येथे भरलेले विद्रोही साहित्य संस्कृती समेलन यशस्वी करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला. आणि इथेच ते श्रमिक मुक्ती दलाशी जोडले गेले.   

विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनाची जबाबदारी

मोहन अनपट गेली पंधरावीस वर्षं श्रमिक कष्टकर्‍यांच्या लढ्यातील एक आघाडीचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने उभारलेले बडवे उत्पात आंदोलन असो की श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन असो या आंदोलनांची सारी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. 

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर सनातन संस्थेच्या विरोधात कोल्हापुरात निघालेल्या पहिल्या मोर्च्यात ते अग्रभागी होते. महाराष्ट्रात झालेल्या दलितांवरील जातीय अत्याचाराच्या विरोधात दलितेतर कष्टकरी जनतेला संघटित करून हा माणूस नेहमीच रस्त्यावर उतरत आला आहे. धर्माध आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात उघड भूमिका घेऊन लढणारा माणूस म्हणून त्यांना सोलापूर जिल्हा ओळखतो.

संघर्षाला जोड रचनात्मक कामाची

संघर्षात्मक कामाला रचनात्मक कामाची जोड मिळाली तर तो संघर्ष अधिक उठावदार होतो. मोहन अनपट यांची लढाऊ कार्यकर्ता म्हणून जरी ओळख असली तरी त्यांनी रचनात्मक कामही उभं केलंय. राज्यात हागणदारीमुक्त गाव ही योजना सुरू झाली. आणि २००६ मधेच सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं हागणदारीमुक्त गावं म्हणून चिंचणीनं पहिला नंबर पटकावला. 

वरदायिनी ही गावाची ग्रामदेवता. गावाला सोबत घेत सुंदर अशा वरदायिनी सभागृहाची उभारणी करून आजूबाजूच्या गावांना एक आदर्श घालून दिला. आपल्या गावातली मुलं ही भविष्यकाळातली आव्हानं पेलू शकतील अशी सक्षम बनली पाहिजेत, सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा त्यांनी गावच्या सहकार्यातून उभा केल्या.   

हेही वाचाः न्यायाधीशांमधेही धर्म जातीचे पूर्वग्रह असतात

चिंचणी बनलं झाडांचं गाव

विस्थापनाआधीचं चिंचणी हे गर्द हिरव्या डोंगर झाडीतलं गाव. ते उजाड माळावर आणून टाकलं होतं. पण मनातली हिरवाई काही पाठ सोडत नव्हती. मोहन आणि त्याच्या पिढीतली तरुणाई पुढे सरसावली. एक एक म्हणता म्हणता हजारो झाडं इथं उभी राहिली. पाखरांनी घरटी केली. दुष्काळी भागात पाखरांच्या किलबिलाटानं चिंचणीची पहाट होऊ लागली. 

एक पिढी स्वतःला सावरण्यात खर्ची गेली. पण दुसर्‍या पिढीने मात्र इथं उजाड माळावर जुनं गावं नव्यानं जन्माला घातलं. उपरेपणाच ओझं झटकून टाकत स्वावलंबी गाव आकाराला आलं. हा सारा प्रवास खूपच संघर्षमय आणि थक्क करणारा आहे. मोहन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा संघर्ष अत्यंत निष्ठेने पुढे नेला. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय दुष्काळी भागात ‘झाडांचं गावं’ अशी आपल्या गावची ओळख निर्माण केली.

प्रत्येक घरात आरओ पाणी

सह्याद्रीच्या अतिपावसाच्या भागातून जगायला आलेलं गाव, अशी जुनी ओळख या गावांनं पुसून टाकली. मोहन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रेनवाटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवत छतावरील सगळं पाणी जमिनीत मुरवलं. स्वतःच्या गावात स्वतःच्या मालकीचं दूध संकलन आणि शीतकरण केंद्र उभं केलं. आरओ सिस्टम उभी करून गावातील सर्व कुटुंबांना पिण्याचं शुद्ध आणि स्वछ पाणी मुबलक उपलब्ध करून दिलं. 

२००६ पासून पाच हजार झाडांची लागवड करून ती जगवली. मोहन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिंचणीची दुष्काळातलं महाबळेश्वर अशी ओळख तयार केलीय. राज्यातलं पहिलं कृषिपर्यटन गाव करून गावातल्या सर्वच कुटुंबांना पर्यटनाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प मोहन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे. 

 

त्यांनी दूध फेकलं, यांनी वाटलं

आंदोलनं आणि चळवळी केवळ नकार देणार्‍या नसव्यात तर त्या निर्मितीक्षम आणि सृजनशील असाव्यात, हे मोहन अनपट यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. संघर्षदेखील सृजनशील कसा करता येतो, हे त्यांनी आपल्या अनेक आंदोलनांतून सिद्ध केलंय. दूधउत्पादक शेतकर्‍यांचं आंदोलन करताना इतर संघटनांसारखं दूध रस्त्यावर न ओतता त्यांनी गरीब वस्त्या, झोपडपट्या आणि शाळांच्यामधे वाटून निषेधाचा सकारात्मक मार्ग चोखाळला. 

शेतकरी संपात आंदोलकांनी फेकलेला शेतीमाल, भाजीपाला जमा करून गरीब वस्त्यात वाटला. मुंबईत आरेचं जंगल तोडलं आणि महाराष्ट्रात निषेधाचे अनेक मोर्चे निघाले. पण मोहन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मात्र निषेधाचा वेगळा मार्ग निवडला. गावात एक हजार झाडं लावून निषेधसुद्धा कसा सकारात्मक होऊ शकतो हे दाखवून दिले. 

विधायक बंडखोरीचा सन्मान

मोहन अनपट डाव्या विचारांचा प्रभाव असलेले वारकरी कार्यकर्ते आहेत. एक प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा पुढे नेत आहेत. आजच्या काळाला सुसंगत अशी वारकरी परंपरेची मांडणी करत पंढरपूर परिसरात समतेचा विचार धाडसाने मांडत आहेत. विठ्ठल मंदिरातून बडवे हटवून सरकारी पुजारी नेमण्याचा निर्णय ज्या दिवशी झाला, तो दिवस गेली अनेक वर्षं मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात ते पुढाकार घेत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातल्या दूधउत्पादक कुटुंबांचं आंदोलन संघटित करून त्यांना योग्य भाव मिळवून देण्यात मोहन अनपट यांचा मोठा वाटा राहिलाय. शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी मोहन अनेकवेळा रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या वर्षीच्या शेतकरी संपात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांचं नेतृत्व केलंय. महाराष्ट्राच्या पुनर्वसन कायद्यात धोरणात्मक बदलासाठी झालेल्या आंदोलनात त्यांना अनेकवेळा अटकही झालीय. 

दुष्काळी भागातल्या जनतेच्या पाणी हक्कासाठी समन्यायी तत्वाचा आग्रह धरत ते पाणी संघर्ष चळवळीत नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यांना आज `सत्यशोधक मनोहर कदम स्मृती सत्यशोधक चेतना पुरस्कार` देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हा सन्मान रचनात्मक लढाऊ बंडखोरीचा आहे. 

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.)