पाऊस विविध दृष्टीने आनंद घेऊन येतो खरा, पण सोबत आजारपण घेऊन येतो. हे वाक्य टिवीवरच्या जाहिरातीप्रमाणे वाटत असलं, तरी सत्य आहे. आजारपण आलं की इम्युनिटी कमी होते. आजारपणांची रीघ लागते. घसा खवखवणं, सर्दी, खोकला यांनी सुरवात होत पुढे मजल डेंग्यू, मलेरीया, गॅस्ट्रो, कावीळपर्यंत जाते. या सगळ्याला वेळीच आवर घालण्यासाठी आपण घरगुती उपाययोजना करू शकतो.
जुलै महिन्यात पाऊस अगदी सिक्सर मारतोय! कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं पूर तर कुठं अगदी तुरळक पाऊस पडतोय. पावसाच्या धारा कडाक्याच्या उन्हाचा दाह कमी करत अगदी मलमासारखं काम करतात. हा पाऊस विविध दृष्टीने आनंद घेऊन येतो खरा, पण सोबत आजारपण घेऊन येतो. हे वाक्य तुम्हाला टिवीवरच्या जाहिरातीप्रमाणे वाटत असलं, तरी सत्य आहे.
मान्सून किंवा पावसाळा ऋतु येताच पहिल्यांदा आपली पचनक्रिया मंदावते. पाठोपाठ रोगप्रतिकारक शक्ती अर्थात कोरोना काळात प्रसिद्ध झालेला शब्द म्हणजे 'इम्युनिटी' कमी होते. मग काय आजारपणांची जणू रीघ लागते. घसा खवखवणं, सर्दी, खोकला यांनी सुरवात होत पुढे मजल डेंग्यू, मलेरीया, गॅस्ट्रो, कावीळपर्यंत जाते.
या सगळ्याला वेळीच आवर घालण्यासाठी आपण योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. हे तुम्हाला पटत असेलही, पण नेमकं घरच्या घरी असे कोणते उपाय करायचे याविषयी आपल्या मनात संभ्रम असतो.
हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
मुख्यत्वे पावसाळी आजारांचं मूळ हे अशुद्ध पाण्यात असतं. मग आपण पाणी कसं प्यावं इथून सुरु करुयात. शाळेत बालवाडीतही आपल्याला शिकवलं आहे की पाणी १५ मिनिटं उकळून, गाळून प्यावं. मग हेच उकळलेलं पाणी दररोजचं पिण्याचं पाणी साठवण्याच्या भांड्यात ओतावं याऐवजी तुम्ही फिल्टर पाणी घेऊ शकता. यात आपल्याला भीमसेनी कापूर मिसळायचा आहे. आयुर्वेदीक भीमसेनी कापूर आपण खाऊ शकतो. खाऊ शकतो, म्हणून लगेच आपण काही कापूराचे खडे चाऊन खायचे नाहीत, तर ते घेण्याची पद्धत असते.
साधारण ३ लिटर पाण्यात, एका तांदुळाच्या दाण्याच्या आकाराचा खडा मिसळावा. आपण पाणी तांबं, चांदी, कांस्य अशा भांड्यात साठवलं तर उत्तम! याचे गुणधर्म आपल्या शरीरातल्या अनेक कमतरता भरून काढतं. ज्यामुळे आपल्याला तंदुरुस्त राहायला मदत होते. ही भांडी नसली तर, तुम्ही पितळ, काच, स्टील अशी भांडी वापरु शकता. भीमसेनी कापूर मिश्रित पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता.
सकाळी उठल्या उठल्या काय खावं, काय प्यावं याबाबतीत आपला खूप गोंधळ होतो. अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. कोण म्हणतं मनुका भिजवलेलं पाणी प्यावं, तर कोण म्हणतं मेथी वॉटर, तर कोण नोनी ज्यूस प्यावा, तर कोण म्हणे भिजवलेले बदाम - अक्रोड खावेत. या सर्व गोष्टी बरोबर आहेत आणि आरोग्याला फायदेशीर आहेत. पण, या कोणत्याच गोष्टी पावसाळ्यात न घेतलेल्याच बऱ्या!
आपण पाणी गरम करून त्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा मध, किंचित सूंठ पूड आणि काळेमिरी पूड पदार्थ घालावेत. हे पाणी कोमट करून त्यासोबत पाव चमचा भाजून पूड केलेली आळशी घ्यावी. हे पाणी सकाळी अनशी पोटी, तोंड न धुवत प्यावं. साधारण १५० ते २०० मिली पाणी पिऊ शकता.
हेही वाचा: दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक
सकाळी उठल्यावर काय करायचं हे तर आपल्याला समजलं. आता आपण जेवणात ताटाच्या डाव्या बाजूसाठी एक चटणी बनवून ठेवायची आहे. पावसाळ्यात शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात बाजारात मिळते.
शेवग्याला काही वर्षांपूर्वी मोठा भाव चढला होता. मोरिंगा-मोरिंगा म्हणत संपूर्ण जगाने याला डोक्यावर घेतलं, सुपरफूडचा दर्जाचा मिळाला, प्रत्येक आहारतज्ज्ञ मोरिंगाचा गोडवे गाऊ लागला. तरी याने आपल्या स्वभाव आणि गुणधर्मासहीत किंमत फारशी बदलेली नाही. आपाल्या साध्याशा शेवग्याच्या पानांची चटणी बनवून रोज एक वेळ जेवताना सोबत घ्यायची त्याचबरोबर स्प्रेड म्हणूनही वापरता येईल.
चटणी बनवण्यासाठी १ वाटी कोवळी शेवग्याची पानं, १ वाटी पुदिन्याची पानं, ३ वाट्या देठासहीत कोथिंबीर, ५ तुळशिची पानं, २५ कढीपत्त्याची पानं, १० हिरव्या मिरचा किंवा तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीप्रमाणे, ८ लहान सांबार कांदे, लहान कांदे नसल्यास १ मोठा कांदा, ६ लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, १ मोठ्या लिंबाचा रस, दीड मोठा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ असे पदार्थ घेऊन सर्वकाही मिक्सरमधून काढून घेतले की हिरवी चटणी तय्यार!
ही चटणी शेवग्याची तरी यात कोथिंबीर जास्त आहे कारण आपण शेवग्याची पानं फार खाऊ शकत नाही त्यामुळे इतर पदार्थ मिश्रित केल्याने चव तर वाढतेच आणि पौष्टीकताही वाढते. ही चटणी पाणी न घालता वाटल्यामुळे ती एक आठवडा सर्वसाधारण तापमानात टिकते, तर हवा बंद डब्यात फ्रिजमधे २५ दिवस टिकते.
शेवग्याच्या पानांच्या चटणीसह आपण जेवणात एक भाजीसुद्धा ऍड करायची आहे. ती भाजी म्हणजे, कुळिथाची! ही भाजीसुद्धा लवकरच सुपरफूड कॅटेगरीत येणार आहे. ज्या दिवशी आपल्या स्थानिक भाज्यांना इंग्रजी नाव येतात, त्या ऑनलाईन एलीट साईट्सवर मिळू लागतात तेव्हा समजावं की या भाजीचा भाव वधारला. तर सध्या हॉर्सग्रॅम म्हणजेच कुळिथाचाही थाट वाढत आहे.
कुळिथाला मोड आणून नेहमीप्रमाणे वाटण घालून उसळ करता येईल. तसंच बाजारातून घरगुती कुळिथाचं पीठ मिळत ते आणावं. त्या पिठाची भातावरच्या आमटीसारखी पिठी किंवा भाकरी - पोळीसोबत खाण्यासाठी पिठलं बनवता येईल. किमान आठवड्यातून एक ते दोन वेळा कुळिथ जेवणात असू द्या. या भाजीतून आपल्याला इतर भाज्यांमधे सहसा न आढळणारे घटक मिळतात. ज्यामुळे आपल्या शरीरातल्या मायक्रो न्युट्रियन्टसची कमतरता भरून निघते.
हेही वाचा: मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित
पाणी कोणतं प्यावं, सकाळी काय करावं, चटणी कोणती, भाजी कोणती हे समजलं आता रात्रीचं काय, रात्री काय करायचं? रात्री झोपताना आपण सर्वांनी दूध हे प्यायलाच पाहिजे, तेही फक्त पावसाळ्यात नाही तर बाराही महिने दूध पिणं हे उपयुक्त आहे. जेवल्यानंतर साधारण तीन तासांनी आपण झोपायचं आणि झोपताना ब्रश करण्यापूर्वी किमान शंभर ते दीडशे मिली गाईचं दूध प्यावं. पावसाळ्यात एका खास पद्धतीचं दूध प्यावं.
त्यासाठी पहिल्यांदा एक कप पाणी उकळण्यासाठी ठेवावं, त्यात १ इंच ठेचलेलं आलं, १० ते १२ गवती चहाची रेषा किंवा पानं, ७ ते ८ तुळशीची पानं, १० पुदीन्याची पानं आणि पाव चमचा गूळ असे पदार्थ घालून पाणी उकळून घ्यावं. मग हे पाणी गाळून आपण दूधात मिश्रित करायचं.
दुधात पाणी म्हणून तोंड मुरडू नका. दुधाला अधिक आरोग्यदायी आणि पचनयुक्त करण्याची ही पद्धत आहे. त्यामुळे सर्व वयातल्या व्यक्तींनी हे दूध आवर्जुन प्यायलं पाहिजं. जितकं दूध घेणार त्याच्या पाव भाग हे पाणी घालावं. समजा, १०० मिली दूध प्यायचं असेल तर केवळ ७५ मिली दूध ग्लासात घ्यावं आणि २५ मिली हे पाणी मिश्रित करावं.
मान्सून आजारांपासून दूर राहण्यासाठी या पाच गोष्टी आवर्जून करा आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवा. त्यासोबत आणखी काही गोष्टी लक्षात घेतल्या अधिक फायदा होईल. पावसाळ्यात पालक, मेथी, माठ, मुळा या भाज्या घ्यायला धावू नका. उलट तुम्ही पावसाळी पालेभाज्या जसं की फोडशी, भोपळ्याची पानं, टाकळा, कवळा, भारंगी तर फळभाज्यांमधे कर्टुले, पडवळ, दोडके, घोसाळे, कारलं अशा भाज्या घ्या आणि बनवून खा.
पावसाळा काय भजी खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही, भजी खा मात्र ८-१० भज्या रगडण्यापेक्षा २-४ भजींचा आस्वाद घ्या. भजी कांदा-बटाट्याची करा पण ओव्याच्या पानांची भजी अधिक लाभदायक ठरेल. भजी घरी बनवलेली, सोडा विरहीतच खा. यासोबत मिक्स डाळींचं सूप किंवा आमटी आठवड्यातून एकदा करावीच. मूग, मटकी, चणे व्यतिरीक्त इतर कडधान्यांच्याही उसळी करा.
तुम्हाला ताक आवडत असेल तर दुपारी नक्की प्या, मात्र त्यात पुदीना, मिरची, कोथिंबीर, जिरं, काळं मीठ या गोष्टी वाटून ताकात मिश्रित करून प्या. या ऋतुमधे तुम्ही नाचणीची भाकरी किंवा तांदुळाच्या पीठात नाचणी आवर्जून मिश्रित करून त्याची भाकरी बनवा. तुम्ही मल्टीग्रेन पोळ्या किंवा फुलके करत असाल तर त्यात नाचणीचं थोडं तरी पीठ मिश्रित कराच आणि त्यासोबत केळ्याचं पीठ असेल तर तेही मिश्रित कराच.
हेही वाचा:
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)
रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली