एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी मुघल राष्ट्रनिर्माते असल्याचं म्हटलं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचं इतिहासाचे अभ्यासक विशाल फुटाणे म्हणतात. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका दुस-या बाजूवर प्रकाश टाकणारी त्यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
अरबस्तानाच्या वाळवंटात निर्माण झालेल्या इस्लामने अवघ्या चारशे वर्षात साऱ्या जगाला हादरवून सोडलं. ऐकेश्वरवादी मताचा आग्रह धरणाऱ्या या धर्मानं धर्मप्रसारासाठी तलवारीचा वापर केला. या धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ६२२मधे जन्नतवासी झाल्यावर त्यांच्या अनुयायांनी एकच ध्येय घेऊन धर्मप्रसारासाठी घोडदौडी चालू केल्या. धर्मप्रसार करताना आठव्या शतकात अरबांचं साम्राज्य संपूर्ण पश्चिम अशिया, इजिप्त, लिबिया, स्पेन, पोर्तुगाल इतक्या विशाल भागावर पसरलं.
ते मोठ्या आशेने भारताकडे आले. इस्लामचं बोलन खिंडीतून झालेलं आक्रमण अत्यंत खतरनाक होतं. खलिफांनी अरबस्तान, सिरीया, इराण, इजिप्त, स्पेन पादाक्रांत केले. चीनच्या सीमेपर्यंत येऊन पोचले. त्यावेळी भारतातून चालुक्य, प्रतिहार, राष्ट्रकुटांनी त्यांना प्रभावी टक्कर दिली. संपूर्ण अशिया खंडात ज्या इस्लामने आपली पाळंमुळं मजबूत केली, त्या इस्लामला भारतात पाचशे वर्षांच्या निरंकुश सत्तेच्या जोरावर पीछेहाट बघायला मिळाली.
भारत संपूर्ण इस्लामी का झाला नाही? इस्लामच्या घोडदौडीला जगातला सगळ्यात मोठा अडथळा भारतात का झाला? याची खंत नेहमीच इस्लामी पंडितांना खात राहिली. याचं कारण त्या विचारवंतांनी कधी शोधलं नाही किंवा ते तिथपर्यंत कधी गेलेच नाही. तशी याची अनेक कारणं आहेत पण राजकीय दृष्टीने आपण याकडे बघू. जोपर्यंत मुघल साम्राज्याचा तटस्थपणे अभ्यास होत नाही तोपर्यंत ही गोष्ट समोर येत नाही.
हेही वाचा: ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव
मुघल भारतात येण्यापूर्वी मोहम्मद बिन कासिम, गझनीचा मेहमूद, शहाबुद्दीन घौरी यांची मोठमोठी आक्रमण भारतावर झाली. उत्तर भारतातल्या सगळ्याच राज्यांचा यांनी धुव्वा उडवला. त्यानंतर दिल्लीत सुलतानशाही स्थापन झाली. यात कुतुबुद्दीन ऐबकपासून इल्तुमिश, खिलजी, सय्यद, लोदीपर्यंत अनेक शासक येऊन गेले. हे सगळे वंशाने तुर्क आणि पठाण होते.
यावेळी ७० टक्के भारतावर पठाणांची म्हणजे अफगाणी मुसलमानांची सत्ता होती. भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांचे तुर्क मुसलमान, बाटलेले भारतीय मुसलमान आणि अफगाणी पठाण असे तीन गट पडले होते. त्यांच्यात पुन्हा शिया-सुन्नी वादामुळे सततचा संघर्ष होत होता. मुघलांचा पहिला सामना झाला तो पठाणांशी.
भारतात मुघल साम्राज्याची स्थापना करायची असेल तर राजपूतांची मदत घेणं आवश्यक आहे, हे अकबराला माहीत होतं. राजपूत जर शांत राहिले तर राजकीय आणि सामाजिकदृष्टया ते फायद्याचंच ठरणार होतं. सुलतानशाही असतानाही विदेशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैन्य आणि अधिकारी भारतात नोकरीसाठी येत होते. त्यावेळी असंख्य मुस्लिमांना महत्त्वाची अधिकारपदं देऊनही त्या अधिकाऱ्यांनी बंड केलं होतं.
उदाहरणार्थ शाह मन्सूर, भाऊ मिर्झा हकीम, माहीम आना. आधमखान या अकबराच्या नातेवाईकानेही विश्वासघात करून बंड केलं होतं. अफगाणी मुसलमानांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्याला विश्वासू आणि कर्तबगार राजपूतांची मदत घेणं योग्य वाटलं. अकबराच्या बापाला ज्यावेळी दिल्लीतून १० वर्ष परागंदा व्हावं लागलं तेव्हा एकाही नातेवाईकाने आणि मुसलमान राज्यकर्त्यांनी त्याला पठाणांच्या भीतीने आश्रय दिला नाही. त्यावेळी राजपूतांनी मदत केली.
पठाण सुन्नी मुस्लिम होते. अकबरावर शिया मुस्लिमांनी संस्कार केले. त्याची आई हमीदाबानू, वडील हुमायून हे शिया होते. वडील गेल्यानंतर त्याची काळजी घेणारे बैरमखान शिया होते. सोबतचे सगळे मित्र, सहकारी, भावंडं शिया होती. यामुळेच तो धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात होता. अकबराला कट्टर सुन्नी मुस्लिमांबद्दल चीडही होती.
मुघल राजघराण्याचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवली. अकबराला चार दाया होत्या. शहाजहान किंवा खुसरोला दाई नव्हती. हिंदू आयांपासून जे मुघल सम्राट जन्मले त्यांना दाया नव्हत्या. दाया म्हणजे तान्ह्या मुलांना अंगावर पाजणाऱ्या, प्रतिपालन करणाऱ्या स्त्रिया. त्यांना तुर्की भाषेत अंका, हिंदीत दाईमा म्हणतात. तिच्या मुलाला कोका म्हणतात. अकबराच्या कार्यकाळात अब्दुलकोका, झेनखानकोका, मिर्झाआझमकोका अशी दायांची मुलं सरदार पदावर होती.
अकबराचा जन्म आणि पालनपोषण उमरकोटचा हिंदू राजा वीरसालकडे झालं. मुळात राजपूत वचनाला पक्के होते. ते दगाफटका करत नव्हते. मुघल साम्राज्यात महत्वाची पदे त्यांना मिळाली. अकबराच्या आसपास, मर्जीत हेच लोक होते, त्यामुळे त्यांना स्वायत्तता मिळाली. त्यात सुन्नी पठाणांशी राजपूतांचं हाडवैर. मुघलांचे शत्रूही पठाणच. त्यामुळे अकबराने राजपूतांच्या मदतीने अफगाणी पठाणांचा नायनाट केला.
हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
राजपूतांनी मुघल साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या वायव्य प्रांताकडे म्हणजे सध्याच्या अफगाणिस्तान सीमेवर जवळपास दोनशे वर्ष मुघलांनी राजपूतांना संरक्षणासाठी ठेवलं. अकबराने बिहारीमल राजा भगवानदास यांना लष्करी अधिकारी केलं. राजा बिरबल, राजा तोरडमल, राजा मानसिंह यांना मोठी पदं दिली. लष्करात हिंदू सेनानायक नेमण्यात आले. हिंदू यात्रा कर, जिझिया कर रद्द करुन हिंदू देवदेवतांची पूजा करण्याचं स्वातंत्र्य दिलं.
जयपूर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेरचे राजे अकबरासोबत आले. रणथंबोर, बुदी आणि गोडवन या राजपूतांशी युद्ध करून त्यांना वश केलं तर मेवाडच्या म्हणजेच चित्तोडच्या राजपूतांनी स्वाभिमान राखत शेवटपर्यंत लढा दिला. राणाप्रतापच्या मृत्यूनंतर अमरसिंग आणि कर्ण या त्याच्या मुलांचे आग्र्याच्या प्रेक्षकगृहात पुतळे उभे करून त्यांचा सन्मान केला. राजपूत जर एक झाले तर मुघल साम्राज्यच टिकणार नाही म्हणून राजा मानसिंग, शक्तीसिंग यांना चिथावणी देऊन त्याने राणाप्रतापला एकाकी पाडलं.
हा जरी राजकारणाचा भाग असला तरी तो हिंदूंचे सणही साजरे करायचा. आईच्या वर्षश्राद्धाला त्याने मुंडन केलं होतं. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद करण्यासाठी त्याने स्वतंत्र विभाग उघडला. पाच हजार वर्षांच्या इतिहासात हिंदू धर्माचे सगळ्यात जास्त ग्रंथ मुघल कालावधीत लिहले गेले. संरक्षित केले गेले. मुघल सत्तेचा आधारच राजपूत होते.
अकबराने त्याच्या नव्या दिन-ऐ-इलाही धर्माची स्थापना करण्यापूर्वी वेगवेगळ्या धर्मांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. वेगवेगळ्या धर्माच्या अभ्यासकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा त्याला करायची आवड होती. तो मौलवींशी चर्चा करताना विचारायचा, ‘तुम्ही अल्लाला बघितलंय का? त्याला ज्यानं बघितलंय असा कुणी तुम्हाला माहित आहे का? त्याला माझ्या समोर आणा.’
हाच प्रश्न तो हिंदूंना, जैनांना विचारायचा आणि म्हणायचा, ‘इथं बसलेल्यांपैकी कुणीही ईश्वराला बघितलं नाही. मी हे जाणतो हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्ही पंडित, मौलवी काय करता ते मला चांगलंच माहितीय. तुम्ही दरवेळी तुमचाच शब्द खरा असं म्हणता कामा नये.’ तो वेगवेगळ्या धर्मपंडितांना आणि मनसबदारांना बोलवून त्यांना स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देत असे.
त्याच्या दिन-ऐ-इलाही धर्माची तत्वे त्याने तयार केली. दाढी ठेवणं त्याला मान्य नसायचं. दररोज अग्नी आणि सूर्याची पूजा करायचा. गोमांस बंदी केली. गाय, कुत्रा आणि डुक्कर यांना पवित्र प्राणी मानायचा. वयाची सोळा वर्षं पूर्ण केल्याशिवाय पुरूषाने आणि सोळा वर्षं पूर्ण केल्याशिवाय स्त्रियांनी लग्न करू नये असे त्याचे नियम होते.
अकबर हे उद्योग करत असताना १५८०मधे अॅक्वाविवा आणि मोन्सेराते या दोन ख्रिश्चन मंडळींच्या नेतृत्वाखाली एक मंडळ पोर्तुगीजांनी अकबराच्या दरबारात पाठवलं. या लोकांना अकबराने आग्र्यात चर्च उभं करायला परवानगीही दिली. अकबराने शाहजादा मुरादला ख्रिश्चन नितीतत्त्वांची शिकवण देण्यासाठी एका मिशनरीची नियुक्ती केली होती.
१५८३मधे पहिले ख्रिश्चन मिशनरी अकबराच्या दरबारात राहून आले. नंतर १५९२मधे एक मंडळ अकबराच्या दरबारात आले. १५९५मधे एक मिशनरी मंडळ पुन्हा अकबराचे धर्मपरिवर्तन करायला आले. त्यांनाही यश आलं नाही. पण अकबराने पोर्तुगीजांना व्यापारात काही सवलती दिल्या. ईश्वर एकच आहे आणि अकबर ईश्वराचा एकमेव दूत आहे अशी त्याच्या नवीन धर्माची मान्यता होती.
एकाने अल्ला हू अकबर म्हणलं तर दुसऱ्याने जल्ला जलाल हू म्हणायचं असा आदेश त्याने काढला. खरं तर, तो एकमेव मुघल राज्यकर्ता होता त्याला भारत समजला होता. आपण इथले राज्यकर्ते आहोत आणि आपल्याला राज्यकर्ते बनूनच राहायचं आहे हे त्याच्या डोक्यात पक्कं बसलं होतं आणि त्यात तो यशस्वी झाला. त्याच्या अशा वागण्यानेच भारतात मुघल सत्तेचा पाया रोवला गेला.
हेही वाचा: नागनाथअण्णा जिवंतपणी दंतकथा बनले, त्याची गोष्ट
अकबराच्या हिंदू सहिष्णू भूमिकेचे पडसाद त्या काळातल्या साहित्यातून दिसतात. मुर्तझा हुसेन हा अठराव्या शतकातला इतिहासकार आपल्या ‘हदिका अल् अकेलिम’ या पुस्तकात लिहतो, ‘अकबर बादशहा हा पूर्वजन्मी हिंदू संन्यासी होता. त्याचं नाव मुकुंद होतं. त्याचे बिरन, माधव आणि जगत नावाचे तीन पट्टशिष्य होते. मुकुंदाने खूप उपासना करूनही त्याला मुक्ती मिळणार नाही असं कळलं. कारण त्याच्या वासना काही अंशी शिल्लक राहिल्या होत्या.
त्यासाठी त्याने होम करून स्वतःची आहुती द्यायची ठरवलं. यामुळे त्याला पुढच्या जन्मात राज्याधिकार मिळेल अशी खात्री होती. त्या जन्मात खूप उपभोग घेतले की वासना नष्ट होतील आणि मुक्ती मिळेल या हिशोबाने मुकुंदाने होमात स्वतःची आहुती द्यायचं ठरवलं. यमुनेच्या तीरावरच हा होम केला. होमापूर्वी त्याने एक ताम्रपट तयार केला आणि त्यावर श्लोक कोरून ठेवला. विक्रम संवत् १५२८मधे माघ द्वादशीला रात्रीच्या पहिल्या प्रहरी मुकुंदाचं शरीर तुकडे करून होमात अर्पण केलं.
त्यामुळे त्या शरीराचा स्वामी पुढच्या जन्मात त्या भूभागाचा स्वामी होईल. मुकुंदच्या शरीराचे तुकडे शिष्यांनी होमात टाकले. गुरुवियोगाने त्यांनीही प्राणार्पण केलं. माधव आणि जगत होमकुंडातच शिरले तर बिरन हठयोगाने देह सोडून गेला. कालांतराने मुकुंद हुमायूनच्या पत्नीच्या पोटी आला. अकबर नावाचा बादशहा झाला. बिरन बिरबलच्या रूपाने, जगत तोरडमलच्या रूपाने आणि माधव तानसेनच्या रूपाने जन्माला आले.
एकदा अकबर, बिरबल, तानसेन, तोरडमल हे चौघे चौपार नावाचा खेळ खेळत असताना अकबर म्हणाला की फासे टाकताना प्रत्येकाने एक काव्यपंक्ती म्हणावी. अकबराने त्या ताम्रपटातली पहिली ओळ म्हटली आणि इतर तिघांनी इतर ओळी म्हटल्या. अकबराला वाटलं की सर्वांनाच आपला पूर्वजन्म माहित आहे. या सगळ्यांना शपथ घ्यायला लावून, बिरबलाला अराईलला पाठवून तो ताम्रपट शोधून काढून नष्ट करायला सांगितलं. त्या ताम्रपटाचा दुसऱ्या व्यक्तीने वापर करू नये म्हणून धूर्तपणे अकबराच्या रूपात असलेल्या मुकुंद या तांत्रिकाने हे सर्व केलं.’
मुसलमान हे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नव्हते. अबुल फझल या अकबराच्या दरबारातल्या लेखकानं लिहून ठेवलंय की अकबर बादशहाचा पुनर्जन्माच्या सिध्दांतावर पूर्ण विश्वास होता. अल-बदाऊनी याने अकबर आणि त्याचा भाऊ खान-ऐ-आझम यांचा संवाद लिहून ठेवलाय. त्या संवादात अकबर म्हणतो, ‘पुनर्जन्म खरा आहे. त्याचा सबळ पुरावा माझ्या जवळ आहे.’ अकबराच्या दरबारातल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनीसुध्दा अकबराच्या पुनर्जन्माच्या सिध्दांतावर अकबराने दाखवलेल्या विश्वासासंदर्भात लिहून ठेवलंय.
इतिहासकार बदाऊनी म्हणतो की लहानपणापासूनच अकबराला होम-हवन करायची आवड होती. तो खाजगीत होमही करायचा. एका मुसलमानाने दुसऱ्या मुसलमानाबद्दल हे लिहिलंय. अकबराचा ओढा हिंदूधर्माकडे होता आणि तो हिंदू धर्मातील काही गोष्टींचं पालन करत होता. तो कपाळावर टिळा लावायचा आणि सूर्याची उपासना करायचा. पूर्वजन्माच्या सिद्धांतावरही त्याचा विश्वास होता. इतर मुसलमान सुलतानांसारखे अकबराने हिंदू धर्माविरोधात उत्पात केले नाहीत हे उघड आहे.
मुघलपूर्व भारत आणि मुघलकालीन भारताचा विचार करता, मंगोलवंशी मुसलमान, धर्मांध सुलतान आणि तुर्क पठाणांच्या तुलनेत फक्त मुघल भारतात समरस झाले. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातच मुघल जास्त बदनाम झाले. थेट मराठ्यांना आमनेसामने आव्हान दिल्यामुळे इथल्या इतिहास अभ्यासकांनी आपल्या शत्रूच्या चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं.
मुघलांचं साहित्य, कला, संगीत, शिल्प आणि चित्रकलेत योगदान वाढलं. अखंड १७१ वर्ष परकीयांपासून भारताचं संरक्षण झालं. सुरत, मिरतसारखी शहरं वसवली गेली. कायदा आणि सुव्यवस्था सुधारली. भारताचा अंतर्गत व्यापार वाढला.
भारतीय कला कौशल्य, बनारसी साडी, दागदागिने यांचा व्यापार जगभरात वाढला. परकीय आक्रमणापासून रक्षण झालं. प्रदीर्घ शांतता मिळाली. मध्ययुगीन कालखंडात एखादं राष्ट्र दोनशे वर्षं आक्रमण आणि परकीय शत्रूपासून भयमुक्त असणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जिथे शांतता तिथे समृद्धी या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो.
हेही वाचा:
महाराष्ट्राचा महानायक : निळू फुले
राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड
शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?
पश्चिम बंगालच्या रणांगणात कुणाचं पारडं होतंय जड?