मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आला. पण, कोकणवासियांना आपल्या घरी घेऊन जाणारा मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ हा २००७ पासून १६ वर्ष होत आली, तरीही अद्यापही अपूर्ण आहे. एकीकडे एका रस्त्याचं कौतुक करून घ्यायचं, पण दुसरीकडे आपलं अपयश झाकायचं, हा दुटप्पीपणा दूर व्हायला हवा.
गेले काही दिवस मीडियावर, सोशल मीडियावर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविषयी भरभरून बोललं, लिहिलं जातंय. एकीकडे जवळपास ७०० किलोमीटर लांबीचा आणि १० जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग अवघ्या पाच वर्षात पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी सगळ्या यंत्रणा कामी लावून, युद्धपातळीवर प्रश्न मिटवले गेले. नुकतंच त्याचं दणक्यात उद्घाटन, जाहिराती, प्रसिद्धी सगळं यथासांग पार पडलं.
पण, राज्यातल्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला मात्र कोणाचं लक्ष उरलेलं नाही, असं म्हणण्याची वेळ आलीय. समृद्धी महामार्गाच्या तुलनेत मुंबई-गोवा कमी लांबीचा म्हणजे फक्त ४७१ किलोमीटरचा आहे. त्यातल्या काही भागाचं काम पूर्णही झालेलं आहे. पण रखडलेलं काम, वर्षानुवर्ष रखडलेल्याच अवस्थेत असून, त्यामुळे आजवर हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा: दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक
कोकणातल्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुदैवाचं दशावतार गेली १६ वर्ष मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. २००७ला पळस्पे ते इंदापूर या जवळपास ९९ किलोमीटर मार्गाचं चौपदरीकरण घोषित झालं. पण २०२३ या नववर्षाला सुरवात झाली तरीही हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही.
त्यानंतरचा टप्प्पा म्हणजे इंदापूर ते झारा. जवळपास ४०० किलोमीटरचा हा टप्प्पा असून त्याच्या काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणाची घोषणा झाली. प्रत्यक्षात या कामाला २०१६ला सुरवात झाली. हे कामही २०२३ उजाडलं तरी पूर्ण झालेलं नाही. उच्च न्यायालयानेही या मार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकारला खडे बोल सुनावले. त्यानंतरही या मार्गाच्या स्थितीमधे फारसा फरक पडलेला नाही.
अलीकडेच माणगावजवळ अपुऱ्या असलेल्या रस्त्यावर जे डायवर्जन दाखवण्यात आलं होतं, त्या ठिकाणी ट्रक आणि कार यांची धडक होऊन दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या १५ वर्षांतल्या अपघातांची आणि मृत्यूंची संख्या काढली तर जवळपास ७०० ते ८०० अपघात होऊन एक हजारापेक्षा अधिक माणसांना प्राण गमवावे लागलेत. अपघातांची ही आकडेवारीच या मार्गाची भीषणता दर्शवते.
एका बाजूला भारत हा सर्वात जलद रस्ते बनवणारा देश, अशी आपण आपली ओळख सांगतो. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अल्प काळात पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं आणि ते खरंच आहे, आता नव्याने मुंबई ते दिल्ली महामार्गाचीही घोषणा केली गेली आहे. तरीही मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामाला गती मिळत नाही, अशी जी स्थिती आहे ती गंभीर म्हटली पाहिजे. यावर आता चौफेर टीका होतेय.
यासंबंधी जी कारणं दिली जात आहेत, त्यातलं एक म्हणजे ठेकेदाराने काम पूर्ण केलं नाही. त्याच्याकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेलं. त्यामुळे नवा ठेका द्यायला उशीर झाला. जुन्या ठेकेदाराने मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम अव्व्वाच्या सव्वा प्रमाणात आहे. त्यामुळे ती प्रचंड रक्कम सरकार देऊ शकत नाही यासारखी इतर कारणं देत काम थांबल्याचं समर्थन केलं जातंय. वास्तविक ते अनाकलनीय आहे.
खरं तर मुंबई आणि कोकण यांचं नाते हे वर्षानुवर्षांचं आहे. मुंबईसुद्धा कोकणातच येते. मुंबईतल्या मूळच्या कोकणवासीयांची संख्या मोजायची म्हटलं तर तीसुद्धा ५० लाखांहून अधिक असल्याचं दिसतं. विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही कोकणातले आहेत. या रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हापासून राज्यात पाच सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले गेले आहेत. तरीही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही.
हेही वाचा: मालवणच्या राजकीय आखाड्यात अमित शहांच्या गजाली
महाराष्ट्रातला हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. महाराष्ट्र आणि गोवा अशी देशातली दोन राज्यं या रस्त्यानं जोडली गेली आहेत. आज केंद्रातही महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ज्या कोकणात हा रस्ता जातो त्याच कोकणचे सुपुत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. असा योग जुळून आल्यानंतर तरी किमान हा महामार्ग होईल, अशी कोकणवासियांची अपेक्षा आहे.
या महामार्गावर सर्वाधिक गाड्या धावतात त्या गौरी गणपती आणि आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळी. आंगणेवाडीची जत्रा ४ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या महामार्गाच्या उपयुक्ततेची चर्चा सुरू झाली आहे. या महामार्गावर अपुऱ्या कामामुळे २५ ठिकाणी ब्लॅकस्पॉट तयार झाले आहेत. हे ब्लॅकस्पॉट नागोठणे ते राजापूर या ३०० किलोमीटरच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातच प्रामुख्याने हे काम रखडलेलं आहे.
पणजी ते खारेपाटण हा जवळपास १५० किलोमीटर मार्गाचा टप्प्पा पूर्णत्वाला गेला आहे. संगमेश्वर, चिपळूण, खेड, पोलादपूर, माणगाव या टप्प्यांत चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरण रखडलं आहे. कशेळी घाट, परशुराम घाट, भोस्ते घाट, सुकेळी खिंड इथं मोठ्या प्रमाणात अपघात होतच आहेत. याचं कारण म्हणजे या महामार्गाचं अपूर्ण काम. म्हणूनच या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचं वास्तव ठसठशीतपणे समोर येताना दिसतं. याबद्दल दिरंगाई परवडणारी नाही.
भारताच्या इतिहासातला सर्वांत रखडेला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जाऊ शकतं. कोकणातल्या सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी या प्रश्नाबाबत कमालीचे उदासीन असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे १६ वर्ष उलटली तरी या प्रकल्पाचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. आंदोलनं, कोर्टकचेऱ्या सारंसारं होऊनही या रस्त्याला काही गती सापडली नाही.
नाही म्हणायला, एखाद्या अपघाताच्या वेळी, शिमगा-गणपतीच्या सणाच्या वेळी किंवा आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळी या महामार्गाची आठवण काढली जाते. त्यावर चार दिवस बातम्या येतात, लेख येतात आणि पुन्हा महामार्गाच्या रखडपट्टीची वर्षे वाढत राहतात. कोकणात चकवा लागतो, अशी एक लोकसमजूत आहे. आज या मुंबई-गोवा हायवेच्या निर्मितीत असाच चकवा लागलाय की काय, अशी गजाली सुरू आहे.
नुकतंच २३ जानेवारीलै बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात एका कार्यक्रमात म्हणाले की, 'मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर महामार्गासारखाच मुंबई-गोवा महामार्गाचा विकास करणार’. असं म्हणणारे ते पहिलेच नाहीत. आतापर्यंत हा महामार्ग पूर्ण करता करता राज्याने एकूण सहा मुख्यमंत्री बदललेले पाहिले आहेत. त्यामुळे आता यांच्या हातून तरी या महामार्गाचं काम पूर्ण होऊ दे, असं गाऱ्हाणं कोकणवासीय घालत आहेत.
हेही वाचा:
क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट
देशासाठी रोल मॉडेल नाशिकची मेट्रो