मुंबईत भाजप शिवसेनेचे खासदार निवडून येतात, तेव्हाच देशात भाजपची सत्ता येते. जेव्हा काँग्रेसचे खासदार निवडून येतात, तेव्हा पंतप्रधान काँग्रेसचा बनतो. जेव्हा मुंबईचा कौल स्पष्ट नसतो, तेव्हा दिल्लीतही खिचडी सरकार बनतं. म्हणून मुंबईच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मोदींनी मुंबई जिंकली तर ते पंतप्रधान बनू शकतील. कारण गेल्या चार दशकांत मुंबईत हरून कुणी पंतप्रधान बनलेलं नाही.
ये हसी कभी, ये फसी कभी, ये बची ये सबसे गुजरी हैं
ये लडी ये जिद पे अडी, ये बिगडी ज्यादा, कम सुधरी रे
ये हसी कभी ये फसी, ये फिर भी बची ये आज सबसे रे
एक यार तले जो प्यार करे, ऐसा दिलदार वो कबसे ढुंढे रे
अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वेच्या डबल सीट सिनेमात मुंबईवरची मोहिनी लावणी आहे. तू दिल के दरिया की रानी अशी सुरवात करून गीतकार क्षितिज पटवर्धन मराठी हिंदी मिक्स शब्दांतून मुंबईची पर्सनॅलिटी उभी करतात. त्यातलं हे कडवं मुंबईच्या राजकारणाचंही न कळत वर्णन करून जातं. विशेषतः आजवरच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांचं.
लोकसभा निवडणुकीत जो देशाचा कौल असतो त्याचंच प्रतिबिंब मुंबईच्या निकालातही उमटतं. काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंतचे आणि गुजरातपासून बंगालमधले स्थलांतरित मुंबईत राहतात. म्हणून खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटिन असलेल्या मुंबईकरांचा कौल देशाचा मूड असतो तसाच असतो. लोकसभा निवडणुकीत एखाद दुसऱ्या मतदारसंघाचा अपवाद सोडला तर मुंबईकर सातत्याने एकाच पक्षाच्या बाजूने उभं राहिलेत असं कधी होत नाही.
हेही वाचाः मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!
देशात एखादी लाट असेल तेव्हा मुंबईकरही लाटेबरोबर असतात आणि जेव्हा देशात बदलाचे वारे वाहतात, तेव्हा मुंबईकरही बदलाला साथ देतात. जेव्हा एखादी लाट असते तेव्हा उमेदवार नव्हे तर पक्ष बघून मुंबईकर मत देतो. जनता पक्षाच्या लाटेत सुब्रमण्यम स्वामी, राम जेठमलानी यांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या मुंबईकरांनी वेगवेगळ्या निवडणुकांत स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिस अशा दिग्गजांना पराभवाची धूळही चारली आहे.
मुरली देवरा, मनोहर जोशी, गुरुदास कामत, जयवंतीबेन मेहता, राम नाईक यांना लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची अनेकदा संधी देणाऱ्या मुंबईकरांनी याच दिग्गजांना अनेकदा पराभवाचीही चव चाखायला लावलीय. त्यामुळे मुंबईकर सातत्यानं एकाच पक्षाला कौल देत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे.
मुंबईत भाजप शिवसेनेचे खासदार निवडून येतात, तेव्हा देशात भाजपची सत्ता येते. जेव्हा काँग्रेसचे खासदार निवडून येतात, तेव्हा पंतप्रधान काँग्रेसचा निवडून येतो. जेव्हा मुंबईचा कौल स्पष्ट नसतो, तेव्हा दिल्लीतही खिचडी सरकार बनतं. निदान गेल्या चार दशकांचा हा इतिहास आहे. म्हणून मुंबईच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आपण १९८४पासूनच्या सर्व निवडणुकांचा इतिहास तपासू शकतो.
हेही वाचाः शरद पवारांसाठी बारामतीपेक्षा मावळ, शिरूर, शिर्डीत प्रतिष्ठा पणाला
१९८४च्या निवडणुकीआधी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर पूर्ण देशाने राजीव गांधी यांना प्रचंड बहुमत मिळवून दिलं. काँग्रेसविरोधी राजकारणाचा इतिहास असतानाही मुंबईने त्यात आपलं योगदान दिलं. सहापैकी पाच जागा काँग्रेसने जिंकल्या. फक्त दक्षिण मध्य मुंबईचा जागा दत्ता सामंतांनी जिंकली. याच निवडणुकीत मुरली देवरा, गुरुदास कामत, सुनील दत्त हे काँग्रेसचं नवं नेतृत्व उभं राहिलं.
वी पी सिंग यांनी बोफोर्सवरून रान उठवून राजीव गांधींना सत्तेवरून पायउतार व्हायला लावलं. त्यातही मुंबईचा हातभार होताच. मुंबईत मुरली देवरा आणि सुनील दत्त हे दोनच काँग्रेसचे खासदार निवडून आले. बाकी भाजपचे राम नाईक आणि जयवंतीबेन मेहता तसंच शिवसेनेचे वामनराव महाडिक आणि विद्याधर गोखले निवडून आले होते.
जनता पक्ष सरकार चालवू न शकल्याने देशाने काँग्रेसला साथ दिली. त्यात मुंबईही सामील होती. दोन वर्षांपूर्वी ४ युती आणि २ आघाडी असं गणित आता उलटं झालं. भाजपचे राम नाईक, शिवसेनेचे मोहन रावले वगळता चारही खासदार काँग्रेसचेच होते.
हेही वाचाः पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?
नरसिंह रावांच्या काँग्रेसला ९६च्या निवडणुकीत देशाने नाकारलं. त्याचबरोबर मुंबईनेही नाकारलं. तीन जागा भाजपने जिंकल्या, तीन जागा शिवसेनेने जिंकल्या. तेव्हा पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी तेरा दिवसांसाठी का होईना पण पंतप्रधान बनले
१९९८च्या निवडणुकीत वाजपेयींना मुंबईतून पूर्ण पाठिंबा मिळेल, असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. मुंबईने वाजपेयींना फक्त ३ खासदार दिले. तसंच काँग्रेसलाही ३ खासदार दिले. यावेळेस वाजपेयींचं सरकार १३ महिने टिकलं.
आता मात्र वाजपेयींना मुंबईने सहापैकी पाच खासदार दिले. एक सुनील दत्त वगळता बाकीचे सगळे काँग्रेसचे उमेदवार पडले. यात किरीट सोमय्या आणि मनोहर जोशी असे नवे खासदारांचे चेहरे मुंबईने दिले.
२००४साली वाजपेयींची इंडिया काही शाईन झालीच नाही. देशभरातून काँग्रेसला आश्चर्यकारक समर्थन मिळालं. त्यात भाजप सेनेचे राम नाईक, मनोहर जोशी, जयवंतीबेन मेहता, किरीट सोमय्या असे दिग्गज दणकून पडले. एकटे मोहन रावले गिरणगावाच्या गडातून जिंकून आले.
हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसवर देशाने पूर्ण विश्वास दाखवला. त्यात मुंबई मागे नव्हतीच. मुंबईने आपले सहाच्या सहा जागांवरून काँग्रेसचा खासदार बनवून मनमोहन सिंगांचे हात मजबूत केले. नव्याने रचना झालेल्या मतदारसंघात भाजप सेनेचा एकही खासदार जिंकून येऊ शकला नव्हता.
काँग्रेसला कंटाळलेल्या देशातल्या मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पूर्ण समर्थन दिलं. आर्थिक राजधानी असलेली मुंबईही मोदींच्या विकासाच्या स्वप्नांची साक्षीदार बनली. मुंबईच्या सहा मतदारसंघांत मोदींचे सहा खासदार जिंकून आले. पण त्यापैकी एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.
आता मुंबईत होणाऱ्या मतदानात काय होणार, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण शितावरून भाताची परीक्षा करता येऊ शकेल. मुंबईत जे होतं, त्याचं प्रतिबिंब देशाच्या निकालात पडतं. त्यामुळे मुंबईच्या मतदानाचं आकलन देशाचं आकलन ठरू शकतं. मुंबईने पूर्णपणे भाजपला साथ दिली नाही, तर देशात मोदींची एकहाती सत्ता येणं अत्यंत अवघड असेल. त्यात काँग्रेसच्या जागा वाढल्या, तर तसंच देशाचं राजकारणही होऊ शकतं.
हेही वाचाः
प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?
एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)