प्रदूषणामुळे मुंबई स्वप्ननगरीचा श्वास गुदमरतोय!

१८ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. जी-२० परिषदेच्या बैठकीतही मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट जाणवलं. सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशी स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे.

रोजगाराच्या शोधात देशभरातून येणार्‍या नागरिकांना सामावून घेणारी आणि कोट्यवधी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी स्वप्ननगरी मुंबई प्रदूषणाच्या विळख्याने जर्जर होताना दिसतेय. कधी नाही इतक्या भयंकर प्रदूषणाचा सामना मुंबईकर करत आहेत.

दिल्लीला मुंबईने मागे टाकलं

देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण होत असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मागे टाकलंय. दोन्ही महानगरांची भौगोलिक स्थिती वेगवेगळी आहे. तरीही प्रदूषणाची कारणं काही प्रमाणात सारखीच आहेत. दोन्ही महानगरांमधे बेसुमार वाढत असलेली लोकसंख्या, या लोकसंख्येसाठी उभारण्यात येणारी बांधकामं आणि गाड्या प्रदूषणामधे सातत्याने भर टाकतायत.

साधारणपणे ० ते ५१ या मर्यादेत असलेला हवेचा दर्जा उत्तम आणि आरोग्यदायी समजला जातो. तर १०० निर्देशांकांपर्यंतची हवा त्यातल्या त्यात बरी समजले जाते. ही बरी हवा शोषून घेत मुंबईकर अनेक वर्ष धकाधकीचं जीवन जगत आलाय. हा निर्देशांक १०० च्या वर गेला तर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. गेल्या आठवड्यात मुंबईचा निर्देशांक तब्बल ३०० पर्यंत गेला होता.

यापेक्षाही कहर म्हणजे १३ डिसेंबरला नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या हवेचा निर्देशांक ४१० इतका नोंदवला गेला. गेल्या चार वर्षांमधे मुंबई महानगराची नोंदवली गेलेली ही सर्वात वाईट हवा आहे. लोकांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये नाहीतर श्वसनाचे विकार जडू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र जगण्यासाठीच्या संघर्षात मुंबईकरांचं या इशार्‍याकडे साफ दुर्लक्ष झालंय.

हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

कचर्‍यामुळे प्रदूषण वाढलंय

अवघ्या ६०३ चौरस किलोमीटरच्या भूभागावर वसलेल्या मुंबईत एक कोटीहून अधिक लोक दाटीवाटीने राहतात. महामुंबईची लोकसंख्या तर सुमारे दोन कोटींवर पोचली आहे. यापैकी ४० टक्के लोक झोपडपट्टीत, २० टक्के चाळीमधे, ३० टक्के सदनिकांमधे तर १० टक्के लोक रस्त्यावर राहतात. या सर्वांच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या कचर्‍यामुळे प्रदूषण आणखी वाढलंय.

मुंबईकरांना वीज आणि पाणी मुबलक आणि अखंडित मिळत असलं तरी निसर्गाने मोफत बहाल केलेली हवा शुद्ध स्वरूपात मिळत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली वाहनं आणि त्याहीपेक्षा मोठ्या वेगाने सुरू असलेली मुंबईतली बांधकामं हवा प्रदूषित करत आहेत. त्यातच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काटेकोरपणे अवलंबली जात नाही.

ठिकठिकाणच्या कचराभूमीतून उडणारे धूलिकण हवेत प्रचंड मोठं प्रदूषण निर्माण करत आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतींमधून बाहेर पडणारे धुराचे लोट मुंबईकरांच्या फुप्फुसांवर काजळी धरत आहेत.

जी-२०वर प्रदूषणाचं सावट

नुकतीच मुंबईमधे जी-२० परिषदेची बैठक पार पडली. मुंबईवर दाटलेल्या प्रदूषणाच्या ढगांचं सावट या बैठकीवरही जाणवलं. मुंबईच्या प्रदूषणामधे तेल शुद्धीकरण कारखान्यांनी मोठी भर टाकल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याचदरम्यान केला. यातल्या शुद्धीकरण कारखान्यांमधून फेकल्या जाणार्‍या धुरामध्ये सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुंबईची हवा आणखीच बिघडली आहे.

याची दखल घेत या परिषदेत अमिताभ कांत यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांमधे या तेलशुद्धीकरण कारखान्यांमधून बाहेर पडणार्‍या सल्फरडाय ऑक्साईडचं प्रमाण कमी करण्याचे उपाय योजले जातील असं सांगण्यात आलं.

या परिषदेमधे मुंबईच्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेतली गेली. अर्थात तेलशुद्धीकरणाचे कारखाने काय उपाय योजून प्रदूषण कमी करतात हातभार लावतात हे पाहावं लागेल. नाहीतर मागच्या पानावरून पुढे अशीच स्थिती राहण्याची शक्यता अधिक. याशिवाय मुंबईतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमुळे हवेतलं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय ते वेगळंच.

हेही वाचा: ‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

प्रदूषणाचे वाटेकरी

मुंबईत सध्या सागरी महामार्गासह मेट्रोचं जाळं निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. त्याचबरोबर निवासी आणि व्यावसायिक वापरासाठीच्या इमारतींचंही बांधकाम प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बांधकामांमुळे मुंबईत दररोज १४०० मे. टन कचरा तयार होतो. या कचर्‍यातले धूलिकण हवेत पसरून हवेचा दर्जा आणखीच खराब होत चाललाय.

वाहन असणं मुंबईकरांसाठी दिलासादायक गोष्ट असली तरी याच वाहनांच्या धुराचा मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणात मोठा सहभाग आहे. जवळपास ३० टक्के हवा ही वाहनांच्या धुरामुळे खराब होते. त्यानंतर जैवइंधनाचा वाटा २० टक्क्यांचा आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे १८ टक्के, तर धुळीमुळे १५ टक्के हवा खराब होते.

मुंबईत या घडीला ४३ लाख वाहनं हवेत धूर सोडत असतात. लवकरात लवकर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणं हा मोठा उपाय असल्याचं अमिताभ कांत म्हणतात. ही प्रक्रिया मोठी आहे. या इलेक्ट्रिक वाहनांसाठीची चार्जिंग व्यवस्था आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा हे मोठं आव्हान आहे. ते कशा रीतीने पेलणार याचा निश्चित असा आराखडा कोणत्याही यंत्रणेकडे नाही.

आरोग्यावर गंभीर परिणाम

या खेपेला प्रदूषणात प्रचंड वाढ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तापमान वाढ. भूमध्य समुद्रात झालेल्या निर्माण झालेल्या तापमानवाढीचा परिणाम देशाच्या पश्चिम भागावर होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबई शहरावरून वाहणार्‍या  खार्‍या वार्‍याचा वेग मंदावला आहे.

एरवी वार्‍याच्या वेगाबरोबर हवेतले धूलिकण शहराबाहेर वाहून नेले जातात. पण संथ गतीच्या वार्‍यामुळे हे कण शहरावर असलेल्या हवेच्या आच्छादनात तसेच अडकून राहतात. हवेच्या दर्जावर सातत्याने लक्ष ठेवून असणारी संस्था सफरचे संस्थापक डॉ. गुफ्रान बेग यांच्यामते, ही स्थिती आगामी काही वर्षांमधे तशीच राहण्याची शक्यता आहे.

या खालावलेल्या हवेमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः श्वसनाचे विकार जडू शकतात. अशी भीती 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' या संस्थेचे संशोधक डॉ. अंजल प्रकाश यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा: इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

मेट्रो प्रकल्पासाठी वृक्षतोड

विकासाच्या नावाखाली मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वसईतल्या तुंगारेश्वर अभयारण्यातल्या १२५ हेक्टरचं जंगल तोडण्यात येतंय. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी सुमारे ४० हजार कांदळवनांची कत्तल होणार आहे. मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि अनेक ठिकाणी असलेले वनक्षेत्र हे शहराच्या फुप्फुसाप्रमाणे काम करतं. त्यावरच घाला घातला जातोय.

मेट्रो प्रकल्पासाठी आरेतली २१०० आणि शहरातली ५००० झाडं तोडली गेली आहेत. या झाडांच्या बदल्यात मोकळ्या आणि दलदलीच्या ठिकाणी वृक्ष लागवड हाती घेण्यात येणार असल्याचं संबंधित यंत्रणांनी जाहीर केलं होतं. पण ही झाडं तग धरून मोठी होईपर्यंत वर्षानुवर्ष वाट पाहावी लागेल. तोवर होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाचं काय, असा गंभीर प्रश्न या दरम्यान उभा ठाकणार आहे.

मुंबईतल्या सर्वच्या सर्व मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर खासगी वाहनांचा वापर कमी होईल अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा वाढवूनही खासगी वाहनांचं प्रमाण कमी झालेलं नाही.

प्रदूषण मोठं, उपाय तोकडे

मुंबईत सध्या घरांसाठीची बांधकामं प्रचंड मोठ्या वेगाने सुरू आहेत. असं असलं तरी मुंबईत गगनचुंबी बांधकामं ठरावीक भागातच आहेत. एका अर्थाने मुंबई आडवी फोफावली आहे. त्यामुळे ती उभी वाढायला प्रचंड वाव आहे. भविष्यात गगनचुंबी बांधकामांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू शकते. हे लक्षात घेतलं तर बांधकामापासून तयार होणारा कचरा भयंकर पद्धतीने वाढू शकतो. त्यावर कोणतीच उपाययोजना सद्यस्थितीत तरी अस्तित्वात नाही.

हा कचरा रोखायचा कसा हाच मुळात मोठा गहन प्रश्न आहे. मुंबईच्या सर्व भागांमधे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या तर लोकसंख्या तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि लोकसंख्या वाढली तर प्रदूषणही तितक्याच मोठ्या प्रमाणावर वाढेल हे वेगळं सांगायची गरज नाही. एकंदर परिस्थिती पाहता, प्रदूषण मोठं आणि त्यावरचे उपाय तोकडे अशीच स्थिती आहे. जी नागरिकांच्या जिवाशी खेळणारी आहे.

हेही वाचा: 

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात?

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

(साभार - पुढारी)