कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

०९ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मुस्लिम महिला एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसल्या. आता तबलीगी जमात प्रकरणातही महिलांनी उघडपणे बोललं पाहिजे. आपल्या कुटुंबपुरुषांना रोखलं पाहिजे. वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का?

वायरसही सही
घरही जलाने के  लिए आ
आ फिरसे मुझे तोड के
जाने के लिए आ…

शायर अहमद फराज आणि गायक मेहदी हसन यांची क्षमा मागून या ओळी लिहिल्यात खऱ्या. पण त्यांनी कोणाचं मन किती बदलवेलं हे सांगता येत नाही. भांडण झालं असलं तरी पुन्हा एकदा माझ्या मनावर घाव घालायला येते ना, असं आर्जव करणारा अहमद फराज यांचा प्रियकर भारतात तरी  पुरता घायाळ झालाय. एकीकडे एक राजकीय संकट तर दुसरीकडे धार्मिक.

राजकारण नको, फक्त इस्लामकडे लक्ष द्या

नागरिकत्वाचा पहिला घाव सहन करतो ना करतो तोच दिल्लीतल्या दंगलीचा घाव. आता तिसरा वार दिल्लीमधूनच केला जावा एवढा मोठा घात! काय म्हणावं, घात की आत्मघात? आत्मघातच तो. परंतु ज्याने तो केला किंवा करवला त्याचा त्याला पत्ता नसावा हा आणखी केवढा मोठा घाव! पेपर वाचू नका, टीवी पाहू नका, राजकारणाकडे दुर्लक्ष करा पण फक्त इस्लामकडे लक्ष द्या म्हणून पढवलेले लोक त्याचीच उजळणी करत देशभर हिंडतात. त्यांना कशाचीच फिकीर नसते. ना असते कशाची खबर. अल्लाची सेवा करताना कशाची चूक झाली म्हणून एवढा डोंब उसळला याचं कोडं त्यांना कधी उमगेल, कोण जाणे.

कार्ल मार्क्सनं फार वेगळ्या दृष्टीनं धर्माचं अफू म्हणून वर्णन केलंय. दुःख विसरायची ती हतबलांची खुंटी असते. म्हणून ती अफू खाऊन गरीब, शोषित दुसऱ्या जगात जाऊ पाहतात, असा त्याचा अदमास. परंतु तबलीगी जमातचा धर्म असा विसर पाडू शकणारी गुंगी आहे का? दुय्यम, दुःखी आणि दुरित यांना वास्तवापासून दूर नेऊन गुंग करणारा?

हेही वाचा : तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

मुस्लिम बायका संतापतील?

मला एक भाबडी आशा होती, की या कट्टर पुरुषांमुळं आपला धर्म आणि आपलं गाव बदनाम झाल्याचं बघून या पुरुषांच्या घरातल्या बायका संतापतील, थयथयाट करतील. पुन्हा घराबाहेर जायला मज्जाव करतील. पण थोडी विचारपूस केल्यावर कळलं की, या कट्टर पुरुषांच्या घरातल्या बायका त्यांच्याएवढ्याच कर्मठ आणि आठमूठ असतात. आता त्यांच्या मनात खरं काय ते कसं कळणार म्हणा!

काहीजणी असतीलही धुसफुसत. कदाचित कानावर काही पडलंही असेल वेडंवाकडं. घरात पेपर किंवा टीवी असला तर चूकबरोबर करता आलं असतं. पण घरात या बायका आणखी दुय्यम, दुःखी आणि दुरित! यांचं मत कोण विचारात घेणार? बुरखा घाल म्हटलं की घालायचा. शादी कुबुल म्हटलं की कुबुल म्हणायचं?

दोनतीन महिने घराबाहेर जाणारा, इस्लामचा प्रचार करणारा आपला कुटुंबपुरुष एवढ्या मोठ्या रोगराईला देशभर जबाबदार धरला जातो म्हणून या माऊल्या गदगदल्या असतील का? नक्कीच काही जणी कावऱ्याबावऱ्या झाल्या असणार. काहींना त्यांच्याचपैकी जरा उच्चभ्रुंचा फोन आलेला असणार. ये कैसे हुआ, क्यूं हुआ, किन लोगों ने किया असे प्रश्न मनाला पडलेच असणार. दिल्ली एकच असून किती वेगवेगळ्या रितीनं अशी वैरीण झाली ती, असं पुटपुटलं असेल का कुणी? कसल्या कठीण परीक्षा घेतोय अल्ला, असा सवाल एकीला तरी पडला असेल का?

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

बिगर तबलीगी महिला तरी बोलल्या का?

पण याच मुस्लिम बायका तीन तलाकला बंदी घालून त्याला गुन्हा ठरवणारा कायदा झाला तेव्हा काही बोलल्या नव्हत्या. म्हणजे झालं ते बरंच झालं, असाच ना त्याचा अर्थ! खुद्द पंतप्रधानांनी माझ्या मुस्लिम भगिनींसाठी हा कायदा करतोय, अशी ग्वाही दिलेली. ती तरी त्यांच्या कानापर्यंत पोचली असेल ना? राम मंदिराची उभारणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार आता होईल. बाबरी मशिदीचा प्रश्न मिटलाय, हे तरी या माऊलींच्या कानावर पडलं असेल ना? काश्मीर, पाकिस्तान, दहशतवाद हे काही तिच्या आसपासचे आणि तिच्या मनाला उमगतील, असे प्रश्न नसणार. तसे ते फार गुंतागुंतीचे आणि फार जुनाट आहेत.

तबलीगी मुसलमान आणि बिगर तबलीगी मुसलमान वेगवेगळे आहेत. जसं संघाच्या शाखेत जाणारे आणि शाखांना विरोध असणारे हिंदू भिन्न आहेत तसं. निदान अशा बिगर तबलीगी घरातल्या महिला तरी उघडपणे काही बोलत असतील का? उच्चवर्गीय, शहरी आणि उच्चशिक्षित महिलांनी लेख लिहून आपल्या भूमिका स्पष्ट केल्यासुद्धा. इतकंच काय पाकिस्तानातल्या डॉन दैनिकात कॉलम लिहिणाऱ्या महिलांनी धर्म आणि जीवन यांचं विलगीकरण केल्याचं वाचनात आलं. कारण पाकिस्तानातही अशाच एका जमातीनं कोरोना फैलावल्याचा आरोप झालाय. तिथे भला मोठा इज्तेमा पार पडला होता.

हेही वाचा : दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

आता मुस्लिम पुरुषांना सांगायची वेळ आलीय

५  एप्रिलच्या डॉनच्या अंकात पोलिओमुळं सिंध प्रांतात ३ वर्षांचा एक मुलगा आजारी पडल्याची एक बातमी आलीय. देशात म्हणजे पाकिस्तानात, यंदाच्या वर्षी पोलिओग्रस्तांची संख्या ३७ झाल्याचं ही बातमी सांगते. गेल्यावर्षी असे १४६ रुग्ण सापडले. २०१८ मधे ते फक्त १२ होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोनच देश सतत पोलिओग्रस्त असतात. चीन, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, पापुआ न्यूगिणी इथंही  काही रुग्ण आढळलेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथे पोलिओची लस द्यायला कट्टर मुसलमानांचा विरोध असतो. तालिबान तर आरोग्य सेवकांवर हल्लेच करतो. तरीही दोन्ही  देश ९० टक्के पोलिओमुक्त आहेतच की. कारण तिथल्या मातांना, महिलांना पोलिओचा वायरस आपल्या मुलांना अपंग करू नये असं वाटतं.

आता वायरस कोणताही असो, त्याने अपाय करू नये असं वाटतं तर त्याविरुद्ध बोलायला नको का? यासाठी मुस्लिम महिलांनी मुस्लिम पुरुषांना काही सांगायची वेळ आलीय.

हेही वाचा : 

पॅथॉलॉजीविषयी: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

लाॅकडाऊननंतर कोणता प्लॅन उभारण्याची गरज रघुराम राजन यांना वाटतेय?

भारताची इटली बनायला निघालेल्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉ़डेल बनवलं

(जयदेव डोळे हे माध्यम अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक आहेत.)