डॉ. स्वाती मोहन : मंगळावर रोवर लँड करणारी भारताची लेक

२३ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा केली त्या होत्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन. गेली ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. 

लहानपणी आपली काहीना काही स्वप्न असतात. काही पूर्ण होतात. काही अपूर्ण राहतात. हे कोवळं वय खरंतर मजा मस्ती करायचं असतं. धावायचं, पळायचं, पडायचं असतं. पण हेच जग आपल्याला नवी नजरही देतं. आजूबाजूला दिसतंय, घडतंय त्याबद्दल कुतूहल निर्माण करतं. आयुष्याला आकार देतं. अशावेळी आपली स्वप्न स्वप्न राहत नाहीत. त्या दिशेनं चालायला आपण सुरवात करतो. आपण धडपडतो. स्वप्नांचा पाठलाग करत आपला शोध सुरू होतो. एक नवं जग शोधण्याचा.

डॉ. स्वाती मोहन भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक. बालपणातल्या एका टर्निंग पॉईंटमुळे अंतराळातल्या जगानं त्यांना खुणावलं. त्यांना प्रश्न पडायचे. त्या प्रश्नांची उत्तरं त्या स्वतःच शोधायचा प्रयत्न करायच्या. खूप सारं वाचायच्या. शेवटी या कुतूहलानंच त्यांना नासासारख्या अंतराळ संशोधन संस्थेत पोचवलं. मंगळावरच्या मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधायचा प्रयत्न नासा करतंय. या मोहिमेत भारताच्या या लेकीनं महत्वाची भूमिका बजावलीय.

नासाचं मार्स पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळ ग्रहाच्या जेझिरो विवरात उतरलं आणि एकच जल्लोष झाला. ते लँड झाल्याची घोषणा केली ती डॉ. स्वाती मोहन यांनी. मंगळावरच्या जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल ठरेल. त्यासोबतच या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वाती यांचं नावंही इतिहासात नोंदवलं गेलंय.

हेही वाचा : चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

एका सिरीजनं कुतूहल वाढवलं

स्वाती मोहन यांचा जन्म दक्षिण भारतातल्या कर्नाटकमधल्या बंगळुरूचा. त्या एक वर्षाच्या असताना त्यांचं कुटुंब भारतातून अमेरिकेत स्थायिक झालं. व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन डीसीत बालपण गेलं. वॉशिंग्टन डीसीमधे सुरवातीचं शिक्षण झालं. स्टार ट्रेक अमेरिकेतली विज्ञानावर आधारित मनोरंजन करणारी एक सिरीज आहे. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी या स्टार ट्रेकमधल्या एका एपिसोडनं त्यांच्यावर भुरळ घातली.

स्टार ट्रेकचा एक एपिसोड पाहत असताना अंतराळातल्या एका चित्रानं त्यांना आपल्याकडे ओढलं. हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. अंतराळातल्या अद्भुत जगानं त्यांच्या मनात कुतूहल निर्माण केलं. त्या वेगवेगळे फोटो पाहत रहायच्या. याच फोटोंनी त्यांना खगोलशास्त्रासाठी वरदान ठरलेल्या 'हबल स्पेस टेलिस्कोप' या नासाच्या अंतराळ दुर्बिणीची ओळख करून दिली.

शाळेत असतानाच अंतराळ क्षेत्रात करियरचा निर्णय पक्का झाल्याचं त्यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. पण बालपणी शास्त्रज्ञ नाही तर लहान मुलांचा डॉक्टर व्हायचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. अंतराळातल्या गोडीमुळे नोकरी मिळेल का याबद्दल त्यांना शंका वाटायची. हेच त्यामागचं खरं कारण होतं.

जगाच्या ओढीने नासात पोचवलं

वयाच्या १६ व्या वर्षी त्या फिजिक्सकडे वळल्या. चांगले शिक्षक मिळाले. त्यांची सोबत मिळाली. मार्गदर्शनही मिळालं. त्यामुळेच अवकाश संशोधन क्षेत्रात करियरची संधी त्यांना दिसू लागली. त्यासाठी त्यांनी इंजिनियरिंगचा मार्ग निवडला. २००० ला कॉर्नेल युनिवर्सिटीत प्रवेश घेतला. या युनिवर्सिटीतुन मॅकेनिकल आणि अवकाश या विषयात बीएसची डिग्री घेतली.

तर २०१० ला एमआयटीमधून वैमानिक आणि अंतराळवीर यात एमएस आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. डॉक्टर व्हायचं स्वप्न वेगळ्या अर्थाने का होईना पण पूर्ण झालं. त्या अंतराळ वैज्ञानिक बनल्या. अंतराळ आणि नासा हे एक घट्ट समीकरण आहे. स्वाती त्याचाच एक भाग बनल्या.

शनी आणि चंद्राच्या कॅसिनी आणि ग्रेल या मिशनसाठी त्यांनी नासामधे काम केलं. त्या कामामुळेच स्वाती यांना मंगळच्या पर्सिवरन्स मिशनमधे महत्त्वाची जबाबदारी मिळाली. सर्वसामान्य माणसांना माहीत नाहीत अशा जगभरातल्या जागा आपल्याला पहायच्यात, समजून घ्यायच्यात, असं स्वाती यांनी नासाच्या आपल्या प्रोफाइलमधे म्हटलंय.

हेही वाचा : गावाकडच्या मराठी पोराचा चांद्रयान २ मोहिमेत सहभाग

नियंत्रण आणि लँडिंगचं नेतृत्व

मंगळ ग्रहावरच्या विषुववृत्ताच्या जेझिरो नावाच्या खोल विवरात पर्सिवरन्स रोवर १८ फेब्रुवारीला उतरवण्यात नासाच्या टीमला यश आलं. त्याची सगळ्यात पहिल्यांदा जगाला माहिती स्वाती मोहन यांनी दिली. रोवरच्या मार्गदर्शन, नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिवाय त्याचं लँडिंग होत असताना प्रत्येक अपडेट द्यायचं कामही त्यांनी केलं. 

रोवर जेझिरो विवरात उतरत असताना 'रोवर पूर्णपणे सुरक्षित असून मंगळ ग्रहावरच्या जीवसृष्टीचे पुरावे शोधण्यासाठी तयार आहे.' अशी घोषणा डॉ. स्वाती मोहन यांनी केली. आणि एकच जल्लोष झाला. गेले ८ वर्ष त्या या प्रोजेक्टवर काम करतायंत. हा प्रोजेक्ट २०१३ ला सुरू झाला. या सगळ्या प्रक्रियेचा भाग बनणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती.

फ्लोरिडा टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, 'पर्सिवरन्ससाठी मी जितका वेळ दिलाय तितका वेळ मी शाळेतही गेली नाहीय. माझ्या छोट्या मुलीच्या वयापेक्षा अधिक वेळ मी पर्सिवरन्सला दिला. हा माझ्या आयुष्याचा मोठा भाग बनलाय.' यशस्वी मोहिमेऐवजी अयशस्वी प्रयत्नातून आपण जास्त शिकत जातो, असं बीबीसीशी बोलताना त्यांनी जगापर्यंत संदेश पोचवलाय. भारताशी असलेलं त्यांचं नातंही अतूट आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण भारतात येत असल्याची आठवणही त्या सांगतात. अनेक रिसर्च पेपर त्यांच्या नावावर आहेत.

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

पर्सिवरन्सकडे जगाच्या नजरा

जगाच्या नजरा नासाच्या मार्स रोवर पर्सिवरन्सकडे लागल्या होत्या. कारण मंगळावरच्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी नासाची महत्वाकांक्षी मोहिम होती. जुलै महिन्यात हा रोवर अवकाशात झेपावला. मागच्या सात महिन्यात या रोवरनं ४७२ मिलियन किलोमीटर म्हणजेच ४७.२ कोटी किलोमीटर इतकं अंतर पार केलंय. १९ हजार किलोमीटर ताशी वेगानं हा रोवर अपेक्षित स्थळापर्यंत पोचलाय.

आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा आणि विकसित रोवर आहे. रोवरचं लँडिंग होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. कारण आजपर्यंत केवळ अर्धीच मिशन मंगळावर पोचण्यात यशस्वी झालीत. त्यामुळे रोवर पर्सिवरन्सचं यशस्वी लँडिंग होणं ही खूप आशादायी गोष्ट होती. डॉ. स्वाती मोहन यांचं टीम वर्क यशस्वी झालं. पुढची काही वर्ष हा रोवर मंगळावरचे दगड, मातीचे नमुने गोळा करेल. २०३० पर्यंत हे नमुने नासाच्या प्रयोगशाळेत तपासले जातील.

या जगात केवळ आपण एकटेच आहोत का या प्रश्नाचं उत्तर शोधायचा हा प्रयत्न असल्याचं नासाचे असोसिएट ऍडमिनिस्ट्रेटर थॉमस त्सुरबुखेन म्हणतात. रोवरची अनेक वैशिष्ट्य आहेत. यात १९ कॅमेरे आहेत. एका कॅमेऱ्यानं नासाला मंगळावरच्या प्राचीन तलावाचे फोटोही पाठवलेत. यात एक छोटासा हेलिकॉप्टर ड्रोनही बसवण्यात आलाय. मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उडवायची ही योजना ऐतिहासिक आहे. हे पहिल्यांदाच घडतंय.

रोवरमधे एक असंही यंत्र बसवण्यात आलंय जे मंगळावर अस्तित्वात असलेल्या सध्याच्या कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमधे बदलू शकतं. भविष्यात मंगळावर मानवी वस्ती उभी राहिली तर ऑक्सिजनची गरजही पूर्ण होईल अशी ही योजना आहे. रोवरला जोडलेल्या मायक्रोफोनद्वारे तिथला आवाज रेकॉर्ड केला जाईल. आजपर्यंत ४ रोवर मंगळावर उतरवले गेलेत. पण त्यातल्या तंत्रज्ञानाचं स्वरूप मर्यादित राहिलंय. आताच रोवर पर्सिवरन्स मात्र इतरांपेक्षा वेगळा आहे. तितकाच अत्याधुनिक आणि प्रगतही. 

हेही वाचा : 

राकेश शर्मांच्या बायोपिकमुळे बॉलीवूडमधे नवी ‘स्पेस’?

बेजान दारूवाला ग्राहकांना न आवडणारं भविष्यही सांगायचे

आदिम हिंदू महासंघाने कुंडल्या कचराकुंडीत का टाकल्या?

जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!