मिशन डार्ट: पृथ्वीचं सुरक्षा कवच, नासाची अवकाश मोहीम

२८ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाला २७ सप्टेंबरला पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या डिमॉर्फस या लघुग्रहाची दिशा बदलण्यात यश आलंय. नासाच्या 'मिशन डार्ट' या अवकाश मोहीमेनं ही यशस्वी कामगिरी केलीय. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ कोटी किलोमीटरवर होता. भविष्यात असे लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतात. अशावेळी नासाच्या 'मिशन डार्ट'ची भूमिका महत्वाची असेल.

२७ सप्टेंबर. आपण सगळेच भारतीय साखरझोपेत असताना तिकडं अमेरिकेत एक वेगळाच इतिहास रचला जात होता. नासा ही अमेरिकेतली महत्वाची अवकाश संशोधन संस्था आहे. याच नासानं गेल्यावर्षी 'डबल ऍस्ट्रॉयड रीडायरेक्शन टेस्ट' अर्थात 'मिशन डार्ट' ही महत्वाकांक्षी अवकाश मोहीम हाती घेतली होती. २७ सप्टेंबरला डिमॉर्फस नावाच्या लघुग्रहाला टक्कर देऊन नासाला आपली मोहीम फत्ते करण्यात यश आलंय.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

असंय नासाचं मिशन डार्ट

अमेरिकेतल्या नासा आणि जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी अप्लायड फिजिक्स लॅबोरेटरी या संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने डार्ट ही मोहीम राबवली गेलीय. पृथ्वीच्या जवळपास असलेल्या लघुग्रहांपासून पृथ्वीचं संरक्षण करणं हा या मोहिमेचा महत्वाचा उद्देश आहे. धूमकेतू, लघुग्रह आणि पृथ्वीवरच्या संभाव्य धोक्यांची यादी तयार करण्याचं काम नासाचं 'प्लॅनेटरी डिफेन्स ऑर्गनायझेशन' करत असते. याच संस्थेची 'मिशन डार्ट'साठी मोठी मदत झालीय.

ऑगस्ट २०१८ला 'मिशन डार्ट'साठी नासाने एक डिझाईन तयार केलं. त्याला परवानगीही मिळाली. त्यावर काम सुरू झालं. मधल्या काळात युरोपियन स्पेस एजन्सी, इटालियन स्पेस एजन्सी, जपानच्या ऍरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांचीही वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत घेतली गेली. पुढं तीनेक वर्षांत आलेल्या छोट्या मोठ्या अडचणींवर मात करत २४ नोव्हेंबर २०२१ला 'डार्ट' अंतराळयान ऍलन मस्क यांची कंपनी असलेल्या स्पेसएक्सच्या रॉकेटमधून अवकाशात झेपावलं.

अंतराळयान अवकाशात झेपावण्याआधी डिमॉर्फस या लघुग्रहाच्या आजूबाजूचं वातावरण, माती, हवा, तिथले दगड यांचा नीट अभ्यास करण्यात आला होता. सगळी खातरजमा केल्यावर तब्बल १० महिन्यांनी ही मोहीम फत्ते करण्याच्या दृष्टीने पाऊल पडलं. २७ सप्टेंबर २०२२ला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४.४५ला 'डार्ट' अंतराळयान डिमॉर्फस लघुग्रहावर जाऊन आदळलं. अंतराळ क्षेत्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीतला हा महत्वाचा पल्ला होता.

मोठ्या लघुग्रहांपासून पृथ्वीला धोका

खरंतर सूर्यमालेतले बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरूच्या दरम्यान असलेल्या मुख्य पट्ट्यात फिरत असतात. ते कधीही पृथ्वीच्या जवळ येत नाहीत. पण गुरुत्वाकर्षणामुळे यातले काही मार्ग बदलण्याच्या स्थितीत असल्याचं खगोलशास्त्रज्ञांना वाटतंय. असे लाखो लघुग्रह आहेत. नासाने अशा १० लाख लघुग्रहांची नोंद केलीय. सध्यातरी त्यांचा धोका नसला तरी १९०८मधे सायबेरियात एक घटना घडली होती. ४० मीटर लांब असलेली उल्का पृथ्वीच्या वातावरणातून जात असताना एका जंगलात पडली. जंगल उध्वस्त झालं. तर रशियातल्या चेल्याबिन्स्क इथं २०१३ला उल्का पडल्यामुळे नागरिक जखमी झाले होते. 

डिडिमॉस हा एक मोठा लघुग्रह आहे. त्याचा शोध १९९६ला अमेरिकन शास्त्रज्ञ जोसेफ मॉँटनी यांनी लावला. डिडिमॉस ७८० मीटर लांबीचा आहे. तर १६० मीटर लांबीचा डिमॉर्फस लघुग्रह ही त्याची छोटी आवृत्ती आहे. डिमॉर्फसला याआधी  'डिडीमून' या टोपणनावानं ओळखलं जायचं. डिमॉर्फसला डिडिमॉसभोवती फिरायला ११ तास ५५ मिनिट लागतात. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीपासून जवळपास १.१ मिलियन किलोमीटरवर आहे. 

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीजवळ सुमारे २५ हजार लघुग्रह आहेत. नासाचं ओसिरिस रेक्स नावाचं अंतराळयान नुकतंच बेन्नू नावाच्या लघुग्रहापाशी गेलं होतं. मोठ्या इमारतीच्या आकाराचा हा लघुग्रह आहे. तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसली तरी सावध रहायला हवं. लहान लघुग्रह नुकसान करणारच नाहीत या भ्रमातही रहायला नको असं नासाच्या शास्त्रज्ञांना वाटतंय. चिली देशाचा वेरा रुबिन ऑब्झर्वेटरी आणि नासा काम करत असलेला निओ सर्विवर या दुर्बिणींमधून पुढच्या काळात पृथ्वीच्या जवळ असलेल्या आणि धोकादायक ठरणा-या लघुग्रहांचा शोध घेतला जाईल.

हेही वाचा: चांद्रयान २: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

डार्टमधलं टेक्निक कसं होतं?

डार्ट अंतराळयानाचं वजन ५७० किलोग्राम इतकं आहे. २२,५३० किलोमीटर ताशी वेगाने हे यान डिमॉर्फस लघुग्रहाला जाऊन आदळलं. ते आदळण्याच्या ११ सेकंदआधी ६८ किलोमीटरवरून यातल्या डॅक्रो कॅमेऱ्यातून त्याचे फोटो घेणं शक्य झालंय. हे अंतराळयान बनवण्यासाठी जवळपास ३२४ मिलियन डॉलर इतका खर्च आलाय.

डिमॉर्फसचं निरीक्षण करण्यासाठी म्हणून या डॅक्रो कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलाय. त्यातून लघुग्रहाची दिशा नेमकी कशी बदललीय याचा अंदाज घेणं शक्य होईल. अवकाशात अनेक देशांच्या जवळपास डझनभर दुर्बिणी आहेत. यात नासाच्या हबल आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचाही समावेश आहे. पुढच्या काळात या दुर्बिणींचा वापर करून लघुग्रहांचा निश्चित असा अभ्यास करता येणं शक्य होईल.

नासानं ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 'कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निक'चा वापर केलाय. जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी अप्लायड फिजिक्स लॅबोरेटरीमधून या यानावर लक्ष ठेवलं जात होतं. नासाकडून याचं लाइव प्रक्षेपणही करण्यात आलं होतं. डिमॉर्फस लघुग्रहाला डार्ट यानाने लक्ष्य केलं आणि त्याची दिशा बदलल्याचं लक्षात येताच नासाच्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. टाळ्या वाजवल्या. एकमेकांचं अभिनंदन केलं गेलं. त्याचं कारणंही तसंच खास होतं.

पृथ्वीला मिळतंय सुरक्षा कवच

लाखो वर्षांपूर्वी आपल्याकडे डायनासोर अस्तित्वात होते. पण असं म्हटलं जातं की, पृथ्वीवर आदळलेल्या धूमकेतूंमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं. पुढं डायनासोरची प्रजातीच नष्ट झाली. असाच फटका पुढच्या काळात इथल्या मानवी संस्कृतीलाही बसू शकतो.

नासाला पृथ्वीच्या आसपास ८ हजार लघुग्रह आढळून आलेत. आजच्या घडीला हा आकडा छोटा वाटत असला तरी तो पृथ्वीचं अस्तित्वच संकटात आणणारा आहे. त्यामुळे 'मिशन डार्ट' पृथ्वीसोबत अवकाश संशोधन क्षेत्राला अधिकचं सुरक्षित कवच देणारी योजना ठरू पाहतेय. त्यामुळेच या मोहिमेची जगभरात चर्चा होतेय. ही मोहीम ऐतिहासिक आणि अवकाश संशोधनातला एक महत्वाचा टप्पा मानली जातेय त्याचं हेच कारण आहे.

डिमॉर्फस लघुग्रहाची दिशा बदलण्यात आलेलं यश हे नासाच्या 'मिशन डार्ट'ची महत्वाची उपलब्धी आहे. त्यामुळे डिमॉर्फसला डिडिमॉसभोवती फिरायला लागणारा वेळही आता कमी होईल. आपल्या पृथ्वीच्या आसपास मोठ्या प्रमाणात लघुग्रहांची असलेली रेलचेल भविष्यात धोक्याची ठरू शकते. अशावेळी त्यांची दिशा बदलली गेली किंवा ते पृथ्वीवर आदळण्याआधीच त्यांना नष्ट करता आलं तर मोठं संकट टळेल. त्यामुळेच 'मिशन डार्ट' पृथ्वीचं संरक्षण करण्याचा विज्ञानानं दाखवलेला एक मार्ग असल्याची भावना नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी नासाच्या प्रेस रिलीजमधून व्यक्त केलीय.

ही मोहीम इथंच थांबलेली नाही. पुढच्या काळात अनेक अवकाश संशोधन संस्था आपल्या कार्यक्रमांची आखणी करू इच्छितात. युरोपियन स्पेस एजन्सीची चारेक वर्षात डार्टसारखी ३ अंतराळयानं अवकाशात झेपावतील. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आलीय. डिडिमॉस, डिमॉर्फस लघुग्रहांचा अभ्यास करणं त्यांचा महत्वाचा उद्देश असेल. ऑक्टोबर २०२४ मधे ही अंतराळयानं लॉन्च केली जातील. 'मिशन हेरा' असं मोहिमेचं नावही निश्चित करण्यात आलंय.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ