नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?

१२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


नागपूरमधे २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्के मतदान जास्त होताना दिसतंय. आता कोणतीही लाट नसताना इतकं मतदान बुचकळ्यात पाडणारं आहे. नितीन गडकरींच्या विकासाच्या प्रेमात पडून शहरी मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलंय की या विकासापासून दूर असणाऱ्या वंचितांनी नाना पटोलेंना मतदान करून आपला निषेध नोंदवलाय?

आज नागपूरचं मतदान भलत्याच गोष्टींमुळे गाजत राहिलं. न्यू इंग्लिश स्कूलच्या मतदान केंद्रावरच्या उमेदवार यादीत भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या नावावर कुणीतरी निळ्या शाईने रिजेक्टेड असे स्टॅम्प मारलेले होते. त्याच्या टीवीत खूप बातम्या झाल्या. अर्थात तो चर्चेचा विषयही बनला.

वेळ संपली, तरी मतदान सुरूच

दुसरीकडे धरमपेठ स्कूलच्या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवेळेप्रमाणे मतदानाला गेले. पण तिथल्या वीवीपॅट यंत्रातच बिघाड झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तासभर ताटकळत राहावं लागलं, अशी बातमी एबीपी माझाने दिलीय.

मतदान यंत्रांच्याही तक्रारी आल्या. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. पण तो मतदान यंत्रणेला हाताशी धरून कुणी आपल्या विरोधात कुरापती करू नयेत, यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न वाटला.

हेही वाचाः जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWFका खेळले?

कारण नागपुरात मोठमोठ्या रांगात मतदान होताना दिसलं. लोकांनी सकाळी उन्हं येण्याच्या आधी मतदान करून घेतलं. कारण दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला. उन्हं उतरल्यावर मात्र पुन्हा मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. त्यामुळे मतदानाचा ६ वाजता वेळ संपला आणि केंद्राचे मुख्य दरवाजे बंद केल्यानंतरही आत मतदान सुरूच राहिलं. काही ठिकाणी मतदान यंत्रातल्या बिघाडांमुळे मतदानाची वेळ वाढवून मिळाली.

२०१४च्या तुलनेत मतदान वाढलं

त्यामुळे नागपुरातल्या मतदानाचा अंतिम आकडा हातात यायला बराच उशीर होण्याची शक्यता आहे. नागपूर मतदारसंघातलं संध्याकाळी ५ वाजताचं मतदान ५३.१३ टक्के इतकं झालं. त्यात उशिरा होऊ शकणारं मोठं मतदान जोडलं, तर मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज साठ टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

२०१४ला नागपूरमधे ५७.१२ टक्के मतदान झालं होतं. यंदाचं मतदान हा आकडा नक्की पार करेल, असं दिसतंय. साधारण तीन टक्के मतदान वाढलेलं असेल. नागपुरातला कडक उन्हाळा पाहता, मतदारांनी दाखवलेला उत्साह काबिले तारीफच म्हणायला हवा. समजा ते न वाढता मागच्या वेगळेइतकं राहिलं, तरी ते वाढलेलंच मानायला हवं. कारण यावेळेस कोणतीही लाट दिसत नव्हती.

हेही वाचाः सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?

२००९ला अवघं ४३ टक्के मतदान झालं होतं. त्या तुलनेत या दोन निवडणुकांतलं मतदान खूपच वाढलंय. २०१४ला वाढलेलं मतदान हे काँग्रेसच्या विरोधातला राग होता, हे निकाल आल्यावर स्पष्टच झालं होतं.

कुंपणावरचा मतदार महत्त्वाचा

ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे कोलाजशी बोलताना म्हणाले, `मी कालच लिहिलं होतं, कुठलीही लाट नसताना मतदान वाढलं, तर त्याचा अर्थ असा काढावा लागेल की मतदार संभ्रमित आहे. दुसरा अर्थ असा आहे की मतदारांनी निर्णय घेतलाय पण ते काहीच बोलायला तयार नाहीत.`

पांडे यांच्या मते कुंपणावरचा म्हटला जाणारा मतदार अशा परिस्थितीत निर्णायक ठरतो. ते सांगतात, `साधारणपणे भाजप आणि काँग्रेस या दोघांचाही ३०-३२ टक्के मतदार कमिटेड आहे. पण कुणाच्याही बाजूने बांधिल नसलेला मोठा मतदार आहे. त्याचं मतदान वाढलेल्या टक्केवारीत फारच महत्त्वाचं ठरू शकेल.`

वाढलेलं मतदान प्रस्थापितांच्या विरोधात?

पत्रकार महारुद्र मंगनाळे यांनी लेख लिहून नितीन गडकरी पराभूत होतील असा दावा केला होता. ते आजही आपल्या मतावर ठाम आहेत. ते सांगतात, `लोकांचा गडकरींच्या विरोधातला असंतोष प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्पष्ट दिसत होताच. मागच्या वेळेस मोदी लाट होती. म्हणून मतदानाची टक्केवारी वाढली होती. आता कोणती लाट आहे? आता असेल तर ती नाना पटोलेंचीच लाट असू शकते.`

हेही वाचाः नागपुरात नितीन गडकरींना धक्का बसण्याची शक्यता कशामुळे?

वाढलेलं मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधात असतं, असं सर्वसामान्यपणे मानलं जातं. मंगनाळेंचा दावा त्याला धरूनच आहे. २०१४च्या निवडणुकांमधे मोदी लाट होती. तेव्हा भाजपने आपल्या संघटनेची सर्वाधिक ताकद दाखवली होती. आता तसं काही नसताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढलीय. 

मात्र आपल्या मतदाराला केंद्रापर्यंत नेतो, तो जिंकतो. काँग्रेसच्या तुलनेत अशी यंत्रणा भाजपकडेच होती. पन्नाप्रमुख आणि मेरा बूथ सबसे मजबूत अशा मोहिमा भाजपने आधीच यशस्वीपणे राबवल्या होत्या. त्यामुळे भाजपने आपला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी आणला असेल आणि त्यातून मतदानाची टक्केवारी वाढली असेल, असाही एक दावा आहे.

शहरी विकास की ग्रामीण नाराजी?

नागपूरच्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मतदान झालंय, याची पाच वाजताची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. नागपूर दक्षिण पश्चिम ५२.५३, नागपूर दक्षिण ५२.५८, नागपूर पूर्व ५४.५८, नागपूर मध्य ५३.१०, नागपूर पश्चिम ५२.८१, नागपूर उत्तर ५३.१८ अशी ही आकडेवारी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा मतदारसंघ असणाऱ्या दक्षिण पश्चिमेत सर्वात कमी तर शहराची सीमा ओलांडून गेलेल्या पूर्वेत सर्वाधिक मतदान आहे. पण यातलं अंतर फार नाही. त्यामुळे त्यातून काही निश्चित निष्कर्ष काढता येत नाही.

हेही वाचाः नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

नितीन गडकरींनी नागपूर शहरात सुरू केलेली मेट्रो, सिमेंटचे रस्ते या विकासाच्या प्रेमात पडून शहरी मतदाराने भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केलंय. की या विकासाच्या प्रभावापासून वंचित असणाऱ्या ग्रामीण आणि शहरी गरीब मतदारांनी वाढलेल्या मतदानातून आपला निषेध नोंदवलाय, हे आताच सांगणं कठीण आहे. पण नागपूरची लढत तुल्यबळ झालीय, असा निष्कर्ष मात्र स्पष्टपणे काढता येतोय.