आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
महाराष्ट्रातल्या शाहिरांनी आपल्या कलेच्या जोरावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खेड्यापाड्यात सर्वदूर नेली. यात तीन शाहिरांचा विशेष नामोल्लेख होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि लोकशाहीर द. ना. गव्हाणकर. कामगार, कष्टकरी, श्रमिक, शोषित अशा सर्वहारा वर्गासाठी आणि समग्र मानवाच्या कल्याणासाठी गव्हाणकरांनी आपलं आयुष्य झोकून दिलं.
४५ वर्षांहून अधिक काळ शोषित वर्गाच्या मुक्तीचा ध्यास घेऊन या महान कलावंताने आपली कला लोककल्याणासाठी वाहिली. त्यांची लेखणी आणि वाणी सतत लोकलढ्याचा आवाज बनून राहिली. म्हणूनच तर त्यांना लोकशाहीर म्हणून गौरवलं गेलं.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातल्या महागोंड या गावात २२ एप्रिल १९१५ ला त्यांचा जन्म झाला. गावातच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषय घेऊन १९३५ मधे ते पदवीधर झाले. याच काळात राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या नानिवडेकरांच्या शाहिरीने ते प्रभावित झाले. नानिवडेकरांच्या सानिध्यात त्यांच्यातला कलावंत आकाराला आला.
हेही वाचाः कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?
शाहिरीला साजेसा आवाज आणि निसर्गतःच लाभलेल्या गव्हाणकरांना संगीताची उत्तम जाण त्यांच्याकडे होती. कोल्हापुरात त्यांच्यातला कलावंत फुलत गेला. ग्रॅज्युएट झाल्यावर ते नोकरीसाठी मुंबईला आले. १९३५ मधे इंग्रजी विषयात ग्रॅज्युएट झालेल्या गव्हाणकरांना नोकरी मिळणं अवघड नव्हतं. नेवल ऑफिसमधे त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
या काळात मुंबईत श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट तत्वज्ञानाने भारावून अनेक तरुण त्यांच्याकडे ओढले गेले. गरिबीतून आलेल्या दत्ता गव्हाणकरांनाही या विचाराने प्रभावित केलं. त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून संघटनेचं काम सुरु केलं. याच काळात अण्णा भाऊ, अमरशेख हेही मुंबईत आलेले. मुळातच कलावंत असलेले हे तिघे डाव्या विचाराने जोडले गेले.
कम्युनिस्ट तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या कलेवर परिणाम करून गेला. या तिघांनी एकत्र येत लालबावटा कलापथकाची स्थापना केली. सावकारशाही आणि भांडवलशाहीने केलेल्या कामगार, कष्टकऱ्यांच्या शोषणाचे पदर ते लोककलेतून उलगडून दाखवू लागले. वर्गीय शोषणाविरोधात संघटितपणे लढण्यासाठी कामगार कष्टकऱ्यांना त्यांची शाहिरी बळ पुरवू लागली. त्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला.
महाराष्ट्राला लोककलेची समृद्ध परंपरा आहे. इथल्या लोककलावंतांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राचं समाजजीवन कसदार बनवलं. रंजन हा तिचा हेतू असला तरी सामाजिक प्रबोधन घडवून समाज जोडण्याचं महत्वपूर्ण काम अनेक शतकं इथल्या लोककलांनी केलं. हाच धागा पकडत शाहीर अण्णा भाऊ, अमरशेख आणि गव्हाणकर यांनी आपल्या शाहिरीतून कामगार, कष्टकरी शेतकरी आणि श्रमिक जनतेच्या वेदना मांडल्या. त्यांना त्यांच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उर्जा पुरवली.
उच्चशिक्षित असलेले शाहीर गवाणकर अनेक क्षेत्रात पारंगत होते. कला ही स्वहितासाठी नाही तर लोककल्याणासाठी उपयोगात आणायची हे तत्व त्यांनी जपलं. भामट्याचा आजार, बंड्या दिवाण, मुंबईचा कामगार, मुंबई कोणाची, शेतकऱ्यांची पांढरी, स्वर्गलोकीचा बातमीदार, काही चालंना गा, काश्मीरची फाळणी या लोकनाट्याबरोबरच उधमसिंगांचा पोवाडा, लेनिनचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा हे पोवाडे आणि अनेक क्रांतीगीतंही त्यांनी लिहिली.
गव्हाणकरांचं बालपण महागोंडसारख्या छोट्या खेड्यात गेलं. ते आईच्या पोटात असतानाच वडिलांचा मृत्यू झालेला. त्यामुळे अत्यंत हलाखीत त्यांचं बालपण गेलेलं. त्यात आईही लवकरच गेली. त्यामुळे लहानपण मावशीच्या घरी गेलं. ब्राम्हण घरात जन्माला आलेल्या गव्हाणकरांचं घर अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात मोडणारं होतं. त्यामुळे शेतकर्यांचं जगणं त्यांनी जवळून अनुभवलं.
हेही वाचाः कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी
शेतकरी, शेतमजूर हा नेहमीच त्यांच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिला. त्यांच्या गाण्यातून शेतकर्यांच जगणं ठळकपणे अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. त्यांचं गाणं केवळ शेतकर्यांचं दुःख, वेदना मांडून थांबत नाही तर ते समग्र शेतकरी वर्गाला आपल्या हक्कासाठी लढायला प्रेरणा देतं. सावकारशाही आणि शोषणव्यवस्था उलथवून टाकण्यासाठी त्यांना हाक देतं. त्यांना बळ पुरवतं.
कामगार, कष्टकरी आणि शोषित वर्गाच्या मुक्तीचा ध्यास घेऊन कार्यरत असलेला हा शाहीर मुंबईच्या लालबाग परळ भागातल्या गिरणी कामगारांचा आवाज बनला. शेतीवर भागत नाही म्हणून मुंबईत जगायला आलेल्या कष्टकर्यांच्या लढ्याचा साथीदार बनला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा बिनीचा शिलेदार बनला. चांदा ते बांदा असा समग्र महाराष्ट्र पिंजून काढला.
अण्णा भाऊ साठे, अमरशेख, आत्माराम पाटील या आपल्या सहकार्यांसह विदर्भ, कोकण, मराठवाडा, कोकणासह आजच्या कर्नाटकातील बिदर, भालकी आणि बेळगाव या सार्या परिसरातील मराठी भाषिकांना आपल्या शाहिरीतून ते जोडत गेले. गोवा मुक्ती आंदोलनातही ते आघाडीवर राहिले.
त्यांना फोटोग्राफीचा विशेष छंद होता. एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांचा नावलौकिक होता. या कलेने त्यांना सिनेसृष्टीकडे ओढून नेलं. के. अब्बास यांच्यासोबत ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. याच दरम्यान अण्णा भाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी आली. अण्णा भाऊंनी बहिष्कृत असलेल्या आणि गावकुसाबाहेर राहणार्या मातंग समाजातून आलेला नायक अफाट ताकदीने मांडला होता.
त्या काळातील बंडखोर मराठी तरुणांना फकिरा प्रेरणादायक होता. फकिरातला सामाजिक संघर्ष सिनेमातून मांडला तर तो अधिक प्रभावी होईल, असा विचार गव्हाणकरांच्या डोक्यात आला. त्यांनी तन, मन, धनाने अपार मेहनत घेत फकिरा बनवला. फकिरा सिनेमाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. पण गव्हाणकर मात्र कर्जबाजारी झाले. पण तरीही ते लढत राहिले.
दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. सतत संघर्षमय जीवन जगत असतानाही आपल्या गोड आणि लाघवी स्वभावाने वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज माणसं त्यांनी जोडली. फिल्म डायरेक्टर के. ए. अब्बास, अभिनेते बलराज सहानी, अमिताभ बच्चन, राजा ठाकूर, दादा कोंडके, मोहन वाघ, सुलोचना, अरुण सरनाईक, कैफी आझमी, शैलेंद्र यांच्यासह साहित्यिक प्र. के. अत्रे, विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे, रणजीत देसाई, शांता शेळके, माधवराव बागल, वि. स. खांडेकर यांच्यासह अनेकांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि स्नेहाचे संबंध होते.
हेही वाचाः
बाजार समित्या बरखास्ती ही तर दुसरी नोटाबंदीच
शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
सरकारनं गुंतवणूकदारांवर विश्वास ठेवायला पाहिजे: मनमोहन सिंग
ही पृथ्वी दलिताच्या तळहातावर तरलीय, वाचा अण्णा भाऊंचं गाजलेलं भाषण
(लेखक हे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)