तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

१० जानेवारी २०२१

वाचन वेळ : ८ मिनिटं


नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव त्यांनी सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.

माझं माहेर बोधरीपाडा. ते आलं पिंपळनेरजवळ साक्री तालुक्यात. धुळे जिल्ह्यात. तिथं आजही दोन प्रमुख आदिवासी जमाती आहेत. मावची आणि भिल्ल. माझी जमात मावची. सगळे भिल्ल, मावची हे देसाई कुळातले. मला आईवडिलांचं मूळ गाव कधी कळालं नाही. मी खूप शोध घेतला. कुणी नातेवाईकही नव्हते आमचे.

शेती असूनही भूमिहीनासारखं जगणं

आईसोबत लग्नानंतर तिचे दोनतीन भाऊही तिच्यासोबत तिच्या सासरी राहिले. आदिवासींमधे घरजावई पद्धत आहे. भावांची लग्न झाल्यावर ते पाचपाच वर्षं त्यांच्या बायकांकडे घरजावई म्हणून राहिले. मग परत आमच्या आईकडे राहायला आले. वडिलांनी भावांना जमिनी घेऊन दिल्या. आमची २५-२६ एकर जमीन होती. त्या जमिनीतून आम्ही कष्ट करायचो. गवताच्या मोळ्या बांधून विकाय जायचो. दहा भावंडं आम्ही. तो काळात इंग्रजांचा सुरवातीचा काळ होता. आजोबा डफ वाजवायचे. वडील गुराखी होते. शेती असूनही भूमिहीनासारखं जीवन जगलो आम्ही! बैलही नव्हते, अवजारं नव्हती.
 
मग मानमोडीची साथ आली होती. पटापटा माणसं मरू लागली. माणसं पुरूनही लोक कंटाळले. असं सगळं जीवन होतं. मी भावंडात दहाव्या नंबरची. मला आठवतं, ५८ साली शाळा आल्या आमच्या भागात. पण शाळा शिकून काय होणार ते कळत नव्हतं! समाजपरिवर्तनाचं कुठलंही वारं नव्हतं. मी बहिणीच्या लहान बाळाला सांभाळायचे.

हेही वाचा : सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

पावसाळ्याच्या तोंडावर सावकार बैल घेऊन गेला

आई शेतात जायची. पण नंतर मला शाळेत टाकलं. आम्ही दोन्ही जमातीची मिळून ७० मुलं पटावर होतो. अनेक गुरुजी बदलून जायचे. शिकवणारे एक नावे गुरुजी बौद्ध होते. ते दिवाळीला घरी गेले होते. परत आल्यावर त्यांनी आम्हाला घरून आणलेल्या दशम्या दिल्या. आम्ही डब्बा खाताना त्यांनी सगळ्या पोरांना दशम्यांचा तुकडा दिला. आम्ही खाल्लं. आम्हाला भेदभाव कळायचा नाही.

मावची जमातीची काही पोरं आम्हाला बोलली गुरुजींनी दिलेलं खाल्लं? आम्ही हो म्हणालो. पोरं बोलली, ‘अरेरे, ते महार आहेत, तुम्ही बाटले!’ मग काही दिवसांनी जिच्या ओट्यावर शाळा भरायची ती बाई बोलली, ‘मास्तर, तुझी पोरं कुठेही घेऊन जा, इथं आमचं घर बाटतं, पाणी बाटतं!’ आमची जागा तर गेली. मग आम्ही तिकडून निघालो. गुरुजी म्हणाले, ‘पोरांनो, चला विळे, कुऱ्हाडी घ्या. पोरींनी गवत कापायचं आणि पोरांनी लाकडं तोडायची. आम्ही एका दिवसात लाकडं तोडली, गावात कापलं. दूर गावाबाहेर टेकडीवर गुरुजीसोबत मिळून शाळा बांधली. पाचवीपर्यंतची शाळा.

चौथी पास झाले. पाचवीत बोर्डिंगला जायला पैसे नाहीत की धड कपडे नाहीत. कसं जायचं? मग मी शाळा सोडली. आईबरोबर शेतकऱ्यांच्या शेतावर राबायचं. कधी मोलकरीण राहिले. चार वर्षं ते काम केलं. मग भावानं माझं लग्न करून सासरी पाठवलं. मी लहान असताना आईबरोबर पिंपळनेरच्या बाजाराला जायचे.

एक कोकणी आदिवासी डोक्यावर धान्याचं गाठोडं घेऊन शेतात आला. एक वाणी त्याला धान्य दे म्हणू लागला. भाव पाडून मागू लागला. तो नको म्हणाला तेव्हा दबाव टाकून त्याच्याकडून मनमानी भावात धान्य घेतलं. आम्हाला कोंबडीअंडी काहीच विकायची परवानगी नसायची. ग्रामपंचायत आमच्यावर कर लावायची. दापूर माझं सासर. नवापूर तालुक्यात येतं. पावसाळ्याच्या तोंडावर सावकार बैल घेऊन गेला. शेती कशी करणार? भावानं भाड्याचा बैल आणून शेती केली.

आपण त्यांना चोर, दरोडेखोर ठरवलं

मला लहानपणी कळलं की वडिलांना भिल्ल बाईशी संबंध ठेवल्याने गावानं बहिष्कृत केलं होतं. घरी त्या बाईची मुलं सणावाराला यायची. वडिलांना जमात पंचायतीनं भयानक शिक्षा दिली. आम्हाला वाळीत टाकलं. सामूहिक विहीरीवर पाणी भरू न देणं, मजुरी न देणं. आम्ही भिल्लाबरोबर राहिलो. अजूनही राहतो. आमची कर्मठ जमात मला मंजूर नाही. आई अडाणी. कुणी शिकलेलं नाही. माझ्या सावत्र भावांकडे मी आजही जाते. आम्ही एकत्र जेवतो. 

सासरीही हलाखी होती. घरातले मोठे लोक अनेकदा गुजरातमधे जाऊन काम शोधायचे. लोंढेच्या लोंढे गुजरातमधे जायचे. पन्नास पैसे, रुपया मजुरी मिळायची. कोळशाच्या रेल्वेनं हे सगळे जायचे. मजुरी नाही मिळाली तर यायचे रिकाम्या हातानं परत. सगळ्या समाजात दारिद्र्य होतं. एका जमातीत नाही. पण कुणी याला वाचा फोडू शकत नव्हतं.

करणार काय? तंट्या भिल्ल, उमाजी नाईक यांनीही हेच भोगलं असेल ना? आपण त्यांना चोर, दरोडेखोर ठरवलं. आजचे प्राध्यापक सत्य संशोधन का करत नाहीत त्यांच्या संघर्षावर? आज स्वातंत्र्यानंतर काय बदललं?

हेही वाचा : मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

अगदी महिलांनाही लढावं लागेल

लाठीपाडा, पानखेडा आणि बोधरीपाडा आजही अशीच आहेत. लाठीपाडाला धरण बांधलं. तेव्हा मी लहान होते. त्या धरणाच्या पाण्यासाठी साक्रीच्या अर्ध्या भागातल्या जमिनी गेल्या. खूप गावं उठली. शेतं गेली. सोबत भयानक दुष्काळ होता. तिथल्या शेतकऱ्यांनी मग कॉम्रेड शरद पाटलांना संपर्क केला. शरद पाटलांनी त्यांच्या अडचणी सोडवल्या. ते म्हणाले, ‘जमीन पाहिजे असेल तर सगळ्यांना, अगदी महिलांनाही लढावं लागेल. एसआरपीचा मारही खावा लागेल.’ मग आदिवासींची चळवळ उभी राहिली. दणकून मोर्चे निघाले.

हा ७१-७२ चा काळ होता. सूरत रोडच्या विसरवाडीला मोठी परिषद झाली. तिथं गोदूताई परुळेकर आल्या होत्या. मी चौथी शिकलेली. मला विषमता खटकायची. पोटभर खाणारे चिमुटभरच असतात. बाकीचे केवढे तरी लोक का उपाशी राहतात हे कळायचं नाही. आंदोलनात आम्हाला सात दिवस तुरुंगात जावं लागलं. पण लोकांमधली भीती निघून गेली. ७४ मधे खूप केसेस झाल्या. मारहाण झाली. महिलांनाही मारलं.

७५ ला आणीबाणी आली. त्यातही तुरुंगवास भोगला. खोट्यानाट्या केसेस भरल्या गेल्या. शेतीची अवजारं जप्त केली. ते वर्ष वाया गेलं. ७६ ला पुन्हा मागची दडपशाही सुरूच होती. वनखात्याची छळवणूकही सुरूच होती. पाड्यांवर कारभारी दवंडी द्यायचे. मग लोकं सभेला जमायचे. पाटलांना ऐकायचे. अशी चळवळ वाढत गेली. भूमिहीनांना मालकी हक्कानं जमीन मिळावी यासाठी आम्ही केलेल्या जनहित याचिकेचा निकाल आमच्याच बाजूनं लागला. दहा वर्षं त्यात गेली. पण त्याच काळात मार्क्सवादी पक्षात फूट पडली.

नैसर्गिक शहाणपण आहेच की आमच्याकडे!

जातीच्या प्रश्नावरून कॉ. शरद पाटलांनी ७८ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा देऊन नवा पक्ष स्थापन केला. तो सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. भारतातली लढाई केवळ वर्गीय नाही. ती जातवर्गस्त्रीदास्य अंताची आहे. त्यासाठी हा नवा पक्ष आम्ही स्थापन केला. आम्ही अडाणी असलो तरी एक नैसर्गिक शहाणपण आहेच की आमच्याकडे! आमचे मुद्दे आम्हाला कळतात. आमची नवी चळवळ जोमात सुरू झाली.

मला आदिवासींमधल्या रूढीपरंपराही दिसायच्या. अतिशय जाचक, महिलेचं शोषण करणाऱ्या. इकडे ‘आदिवासी हिंदू नाहीत तेव्हा त्यांना हिंदू कोड बिलाचे कायदे होत लागू नाहीत’ असं न्यायालय सांगायचं. कॉम्रेडनी हिंदू कोड बिलाचा नीट अभ्यास केला. आदिवासी महिलांना या कायद्यातून वगळण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टात केस टाकली तर तोच निकाल. अनेक आदिवासींनी चार-पाच-दहा बायकाही केल्या होत्या. त्यांना कायद्याचं बंधनच नाही ना!

हिंदू कोड बिलासाठी आग्रह

स्त्रीमुक्ती संघटना त्यावेळी जोमात होत्या. त्यांच्याकडं मी हा मुद्दा अनेकदा मांडला. त्यांनीसुद्धा हे मनावर घेतलं नाही. या विशिष्ट महिलांच्याच संघटना होत्या. शेवटी टाटा इन्स्टिट्यूटमधल्या चर्चासत्रात मी आणि कॉम्रेडनी हा मुद्दा मांडला. गोदूताईपण तिथं होत्या. त्यांनी विरोध केला. म्हणाल्या, ‘आदिवासी बायका तर स्वतंत्र आहेत. त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार आहे. त्यांना या कायद्याची गरज नाही.’

म्हणाले, आम्ही स्वतंत्र आहोत. पण तिचं शोषण तुम्हाला दिसत नाही का? अजूनही परिस्थिती बदललेली नाही. आजही बहुपत्नीत्व आहे. महीपत कारभाऱ्याच्या बायकोला गावानं डाकीण ठरवलं होतं. विहिरीत टाकून मारलं. पुरावा नष्ट केला. अशा कितीतरी जणी. आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधीही डाकिण प्रथेविरुद्ध बोलत नाहीत. देवमोगरा आमची अन्नदेवता. शेतीचे तंत्रमंत्र तिला ठाऊक होते. पण तिला डाकिण ठरवलं गेलंय. जोवर हिंदू कोड बिल लागू होत नाही तोवर हे चित्र बदलणार नाही.

आज आदिवासी समाजाला अल्प रोजगार तरी मिळतोय. अंगभर कपडा मिळतोय. बराच प्रश्न सुटलाय. पण कष्ट कमी झाले नाहीत. शिक्षण तळागाळापर्यंत पोचलंय. पण पुढचं भविष्य काय? उच्चशिक्षण कुठं मिळतं? या पोरांच्या आरोग्याची, शिक्षणाची सगळी सगळी जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. खेड्यापाड्यापर्यंत संविधान अजूनही पोचलं नाही. घटनेनं काय अधिकार दिलेत, त्यातले किती मिळालेत हे अजूनही कळलं नाही.

हेही वाचा : अहिल्याबाई होळकर : फक्त साध्वी नाहीत तर राष्ट्रनिर्मात्या!

लोक का धर्मांतर करत असतील?

मी लहान असल्यापासून बघते, ख्रिश्चन लोक आमच्यात यायचे. धर्मांतर करायला लावायचे. मला प्रश्न पडला की लोक का धर्मांतर करत असतील? त्यांना काय आवडत असेल? मी सगळे चर्च फिरले. बायापुरुष सांगायच्या, वैदूबुवाकडे गेल्यावर काही फरक पडला नाही. पण चर्चमधे गेल्यावर प्रार्थनेतून फरक पडला. ‘ख्रिश्चन धर्म आवडला म्हणून धर्मांतर केलं’ असं कुणी म्हणालं नाही. ‘आजार बरा झाला म्हणून गेलो’ म्हणायचे.

मी सतत कथा-कादंबऱ्या वाचते. कॉम्रेड मला खूप पुस्तकं वाचायला आणून द्यायचे. अण्णा भाऊ साठे, लक्ष्मण माने, आनंद यादव, दया पवार, भुजंग मेश्राम मला आवडतात. आजच्या काळाचं चित्र लिहिणाऱ्या लोकांकडून नीटपणे आलं पाहिजे. नव्या लोकांची ही जबाबदारी आहे. का जुन्याच पुस्तकांच्या आवृत्या काढायच्या?

पूर्वी चळवळी पोटतिडकीने लढल्या. आज सगळ्या चळवळी विखुरल्यात. जेवढा बहुजन समाज आहे त्यांनी एकत्र येऊन आज समाजपरिवर्तन केलं पाहिजे. एका झेंड्याखाली आलं पाहिजे. महिलांनीही यावं. त्यांचं दु:ख मोठं आहे. त्या अजूनही गुलाम आहेत. सत्तेत गेलं पाहिजे. पण कोणाच्या सत्तेत गेलं पाहिजे याचाही विचार व्हावा. कुणीही उठून कुठल्याही पक्षात जाऊ नये. सध्या सत्तेचे तुकडे खायला सगळे धावायलेत. स्वार्थासाठी तुकडे मिळाले की समाजाचा बळी दिला जातोय.

संघवाल्यांनो, आमच्याशी बेटी व्यवहार करा

आज पुरोगामी लोकांना सरकार नक्षलवादी ठरवतं आहे. बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिलाय ना! आम्ही ते केलं तर नक्षलवादी ठरतो? खरे नक्षलवादी शोधा ना. आमचं दु:ख आम्ही बोललो तर नक्षलवादी का? चैनीसाठी लिहितबोलत नाही आम्ही. हे राज्य आमचं आहे. तुमचं नाही.
 
आम्ही इथलेच आहोत. मात्र आमचा इतिहासही कुणी नीट लिहिला नाही. आम्ही वनवासी नाही आदिवासी आहोत. कोर्ट आम्हाला हिंदू म्हणत नाही. आणि तुम्ही फक्त धर्मांतरापुरतं आम्हाला वापरता. संघाचे लोक काय करतात? ख्रिश्चनांना नाव ठेवतात. पण संघाचे वाईट हेतू मला माहीत आहेत. संघवाल्यांनो, तुम्हाला आमची देवमोगरा आवडते ना? मग आमच्याशी बेटी व्यवहार करा. आमच्यात बसून मटन खा.

आज जोडणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे. जातीचे बळी जे आहेत त्यांनाच पुढे करून जातीव्यवस्था घटत केली जातेय. भीमा कोरेगावमधे तेच झालं. बहुजन कधी शहाणे होणार? स्वत:चा वापर होऊ देणं कधी थांबवणार? तरुणांना भडकवलं जातंय. दंग्याधोप्यात त्याचा वापर केला जातोय.

हेही वाचा : या पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग

तुम्ही कधी गाईचं शेण काढलंय का?

पूर्वज कोण होते आणि आपण काय करतोय याचं त्यांना भान नाही. संघवाल्यांना मला सांगायचंय, गाय आमची आहे, तुमची नाही. गाईचं शेण तुम्ही कधी काढलंय का? बळीला कुणी पाताळात गाडलं हे कळलं पाहिजे.

मी लोकसभा निवडणूकीला उभी होते तेव्हा लोकांनी कांद्या-बटाट्यावर चुकीच्या उमेदवारासाठी मतं विकली. वीस वर्षापूर्वीचं हे चित्र अजूनही तसंच आहे. दलाल दारूकोंबडे देतात. आदिवासी भुलतो. प्रत्येक घरात मतांचा काळाबाजार चालतो. आता ठरवलंय, राजकारण, सत्तेचा मार्ग माझा नाही. जनलढा हा माझा मार्ग आहे. राजकारणात ज्याला जायचंय त्यांनी जावं.

आता तुमच्यावर वेळ आलीय

आम्ही आजवर निकरानं लढलो पण कुणाची साथ मिळाली नाही. कुणी समजून घेतलं नाही. आज सगळे कोंडीत सापडलेत. कुणी नीट रस्ता दाखवू शकत नाही. सगळे फसलेत. आम्ही सगळ्यांना केवळ समजून घेतलं. आम्हाला तुम्ही डांबून मारलं. कुणाला पत्ता लागला नाही. आता तुमच्यावरही ती वेळ आली. आम्ही धरणग्रस्तांच्या बाजूनं लढत होतो. शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय मागत होतो. त्यावेळी सोबत कुणी आलं नाही. बिगर आदिवासी आमच्यावर हसायचे. आता तुमच्यावर वेळ आलीय.

उकाई धरणात उठलेली शंभरहून अधिक खेडी कुठं गेली? माणसं कुठं गेली? विकासाच्या व्याख्येत आम्ही उद्धवस्त होतोय. आमच्या पोरांच्या भविष्याचं काय? आता लोकं रस्त्यावर उतरतील असा काळ येईल. काळ आपोआप लोकांना घराबाहेर काढेल. मी नसेनही कदाचित. पण क्रांती होईल. तोंड आहे तोवर बोलत राहील. मलाही नक्षलवादी म्हणतील कदाचित!

हेही वाचा : 

लसीचे साईड इफेक्ट अच्छे हैं

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?

आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

(साभार शब्द पब्लिकेशनचे मुक्त शब्द मासिक. )