कोरोनासारख्या आरोग्य संकटाशी लढण्याचा पाया घालणारे नामदेवराव गुंजाळ

२३ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनासारखं मोठं संकट आल्यावरच आपल्याला सामाजिक आरोग्याची काळजी वाटू लागते. पण नामदेव गुंजाळ हे व्यक्तिमत्त्व गेली ३८ वर्ष सामाजिक आरोग्याचा पाया घालतायत. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. या जागतिक साथीच्या काळात त्यांच्या कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

कोरोनासारख्या जागतिक साथीचं संकट दारात आल्यावर आपण आरोग्याच्या प्रश्नाविषयी चर्चा करू लागलोय. संकट नसतं तोवर आरोग्याचा प्रश्न आपल्या गावीही नसतो. आपल्याला आरोग्य सुविधा मिळत नाहीत, यावर आपण विचार करत नाही. दुखणं अंगावर काढण्यावर आपण डोकं चालवतो. तिथं गावाच्या किंवा शहराच्या स्वच्छतेचा का होणार? सरकारी दवाखाने मोडकळीस आलेत, त्याकडे आपल्याला बघावंसं वाटत नाही. महात्मा गांधी आणि गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचे धडे आपल्याला दिले. पण आपण त्याकडे लक्ष देत नाही.

काही माणसं मात्र नेहमीच जागरूक असतात. या जागरूक माणसांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीचं असते. पण म्हणूनच त्यांचं महत्त्व जाणवतं. अहमदनगरमधले डॉक्टर नामदेवराव गुंजाळ हे त्यापैकीच एक. १९८२ ते २०२० अशी ३८ वर्ष ते आरोग्य सेवेत अथकपणे कार्यरत आहेत.

हेही वाचा : कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

संकटात उभा राहणारा माणूस

संगमनेर तालुक्यातल्या खांडगाव नावाच्या खेड्यात शिवराम गुंजाळ आणि लहानाबाई या विडी कामगार दांपत्याच्या पोटी नामदेव यांचा जन्म झाला. शिक्षण मर्यादित असूनही हा मुलगा नामदेवचा नामदेवराव झाला.

नामदेवराव म्हणजे अत्यंत धडपडं व्यक्तिमत्व. कोणतीही गोष्ट मुळापर्यंत जाऊन समजून घेण्याची वृत्ती. धाडस आणि समाजसेवा नसानसात भिनलेली. याच वृत्तीतून अनेकदा अपघातात सापडलेल्या लोकांचे त्यांनी जीव वाचवले. अनेकांचे संसार उभे केले. कुठल्याही संकटात हा माणूस माणसाच्या मागं निडरपणे उभा राहतो.

नामदेवराव यांचं कुटुंब खूप मोठं. पाच भावंडं आणि सात बहिणी. नामदेवरावांचा नंबर दुसरा. थोरल्या भावाच्या शिक्षणाला पैसा पुरवण्यासाठी नामदेवराव यांना पाचवीनंतर शाळा सोडावी लागली. रात्र शाळेत नाव नोंदवलं. रात्री शाळेत जायचं आणि दिवसा काम करायचं. कुठे किराणा दुकानात हमाली कर, सुताराच्या हाताखाली टमाटयाचं खोकं बनव, गायछाप जर्दाच्या पुड्या भर, सायकलवर भाजीपाला विक अशी कामं ते करत.

गुजरातमधे जाऊन आदिवासी डांग भागातल्या लोकांना त्यांनी भाजीपाला पिकवणं शिकवलं. त्यांनी पिकवलेला भाजीपाला ते स्वतः सायकलवर फिरून विकत. अशी अनेक कामं करत टक्के टोणपे खात नामदेव यांनी शिक्षण पूर्ण केलं.

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

मदतीला आला सुनील दत्त

पुढे मोठा भाऊ डॉक्टर झाल्यावर त्याने आरोग्य क्षेत्रात समाजसेवा सुरू केली. त्यावेळी सायकल हे एकमेव प्रवासाचं साधन होतं. सायकलवर प्रवास करून दुर्गम आदिवासी भागात शेकडो आरोग्य शिबिरं घेतली. आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवल्या. सलग पंधरा वर्ष गांधी जयंतीच्या दिवशी अशी शिबिरं भरवली जायची.

पहिलं शिबीर १९८३ ला घेतलं. त्यात २६०० पेक्षा अधिक रुग्ण तपासले गेले. विडी कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांना टी.बी.सारखे आजार होत असत. ते तपासण्याची सुविधा या भागात नव्हती. म्हणून अशा शिबिरांची गरज होती. हे ओळखून अशीच शिबिरं संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूरच्या ग्रामीण भागातही घेतली. 

एका कॅन्सर शिबिरासाठी तर नामदेव थेट अभिनेता सुनील दत्त यांच्या घरी पोचले. नामदेवरावांचं काम आणि समाजसेवी वृत्ती बघून सुनील दत्त यांनी एक अद्ययावत प्रयोगशाळा असलेली गाडी आणि टाटा हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांची टीम शिबिरासाठी संगमनेरला पाठवली. त्यामुळे अनेक कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळाला.

गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार 

संगमनेरमधे कुठल्याच वैद्यकीय सुविधा नव्हत्या त्या काळातलं हे काम वाखाडण्याजोगंच म्हणावं लागेल. आज संगमनेरमधे अनेक अद्यावत दवाखाने आहेत. कुशल डॉक्टर आहेत. पण जेव्हा हे काही नव्हतं तेव्हा नामदेवराव कॅन्सर झालेल्या रुग्णांना आधार देत होते. गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी यांना आरोग्य शिबिरातून सेवा पुरवत होते. म्हणून याचं मोल मोठं आहे. 

हात साबणाने धुवावेत. घरात, दारात आणि प्रवासात स्वच्छता ठेवावी हे आज सरकार सांगतंय. नामदेवराव आणि त्यांचे सहकारी गेली ३८ वर्ष स्वच्छतेचा गाडगेबाबांचा विचार आदिवासींसह बहुजन समाजात सांगत फिरतायत. या कामामुळे बहुजन समाजात, गावागावात स्वच्छतेचा विचार रुजू लागलाय. त्यातून आरोग्य प्रश्न आटोक्यात येण्यात मोठा हातभार लागलाय.

कोरोना स्पेशल लेखही वाचा :

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

रेकॉर्ड ब्रेक काम करायचं

आरोग्य शिबिरांचं काम सुरू असतानाच नामदेवराव समाजसेवक बाबा आमटे यांच्या संपर्कात आले. बाबा आमटे यांच्याविषयी वाचून त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. १९८४ मधे त्यांनी थेट आनंदवन गाठलं. आठवडाभर आमटे कुटुंबात वास्तव्य केलं. त्या कुटुंबातलेच एक झाले. तिथंही कुष्ठरोग्यांची सेवा केली. आमटेंचा प्रभाव म्हणून या माणसाने इतर सर्व कामं सोडून समाजसेवेला वाहून घेतलं.

त्यातही अपघातग्रस्तांना मदत करणं, त्यांचे प्राण वाचवणं हा त्याचा छंदच बनला. अपघाताच्या ठिकाणी हा माणूस पहिल्यांदा पोचणार. पोलिस आणि कायदा कशाचीही भीती न बाळगता मदतकार्य सुरू करणार. त्याचं हे कार्य बघून डॉक्टर सुधीर तांबे यांनी आपला सहकारी म्हणून त्यांना आपल्या हॉस्पिटलमधे ठेवून घेतलं. तिथेही त्यांनी अनेक गरजू रुग्णांना मदत केली. डॉक्टरकीची अनेक कौशल्य आत्मसात केली.

एकदा संगमनेरचा नेवासकर नावाचा अपघातग्रस्त तरुण पुढील उपचारासाठी पुण्याला नेताना त्याच्या फुफ्फुसात नळी टाकून हवा पुरवण्याचा भाता म्हणजेच अंबू फुटला. नामदेवांनी पुण्यापर्यंत तोंडाने हवा भरून त्याचे प्राण वाचवले. आजही तो माणूस धडधाकट जीवन जगतोय. नामदेवरावांनी अशा किती जणांचा जीव वाचवला याची गणती त्यांनी ठेवली नाही. रेकॉर्ड ब्रेक काम करायचं, कामाचा रेकॉर्ड ठेवायचं नाही, हा नामदेवरावांचा खाक्या आहे.

मी समाजसेवेतच आनंदी

१९८२ मधे शिर्डी वावी रस्त्यावर अपघात घडला. त्यात सगळं कुटुंब सापडलं. ते मदतीची याचना करत होतं. लोक बघून जात होते. नामदेवांनी हे बघितलं आणि लगेच मदतकार्य सुरू केलं. एस.टी. अडवून अपघातग्रस्तांना सिन्नरला नेलं आणि उपचार सुरू केले. तेव्हापासून अपघातग्रस्तांना मदत करणं त्यांनी सुरू केलं. ही सेवा आजपर्यंत विनाखंड सुरू आहे. 

नामदेवराव सतत प्रवासात असतात. महाराष्ट्रभर भटकंती करतात. कुठेही कुठल्याही रस्त्यावर अपघात घडो, अनोळखी प्रदेशातही हा माणूस अपघातग्रस्तांवर उपचार आणि मदत करणार! संगमनेरात  मुकबधिर आणि मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संग्राम संस्थेच्या स्थापनेतही नमदेवरावांचा सिंहाचा वाटा आहे. या मुलांच्या सेवेत त्यांना परम आनंद मिळतो.

अशाच कामातून नामदेवराव यांचा क्रिकेटर आणि तत्कालीन खासदार सचिन तेंडूलकर यांच्याशी परिचय आला. त्या स्नेहातून त्यांनी सचिनकडून मुकबधीर विद्यालयासाठी पन्नास लाखांची देणगी मिळवली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी नामदेवराव यांचा विशेष स्नेह. ‘राजकारण हे माझं क्षेत्र नाही, समाजसेवेत मी आनंदी आहे,’ हे नामदेवरावांचे म्हणणं. म्हणून थोरातांकडून गोरगरिबांची कामं करून घेणं यातच ते धन्यता मानतात. यामुळेच त्यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानावर विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी बाळासाहेबांनी दिली होती. पण आरोग्य, सामाजिक कामातून झालेल्या थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा नामदेवरावांनी स्वत:साठी कधीच घेतला नाही.

हेही वाचा : एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

निर्भिड, सडेतोड आणि विज्ञानवादी

ग्रामीण भागाचा विकास, हा नामदेवरावांचा विशेष अभ्यासाचा विषय. ‘सरपंचाला दिशा दिली तर गावाला आपोआप दिशा मिळेल’ या हेतूने त्यांनी सरपंच परिषदेचं आयोजन केलं. रक्तदान शिबिरं घेऊन स्वतः त्यात रक्तदान केलं. त्यांच्या संग्राम संस्थेनंही ग्रामीण भागात अनेक आरोग्य शिबिरं घेतली. त्या शिबिरांच्या आयोजनाची धुरा नेहमीच नामदेवरावांनी सांभाळली. मध्यंतरी बांबू परिषदेवर काम करण्याची संधी त्यांना लाभली. या क्षेत्रातही त्यांनी आपलं वृक्षप्रेम जपत कामाचा ठसा उमटवला. झाडं, पर्यावरण चांगलं तर आरोग्याचे प्रश्न निम्मे कमी होतील, असं नामदेवराव म्हणतात.

नामदेवराव कुठेही भेटूद्यात, कुणाच्या तरी कामाच्या घाईत असणार. तंटे सोडवण्याचं उपजत शहाणपण या माणसाला लाभलंय. अनेकांच्या घरगुती समस्येवर ‘नामदेव’ हे एकमेव औषध असल्याचा अनुभव अनेकांना आलाय. त्यामुळे अनेकांचे प्रपंच सावरलेत आणि ते आज सुखाने नांदताहेत. प्रत्येक समस्येला उपाय आहे, असं नामदेवरावांचं ठाम  मत आहे. ते राहतात ग्रामीण भागात, लोकल वातावरणात. पण विचार ग्लोबल करतात. अनेक देश ते फिरलेत. आरोग्य, सामाजिक, शेती, पर्यावरण या विषयी अभ्यास दौरे त्यांनी परदेशात केलेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 'सत्याचे प्रयोग' पुन्हा पुन्हा सिद्ध होतायत. कोरोनाशी लढण्यासाठी गांधीजींच्या मानवता, स्वच्छता, खेड्याकडे चला, सत्य आणि अहिंसा, पर्यावरण रक्षण आणि सर्वधर्मसमभाव या शिकवणीची साऱ्यांना आता जागतिक साथीच्या काळात आठवण येतेय. पण नामदेवराव गेली ३८ वर्ष याच शिकवणीच्या वाटेवरून चालतायत.

नामदेवराव यांच्यासारख्या काही माणसांनी आरोग्याच्या क्षेत्रात करून ठेवलेल्या कामामुळे आज आपण समाज म्हणून निरोगी आहोत. थोर कादंबरीकार, हिंदूकार भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेच्या ओळी आहेत- ‘चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत. लक्षात राहत नाहीत बिचारी.’ अशा चांगल्या माणसांपैकी एक असलेल्या नामदेवराव यांची कोरोनाशी लढण्याच्या काळात आठवण होते.

हेही वाचा : 

देशभरातले डॉक्टर संपावर जाण्याचं कारण की,

आई होण्याचं आदर्श वय सरकार कसं ठरवणार?

गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?