नामवर सिंहः पण बोलावं तर लागेलच

२३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


हिंदी साहित्यातले प्रख्यात समीक्षक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झालं. कवितेची थिअरी मांडणारे नामवर सिंह आपल्या कामातून हिंदी साहित्यातच स्वतः एक थिअरी बनले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ हिंदी साहित्यातल्या संस्था, चर्चा आणि वादांच्या ते केंद्रस्थानी होते. त्यामुळे 'दुसरा नामवर कौन' अशाही चर्चा झाल्या. पण त्यांना पर्याय नव्हता.

‘माझ्याविषयी बोलताना लोक एका शब्दाचा वापर नेहमी करतात. आणि तो म्हणजे वादग्रस्त. मी लिहतो तेव्हा वाद होतो. बोलतो तेव्हा वाद होतो आणि एवढंच नाही तर गप्प बसतो तेव्हाही वाद होत राहतो.’ असं सांगणारे नामवर सिंह १९ फेब्रुवारीचा दिवस मावळता मावळता कायमचे शांत झाले. 

हिंदी साहित्यात. त्यातही समीक्षेत त्यांचं स्थान सर्वोच्च होतं. त्यांच्या नावासोबत महान शब्द जोडताना कुठलाही विचार करावा लागत नाही. कुणीही तोंड उघडून त्यांना महान म्हणून शकतो. असं असलं तरी नामवर सिंह यांचा मृत्यू काही त्यांच्या जगण्याला आणि मानसिकतेला साजेसा नव्हता. तो एखाद्या मंचावर झाला असता. एखाद्या कार्यक्रमात बोलता बोलता त्यांनी जगाला अलविदा केलं असतं, तर तो त्यांच्या थोरवीला साजेसा असता. आता हे सगळं एखाद्या ब्लू प्रिंटसारखं मागं राहिलंय.

या दुःखद प्रसंगी नामवर सिंह यांच्याशी संबंधित काही प्रमुख घटना आणि त्यांचं योगदान सांगितलं पाहिजे. पण हेही काही सोपं नाही. कारण ते सगळीकडे पसरलेत. ९२ वर्षांच्या दीर्घायुष्यातली अर्ध्याहून अधिक वर्ष ते हिंदी साहित्यातले मध्यवर्ती पुरुष होते. आणि त्यांचं हे स्थान स्वाभाविक आणि तितकंच अनिवार्यही होतं.

आजपासून तेरा वर्षांपूर्वी म्हणजे ८० व्या वर्षी त्यांनी कबुली दिली होती की त्यांचं आयुष्य त्यांच्या वडलांसारखंच एकाकी झालंय. वडील बनारसच्या जीयनपूर या गावातले शिकलेले एकमेव व्यक्ती होते. भल्या मोठ्या संयुक्त कुटुंबात ते एकटेच होते. दुसरीकडे नामवर सिंग यांचं मोठेपण हे की वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांना वाटत नव्हतं की आपल्या आयुष्यावर गर्व बाळगायला हवा किंवा त्याची शरम वाटायला हवी. हे खरंय की आपल्या लिखाणाच्या योजना पूर्ण न करू शकल्याबद्दल त्यांच्यात पश्चातापाची भावना नक्कीच होती.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, ‘माझ्या अनेक योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. यासाठी कुणालाच दोष देणार नाही. रामविलास शर्मा यांनी संकल्प केला होता, कुठल्याही चर्चासत्रात, परिसंवादात जाणार नाही. भाषण देणार नाही. फक्त लिहित बसणार. हे काम मला जमू शकलं नाही. झालं तर ही माझी कमजोरी म्हणा. कुणी निमंत्रण दिलं तर मला नाही म्हणता आलं नाही. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की जो काही थोडाफार काळ हातात आहे, त्यात दिल्लीबाहेर किंवा दिल्लीतल्याही भाषणांना जाणं बंद करावं.’

ही गोष्ट कबूल करण्याआधीच आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की नामवर सिंह यांची प्रतिमा हिंदी साहित्यातल्या एक मोठ्या गोटामधे राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात अस्थिरता आणि घोटाळे घडवणारा एका चाणाक्ष माणूस अशी तयार झाली होती. ते कुठल्याही मंचावर गेले की तिथे बोंबाबोंब व्हायची. ते तोंड उघडताच गोंधळ व्हायचा. महान, अद्वितीय, पालक यासारखी विशेषण नामवर सिंह यांच्याबाबतीत संपूर्णपणे खरी नसली तरी ती निरर्थकही नव्हती.

हिंदीच्या अकॅडमिक आणि प्रकाशन जगतावर छाप असणाऱ्या नामवर सिंह यांच्यातला डावा विचार हळूहळू संपला. शेवटी शेवटी तर ते देवाचा धावा करू लागले. इथे मला हिंदीतले ज्येष्ठ कवी, लेखक मंगलेश डबराल यांची ‘नामवर सिंह यांचे आश्चर्यजनक असत्य’ असं शीर्षक असलेली एक टिप्पणी आठवते.

त्यामधे डबराल लिहितात, ‘मी कधी त्यांच्या खूप जवळ गेलो नाही. कारण एक काळ होता व्यासंगी नामवरजींच्या घरातल्या एका खोलीमधे चे गवेराचा फोटो होता. नंतर जेएनयूवाल्यांच्या, हिंदी विभागांच्या राजकारणात ते आकंठ बुडालेले, योग्य लोकांच्या जागी कमी योग्य लोकांच्या नियुक्त्या करणारे म्हणून भेटत राहिले. मलयज की डायरीच्या प्रकाशनाला उशीर झाला म्हणून रघुवीर सहाय यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांना धमकावणाऱ्या नामवरजींबद्लची माझी भावना आधीसारखी राहिली नाही. त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडून एक, दोन पुरस्कार स्वीकारल्यावरही मला असं वाटतं. पाश्चात्य देशांत सुरू असणाऱ्या मार्क्सवादाविषयीच्या नव्या नव्या चर्चांबद्दलची माहिती आणि त्यांचं भाषण कौशल्य नक्कीच प्रभावित करणारं होतं. पण त्या गोष्टींचा नेहमीच दुरुपयोग झाल्याचंच मी तरी बघितलंय. सहारा समयच्या उद्घाटनावेळी त्यांनी सहाराच्या प्रशंसेखातर अनेक प्राचीन स्तुतिसुमनांचा आधार घेतला.’

नामवर सिंह यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाकडे आपण बघतो, तेव्हा ते नेहमीच तोंड उघडं असलेला, हाथ उचललेले, पाय फिरतीवर आहेत, असा एक माणूस दिसतो. या धावपळीत असे अनेक प्रसंग येतात, की ते मार्क्सवादातल्या नैतिकतेला धक्का पोचवतात. प्रतिभावंत, विचारवंत, समीक्षक, अद्भूत वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ही गोष्ट त्यांचे चमचेच नाही तर त्यांचे टीकाकारही मान्य करतात. 

नामवर सिंह यांनी हिंदी समीक्षेला थंडपणा आणि कोरडेपणातून बाहेर काढलं. त्यांनी समीक्षेला समकालीन जबाबदारीची ओळखू करून देत संशोधनाजवळ नेलं. लिखित आणि वाचिक दोन्ही माध्यमांमधे त्यांनी हिंदी समीक्षेला तिचं मूळ काम काय आहे, ते समजावलं. 

एखादा मोठा माणूस गेला की एका युगाचा अंत असं गुळगुळीत वर्णन केलं जातं. पण ते नामवर सिंग यांच्या बाबतीत तसं नव्हतं. त्यांच्या जाण्याने खरोखरच एक युग संपलंय. ते युग होतं, संघर्ष आणि यश, उत्कर्ष आणि ऱ्हास, शहाणपण आणि मूर्खपणा, सर्वोत्तम आणि मर्यादित, एकांत आणि गर्दी, शिष्य आणि शत्रू या सगळ्यांसोबत एकाचवेळी गतिमान राहण्याचं. या युगांतानंतर हिंदी समाज आणि साहित्याला एका नवी सुरवात करावी लागणार आहे.
 

(न्यूजलाँड्री हिंदीवर आलेल्या या लेखाचा सदानंद घायाळ यांनी अनुवाद केलाय.)