कणकवलीत राणेंच्या विजयाचं श्रेय भाजपचंच!

२६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


कणकवलीत शिवसेनेच्या विजयापेक्षा नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत राणेंपुत्र नितेश राणेंच्या विजयाने यश आलं. पण या यशाचं श्रेय राणेंचं नाही तर भाजपचं आहे. भाजपच्या टेकूशिवाय राणेंच्या विजयाचं गणित जमणारं नव्हतं. त्यासाठीही राणेंना खूप कसरत करावी लागली. भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून‌ ठेवतील का?

कणकवलीत नितेश राणे जिंकले. राणे पितापुत्राच्या लागोपाठच्या चार पराभवानंतर यावेळची लढाई राणेंसाठी अस्तित्वाची लढाई होती. त्यासाठी त्यांना भाजपचा आसरा घ्यावा लागला. १४ वर्षांपूर्वी बंड करताना शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी माझा पराभव करू शकणार नाही असं म्हणणाऱ्या नारायण राणेंना स्वतःचा स्वाभिमान दोन वर्षांतच विसर्जित करावा लागला. आणि भाजपमधे जावं लागलं. यातून राणेंच्या राजकारणाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.

हेही वाचाः शेतकऱ्याच्या पोराने मातब्बर कृषीमंत्र्याला हरवलं, त्याची गोष्ट

पराभवातून आलेलं शहाणपण

नितेश राणे जिंकले कारण त्यांना भाजपची साथ मिळाली. केवळ स्वाभिमानच्या बळावर यावेळी जिंकणं सोपं नाही याचा अंदाज त्यांना लोकसभा निवडणुकीआधीच आला असेल. खुद्द नारायण राणेंना कुडाळ आणि वांद्रे पूर्व विधासनभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत आणि मुलगा निलेश राणेंना लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत पराभूत करून शिवसेनेनं राणेंच्या बंडाचा बदला घेतला.

दुसरीकडे राणेंचा दुसरा मुलगा आमदार नितेश राणे यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना सारी शक्ती पणाला लावेल यात कोणतीच शंका नव्हती. म्हणूनच भाजप फारसं महत्व देत नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून राणेंनी पक्षात प्रवेश मिळवला. मुलाला तिकीटही मिळवून दिलं आणि जिंकूनही आणलं. पण यावेळचा विजय हा नारायण राणेंच्या करिष्म्याचा नव्हता. यावेळी विजय भाजपचा होता.

आता भाजपमधल्या अस्तित्वाची लढाई

राणेंनी अस्तित्वाची लढाई जिंकली. पण आता भाजपमधल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. ही पहिली निवडणूक होती, जिथे शिवसेना विरोधात लढत असूनही राणेंना नेहमीप्रमाणे शिवसेनेवर तोंडसुख घेता येत नव्हतं. तसं करू नका म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना स्पष्ट शब्दात बजावलं होतं.

काँग्रेसमधे असताना त्यांनी आक्रमकपणा सोडला नाही. भाजपमधे तो सोडावा लागेल याची जाणीव राणेंना आहे आणि मीडियाशी बोलताना त्यांना जी कसरत करावी लागतेय त्यातून हे ठळकपणे दिसू लागलंय. त्यामुळे फॅमिली पॉलिटिक्सचं भाजपमधे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तर येत्या काळात राणेंना खूप कसरत करावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे.

हेही वाचाः कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय म्हणत आठ आमदारांना घरी बसवलं!

भाजप आणि राणे दोघांचीही मजबुरी

खरं तर शिवसेनेच्या प्रभावामुळे भाजप कोकणातून हद्दपार झाली होती. राणेंच्या निमित्तानं शिवसेनेशी सामना करून कोकणात हातपाय पसरवण्याचा भाजपचा उद्देश असणार. म्हणूनच शिवसेनेच्या विरोधानंतरही अटी टाकून राणेंना भाजपत प्रवेश दिला गेला.

भाजपप्रवेश ही राणेंची‌ मजबुरी तशीच‌ ती भाजपचीही. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थानिक नेत्यांशी दोन हात करून पक्षाला‌ पुन्हा उभारी दिली. भाजपचं‌ स्थानिक नेतृत्व मात्र पूर्णतः अपयशी ठरलं. म्हणूनच कोकणात राणेंशिवाय भाजपला शिवसेनेशी पंगा घेणं सहज शक्य नाही.

आक्रमक राणे दोन दिवसांतच नरमले

मतदान होताच राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर नेहमीप्रमाणं टीका सुरू केलीय. पण दोन दिवसांत निकाल येताच त्यांचा‌ सूर नरमलाय. कारण भाजपला आता राणेंची नाही, तर शिवसेनेची गरज आहे. निकाल असे आलेत की पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी म्हणजे पुढची १० वर्ष भाजपला शिवसेनेची‌ गरज लागेल. त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंनाच‌ महत्व‌ देईल.

राणेंची आणखी एक उणीव अशी की त्यांचं‌ राजकारण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केल्याशिवाय पुढे जात नाही. जसं सिंधुदुर्गात‌ राणेंना विरोध करून स्थानिक नेते राजकारणात वाढले, पदं‌ मिळवली. राज्याच्या राजकारणात राणेंची‌ स्थिती आता तशीच झालीय. काँग्रेस किंवा भाजपच्या कुबड्या घेतल्याशिवाय राजकारणातल पुढे जाता येणार नाही हे त्यांनाही‌‌ कळून चुकलंय. पण शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपमधे राजकारण करताना राणेंच्या राजकारणाला मर्यादा येणार आहेत.

हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

फॅमिली पॉलिटिक्सचं काय होणार?

राणेंचं पॉलिटिक्स हे सध्या फॅमिलीपुरतं मर्यादित झालंय. त्यांना आपल्या फॅमिलीला नीट सेटल करायचंय. सध्याच्या परिस्थितीत कुणालाही राणेंना आपल्यासोबत घेणं म्हणजे तीन जागा राखीव ठेवण्यासारखं आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांची सोय करावी लागणार आहे. सध्या भाजपने राणेंना राज्यसभेवर आणि त्यांच्या एका मुलाला विधानसभेत पाठवलंय.

आता त्यांचा दुसरा मुलगा माजी खासदार निलेश राणेंचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या राजकीय भवितव्याचा मोठा प्रश्न राणेंसमोर उभा राहील. सध्याच्या परिस्थितीत तर निलेश राणेंना पुढची पाच वर्ष फक्त वाट बघण्याचं राजकारण करावं लागणार आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपची युती कायम राहिली तर मात्र राणेपुत्रापुढे वाट बघण्याशिवाय दुसरं काहीच राहणार नाही. कारण इथे गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आलाय. आणि शिवसेना इथे कुठलीही तडजोड करणार नाही. यावेळच्या निकालाने जसं भल्याभल्या‌ नेत्यांना जमिनीवर आणलंय तसं‌ राणेंनाही. अशा स्थितीत भाजपमधे राहून राणे स्वतःचं अस्तित्व टिकवून‌ ठेवतील का?

हेही वाचाः 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?