नरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय? 

१५ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


बुलडाणा इथले ज्येष्ठ साहित्यिक, मुक्त पत्रकार, साहित्य चळवळीतले बिनीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र लांजेवार यांचं १३ फेब्रुवारीला वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात प्रकाशित झालंय. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

राजमान्य राजश्री प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेजी,

तुमच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करून आज तुमच्याशी संवाद साधताना मन भरून आलंय.

तसं एका कोणत्याही चाकोरीमधे बद्ध करावं असं तुमचं व्यक्तिमत्त्व नाहीच. तरीही तुमच्या व्यक्तिमत्वाचा मी सखोल अभ्यास करतो, तेव्हा मला तुमच्यामधे दिसतो एक विचारवंत, जनसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा सव्यसाची पत्रकार, कुशल संपादक, प्रकाशक, लोकप्रिय वक्ता, धर्मसुधारक, समाजसुधारक, लेखक, इतिहास संशोधक, नाटककार, चित्रपट पटकथा लेखक, अभिनेते, संगीतकार, आंदोलनकतेॅ, खंदे समाजशिक्षक, छोटे उद्योजक, छायाचित्रकार, टंकलेखक, चित्रकार अशा विविध गुणांनी संपन्न असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी.

हेही वाचा: आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा देणाऱ्यांमधे तुमचं नाव अग्रेसर आहे. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांवरून नुसती नजर जरी फिरवली तरी छाती दडपून जाते. एका आयुष्यामधे हे सर्व गुण तुम्ही कसे प्राप्त केले, हे एक न उलगडणारं कोडंच आहे.

तुमच्या समग्र साहित्यामधे तुम्ही विविधांगी लेखन केलंय. तुमच्या साहित्यावरून नुस्ती नजर जरी फिरवली तरी त्यात वैचारिक पुस्तकं आहेत, इतिहास संशोधन पुस्तकं आहेत, नाटकं आहेत, काही जुन्या आठवणी लिहिल्या आहेत, ललित लेखन विपुल प्रमाणात आहे, चरित्रलेखन आहे. हे सर्व लेखन विपरीत परिस्थितीत तुम्ही घडवून आणलेलं महान कार्यच आहे.

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेऊन तुम्ही घरसंसार सांभाळून समाजकार्यात उतरलात. पनवेलसारख्या कोकणी भागात १७ सप्टेंबर १८८५ला तुमचा जन्म झाला. पुढे वडलांसोबत विविध ठिकाणी तुम्ही स्थलांतरित म्हणून फिरत राहतात. हे सर्व करत असताना शेवटी मुंबईला स्थायिक झाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक प्रबोधनकार मिळाला. तुमचं वक्तृत्व, तुमचा विचार हा त्याकाळी जहाल विचार म्हणून समजला जायचा. तुम्ही धार्मिकतेवर ज्या पद्धतीने आघात करत होता ती पद्धत सुरवातीला लोकांना भावत नव्हती. तुमच्या जवळचे कित्येक ब्राह्मण मित्र तुमच्यापासून दुरावले. तुम्ही त्यांना पदोपदी सांगत असत की, मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, मी ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहे, मी भिक्षुकशाहीच्या विरोधात आहे.

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

तुमची शाहू महाराजांसोबत मैत्री होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत तुमची मैत्री होती. तुमचे कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत चांगले संबंध होते. संत गाडगेबाबांसोबत निखळ मैत्री होती. अशी मोठी माणसं तुमच्या सहवासात होती. या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देऊन तुम्ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचा चेहरा देण्याचं काम केलं.

तुम्ही बालविवाहांना विरोध केला. अस्पृश्यता निवारणासाठी जीवाचं रान केलं. तुम्ही विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. तुम्ही हुंडा विरोधात खंबीरपणे चळवळ उभारली. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं आणि सर्व प्रकारच्या धर्माची चिकित्सा आपण केली पाहिजे, हे तुम्ही आम्हाला अग्रक्रमाने सांगितलं. तुमची धर्मचिकित्सा ही डोळस होती. तुमची धर्मचिकित्सा ही विवेकावर आधारित होती. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला देऊ पाहात होता. या सर्वांमधून तुम्हाला मराठी माणसांना विवेकी करण्याचं काम करायचं होतं. मराठी माणूस हा कोणत्याही क्षेत्रात कच खाऊ नये, हे तुम्हाला दाखवायचं होतं.

तसं तुमचं शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत. पण पुढे विविध चांगल्या लोकांच्या संपर्कात येऊन तुम्ही पत्रकारिता, साहित्य, कला, संगीत, चित्र, शिल्प, इतिहास, व्याख्यान अशा विविध कलांचा अभ्यास केला आणि स्वतःला तसं घडवत गेलात. काही अनुवादाचंही तुम्ही काम केलं. आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटात तुम्ही कीर्तनकाराची अव्वल भूमिका केली.

हेही वाचा: लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

तुमचं प्रकाशित झालेलं साहित्य जेव्हा मी बघतो तेव्हा आश्चर्य वाटतं. संगीत सीताशुद्धी, आई थोर तुझे उपकार, श्री संत गाडगेबाबा यांचं चरित्र, ग्रामण्यांचा इतिहास, भिक्षुकशाहीचे बंड, माझी जीवनगाथा, बापाची कसरत आणि मुलीची फसगत, बावला मुमताज प्रकरण, बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा, हिंदवी स्वराज्याचा खून, हिंदूजनांचा ऱ्हास आणि अध:पात, जुन्या आठवणी, खरा ब्राह्मण, कुमारिकांचे शाप, महामायेचे थैमान, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, हिंदू धर्माचे दिव्य, काळाचा काळ, कोदण्डाचा टणत्कार, वाचकांचे पार्लमेंट, विजयादशमीचा संदेश, वक्तृत्व कला आणि साधना, साताऱ्याचे दैव की दैवाचा सतारा, संगीत विधिनिषेध, वैदिक विवाह विधी, ऊठ मऱ्हाठ्या ऊठ, पोटाचे बंड, रायगड यात्रा दर्शन माहिती, शनिमहात्म्य, शेतकऱ्यांचे स्वराज्य, The Temptress, टाकलेलं पोर, स्वाध्याय संदेश, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, पंडिता रमाबाई सरस्वती, अशा विविध विषयांवर आपली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

आपल्या 'माझी जीवनगाथा' या पुस्तकाला धनंजय कीर यांची प्रस्तावना लाभली आहे. आपले भिक्षुकशाहीचे बंड असेल किंवा संत गाडगे बाबांचे चरित्र असेल, 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' असतील या सर्व पुस्तकांमधून आपण सातत्याने विवेकवादाचा पुरस्कार करत राहिलात. अंधश्रद्धेवर प्रहार करत आलात.

मित्रपरिवारामधे तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की, मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, मी भिक्षुकशाहीच्या विरोधात आहे. देणाऱ्याचे आणि घेणा-याचे हात नेहमी स्वच्छ असावे हे तुमचं नेहमीचं तत्व राहिलं आहे. आपल्या घरी येणारी माणसं हीच आपली श्रीमंती असते, हे तुम्ही आपल्या मुलांना सांगत आलात. देवळातल्या मंदिरावर देवाचं पोट नसतं तर तिथल्या भिक्षुकाचं पोट असतं, म्हणून देशातल्या सर्व धार्मिक संस्था नष्ट केल्या पाहिजेत, असं तुम्ही जहालतेने बोलत होतात. मठ आला की मठाधिपती आले, की संप्रदाय सुरु झाला, संप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच आहे असं तुम्ही सतत सांगत होतात.

हेही वाचा: महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

तुम्ही १९२१ला प्रबोधन पाक्षिक सुरु केलं. या प्रबोधन पाक्षिकाच्या नावासोबतच 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत' असं संस्कृत वचन तुम्ही टाकलं होतं. प्रबोधन पुढे मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक तुम्ही सुरु केलं. प्रबोधनमधलं आपलं लेखन विचार ऐकून आपल्याला प्रबोधनकार ठाकरे असं सर्व लोक संबोधू लागले. पुढे प्रबोधन मासिक बंद पडलं. पुण्यामधे महात्मा फुलेंचा पुतळा उभारावा की उभारू नये या वादात तुम्ही उतरला आणि पुण्यात महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्यासाठी तुम्ही जनआंदोलन उभं केलं.

तुमची बंडखोर वृत्ती खरोखरच आजच्या काळात कितपत समाजाला रूचेल याबद्दल शंकाच आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचे तुम्ही साक्षीदार आहात. शिवसेनेच्या १९६६ मधल्या पहिल्या दसरा मेळाव्यात तुम्ही जोशपूर्ण भाषण दिलं होतं, याच शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले अर्थात ते बघण्यासाठी तुम्ही नव्हतात. पण २१ सप्टेंबर १९९५ला म्हणजे आजच्या पंचवीस वर्षांपूर्वी मनोहर जोशींच्या हाताने गणपती दूध प्याला, ही अफवा सर्वत्र पसरली. तुम्ही असता तर या अफवा पसरवणाऱ्यांना चाबकाने मारलं असतं. कारण तुम्ही असत्याला असत्य म्हणणारे आणि खर्‍याला खरं म्हणणारे प्रबोधनकार होता.

तुमचं वक्तृत्व कला आणि साधना हे पुस्तक आजही महाराष्ट्रामधे विचारवंतामधे वाचलं जात आहे. तुमच्या समग्र पुस्तकांचं पुन्हा एकदा प्रकाशन होणं गरजेचं आहे, हे सर्व साहित्य एकत्र येणं गरजेचं आहे. कारण तुमचा विवेकवाद आज महाराष्ट्राला पुन्हा हवा आहे. महाराष्ट्रामधे धार्मिकता आणि धार्मिक तेढ वाढत आहे. सर्व धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर साजरे करण्यात येत आहेत. देवघरातले देव रस्त्यावर मांडून आम्ही धार्मिकतेचं प्रदर्शन करत आहोत. उठता बस्ता मंदिर बांधण्याच्या गोष्टी देशभर होत आहेत. शाळेच्या वर्गखोल्या कमी होतेय आणि मंदिरांची संख्या देशात वाढतेय. या मंदिरांवर देवाचं पोट नाही तर भिक्षुकांचं पोट असतं हे सांगण्याचं धाडस तुम्ही केलं होतं, हे पुन्हा आज महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे.

हेही वाचा: या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा तुम्ही अग्रेसर राहिलात. तुम्ही साप्ताहिक, मासिक, वृत्तपत्र चालवलं आणि सातत्याने प्रबोधनाचा वसा शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठी तुम्ही वेळ प्रसंगी रस्त्यावरसुद्धा उतरलात. महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचारवंत म्हणून इतिहास तुम्हाला कायम लक्षात ठेवेल. आज आपल्या महाराष्ट्रात धार्मिकता, जातीयता वाढत आहे. जात पोटजातींची अंधश्रद्धा सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढीला लागली आहे. बाबा बुवा, महंत, मठाधिपती यांचे सत्संग वाढलेत. राजकारणी नेते अनेक बाबा बुवांच्या नादी लागलेत. अनेक राजकारणी सत्ताधीश, नोकरशाहांच्या हातात विविध राशींच्या खड्यांच्या अंगठ्या दिसतात, हे सर्व बघून तुम्ही पुन्हा एकदा यांच्यावर नुसते बरसला नसता तर चाबूक घेऊन यांना फटकारलं असतं. तुमचा तो अधिकारही होता.

महाराष्ट्र उभा राहण्यासाठी या महाराष्ट्रात विचारांची पेरणी करण्यासाठी तुम्ही आयुष्याचं दान केलं आहे, म्हणून आम्हाला तुमच्या कार्याची उपेक्षा होताना वाईट वाटतं. आज शिवसेना सत्तेत आहे, तरीही महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा वाढतेय. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांचे खरे सूत्रधार मिळत नाहीत. ते लवकर मिळावं असं एकाही लोकप्रतिनिधीला वाटत नाही.

आदरणीय प्रबोधनकार ठाकरेजी, एका अर्थाने बरं झालं, तुम्ही जास्त जगला असता तर निश्चितच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धुरा तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घेतली असती आणि डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांनी पहिला बळी तुमचा घेतला असता, एवढी सध्या सनातनवाल्यांची ताकद वाढली आहे. या सनातनवाद्यांना हे कळत नाही माणूस मारून विचार संपत नाहीत. सध्या दाभोळकर हे कसे शहरी नक्षलवादी होते आणि त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कशी नक्षलवाद्यांना साथ देत होती अशी बदनामी केली जात आहे. विचारांची पेरणी करणाऱ्या महाराष्ट्रात प्रबोधनाची कास धरणाऱ्या कार्यकर्त्यांची कमी नाही. इथे बलिदान देण्यासाठी कोणीच मागे हटत नाही.

मा. प्रबोधनकार ठाकरे, तुमच्या विचारांनी या महाराष्ट्राची भूमी बरीच नांगरली आहे. परंतु घराचेच वासे फिरतात, तसेच आज महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचं झालंय. आज महाराष्ट्रात पुरोगामी ही शिवी झाली आहे. तुमच्यासारख्या मोठ्या विचारवंताने महाराष्ट्राला आत्मभान देणारा क्रांतिकारक विचार दिला असला तरी तुम्ही स्थापन केलेली शिवसेना तुमच्या विचारांपासूनच आता पाठमोरी झाली आहे. त्यांना धर्माचे, जातीचे, भगव्या राजकारणाचे जास्त वेध लागलेत, म्हणून प्रबोधनकार ठाकरे तुम्ही आम्हाला हवे आहात, तुमचे विचार आम्हाला हवे आहेत, कारण तुम्ही आमचे वैचारिक मार्गदर्शक आहात.

हेही वाचा: ना बाळासाहेब ना प्रबोधनकार, त्यांनी दाखवून दिला स्वत:चाच चमत्कार!

संत तुकाराम, संत गाडगेबाबा यांच्या विचारांची पेरणी करणारे तुम्ही फार मोठे कृतिशील विचारवंत होता. आज महाराष्ट्रात पदोपदी विचारवंत दिसतात, पण कृतिशील विवेकी विचारवंतांची आज महाराष्ट्राला गरज आहे. आज तुमची आठवण आली म्हणून तुमच्याशी हा संवाद साधत आहे. तसे तुम्ही मराठी माणूस म्हणून आम्हाला माफ करावं, आम्ही तुम्हाला ना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ शकलो, ना भारतरत्न, ना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुम्हाला देऊ शकलो. तुम्ही गेलात तरी तुमचे विचार अजून कायम आहेत. म्हणतात ना माणूस मरतो, परंतु तो विचारांनी त्यांच्या साहित्यातून जिवंत राहतो.

प्रबोधनकार ठाकरे साहेब, तुमचे विचार पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत, म्हणून आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले तुमच्या विचारांचा जागर सातत्याने करत असतो. तो अधिक बळकट व्हावा हीच अपेक्षा आहे.

तुमच्या विचारांचा चाहता,
नरेंद्र लांजेवार,
बुलडाणा

हेही वाचा: 

रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

एप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया

पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,