नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त

०४ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.

अगदी गेल्या १०० दिवसांच्या आधी भाजपचा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता मुंबईजवळच्या मीरा-भाईंदर शहरात अनभिषिक्त सत्ता उपभोगत होता. पण त्याला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागलाय. भाजपच्या नगरसेविकेनेच त्याच्या विरोधात पद आणि सत्तेचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पोलिसात दाखल केलीय.

नरेंद्र मेहता का गंदा चष्मा

४८ वर्षांच्या नरेंद्र मेहताचा एका अज्ञात बाईसोबतचा अर्धनग्न वीडियोही वायरल झालाय. लैंगिक शोषणाच्याच दुसऱ्या एका केसमधे त्याने कोर्टकडून कसाबसा दिलासा मिळवलाय. विविध प्रकारचे फौजदारी गुन्हे, दावे, तक्रारी असणाऱ्या मेहतावर गैरप्रकार, भ्रष्टाचार असे अनेक प्रकारचे आरोप आहेत. पण आता त्याचा विकृत चेहराही समोर आलाय.

मेहताने गेल्या पाचवर्षाच्या फडणवीस सरकारच्या काळात मीरा भाईंदरमधे बेफाम उच्छाद मांडला होता. महापालिका, पोलिस, महसूल अशा सर्वच प्रशासन यंत्रणा मेहताच्या घरी पाणी भरत होत्या. विरोधी पक्षसुद्धा मेहतासमोर शेपूट टाकून बसला होता. त्याच्या राजकीय कारकीर्दीची उलटी गिनती सुरू झालीय.

पण भाईंदरचा हा भस्मासूर कसा उभा राहिला आणि त्याची वाटचाल कशी झाली, हे बाहेर फारसं कुणाला माहीत नाही. नरेंद्र मेहताची ही कहाणी फक्त मतदारांचेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारी आहे. स्वतःला पार्टी विथ द डिफरन्स म्हणवणारा भाजपही सत्तेसाठी कोणत्या लोकांना मोठं करत होता, याचं आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावरही आलीय.

हेही वाचा : ओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला!

तिसऱ्या महिन्यातच लाच देताना पकडला

मूळ राजस्थानचा जैन - मारवाडी असलेला नरेंद्र लालचंद मेहता हा फक्त आठवी पास आहे. तो सुरवातीला किरकोळ व्यवसाय करत होता. पण त्याने विडियो सीडी, केबल, गुंतवणूक स्कीम, पत्त्यांचा क्लब असे काळेसावळे धंदे सुरू केले. या धंद्यांना संरक्षण मिळावं म्हणून तो ऑगस्ट २००२ मधे मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिला. आणि पहिल्यांदाच अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला.

अवघ्या तीन महिन्यातच म्हणजे डिसेंबर २००२ मधे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहताला त्याच्या ऑफिसमधेच लाच घेताना रंगेहात पकडलं. अनधिकृत बांधकामाची तक्रार करु नये म्हणून त्याने ५१ हजारांची मागणी केली होती. त्यापैकी २० हजारांची लाच घेताना पोलिसांनी त्याला पकडलं.

काँग्रेससह सगळ्याच पक्षांचा पाठिंबा

असे दिवे लावले असतानाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वत:ची अधिकृत उमेदवार शानू गोहिल हिला पाडून लाचखोर मेहताला प्रभाग समिती सभापती म्हणून निवडून दिलं. पालिकेत शिरकाव करतानाच नगररचना विभागातल्या एका अधिकाऱ्यासोबत जमीन घरेदी, टीडीआर घेणं असे झटपट कमाईचे मार्ग शिकून घेतले.

हे सारं कमी होतं म्हणून की काय, २००७ मधे अवघे दोन नगरसेवक असताना मेहता मीरा भाईंदरसारख्या एका मोठ्या महापालिकेचा महापौर बनला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी, बसपा आणि जनता दल सेक्युलर  या पक्षांच्या नेत्यांनी त्याला मतदान केलं.

जैन धर्मीयांची वोट बँक बनवली

महापौर होताच मेहताने आमदारकीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्याने धार्मिक ध्रुवीकरणाचा हातखंडा प्रयोग केला. शहरात मोठ्या संख्येने असलेल्या जैन धर्मियांची वोट बँक तयार करण्यासाठी मांसाहार बंदीचं भलतंच भूत उभं केलं. त्यामुळे शहरात नवा धार्मिक वाद उभा केला. जैन धर्मात उच्च नैतिक मूल्यांचा आणि इंद्रिय निग्रहाचा आग्रह धरला जातो, त्याच धर्माचे अनुयायी अशा अधःपतित व्यक्तीला नेता मानू लागले. मेहताला मतदान करण्याचं आवाहन करणारे जैन मुनींचे वीडियो वायरल झाले.

एकेकाळी भाईंदरचे सर्वेसर्वा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गिल्बर्ट मेंडोन्सांमुळे मेहता महापौर झाला होता. २००९ मधे त्याच मेंडोन्सांच्या विरोधात मेहताने भाजपची उमेदवारी मिळवत विधानसभा निवडणूक लढवली. पण मेंडोन्सांनी मेहताचा पराभव केला. २०१४च्या मोदी लाटेत मात्र मेंडोन्सा यांचा पराभव करुन मेहता आमदार झाला. 

२०१५ मधे त्याने शिवसेना, बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन महापालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आणली आणि गीता जैन महापौर झाल्या. २०१७ मधे पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. आमदार झाल्यापासून मेहताने पालिका आणि पक्षावर पूर्णपणे पकड बसवली.

हेही वाचा : कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेहताला अगदी तळहाताच्या फोडासारखे जपत राहिले, हे कुणापासूनच लपून राहिलेलं नाही. एखादा मुख्यमंत्री मेहतासारख्या आमदारासाठी शहरात इतका वेळ येतो आणि त्याच्या बेकायदेशीर कामांना त्याला पाठीशी घालतो, याविषयी मीरा भाईंदरच्या लोकांना आजही आश्चर्य वाटतं.

फडणवीसांची मेहतांवर असलेल्या मेहेरनजरेची तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. त्यानंतर हा प्रकार थोडाफार कमी झाला, पण थांबला नाही. आमदार झाल्यावर मेहताने फडणवीसकृपा गृहित धरून सर्वत्र धुडगूस आणि धूमाकूळ घातला. तो सांगेल ती पूर्व दिशा आणि तो सांगेल तो नियम असा मनमर्जीचा कारभार शहरात सुरू होता.

सात दिवसांच्या ओल्या बाळंति‍णीला रस्त्यावर

महापालिकेचा कारभार तर मेहताच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली होता. २५ टक्के इतक्या टक्केवारीच्या आरोप केले गेले. कोणत्याही बांधकामासाठी फुटाला ३०० रुपये घेतले जात असल्याचा आरोप खुद्द शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी केला. मेहता सांगेल ती बांधकामं, टपऱ्या, झोपड्या हटवायच्या आणि बाकीच्यांकडे ढुंकूनदेखील बघायचं नाही, असा जणू फतवाच पालिका प्रशासनाच्या कपाळावर बट्टय़ासारखा लावण्यात आला.

राजकीय चमकोगिरीसाठी मेहताने महापालिका तिजोरीतल्या करदात्या नागरिकांच्या पैशांची लयलूट सुरु केली. मनमर्जीने ठेके दिले. त्यासाठी कर आणि दरवाढीची कुऱ्हाड चालवली. विरोधकांची बांधकामं तोडण्यापासून त्यांची कामं रोखण्यासारखे प्रकार झाले. दिव्यांग, चर्मकारांचे स्टॉल उद्ध्वस्त करण्यासही त्याने मागेपुढे पाहिलं नाही. तर स्वत:च्या नवरात्रोत्सवासाठी सात दिवसांच्या नवजात बालिकेला तिच्या ओल्या बाळंतीण आईसह भरपावसात रस्त्यावर आणण्याचं पापही त्यानं केलं.

राज्यात देवेंद्र, भाईंदरमधे नरेंद्र

मेहताने कवडीमोलाने जमिनी घेतल्या. अनेकांना तर मोबदलापण दिला नाही. नाविकास क्षेत्र, सीआरझेड, खारफुटी, पाणथळ, इकोसेन्सेटिव झोन अशा जमिनी ताब्यात घेऊन सत्तेचा वापर करत बेकायदा विकसित केल्या. टेक्निकल शाळेचं आरक्षण बळकावून त्यात अन्य शाळा सुरू केली. ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेल, अपना घर, ७११ हॉस्पिटल, अनेक इमारती अशी त्यांच्या बेकायदेशीर कामांची जंत्रीच आहे.

वीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या मेहताची लोकायुक्तांनी २०१६मधे बेनामी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत खुली चौकशी लावली. पण फडणवीस मेहरबान असल्याने ती चौकशी दाबून ठेवली. त्याने याच दबावतंत्राचा उपयोग करून काही गुन्ह्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली. लाच घेताना रंगेहात पकडला गेलेला मेहता शहराचा प्रभाग सभापती, विरोधी पक्षनेता, भाजपचा जिल्हाध्यक्ष, आमदार आणि सर्वेसर्वाही झाला.

हेही वाचा : ओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध?

आमदारकीसोबत गॉडफादरचीही सत्ता गेली

७११ नावाच्या कंपनीमार्फत त्याने प्रचंड जमीन खरेदी आणि मालमत्ता बनवली. लाचखोरी हा राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा राजमार्ग असल्याचं मेहताने पोलीसांसह सर्वच यंत्रणांच्या, कार्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून दाखवून दिलं. पण लोकांच्या हातात असलेल्या मताच्या अधिकाराने मेहताला असलेला सगळा माज आणि मस्ती उतरवली.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत कधी मेहतांच्या कार्यकर्त्या असणाऱ्या गीता जैन यांनी अपक्ष म्हणून मेहतांचा पराभव केला. मेहताच्या दुर्दैवाने म्हणा की मीरा भाईंदर शहराच्या सुदैवाने म्हणा, राज्यातदेखील भाजपची सत्ता गेली आणि मेहताचे गॉडफादर असलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं.

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका अंगलट

मीरा भाईंदरमधे बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याच्या कामास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी महापौर दालन, सभापती दालनाची तोडफोड केली होती. तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे संस्कार काढणाऱ्या मेहताला आता एका पाठोपाठ एक धक्के बसू लागलेत. लाचार झालेले पालिका, पोलिस, महसूल प्रशासन आता नाईलाजाने का होईना पण मेहताच्या विरोधात हळूहळू भुमिका घेऊ लागलेत. नवनियुक्त महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मेहताच्या कंपनीचे प्लेझंट पार्क जवळचे बेकायदा गाळे तोडून धक्का दिला.

डोंगर फोडल्याप्रकरणी तसंच तलावचोरी प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय. ७११ क्लब प्रकरणातल्या दाखल गुन्ह्याचा तपास आता होऊ शकेल. मेहताच्या अपना घर योजनेतल्या दहा इमारतींमधले तब्बल ३० मजले हे अनधिकृत आहेत. आता अधिवेशनात प्रश्न येताच पालिकेने ते तोडायची कारवाई कागदोपत्री तरी सुरु केलीय.

मेहताचा विकृत चेहराही वायरल

हे सगळं होत असताना मेहताची एका अनोळखी महिलेसह अर्धनग्न अवस्थेतली वीडियो क्लीप वायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यापाठोपाठ आता एका मागासवर्गीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून गरोदर ठेवणं, मूल जन्माला घालणं, सत्तापदाच्या धाकधमकीने सतत लैंगिक शोषण करणं अशा प्रकरणी नरेंद्र मेहतासह त्याचा साथीदार संजय थरथरे यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

ही तक्रार सांगते की मेहताने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. पण ती मागासवर्गीय असल्याने तिच्याशी समाजासमोर लग्न करण्यास नकार दिला. पण १३ जून २००१ला डहाणुतल्या एका मंदिरात तिच्याशी गुपचूप लग्न केलं. ती गर्भवती असतानाच त्याने १६ जानेवारी २००३ ला सुमन सिंग या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. २२ मार्च २००३ला पीडित महिला बाळंत झाली. पण मेहताने बाळाला स्वतःचं नाव दिलं नाही. उलट पीडितेला बाळासह मारून टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरूच ठेवलं.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

भाईंदरसाठी हे प्रकरण नवं नाही

पोलिस तक्रार आणि कोर्ट केसमुळे या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू असली तरी भाईंदरच्या लोकांसाठी हे प्रकरण नवीन नाही. २०१५मधे आमदार असताना नरेंद्र मेहताने पीडितेला नागपूर अधिवेशनला बोलावून तिचं विमान तिकीट काढलं होतं. ते त्यांच्या पत्नी सुमन मेहतांना कळल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला होता.

सुमन यांनी पिडीतेच्या मुलाला त्यांच्या शाळेतून काढुन टाकलं. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने पीडितेच्या मुलाला शाळेत घेण्याचे आदेश दिले. पण नंतरही मुलाचा त्रास सुरूच राहिला. त्याची तुकडी बदलली गेली. त्याला फुटबॉल संघाच्या कॅप्टनपदावरून काढून टाकलं.

करून करून भागला आणि भाजप सोडला

भाजपच्याच नगरसेविकेने ही तक्रार केल्याने मेहताचं आणखी एक विकृत वास्तव चव्हाट्यावर आलंय. या नगरसेविकेने तक्रार करून आल्यावर स्वतःचा एक वीडियो वायरल केला. त्यात त्या रडत रडत आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याचं सांगत आहेत.

त्याच्या आधीच आणखी एक वीडियो वायरल झाला. हा वीडियोही या नगरसेविकेने स्टिंग ऑपरेशन करून काढल्याचं सांगितलं. त्या वीडियोमुळे नरेंद्र मेहता नैतिकदृष्ट्या पूर्णपणे नागडा झाला. तरीही त्याने स्वतःच आपलाही वीडियो प्रसिद्ध केला. त्यात पक्ष आपल्यामुळे बदनाम होत असल्यामुळे आपण भाजप सोडत असल्याचं म्हटलंय. खरंतर त्याचा नाईलाज झालाय, तरीही गिरे तो भी टांग उपर, असा त्याचा पवित्रा आहे.

नरेंद्र मेहताच्या कृष्णकृत्यांची चर्चा थेट विधानपरिषदेतही झाली. गृहमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाईचं आश्वासन दिलंय. पण त्याने कोर्टात जाऊन २० ऑगस्टपर्यंत कारवाई रोखण्याचे आदेश मिळवलेत. पण या नरेंद्राचे उपद्व्यापच इतके आहेत की तो फार दिवस वाचू शकणार नाही.

हेही वाचा : 

एल्गार प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपण्याची तीन कारणं

लोकसंख्या नियंत्रणाने देशापुढच्या अडचणी वाढणार तर नाहीत ना?

मोदी-ट्रम्प दोस्तीच्या अमेरिकन मस्करीवर हॉटस्टारने बंदी का घातली?

सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला

(लेखक हे मीरा भाईंदर येथील पत्रकार आहेत.)