नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

१४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. या साऱ्यावर एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक जिंकणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. निवडणुका जिंकण्याचा किंवा जिंकून देण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर बराच काळ राहील. पण आता पंतप्रधानांनी आपल्या पराभवाकडंही बघायला हवं. ते आपल्या भाषणांतून पराभूत होत चाललेत. त्यांचा हा पराभव तुम्हाला निवडणुकीच्या निकालातून दिसणार नाही. त्यांच्या भाषणातला खोटारडेपणा पकडला जाईल, भाषणातल्या तथ्यांची तपासणी केली जाईल. तेव्हा तुम्हाला त्यांचा पराभव दिसेल.

इतिहासाच्या उंबरठ्यावर उभं राहून खोटेपणाचा आधार घेत पंतप्रधान इतिहासाची हेटाळणी करतायत. इतिहासात त्यांच्या या अवाजवी धाडसाची नोंद होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच आपल्या शिखराची निवड केलीय. त्यांचं एक शिखर उंच आकाशात आहे आणि एक खोल दरीमधे, जिला ना कुठली मर्यादा ना पातळी.

हेही वाचाः पाकिस्तानचा `टांग उपर` डे

आपण एका शिखरावर असल्याचं लोकांना भासवून स्वतः दरीत राहणाऱ्या मोदींना कुठल्याही किमतीत सत्ता हवीय. या दरीमधेच एक नायक असूनही त्यांचं बोलणं धुतल्या तांदळासारखं पांढरशुभ्र होऊन जातं. या दरीची निवडही ते स्वतःच करतात. खोटी तथ्यं सांगणं, खोटा इतिहास मांडणं, विरोधी पक्षाच्या नेत्याला त्याच्या मातृभाषेत वादविवाद करण्याचं आव्हान देणं, ही गल्लीतली भाषा आहे. पंतप्रधानांची नाही.

खरं पाहिलं तर पंतप्रधानांसाठी नेहरू एक आव्हान बनलेत. त्यांनी स्वतःच नेहरूंना एक आव्हान मानलंय. संधी मिळाली की ते नेहरूंना खोडून मोडून काढतात. त्यांच्या भक्तांची टोळी वॉट्सअप नावाच्या युनिवर्सिटीत नेहरूंविषयी सतत खोटी तथ्यं सांगत फिरते. नेहरूंसमोर खोटारडेपणाचा मुखवटा घातलेला एक नेहरू उभा केलाय. त्यामुळं ही लढाई मोदी आणि नेहरू अशी राहिली नाही. आता लढाई खरे नेहरू आणि खोटे नेहरू अशी झालीय.

तुम्हाला माहितीय, यात विजय खऱ्या नेहरूंचा होणाराय. नेहरूंशी लढता लढता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चहुबाजुंनी नेहरूंचंच भूत उभं राहिलंय. नेहरूंचा एक इतिहास आहे. हा इतिहास पुस्तकं जाळल्यानं किंवा नेहरूंचं स्मारक असलेल्या तीन मूर्ती भवनला पाडल्यानं धुळीस मिळणारा नाही. मोदींच्या आसपास आता नेहरूच दिसू लागलेत. त्यांचे भक्तही आता काही दिवसांमधेच मोदींऐवजी नेहरू विशेषज्ञ होतील. त्यांचा नेहरू खोटा असला, तरी ते शेवटी नेहरूंबद्दलच सांगतायत.

हेही वाचाः कृतीच त्यांची भाषा होती

पंतप्रधानांची निवडणूक प्रचारातली भाषण ऐकली, की वाटतं आपल्या तत्कालीन नेत्यांचा अपमान करणं एवढंच नेहरूंचं योगदान आहे का? नेहरूंनी कधी नेताजी सुभाषचंद्र बोसांचा, कधी सरदार पटेलांचा, तर कधी शहीद भगतसिंगांचा अपमान केलाय आणि हे आता त्यांच्या पदरात एवढंच शिल्लक आहे. नेहरूंनी कधी स्वातंत्र्यासाठी झळ सोसली नाही. ते निव्वळ काही नेत्यांचा अपमान करण्याच्या कामातच गुंग होते.

ब्रिटीशांनी नेहरूंना या नेत्यांचा अपमान केल्यामुळेच तर नऊ वर्षं जेलची हवा खायला घातली नसेल? या नेत्यांमधील वैचारिक मतभेद, अंतर्विरोध आणि वेगवेगळ्या वाटेनं चालण्याच्या त्यांच्या निर्णयांना आम्ही किती काळ अपमानाच्या चौकटीतूनच बघणार आहोत? अशा पद्धतीनं बघायचं ठरलं तर सगळेजण एकमेकांचा अपमानच करत असल्याचं दिसेल.

एकाहून एक तगडे नेते, हेच स्वातंत्र्य चळवळीचं वैशिष्ट्य होतं. हेच वैशिष्टय गांधींचं होतं. त्या काळाचंही होतं. त्यामुळंच काँग्रेस आणि काँग्रेसशिवायच्या जगात आपल्याला नेत्यांनी भरलेलं आकाश दिसत होतं. गांधींनाही ही संधी त्यांच्या आधीचे नेते आणि समाजसुधारकांनी मिळवून दिली होती.

भगतसिंग आणि नेहरू यांच्याविषयी पंतप्रधान जे चुकीचं बोललेत, ते चुकीचं नसून साफ खोटं आहे. नेहरू आणि फील्ड मार्शल करिअप्पा, जनरल थिमय्या यांच्याविषयीही जे बोललेत, तेही खोटं होतं. अनेकांचा एक गैरसमज असतो, पंतप्रधानांच्या रिसर्च टीमची ही चूक आहे. पण असं नाही. त्यांची भाषणं ध्यान देऊन बघा. त्याच्या एका एका शब्दासोबत अख्खं वाक्य बघाल. तेव्हा त्यात एक सूत्रबद्धपणा दिसून येईल.

भगतसिंगांबद्दलच्या विधानावरून वाद झाल्यावर त्यांनी पहिल्यांदाच या सगळ्यांपासून स्वतःला वेगळं केलं. यामधेही एक गोम आहे. ते आपल्याला इतिहासाची माहिती नसल्याचं सांगतात आणि पुढच्याच वाक्यात मोठ्या खात्रीनं प्रश्न विचारण्याच्या सुरात म्हणतात, की भगतसिंग जेलमधे होते, तेव्हा काँग्रेसचा कोणताच नेता त्यांना भेटायला गेला नव्हता. आणखी एक उदाहरण म्हणजे गुजरात निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीसंबंधी पंतप्रधान मोदींच्या विधानाकडे बघितलंत, तर त्यातही हाच सूत्रबद्धपणा दिसून येईल.

हेही वाचाः सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

भाषणं तयार करणाऱ्यांना हे माहितीय की सर्वसामान्य जनतेला इतिहास पुस्तकांमधून नाही तर अशा अफवांमधूनच कळतो. भगतसिंगांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून त्यावेळच्या नेत्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, ही अफवाही लोकसुलभच आहे. अशाच लोकसुलभ अफवांशी जोडून नेहरूंभोवती संशयाचं धुकं तयार करण्यात आलंय. नाव न घेताच सांगितलं की नेहरू भगतसिंगांना भेटायला गेले नव्हते. हे एवढं साधं तथ्य आहे की यामधे सामान्यातल्या सामान्य रिसर्च टीमचीही चूक होऊ शकत नाही. तारीख किंवा इसवीसनात चूक होऊ शकते, पण अख्खा प्रसंगच चुकीचा होत असेल, तर यात एक पॅटर्न स्पष्ट दिसतो.

इथं एक गोष्ट नोंदवायला हवी, ती म्हणजे भगतसिंग धार्मिक कट्टरतेच्या विरोधात होते आणि देवालाही मानत नव्हते. जमातवादाच्या विरोधात भगत सिंगांइतकीच नेहरूंचीही भूमिका स्पष्ट होती. दोघांची भूमिका एकमेकांना पूरक होती. नेहरू आणि भगतसिंग एकमेकांचा आदर करायचे. आणि दोघांमधे मतभेद असतील, तर मग काय यांचा हिशोब निवडणूक प्रचारात करायचा का?

नेहरूंच्या कारभारावर टीका करणारी अनेक पुस्तकं बाजारात आहेत. पंतप्रधान मोदीही आपल्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी करतायत. परंतु हे करताना त्यांनी हा इतिहास खोटेपणावर आधारलेला नसावा, याची काळजी घ्यायला हवी. बीजेपीचे प्रचारक म्हणून किंवा पंतप्रधान म्हणूनही ते हा खोटारडेपणाचा इतिहास मांडू शकत नाहीत. वॉट्सअप युनिवर्सिटीतून नेहरूंविषयी पसरवल्या जाणाऱ्या विषारी इतिहासाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. या सगळ्या अफवांतून आता मोदीच नेहरूंना काहीशी विश्रांती देऊ शकतात. नेहरूंना आराम मिळाला, तर मग मोदींनाही आराम मिळेल.

हेही वाचाः 

पंजाबराव देशमुखांना आपण आतातरी स्वीकारायला हवं: डॉ. स्वामिनाथन

वीपी सिंग : मंडल आयोगासाठी पंतप्रधानपद पणास लावणारा नेता