नसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील?

२८ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?

कारवां ए मोहोब्बते या कार्यक्रमात बोलत असताना नसीरुद्दीन म्हणाले, ‘धर्मांध विष पसरलं आहे. कोणीही कायदा हातात घेतो. एका गायीचा मृत्यू हा एका पोलिस अधिकाऱ्याचा झुंडीने केलेल्या खुनापेक्षा अधिक महत्वाचा आहे, असं दिसतंय.’

नेमकं काय म्हणाले?

बुलंदशहरमधे सुबोध कुमार सिंगच्या हत्येविषयीचा हा संदर्भ नसीरुद्दीन यांनी दिलेला होता. अखलाकच्या हत्येचा तपास प्रामाणिकपणे करणाऱ्या सुबोध कुमार सिंग यांना जाणीवपूर्वक ठार मारण्यात आलं. सत्तेच्या विरोधात सुबोध असो वा अखलाक, सत्ताधारी त्यांना संपवण्यात कसूर सोडत नाहीत.

पुढे बोलताना नसीरुद्दीन म्हणाले, ‘मला काळजी वाटते माझ्या मुलांची. त्यांना कुठलाच धर्म नाही. मला वाटतं चांगल्या आणि वाईट गोष्टींचा कुठल्या एका धर्माशी संबंध नाही.’ आपल्या मुलांना कोणत्याच धर्माचं शिक्षण न देणारे नसीरुद्दीन पुढे म्हणाले, ‘एखादी झुंड जेव्हा या मुलांना घेरेल आणि विचारेल, तुमचा धर्म काय? तेव्हा ही मुलं काय उत्तर देतील? हा विचार करुन मला भीती नाही, राग येतो. कुठे पळून जाण्याचा प्रश्नच नाही. हे आपलं घर आहे. पण (धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतची) परिस्थिती बदलताना दिसत नाही.’

या विधानात माझ्या मुलांना तर धर्माचं सुरक्षित समजलं जाणारं कवचही नाही आणि ज्यांना आहे त्यांच्याही हत्या होताहेत. ही चिंताजनक परिस्थिती असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी नोंदवलं. नसीरुद्दीन म्हणतात तशी परिस्थिती खरोखरच आहे काय?

याआधी कोण असं बोललंय?

नसीरुद्दीन शाह ही काही पहिली व्यक्ती नाही जिने असं वक्तव्य केलंय. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असहिष्णुता वाढतच चाललीय. त्याचे अनेक दाखले देता येतील. चार विचारवंतांच्या हत्या, ‘झुंडींनी’ केलेल्या पन्नासहून अधिक हत्या, योगी सरकारच्या पोलिसांनी केलेले दीड हजारहून अधिक एनकाउंटर्स आणि व्यापमंसारख्या घोटाळ्यात पन्नासहून अधिक ‘नैसर्गिक’ मृत्यू. अर्थात ही काही मोजकी उदाहरणं आहेत. हे सारं बघणारी, अनुभवणारी व्यक्ती चिंताक्रांत झाली नाही, तरच नवल!

वाढत्या असहिष्णुतेचा निषेध म्हणून २०१५-१६ मध्ये अनेक नामवंत लेखक कलावंतांनी पुरस्कार परत केले. वैज्ञानिकांनी जाहीर विधानं केली. त्यावेळेस आमीर खानचं असहिष्णुतेबाबतचं वक्तव्य जाणीवपूर्वक वादग्रस्त करून त्याला ट्रोल करण्यात आलं. विविध योजनांचं ॲम्बॅसिडरपद त्याच्याकडून काढून घेतलं. त्यासाठी आमीरविरोधात कॅम्पेन राबवलं गेलं. या कॅम्पेनची पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ‘आय एम अ ट्रोल’ या पुस्तकात पोलखोल केलीय.

पण या सगळ्यांविषयी मुख्य प्रवाहातला मीडिया मौन बाळगून आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाची भूमिका अस्तंगत होत चाललीय. या बेसुमार हिंसेबाबत, अराजकाबाबत सरकारला जबाबदार धरण्यातही मीडिया सपशेल अपयशी ठरलाय. ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ ही गैरसरकारी संस्था दरवर्षी मीडियाच्या स्वातंत्र्यासंदर्भात आकेडवारी असलेला रिपोर्ट प्रसिद्ध करते. या रिपोर्टवरूनही आपल्याला मीडियाची सध्याची दूरवस्था समजून येते.

मीडियाने मौनामुळे लोकांमधे संभ्रम

जवळपास १८० देशांतल्या मीडियाच्या स्वातंत्र्याची अवस्था आपल्याला या रिपोर्टमधून कळते. बहुलतेचा स्तर, माध्यमांना असणारं स्वातंत्र्य, वातावरण, स्वतःहून केली जाणारी सेन्सॉरशिप, पारदर्शकता, कायदेशीर चौकट, माहिती आणि बातमी पब्लिश करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा यासारख्या निकषांवर हा रिपोर्ट आधारलेला आहे. या निकषांनुसार माध्यम स्वातंत्र्याबाबतची जागतिक क्रमवारी ठरवण्यात येते.

२०१८ मधे पहिल्यांदाच या संस्थेने आपल्या अहवालात भारताला इशारा दिलाय. १८० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १३८ वा आहे. त्याखालोखाल शेजारच्या पाकिस्तानचा १३९ वा क्रमांक आहे. २०१८ मधे भारतात ६ पत्रकारांच्या हत्या झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. ऑनलाइन धमक्यांपासून ते कोब्रापोस्टच्या स्टिंगपर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधत या अहवालात भारत सरकारला काही महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्यात.

या साऱ्या तपशीलांमधून सध्या भारतीय मीडियाची अवस्था स्पष्ट होते. विशेषतः २०१४ साली मोदी सरकार आल्यानंतर मीडियाच्या स्वातंत्र्याची स्पेस दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याचं वेगवेगळ्या विविध घटनांवरून दिसतंय. पण हे काही न्यूज चॅनल, पेपरात दिसत नाही. त्यामुळे कुणी देशात असहिष्णुतेचं वातावरण वाढलंय, असं म्हटलं की सर्वसामान्यांमधे संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातं. खरं तर असहिष्णुता वाढली आहे, असं कुणी म्हणताच त्या व्यक्तीवर होणारा हल्ला, शिवीगाळ यातून त्या व्यक्तीचं म्हणणं सिद्ध होतं.

सायबर स्वयंसेवक टोळीचा उद्योग

बायकांच्या बाबतीत तर हा मॉब खूप विकृत होताना दिसतो. एखाद्या बाईनं असहिष्णुता वाढलीय किंवा अशा आशयाचं वक्तव्य केल्यास तिचे अश्लील फोटो, विडीओ तयार करून वायरल केले जातात. या सायबर स्वयंसेवक टोळीचा हा उद्योग जोरात सुरू आहे. हा सगळा समाजात धार्मिक दुही निर्माण करण्याचा पद्धतशीर डाव आहे. जावेद अख्तर, नसीरूद्दीन शहा, आमीर खान, हमीद अन्सारी अशा सार्वजनिक जीवनातील मुस्लिम व्यक्तींना टार्गेट केलं जात असेल तर इथे सर्वसामान्यांची काय कथा!

कुण्या साध्वीनं दोन वर्षांपूर्वी सांगितलं की तिन्ही खानांच्या सिनेमांवर बहिष्कार टाका. शाहरूख, सलमान, आमीर हे मुस्लिम आहेत, असं माझ्या डोक्यात कधीही आलं नव्हतं. बॉलीवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातल्या कलाकार, खेळाडू यांच्यावर जनतेने निस्सीम प्रेम केलं तो त्यांचा अभिनय पाहून किंवा खेळ पाहून. भारताच्या एकसंधतेत बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं मोठं योगदान आहे. रामचंद्र गुहा यांनी ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकात हे योगदान सविस्तर विशद केलंय.

लोकशाहीचा पाया बळकट करणाऱ्या जुन्या स्वायत्त धर्मनिरपेक्ष संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीकडे बॉलीवूड, क्रिकेटसारख्या क्षेत्रातही धार्मिक आधारावर फूट पाडण्याची खेळी सुरु आहे. २०१० ते २०१७ या काळात झुंडींनी केलेल्या हत्यांपैकी ९७ टक्के हत्या या २०१४ नंतरच्या आहेत. यामधे मारले गेलेल्यांमधे ८६ टक्के मुस्लिम असल्याचा अहवाल इंडियास्पेंडने दिलाय.

नव्या पिढीला काय देणार?

हे सगळं बघितलं तर नसीरूद्दीन शाह म्हणाले ते किती योग्य आहे, याची खात्री पटते. धर्म आणि राजकारणाची आपल्या सोयीची भेळ करणं घातक आहे. यातून आपण एक समाज म्हणून कोसळून जावू. विविधता हीच आपली ताकद आहे. धार्मिक सामंजस्य आणि शांततापूर्ण सहअस्तित्व या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग आहेत. नसीरुद्दीन यांना याची पुरेशी जाणीव आहे. त्यामुळेच इम्रान खानच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने स्वतःचं तोंड आरशात बघावं, असा सल्ला ते देऊ शकतात.

नसीरुद्दीन  यांना पाकिस्तानात पाठवू इच्छिणाऱ्यांना भारताचा सर्वसमावेशकतेचा विचार कणभरही समजत नाही. पुढच्या पिढ्यांना तगवू शकेल अशा प्रकारे नैसर्गिक संसाधनांचा वापर करत केलेला विकास म्हणजे शाश्वत, टिकावू विकास. निरामय निरोगी पर्यावरणाचं हेच सूत्र सामाजिक पर्यावरण, सौर्हादासाठी गरजेचं असतं. नैसर्गिक संसाधनांची अपरिमित लूट करून भकास केलेलं पर्यावरण एका बाजूला आणि हिंसेने द्वेषाने बरबटलेलं सामाजिक वातावरण दुसऱ्या बाजूला. अशा वेळी येणाऱ्या पिढीच्या हाती आपण कोणतं जग सोपवून जातो आहोत याची काळजी, भीती, अपराधभाव असणं अत्यंत स्वाभाविक आहे. नसीरुद्दीन यांनी तेच व्यक्त केलंय. म्हणूनच त्यांच म्हणणं अधिक महत्त्वाचं आहे.

समाज म्हणून आपण आणि आपण निवडून दिलेलं सरकार दोन्हीकडून जर सर्वांच्या मनात सुरक्षिततेबाबत आश्वस्तता निर्माण होत नसेल तर ते आपलं सामूहिक अपयश आहे, हे मान्य करायला हवं. या असहिष्णू धर्मांध वळणावर प्रेमाचं अधिष्ठान अधिकाधिक भक्कम करत जाणं हाच एकमेव पर्याय आहे आणि भवतालात विखुरलेले प्रेमाचे झरे हीच आशा आहे, हे देखील तितकंच खरं.