नॅथन लायन: ग्राऊंडमॅन ते मॅचविनर

१९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


ऑस्ट्रेलियाला तब्बल चार वर्षांनी मॅचविनर स्पिनर गवसलाय. शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतरची फिरकीपटूची ही पोकळी नॅथन लायनच्या रुपाने भरून निघताना दिसतेय. मैदान तयाप रपणापा मातीतला कर्मचारी ते मैदान गाजवणारा मॅचविनर अशी त्याची सक्सेसस्टोरी सिनेमात शोभेल अशी आहे.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधला पर्थ स्टेडियमवरच्या दुसरी मॅचमधे भारत हरला. आता या मॅचचं ‘पोस्ट मॉर्टम’ करून हाराकीरीची कारणं शोधण्याचं काम जोरात सुरु आहे. ही शोधमोहीम भारताने स्पिनर न खेळवल्याने पराभव झाला इथे येऊन संपली. हा शोध लागण्याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन. या ऑफ स्पिनरने भारताच्या आठ बॅट्समनना पॅवेलियनची वाट धरायला लावली.

विशेष म्हणजे लायनने दोन्ही डावात भारताच्या तगड्या बॅटींगची शिकार केली. त्याने या शिकारी पध्दतशीर केल्या. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या विकेट घेतल्या. त्यावरून हे दोघं आपल्या बेजबाबदार फटकेबाजीमुळे आऊट झाले नाहीत. लायनने या दोघांना ‘बाद’ केलं. पद्धतशीर सापळा रचून शिकार केली. ही बॉलिंग बघून भारतीय टीम मॅनेजमेंटला हिरव्या विकेटवर आपणही स्पेशलिस्ट स्पिनर घेऊन खेळायला हवं होतं, असं आता वाटायला लागलंय.

लक्षात न येणारा ‘लायन’

भारतातासख्या स्पिनर्सची खाण असलेल्या देशाला असं वाटायला लावलं ते नॅथन लायनने. सीरिजच्या सुरवातीपासूनच त्याच्याकडे दूर्लक्ष झालं. तो काही ऑस्ट्रेलियाच्या भात्यातलं एक प्रमुख अस्त्र असेल असंही कुणाला वाटलं नाही. पण आता त्याने पहिल्या दोन मॅचमधे केलेल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज सुरू होण्याआधी दोन्ही संघातलं कोणकोणं चांगलं खेळू शकतं याची चर्चा सुरू होती. यामध्ये सर्वचजण भारतीय बॅट्समन आणि ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर यांच्यात जोरदार टक्कर होईल, असं म्हणत होते. पण सीरिजच्या पहिल्याच मॅचने चर्चेचा हा सूरच बदलला. ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलिंगची चर्चा थांबली.

चर्चा सुरू झाली ती ऑस्ट्रेलियाच्या टीममधला एकमेव स्पिनर नॅथन लायनची. पण ही चर्चाही भारताच्या पहिल्याच विजयामुळे दुर्लक्षित झाली. तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियासाठी लायनने दिलेलं योगदानच दुर्लक्षित राहिलं. आपण सध्याच्या जागतिक क्रिकेटमधील प्रभावशाली स्पिनर्समधे प्रामुख्याने नावं घेतो, ती सगळी आशिया खंडातली आहेत. याला कारणीभूत आहेत, इथल्या स्पिन बॉलिंगसाठी पोषक असलेल्या खेळपट्या.

या खेळपट्यांमुळे इथे फास्ट बॉलरहून फिरकीचीच चर्चा जास्त होते. भारताचा रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन सध्या आघाडीवर आहेत. बॉलिंगच्या आयसीसी क्रमवारीत दोघंही पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तर लायन चौदाव्या स्थानावर आहे. 

फास्टरच्या कळपातला एकमेव ‘टर्नर’

आशियाई खंडातले स्पिनर्स हे फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर भरपूर विकेट काढतात. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात हेच फिरकीपटू कधी-कधी अंतिम अकरातही बसत नाहीत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रवींद्र जडेजा. तो क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. पण तो संघात नाही. याउलट नॅथन लायनने या टेस्ट सीरिजच्या दोन मॅचमधे आतापर्यंत १३ बळी मिळवलेत.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्या या फास्ट बॉलरसाठी पोषक असतात. त्यामुळे इथे अंतिम अकरामधे एखादाच स्पिनर असतो आणि त्याचा रोलही मर्यादित असायचा. फास्ट बॉलर दमले की त्याला कही ओवर टाकण्यासाठी बोलवायचं. त्याच्याकडून विकेट काढण्याची अपेक्षा कॅप्टनलाही नसायची. त्यातूनच विकेट पडली तर तो जॅकपॉट ठरायचा. रेस्टनंतर पुन्हा विकेटवर फास्ट बॉलरच्या तोफा धडाडत होत्या.

महान फिरकीपटू शेन वॉर्न निवृत्त झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघात स्पिनर्सची काहीशी अशीच अवस्था झाली होती. पण हा ट्रेंड नॅथन लायनने बदलवला. त्याने भारत, श्रीलंका, बांगलादेश या देशांच्या दौऱ्यांत संधी मिळेल तसं विकेट घेत आपणही विकेट काढू शकतो असा विश्वास कॅप्टनला दिला. त्यानंतर कॅप्टनचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलत गेला. आज तो ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॉलर म्हणून ओळखला जातोय.

सिनेमासाठीची मसाला स्टोरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या दोन टेस्टमधे १३ विकेट घेणाऱ्या नॅथन लायनने सगळ्यांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. त्यातल्या त्यात त्याने भारताचा कॅप्टन विराट कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवून शॉर्ट लेगला कॅच द्यायला भाग पाडलं. ही एका ऑफ स्पिनरने काढलेली आयडियल विकेट मानण्यात येतेय. स्पिन बॉलिंगवर खेळण्यात तरबेज असणाऱ्या विराटची विकेट घेतल्याने लायनकडे क्रिकेटच्या जाणकारांचं लक्ष वेधलं गेलंय.

तसा लायन हा लोकांचं लक्ष वेधून घेण्यात पटाईत असलेला गृहस्थ. म्हणजे याचा अर्थ तो काही विचित्र कृत्य करुन लक्ष वेधून घेतो असा नाही. त्याची कामगिरीच इतकी लक्षवेधी असते की तो लोकांचं लक्ष त्याच्याकडे जातं. या लक्षवेधी लायनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्याचा प्रवास एखाद्या सिनेमासारखा आहे.

सिनेमासाठीचा सगळा मसाला त्याच्या आयुष्यात सापडतो. किंबहुना त्याच्या क्रिकेट प्रवासावर एखादा प्रेरणादायी सिनेमाही होऊ शकतो. या गुणी ऑफ स्पिनरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु झाली ती २०११ ला श्रीलंकेविरुद्धच्या गाले कसोटीतून. 

ग्राऊंड स्टाफचा झाला स्पिनर

लायनने क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदा पाऊल टाकलं ते खेळाडू म्हणून नाही तर ग्राऊंड स्टाफ म्हणून. त्याने ओवल मैदानावर ग्राऊंड स्टाफ म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. ग्राऊंड स्टाफ म्हणून चार वर्षाचं प्रशिक्षण घेतलेलं. याच काळात तो मैदानावर बॉलिंगही करायचा. त्याच्या बॉलिंगकडे बिग बॅशमधील रेडबॅक्स टीमचे कोच डॅरेन बेरी यांचं लक्ष गेलं. त्यांनी त्याला लगेचच आपल्या टी-२० टीममधे घेतलं.

बिग बॅश स्पर्धेतल्या त्याच्या प्रभावी बॉलिंगमुळे त्याला साऊथ ऑस्ट्रेलियाकडून प्रतिष्ठित शेफिल्ड शिल्डमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याचवर्षी त्याला ऑस्ट्रेलियाच्या ए टीममधे संधी मिळाली. त्याने झिंम्बाब्वे दौऱ्यात ११ विकेट मिळवून मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. या कामगिरीने त्याने राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं. या संधीचे सोनं करत त्याने पदार्पणाच्या टेस्टमधेच एका डावात पाच विकेट घेतल्या. या खेळीने आपण शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतरची पोकळी भरुन काढण्यास सक्षम असल्याचं त्याने सिद्ध केलं.

आता रमतोय कसोटीत

श्रीलंकेतील यशाचा हाच सिलसिला त्याने ऑस्ट्रेलियातही सुरु ठेवला. त्याने होमपीचवरच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच टेस्टच्या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ बळी टिपले. ज्या बॉलरची सुरवात टी-२० मधून झाली, त्याने नंतर टेस्टमधे एक एक शिखर सर करण्यास सुरवात केलीय. आज लायन हा एक टेस्ट मॅचसाठीचे सगळे गुण असलेला बॉलर झालाय. त्याच्या कलात्मक ऑफ स्पिनची चर्चा जगभरातल्या दिग्गज खेळाडूंमधे सुरू आहे.
 
हा असा लक्षवेधी, गुणी, वॉर्नचा वारसदार आणि कलात्मक ऑफ स्पिनर आपल्या आठ वर्षाच्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर पोचलाय. एक ग्राऊंड स्टाफ म्हणून सुरवात करणारा व्यक्ती क्रिकेटच्या यशोशिखरावर पोचेल ही स्टोरी एखाद्या सिनेमातच आपल्याला दिसू शकेल. पण लायन हे त्याचं जितजागतं उदाहरण आहे.

शेन वॉर्नचा वारसदार

जलदगती गोलंदाजांची मांदियाळी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा तो आता प्रमुख बॉलर आहे. लायन ऑस्ट्रेलियाचा टेस्टमधे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत सध्या चौथ्या नंबरवर आहे. लायन आता वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाकडून टेस्टमधे सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू बनलाय.

लायनने ८२ टेस्टमधे ३३१ विकेट घेतलेत. त्यातले जवळपास १५० विकेट हे होमपीचवर खेळताना मिळवलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर तब्बल चार वर्षांनी खऱ्या अर्थाने लायनच्या रुपाने फिरकीचा वारसदार मिळालाय.

लायनची विशेष बाब म्हणजे त्याने आपली क्रिकेट कारकीर्द टी-२० लीगपासून सुरु केलीय. तरीही तो या टी-२० लीगच्या मायाजाळात अडकला नाही. म्हणूनच आज तो टेस्ट क्रिकेटमधला एक बेस्ट बॉलर म्हणून नावारुपला आलाय.

(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)