विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

२८ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


नव्वदच्या दशकात भारतात विज्ञान दिन साजरा केला जावा, ही संकल्पना पुढे आली. हा विज्ञान दिवस सर सीवी रमण यांच्याशी निगडित असावा असं ठरलं. तो दिवस ठरला २८ फेब्रुवारी. या दिवशी सर सीवी रमण यांचा जन्मदिवसही नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग का साजरा केला जातो २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस?

तुम्हाला यंदाचा नोबेल पुरस्कार घोषित झाला, कुणीतरी फोन केला. यावेळी ते पुन्हा चिडले. नेहमीच येणाऱ्या मित्रांच्या अशा फोनमुळे त्यांना वैताग यायचा. मात्र यावेळी आलेला हा कॉल खरा होता. त्यांना १९३० या वर्षाचा नोबेल पुरस्कार खरोखरच घोषित झाला होता. केवळ भारतच नव्हे तर विज्ञानाच्या क्षेत्रात आशिया खंडातला हा पहिला पुरस्कार एका भारतीयाला जात होता. 

भारतात आधुनिक विज्ञानाची नुकतीच रुजवात झाली होती. भारतच नाही तर जगभरातून या नावाची चर्चा व्हायला लागली होती. हे नाव होतं, चंद्रशेखर व्यंकट रमण. सीवी रमण. जगातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार हा त्यापूर्वी फक्त एका भारतीयाला घोषित झाला होता. यापूर्वी १९१३ या वर्षी साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?

आईच्या घरगुती प्रयोगांचा वारसा

सर सीवी रमण जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुवनैक्कवल इथे झाला. त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर हे विज्ञानाचे शिक्षक होते. आई पार्वती अय्यर ह्या गृहिणी होत्या. मात्र त्या अत्यंत कल्पक आणि प्रयोगशील होत्या. त्या अनेक छोटी मोठी उपकरणं घरीच तयार करत. त्यात काही बिघाड झाला तर त्यांची दुरूस्तदेखील करत. लहानगा चंद्रशेखर हे सगळं पाहत असे. वडलांचा वाचनाचा वारसा त्यांना आपसूकच मिळाला. 

त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने सर्व चकित व्हायचे. आता पुढे काय शिकवावं असाही प्रश्न त्यांच्या शिक्षकांपुढे पडायचा. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच ते मॅट्रिकची परीक्षा पास झालेत. १९०१मधे त्यांनी इंटरमीडिएटची परीक्षा पास केली. १९०२ मधे मद्रासच्या प्रेसिडेंसी कॉलेजला त्यांना बीएसाठी प्रवेश मिळवला. १९०५ मधे प्रथम श्रेणीत ही पदवी मिळवणारे ते एकमेव विद्यार्थी होते. एमएची डिग्री घेत असताना ते प्रोफेसर आरएल जोन्स यांचे लाडके विद्यार्थी होते. त्यांच्या फेवरी पिरट इंटरफेरोमीटर या यंत्राचा उपयोग रमण प्रयोगांसाठी करायचे. या यंत्रामधून ते प्रकाशकिरणांचं मोजमाप करायचा प्रयत्न करायचे.

प्रेमाचं म्युझिकल विज्ञान

१९०७ मधे एमएच्या पदवीसह रमण गोल्ड मेडलदेखील मिळाले. पुढचं शिक्षणही त्यांनी भारतात राहूनच घेतलं. ते वायोलिन आणि अन्य वाद्यांच्या ध्वनिकंपनांवर संशोधन करत होते. स्वतः उत्तम वादक होते. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांच्या आयुष्यात हळूहळू प्रेमाचंही म्युझिकल विज्ञान फुलायला लागलं. वीणावादन करणाऱ्या लोकसुंदरी यांच्याशी त्यांच्या मनाच्या ताराही जुळल्या. ६ मे १९०७ला त्यांचं लग्न झालं.

मोठ्या भावासारखंच सरकारी नोकरीत रुजू व्हावं, असं रमण यांना वाटलं. त्यांनी आयएएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची भारत सरकारच्या अर्थविभागात सहायक अकाउंटंट जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे वय फक्त १९ वर्ष होते. पुढे ते अकाउंटंट जनरलही झाले. विज्ञानात रमणाऱ्या रमण यांचं मन काही या नोकरीत लागत नव्हतं. एक दिवस फिरता फिरता त्यांना ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स’ ही संस्था दिसली. तिथे त्यांचं एक उज्ज्वल भविष्य दिसायला लागलं.

कोलकाता इथे डॉ. महेंद्रलाल सरकार यांच्या पुढाकाराने २९ जुलै १८७६ला विज्ञान विषयाला समर्पित एक संस्था स्थापन झाली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, ऊर्जा अशा अनेक विषयांवर संशोधन करणारी ही भारतातली सर्वात जुनी इन्स्टिट्यूट आहे. १९३३पर्यंत रमण इथेच संशोधन करत होते. जगप्रसिद्ध रमण इफेक्टचा शोधही इथेच लागला.

हेही वाचा : इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं

समुद्राच्या प्रेरणेतून रमण इफेक्ट

१९१७ला रमण यांनी शासकीय नोकरी सोडली. कलकत्ता विद्यापीठात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नव्या पिढीत आणि लहान मुलांत ते रमायचे. त्यांच्या शंकांचं निराकरण करायचे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तरुणांना प्रोत्साहित करत. १९१८ ला लंडन इथे ब्रिटीश राष्ट्रकुलातल्या विद्यापीठांचं संमेलन होतं. या संमेलनात रमण यांनी कलकत्ता विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं. ती त्यांची पहिली विदेशवारी होती.   

१९२१मधेही इंग्लंडमधल्या अशाच परिषदेवरून जहाजाने परतीचा प्रवास सुरू असताना रमण समुद्राची आणि आकाशाची निळाई पाहत होते. अनुभवत होते. समुद्राची आणि आकाशाची निळाई त्यांना जणू प्रश्न विचारत होती. समुद्र निळा का दिसत असावा? आकाश निळं का दिसत असावं? निळ्या आकाशामुळे तर समुद्र निळा दिसत नसेल ना? की सूर्यकिरणामुळे समुद्राचं पाणी निळं दिसत असेल का?  

लॉर्ड रॅले या वैज्ञानिकाने सूर्यकिरणांवर विविध प्रयोग केले होते. त्यांच्यानुसार वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंसोबत सूर्यकिरण भिडले तर प्रकाश सर्व दिशांना पसरतो. या क्रियेमुळे आकाश निळं दिसतं. या प्रक्रियेला रॅलेच्या नावावरूनच ‘रॅले प्रकीर्णन’ असं नाव पडलं. सागराची निळाई ही आकाशामुळे असते असं लॉर्ड रिले यांनी जाहीर केलं होतं. मात्र रमण यांचं मन ते मानायला तयार नव्हतं. ‘स्पेक्ट्रोमीटर’ हे उपकरण त्यांच्या सोबतच होतं. जहाजावरूनच त्यांनी त्यांचे प्रयोग सुरू केले. अनेक प्रयोगांती त्यांच्या लक्षात आलं, की सागराच्या निळाईमागे आकाश हे कारण नाही. सागराचा निळा रंग हा सागरातील पाणी आणि प्रकाशाच्या संयोगाने भासतो.  

विज्ञानाच्या प्रसारासाठी

रमण यांचा परतीचा प्रवास सुरूच होता. या प्रवासात सोबतीला हा रंगाचाच विचार होता. कलकत्त्याला आल्याबरोबर त्यांनी त्यावर अत्यंत सखोल संशोधन सुरू केलं. त्यांचं संशोधन ‘नेचर’ या अत्यंत प्रतिष्ठित मॅग्झिनमधे प्रकाशित झांलं. याच संशोधनाने पुढे वैज्ञानिक क्षेत्रात महान क्रांती झाली. त्यांच्या संशोधनाची संपूर्ण विश्वात चर्चा व्हायला लागली. कौतुक व्हायला लागलं. ‘ऑप्टिकस’ नामक वैज्ञानिक क्षेत्रातील रमण यांच्या योगदानाची दखल घेतली गेली. त्याबद्दल १९२४ साठी रमण यांना ‘रॉयल सोसायटी’चं सदस्यत्त्व मिळालं.

भारतीयांमधे विज्ञान रुजावं, त्यात आवड निर्माण व्हावी म्हणून रमण हे सदैव प्रयत्नरत असायचे. याच प्रेरणेतून १९२६ मधे त्यांनी ‘इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स’ हे मासिक सुरू केलं. ते याचे पहिले संपादक होते. दुसऱ्या अंकात त्यांना ‘न्यू रेडिएशन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या अंकांमुळे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, वैज्ञानिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सहजरीत्या विज्ञान पोहचायला लागलं.

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

२८ फेब्रुवारीचा चमत्कार

समुद्राच्या निळ्या रंगाच्या चमत्कारात रमण खोल खोल बुडाले होते. वारंवार प्रयोग सुरू होते. काहीतरी नवीनच डोळ्यांसमोर येत होतं. अस्वस्थ येराझारा, सतत टिपणं काढणं सुरूच होतं. ‘युरेका... युरोका...’ सापडलं सापडलं, असं त्यांच्या मनाने ठाम केलं. भौतकशास्त्राच्या विश्वातील एक रहस्य पहिल्यांदाच त्यांना गवसलं होत. तो दिवस होता २८ फेब्रुवारी १९२८ चा. 

लेजर किरणांपासून अनेक आधुनिक संशोधनांचा पाया या शोधाने रचला. रमण यांनी केलेल्या इफेक्टिव संशोधनाला त्यांच्याच नावावरून ‘रमण इफेक्ट’ हे नाव देण्यात आलं. याच संशोधनासाठी त्यांना १९३०मधे अत्यंत प्रतिष्ठेचं नोबल पारितोषिक मिळालं. २८ फेब्रुवारीच्या या चमत्काराने भारताची प्रभा अधिक लख्ख झाली.

भारतीय विज्ञानाच्या क्षेत्रातलं हे एक प्रचंड मोठं यश होतं. रमण यांना बेंगलोर येथील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेज’चे संचालक म्हणून जबाबदारी त्यांना देण्यात आली. तिथे त्यांनी १९४८पर्यंत काम केलं. त्यानंतर त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ‘रमण रिसर्च इंस्टिट्यूट’चा डोलारा उभा केला. रमण यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इथे आपले प्रयोग सुरूच ठेवलेत.

शेवटचा श्वास समाधानाचा

या इंस्टिट्यूटसाठी त्यांनी आपली जमापुंजी खर्ची घातली. लोकांनीही त्यांना मदत केली. त्यांनी ‘द फिजिओलॉजी ऑफ विजन’ सारखे अनेक ग्रंथ लिहिले. आपल्या कामात ते सातत्याने व्यस्त असायचे. भारत स्वतंत्र झाल्यावर 1952 मधे उपराष्ट्रपतीपद स्वीकारण्याचं त्यांना निमंत्रण मिळालं. मात्र अत्यंत विनयपूर्वक त्यांनी ते नाकारलं. 

पुढे १९५४ मधे त्यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. १९९८मधे अमेरिकन केमिकल सोसायटीने रमण इफेक्टचा ‘आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक रासायनिक घटना’ म्हणून गौरव केला. नागपूरला त्यांच्या नावाने 'रमण विज्ञान केंद्र सुरू झालं.' १९६८ला त्यांनी अज्ञात कारणांमुळे रॉयल सोसायटीचं सदस्यत्त्व परत केलं. तसं करणारे ते एकमेव मान्यवर आहेत. 

१९६८च्या ऑक्टोबरमधे ते त्यांच्याच इन्स्टिट्यूटमधे काम करता करता कोसळले. त्यांना हॉस्पिटलमधे हवलण्यात आलं. पण त्या चार भिंतीतलं मरण त्यांना नको होतं. त्यामुळे इंन्स्टिट्यूटच्या आवारात त्यांना ठेवण्यात आलं. मृत्यूच्या आदल्या दिवशी त्यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी भवितव्याविषयी चर्चा केली. २१ नोव्हेंबर १९७०च्या सकाळी त्यांनी समाधानाने आपला देह ठेवला.

राष्ट्रीय विज्ञान दिनाची सुरवात

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने विज्ञान दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी कोणती तारीख निवडावी याचा विचार सुरू झाला. तेव्हा या खात्याचे सचिव शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर होते. सर्वानुमतीने ही तारीख २८ फेब्रुवारी नक्की झाली. जगाच्या पाठीवर विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने रमण इफेक्टच्या रूपात दिलेली अनमोल देणगी ही याच दिवशी मिळाली होती. या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा करण्यास सुरवात झाली.

हेही वाचा : 

पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?

जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ