जातपात तोडक मंडळाच्या परिषदेचं आंबेडकरांचं भाषण वाचून आयोजकांनी तो कार्यक्रमचं रद्द केला. नंतर ते भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ नावाने खूप लोकप्रिय झालं. आता नयनतारा सहगल यांना उद्घाटनाला येऊ नये असं सांगितलंय. निमंत्रण रद्द करणाऱ्यांनी रांगड्या मराठीपणाच्या वारशाचा अपमान केलाय, अशी भूमिका मांडणारं पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत.
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अंगणात आक्रीत घडतंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण मागं घेण्यात आलं. आणि नव्या, सोयीच्या उद्घाटक भाषणाच्या शोधाची अभुतपूर्व धावपळ सुरू झालीय. या धावपळीला अजून यश आलं नाही. याची अजिबात चिंता वाटत नाही. कारण सोयीचं बोलतील असे तथाकथित उद्घाटक पैशापासरी आहेत. त्यांना यातलाच हमखास मिळेलही आणि संमेलनाचं उद्घाटनही होईल.
खरं तर साहित्य संमेलनाच्या मांडवात काय घडतंय किंवा काय घडणार आहे यामधे आम्हाला काडीचाही रस नाही. भले आम्हाला मराठीद्वेष्ठा म्हटलं तरी फिकीर नाही. मराठी साहित्यिकांना बैल वगैरे म्हटल्याचं आणि तेही आमच्या साहित्यिकांनी समजुतीने घेतल्याचं कळल्यावर तर या मांडवाचे अजिबात आकर्षण राहिलं नाही. तेही फायद्याचंच झालं म्हणा.
गुराखी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, कष्टकरी स्त्रियांचे संमेलन, भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन, विद्रोही अशा अनेक प्रकारच्या मांडवात फिरता आलं आणि मायमराठीची वेगवेगळी शानदार, रुबाबदार रूपं समजावून घेता आली. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या घडामोडींवर बोलण्याइतके आम्ही मोठे नाही आणि छोटे असलो तरी आम्ही बोलावे इतक्या लायकीचेही ते राहिलेलं नाही. तरीही नयनतारा सहगल यांच्या बाबतीत जे घडले त्याबाबत रामदासी परंपरेतले असलो असतो तर गुळणी धरून बसलो असतो, आम्ही पडलो नामदेवतुकारामांचे वारसदार.
नामदेवांनी भारतभर फिरून मानवी सहिष्णुतेचा आवाज बुलंद केला आणि पंजाबच्या घुमानमधे आपला समृद्ध वारसा प्रस्थापित करतानाच शीख धर्मग्रंथात आपल्या वाणीला अढळस्थान दिलं. पंजाबच्या सांस्कृतिक परंपरेने या वारशाला थँक्स म्हणताना घुमानमधे साहित्य संमेलनाचा उत्सव डोक्यावर घेतला. ही संत नामदेवांची कमाई होती. ती काल महामंडळांच्या धारकऱ्यांनी नयनतारांचा अपमान करून बेमुर्वतखोरपणे मातीत घातली. आम्ही लेखक नाही त्यामुळे मान्यता मिळवण्याची किंवा कोणत्याच पुरस्काराची चिंता नसल्याने नामदेवांच्या मराठी परंपरेचा अपमान गिळता येत नाही. असो.
आमच्या मराठी भाषेत लिहिणाऱ्या लेखक कवींची जमात हे अनाकलनीय असं अजब प्रकरण. त्यातल्या अनेकांनी अवाक होऊन तोंडात बोट घालून संताप जाहीर केला. हे होऊच कसं शकतं हा त्यांना पडलेला यक्षप्रश्न आहे. आम्हाला तर महामंडळाने आणि संयोजकांनी केलेल्या कृतीचा अजिबात अचंबा वाटला नाही. मनसेच्या जिल्हाध्यक्षाचं धमकीचं पत्र हा रचलेला बनाव आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षाला बळीचा बकरा बनवण्यात आलं.
यामागच्या राजकारणाचे खरे सूत्रधार हे साडेतीन टक्क्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वाचं प्रवक्तेपण करणारे आहेत. त्यांनी हे जे घडवलेय ते त्यांच्या भूमिकेला अनुरूपच आणि ठरवून घडवलेलंय. मुळातच असहिष्णुतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रवृत्तींनी सहगलांचे सहिष्णुतेचे धडे गिरवण्यासाठी साहित्य संस्कृतीच्या या संस्था आपल्या बुडाखाली घेतलेल्या नाहीत. अशा संस्था मुठीत ठेवूनच सांस्कृतिक अधिमान्यता मिळवता येते हे ते पक्के जाणून आहेत.
नयनतारांचं भाषण झालंच असतं तर या धारकऱ्यांचा पराभवच होता. सांस्कृतिक मैदानावरची लढाई बेसावधपणेही हरण्याइतपत ते कच्चे मुळीच नाहीत. नयनतारा सहगलांचे घणाघाती भाषण संघीय संस्कारातल्या मुख्यमंत्र्यांना झेपणारे नाही, या भीतीने उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण परत घेतलं. या कृतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या न झालेल्या क्रांतिकारी ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली.
लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या १९३६ च्या वार्षिक परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आलं. तब्येत बरी नसतानाही त्यांनी ते निमंत्रण स्विकारलं. आणि प्रचंड मेहनत घेवून अध्यक्षीय भाषण तयार करून संयोजकांकडे पाठवलं. संयोजक आर्यसमाजी नेते होते. परखड चिकीत्सा करणारं हे भाषण संयोजकांना स्वतःच्या अडचणींचं वाटलं.
संयोजकांनी डॉ. आंबेडकरांना काही मतं भाषणातून काढून टाकावीत अशी विनंती केली. पण डॉ. आंबेडकरांनी, ‘ माझी मतं पटली नाहीत तर स्वागत समितीने असहमतीचा ठराव मांडून आपली नाराजी दाखविली तरी त्याचं मी स्वागत करेन. पण माझ्या विचारावर कोणी सेन्सॉर केलेलं मला चालणार नाही.’ असं ठणकावून सांगितलं. डॉ. आंबेडकर आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळले नाहीत.
शेवटी संयोजकांना परिषदच रद्द करावी लागली. ही रांगड्या मराठीची विचार अभिव्यक्तीची उज्ज्वल परंपरा आहे. अखिल भारतीय संमेलनवाल्यांनी केवळ नयनतारांचाच अपमान केला नाही तर या उज्ज्वल परंपरेचाही अपमान केलाय. डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षीय भाषणाबाबत ज्या प्रवृत्तींनी असा व्यवहार केला त्याच प्रवृत्तींनी नयनतारा सहगलांना दिलेले निमंत्रण मागे घेवून अपमान केलाय. याच वर्चस्ववादी शक्ती ग्रंथकारसभा निर्माण करणाऱ्यांमधे प्रबळ होत्या. त्यामुळे महात्मा फुलेंनी या प्रवृत्तींना घालमोड्या दादा म्हणून त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
आज नयनतारांच्या अपमानाबाबत तारस्वरात गळा काढणाऱ्या साहित्यिकांना महात्मा फुलेंची ही भूमिका एक तर कळली नाही. आणि कळली असेल तर हितसंबंधाच्या राजकारणाला सोईची नसल्याने ती जाणूनबुजून नजरेआड केली. घालमोड्या दादांच्या पंक्तीला बसणं त्यांना सोईचं वाटत राहिलं. मराठी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात बहुजन अभिव्यक्तीला पायाखाली घेत मायमराठीला मातीत गाडण्याचं काम पाप संघीय धारकरी करत आलेत.
या पापाचे खरे धनी हे एकीकडे महात्मा फुलेंचा वारसा सोईपुरता मिरवतात. आणि मान्यतेसाठी धारकऱ्यांच्या अखिल भारतीय संमेलनाच्या मांडवात आश्रित बनतात. महात्मा फुलेंच्या भूमिेकेला वळसा घालण्याच्या आपल्या दुटप्पी व्यवहारानेच मराठी साहित्य आणि संस्कृतीचं खूप नुकसान झालंय.
लेखक किंवा कवी जे लिहितो ती त्याची राजकीय कृती असते. या राजकीय कृतीमागे एक समग्रलक्षी भूमिका असते. आजचे मराठी साहित्यविश्व ही भूमिकाच विसरून गेलेय इतकी भयाण शांतता पसरलीय. हे विदारक वास्तव दिनकर मनवर यांच्या कवितेच्या निमित्ताने भयावह पद्धतीने सगळ्यांच्या नजरेसमोर आलं. आपण आपसूकच धारकऱ्यांच्या कटाचे वाहक झाल्याचं चित्र आहे.
आजचे मराठी साहित्यिक का लिहायचे आणि कुणासाठी लिहायचे या संभ्रमात आहेत. हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर सहगलांचे उद्घाटनपर भाषण बाकी कोणी वाचतील न वाचतील पण मराठी कवी, लेखकांनी आवर्जून वाचायला हवं. इतकं महत्त्वाचं ते भाषण आहे. या भाषणात मानवी मूल्यं प्रबळ करणाऱ्या भारतीय परंपरेचा वेध घेण्यात आलाय. बिघडत्या भारताबाबत आणि बिघडवण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रवृत्तींवर परखडपणे हल्ला केलाय. या संघर्षात लेखक, कवींनी कुठे असायला हवं, लेखक कवींची राजकीय कृती काय असते, कलावंताची भूमिका आणि त्यातून येणारी जबाबदारी काय असते याचं प्रशिक्षणही हे भाषण करतं.
लेखक किंवा कवी किंवा कोणताही कलावंत समष्ठीच्या जगण्याशी एकरूप होवून अभिव्यक्त होतो. तेव्हा त्याची अभिव्यक्ती सर्वदूर पोचताना भाषेचाही अडसर राहत नाही. नयनतारा सहगल यांचं इंग्रजीतले भाषण वाचायला मिळालं. इंग्रजी वाचता येते पण कळत नाही. तरीही गदारोळ उठलेलं भाषण वाचण्याची उत्सुकता असल्याने वाचण्याचं धाडस केलं. आयुष्यातला हा पहिलाच इंग्रजी लेख वाचला आणि तो समजलाही. याचं उत्तरही त्याच भाषणाच्या कंटेंटमधेच आहे.
हे आटोपतं घेत असतानाच साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याची बातमी आलीय. या बातमीने संमेलनावर भावनेच्या भरात बहिष्कार टाकणारेही गहिवरून गेलेत. तिकडे साहित्य संमेलनाच्या जेष्ठ लाभार्थ्यांनी तुकोबारायांच्या वंशजांनाच सोबत घेतलंय. संमेलनावर बहिष्कार न टाकता संमेलनस्थळी राबणाऱ्या लोकांचा आदर करण्यासाठी सहभागी होण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे हा गहीवर फारच दाटून येण्याची शक्यता आहे. नामदेव, तुकोबारायांसहीत फुले, आंबेडकरांचा वारसा मिरवणाऱ्यांसोबत सगळेच जण बहिष्काराचं हत्यार म्यान करून यवतमाळच्या दिशेने पावलं टाकतील, अशी चिन्हं दिसतायत.
शेवटी प्रश्न मान्यता मिळवण्याचा असतो. ती मिळाली की अकादमीची लढाई सोपी होते. कवी, लेखक, नाटककार, कथाकार यापैकी कोणीच नसल्याने आम्हाला मान्यता हवी असण्याचा प्रश्नच नाही. पण आमची रसिक म्हणून भूक आहेच. ती यवतमाळला न जाताही भागवता येईल. पण अट इतकीच की तुम्हाला मायमराठीची हाक ऐकता आली पाहिजे. ही हाक दलित, आदिवासी, स्त्रिया, भटके किंवा विद्रोही कुठूनही येईल. महात्मा फुलेंच्या वारशाची हीच तर पुण्याई आहे.
(लेखक हे सिंधदुर्ग जिल्ह्यात शिक्षक असून परिवर्तनवादी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.)