नयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात?

०४ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.

कार्यक्रमः भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार सोहळा

ठिकाणः एस. एम. जोशी सभागृह, पुणे

वेळः २ एप्रिल, सायंकाळी ५.३० वाजता

वक्त्या: प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल

विषयः देशातली लोकशाही

१. समाजवाद हे जगण्याचं तत्त्वज्ञान

आजकाल आपल्या आजूबाजूला समाजवाद हा शब्दच ऐकू येत नाही. सध्या समाज बाजारपेठेच्या आहारी गेलाय. त्यातल्या चंगळवादाने प्रत्येक गोष्टीची किंमत आणि तिच्या बाजारातल्या किंमतीवरून सामाजिक स्तराची मोजणी केली जाते. म्हणूनच समाजातल्या मूठभर हायफाय लोकांसाठी समाजवाद आउट ऑफ फॅशन झालाय.

हेही वाचाः नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

१९३१ पासून काँग्रेसची आर्थिक धोरणंही समाजवादावर आधारलेली होती. आपल्याला समाजवाद फक्त पुस्तकातला एक अर्थव्यवस्थेशी संबंधित विचारधारा वाटते. पण तसं नाहीय. आपण आयुष्य कसं जगायला हवं, याचं हे मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान आहे. अशी नेहरूंची समाजवादाकडे बघण्याची दृष्टी होती. भारतातल्या परिस्थितीला हाताळण्याचा तो एक सर्वात चांगला मार्ग होता. भाई वैद्य समाजवादाच्या या मार्गावर  आयुष्यभर चालले. 

२. हे खऱ्या हिंदू धर्माच्याही विरोधात

स्वातंत्र्यानंतरचं राजकारण ध्येयवादी होतं. आता सुरू असलेल्या राजकारणाशी त्याचा काहीच संबंध उरलेला नाही. सेक्युलॅरिझमवर रोजच्या रोज हल्ले केले जात आहेत. समानतेला किंमत उरलेली नाही. देशातल्या लोकांमधे हिंदू आणि इतर असा भेद केला जातो. हा भेदाभेद करणारे कट्टर हिंदुत्ववादी आहेत. पण खरं तर खऱ्या हिंदू धर्माच्या ते पूर्णपणे विरोधात आहे.  

हिंदूंमधलेही अनेक रॅशनल नागरिक कट्टर जातीयवादी विचारधारेला विरोध करत आहेत. दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या विरोधात सूडबुद्ध ठेवून हिंसाचार केला जातो, त्या राजकीय अजेंड्याला ते विरोध करत आहेत. 

हेही वाचाः संमेलनाध्यक्षांच्या भाषणापेक्षाही महत्त्वाचं लक्ष्मीकांत देशमुखांचं भाषण

आपल्या घटनेचा विचार केला, तर लोकशाहीत धर्माला काहीच किंमत नाही. ती अगदी खासगी गोष्ट मानली गेलीय. पण लोकशाहीच्या विरोधकांना सेक्युलॅरिझमच्या ऐवजी हिंदूराष्ट्र स्थापन करायचंय. राज्यघटना बनवणाऱ्या समितीमधे खरंतर बहुसंख्य हिंदूच होते. पण स्वातंत्र्यानंतर भारताची ओळख ही धर्माच्या आधारावर नसायला हवं, असं त्यांना वाटत होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं. 

३. हा तर घटनेवरचा हल्ला

सर्व धर्मांविषयी आदर हवा आणि प्रत्येक धर्माचं संरक्षण व्हायला हवं, असा विचार सेक्युलर डेमोक्रसीमधे आहे. आपल्या घटनासमितीने लोकशाही निवडली. त्यात वेगवेगळ्या संस्कृतींना मानणाऱ्या प्रत्येकाला एक सारखाच मतांचा अधिकार मिळावा, असे प्रयत्न घटनासमितीच्या लोकांनी केलेत. 

पण या विविधतेचा सन्मान करणारा वारसाच संपवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या कट्टर हिंदुत्ववाद्यांसाठी बाकीच्या धर्मांचे लोक परकीय असतात. विशेषतः मुसलमान तर देशाचे शत्रू आहेतच, असं मानून टार्गेट केलं जातं. आता तर त्यांना राष्ट्रद्रोही म्हटलं जातं.

शोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी विचार, कल्पकता आणि वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टींना हिंदुत्ववाद्यांच्या नव्या भारतात स्थान नाही. इथे विरोधकांना राष्ट्रद्रोहाच्या खोट्या आरोपांवरून जेलमधे पाठवलं जातंय. तर अनेकांचा कोणताही दोष नसताना छळ केला जातोय. 

हेही वाचाः साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस

मुसलमानांना तर ठेचून मारलं जातंय, त्यांच्यावर हल्ले होत आहेत. तर चर्चची मोडतोड सुरू आहे. पाच विवेकवाद्यांना फक्त त्यांच्या विचारांसाठी ठार करण्यात आलं, ही गोष्ट लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. अंधश्रद्धेला विरोध करून स्वतंत्र विचार मांडणाऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या. पण त्याचे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यंचे सत्कार होताहेत. हा घटनेवरचा हल्ला आहे.

४. आम्ही विज्ञानाचा वारसा विसरलोय

गेली काही वर्षं भारताच्या लोकशाही गाभ्याला अत्यंत निष्ठूरपणे संपवलं जातंय. खरोखरचा इतिहास पुसला जातोय. शालेय पुस्तकांमधे मोठे बदल केले जात आहेत. इतिहासाचं पुनर्लेखन सुरू आहे. थेट मोगलांचा इतिहास आज दोन राज्यांच्या पुस्तकांमधे कापण्यात आलाय. 

स्वातंत्र्याच्या लढ्यात लढणाऱ्यांना असा देश अपेक्षित नव्हता. त्यांनी देशाला आधुनिकेच्या मार्गावर आणलं होतं. त्यासाठी वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन दिलं होतं. आज त्याच्या जागी पुराण्यातल्या चमत्कारांनी घेतलीय. त्यासाठी प्राचीन वैदिक काळात आपला देश सांस्कृतिकदृष्ट्या आणि वांशिकदृष्ट्याची कसा शुद्ध होता, हे सांगितलं जातंय. पण असं केल्याने आपला देश आधुनिक होईल का? खरं तर असा कोणताही शुद्ध वंश किंवा शुद्ध संस्कृती अस्तित्वातच नव्हती. आपली संस्कृती ही आपल्या शेजारी देशांमधल्या संस्कृतीशी झालेल्या संयोगातून घडलेली आहे. 

५. नेहरू म्हणाले, माझी मातृभाषा उर्दू

मी राहणारी उत्तर भारतातली आहे. तिथल्या प्रत्येक गोष्टीवर इस्लामी संस्कृतीचा ठसा आहेच. अगदी ऐतिहासिक वास्तू असतील किंवा संगीत, गीतं, नृत्य, भाषा, अन्नपदार्थ किंवा रोजचं चालणंबोलणं असो.  

भाषेबद्दलची एक आठवण सांगते, १९४७ मधे आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हा भारतात किती भाषांना अधिकृत राष्ट्रीय भाषांचा दर्जा द्यावा असा प्रश्न चर्चेला आला. त्याच्या यादीत उर्दू नव्हती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विचारलं, असं कसं काय? त्यावर कारण सांगण्यात आलं, उर्दू ही कुणाचीच मातृभाषा नसते. त्यावर नेहरू म्हणाले, ‘उर्दू तर माझी मातृभाषा आहे.' यातून मला आपल्या सर्वसमावेशक अशा एकत्रित सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करायचंय. आपण आपल्या कलेतून तो वारसा जपत आहोत.

६. माझं हृदय दोन्ही धर्मांसाठी धडधडतं

कादंबरीकार म्हणून मी लेखन केलंय, त्याचं श्रेय माझ्या हिंदू मुस्लिम एकत्रित वारशाला जातं. 'मिस्टेकन आयडेंटिटी’ या माझ्या कादंबरीत भूषणसिंग नावाचा एक कवी आहे. १९२९ मधे ब्रिटिश त्याला अटक करून कोर्टात खटला भरतात. कोर्टात सरकारी वकील कवीला विचारतात, 'तुझा धर्म कोणता?' त्यावर भूषणसिंग त्यांना उत्तर देतो, 'माझा धर्म कविता. नाही तर मी हिंदू किंवा मुसलमान असतो.'

यावर न्यायाधीश चिडतात आणि त्याला नीट उत्तर द्यायला सांगतात. वकील पुन्हा विचारतो, 'तुम्ही कोण? हिंदू की मुसलमान?' भूषणसिंग विचार करतो आणि उत्तर देतो,  'खरंतर माझी मातृभाषा हिंदी आहे आणि पितृभाषा उर्दू. मी माझी स्वप्नं या दोन्ही भाषांमधे बघतो. माझं खानपान आणि पोट बहुतांश मुसलमान आहे. पण माझ्या शरीरातून रक्त वाहतं ते मात्र हिंदू पद्धतीने. माझं हृदय एकदा हिंदू धर्मासाठी धडधडतं. तर दुसऱ्यांदा ते मुसलमान धर्मासाठी धडधडतं.'

हेही वाचाः संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा