राष्ट्रपिता महात्मा गांधी सन्मान कायद्याची गरज!

०४ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


महात्मा गांधींच्या जयंती दिनी काही नथुरामी प्रवृत्तींनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला. गांधींजींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती शनिवारी जगभर साजरी करण्यात आली. पंतप्रधान  झाल्यावर गेल्या सात वर्षात सातव्यांदा अमेरिकेच्या भेटीवर गेलेले नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनीही महात्मा गांधींचे विचार जगासाठी दिशादर्शक असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र गांधींच्या जयंती दिनी ‘नथुराम गोडसे जिंदाबाद’ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवण्यात आला. २ लाखांहून अधिक ट्विट या विषयावर झाले.

हेही वाचा: गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

हिंदू राष्ट्रवादाआडून गांधीद्वेष

गांधींची हत्या करूनही गांधी जसे विचार स्वरूपात जिवंत आहेत. तसेच त्यांची हत्या करणारा देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेच्या मनातला गांधी द्वेष, विखार, हिंसक मनोवृत्तीही आजही काही लोकांमधे जिवंत आहे, याचं दुःखद दर्शन या निमित्ताने जगाला घडलं.

गांधींच्या मारेकऱ्याचं उदात्तीकरण करणाऱ्या विकृतीच्या मुळाशी जातीय, धार्मिक श्रेष्ठतेचं नाझी-तत्व दडलंय. या नाझी तत्वाचं भारतीयीकरण करताना काही चतूर लोकांनी त्याला ‘हिंदू-राष्ट्रवाद’ असं नाव देऊन हिंदू धर्मातल्या देवभोळ्या सत्शील सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

‘हिंदू-राष्ट्रवाद’ हे नाव सर्वसामान्य हिंदूंना वरवर वाटायला कितीही गोंडस दिसत असलं तरी त्याचं खरं स्वरूप हे विषमता जोपासणारं, हिंदू धर्मातल्या कनिष्ठ जातींनी सदैव वरिष्ठ जातींचं आणि स्त्रीयांनी पुरूषांचं गुलाम रहावं असा विचार करणारं, अल्पसंख्यांकांना दुय्यम लेखणारं आणि गरिब, दलित बहुजनांचं सर्व पद्धतीने शोषण करणारं आहे.

जेव्हा आपल्यापैकी काही विकृत लोक नथुराम गोडसे जिंदाबाद म्हणतात तेव्हा त्यांना ‘नथुराम’ या व्यक्तीचा जयजयकार करायचा नसतो तर ‘हिंदू-राष्ट्रवाद’ या शब्दात दडलेल्या विकृत, विषमतावादी, जातीयवादी संकल्पनेचा हा जयजयकार असतो.

ओळख लपवणारा हिंदूत्ववादी?

‘रघुपती राघव राजाराम’ म्हणत गांधींनी रामराज्याची गोष्ट केली. गांधींची हत्या करणं हे हिंदूत्व नसून भ्याडपणा, विकृती आणि देशातल्या लोकांना उच्चवर्णियांचं गुलाम बनवण्यासाठी सुनियोजित षडयंत्र होतं.

नथुराम केवळ एक भ्याड मारेकरी होता. त्यामुळे गांधी हत्या केल्यानंतर आपण हिंदू आहोत हे उघडपणे सांगण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. देशातल्या कोट्यवधी हिंदूंच्या शोषणाला कारणीभूत ठरलेल्या ब्रिटिशांवर बंदूक न उगारता एका निशस्त्र अहिंसक म्हाताऱ्यावर शस्त्र उगारणारा आणि हत्येनंतर आपली धार्मिक ओळख लपवणारा खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी कसा असू शकतो?

गांधींचा हा राम एका धर्मापुरता, एका जातीपुरता मर्यादित नव्हता. जनमनात वसलेला, सकाळी उठताच एकमेकाला राम-राम म्हणताना ज्या रामाचं स्मरण केलं जातं तो हा राम होता. या रामाला एका विशिष्ट विखारी विचारधारेनं आपल्या तुरूंगात कैद केलं. यामागचा खरा हेतू हा रामभक्तीचा नव्हता तर सत्ताप्ताप्तीचा होता.

हेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता

ट्रेंड चालवणारी नथुरामी प्रवृत्ती

१२५ कोटींच्या देशात जनमनात रामासारखेच गांधी वसलेले आहेत. पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि आता वकील असलेले माझे मित्र जयेश वाणी यांनी नथुरामला खरंतर ‘नथुरावण’ म्हणायला हवं असं म्हणत नथुरामी प्रवृत्तीचं खरं स्वरूप उघड केलं आहे. त्यांचा हा शब्द मला खूप आवडला.

त्यामुळे २ लाख ट्विटच्या रूपात सोशल मीडियावर आजच्या नथुरावणांनी लेंड्या टाकल्या म्हणून गांधींच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत नाही. लाखो माणसं थुंकल्यामुळे सूर्याचं तेज तर कमी होत नाही. उलट ही थुंकी थुंकणाऱ्यांच्या तोंडावर पडून त्यांचं हसं होतं. तसं या प्रकरणी होतंय.

मोदींचे ट्विटरवरचे ५० टक्के फॉलोअर्स खोटे असल्याचं यापूर्वीच तज्ञ्जांनी सिद्ध केलंय. त्यामुळे शनिवारी नथुराम गोडसेच्या नावाने ट्विट करणारी खातीच मुळात खरी असण्याची शक्यता कमी आहे. फाळणीच्या दुःखातून जर नथुरामने गांधींची हत्या केली तर या फाळणीसाठी तीव्र आंदोलन करणाऱ्या, त्यासाठी मुस्लिम लीगसारख्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या बॅ. जीनांची हत्या, तसा प्रयत्न हिंदूत्ववाद्यांनी कधीच का केला नाही?

हिंसक राजकारणाला समाज मान्यता नको

नथुराम गोडसे काय प्रकरण आहे, त्याने केलेल्या कृत्यामागे कोणती देशविघातक विकृत विचारधारा होती याचा विस्तृत उहापोह थोर संशोधक आणि इतिहासाचे अभ्यासक य. दि. फडके यांनी आपल्या ‘नथुरामायन’ या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. नथुरावणाचा जयजयकार करायला तो महापुरूष होता का? त्याने कोणते महान विचार मांडले? त्याने कोणती महान सामाजिक क्रांती केली? हा प्रश्नही या निमित्ताने विचारायला हवा.

गांधींच्या मारेकऱ्याचा जयजयकार म्हणजे हत्येला, हिंसक राजकारणाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या प्रयत्नांना समाज मान्यता मिळाली तर भविष्यात आपल्या विचारधारेला विरोध करणाऱ्यांचा खून करून त्यांना संपवायचं असा हिंसक विचार जोर पकडेल. असं झालं तर आज राजकीय विरोधकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात डांबणारे उद्या थेट विरोधकांना संपवू लागतील आणि देशातली लोकशाही संपुष्टात येईल, हा धोका समजून घ्यायला हवा.

हेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विषवल्ली

भारत हा गांधींचा देश आहे असं विदेशात जाऊन सांगणाऱ्या मोदींनी या विषयावर पद्धतशीर मौन साधलं. वरूण गांधी वगळता भाजपच्या एकाही नेत्याने आणि मोदींनीही या विकृत ट्रेंडचा निषेध नोंदवला नाही. थेट राष्ट्रपित्याचा असा उघड अपमान होत असताना शांत राहून या विकृतीला त्यांनी प्रोत्साहनच दिलं.

याचं कारण स्पष्टपणे दडलंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुटप्पीपणात. संघाच्या शाखेत, खासगी चर्चेत गांधींविरूद्ध विष पेरलं जातं. गांधींचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान नाकारलं जातं. मात्र जाहीरपणे संघ परिवार गांधी हे प्रातःस्मरणीय असल्याचं सांगते. सकाळी उठताच गांधींविरूद्ध विखार पेरण्याची आठवण व्हावी आणि ती सवय लागावी म्हणून संघाने त्यांना प्रातःस्मरणीय ठरवलं असावं. मात्र संघ परिवाराबाहेरच्या लोकांचा प्रातःस्मरणीय म्हणजे गांधींना वंदनीय मानणं असा अर्थ होत असल्याचा गोड गैरसमज आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधींविरूद्ध विष पेरलं. गांधींच्या हत्येनंतर त्यांनी मिठाई वाटली' असं ४ फेब्रुवारी १९४८ रोजी संघावर बंदी घालताना तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी जाहीर केलं होतं. नथुराम आणि गोपाळ गोडसे हे बंधू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते, संघाच्या शाखेत जात होते, अशी कबुली गोपाळ गोडसे यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.

गांधी विचार संपवायचे प्रयत्न

गांधींना मारल्यानंतरही गांधींचा विचार जिवंत आहे. त्यामुळे आता विचारांना मारण्याची तयारी सुरू आहे. गांधी सत्याचं प्रतीक आहेत म्हणून असत्याचे विखारी प्रयोग करण्यातच आयुष्य गेलेल्या संघ परिवाराला गांधी अडचण ठरत आहेत. गांधींचा अहिंसेचा विचार दंगली, मॉब लिचिंगला प्रोत्साहन देणाऱ्या संघाच्या हिंसक आणि दहशतवादी राजकारणाला अडथळा ठरतोय.

सत्याग्रह या गांधींच्या अस्त्राची संघ परिवाराने नेहमीच खिल्ली उडवली. भारत छोडो आंदोलनात सहभागी होऊ नका, असा आदेश त्यांनी स्वयंसेवकांना दिला. आज शेतकरी कायद्याविरूद्ध शेतकरी सत्याग्रह करत असताना त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी मोदी आणि संघ परिवाराने त्यांना खलिस्तानी ठरविण्याचे प्रयत्न केले.

गांधींप्रणित अर्थव्यवस्थेत सर्वात गरीब माणूस केंद्रस्थानी आहे. मात्र संघ-भाजपला अपेक्षित अर्थव्यवस्थेत अंबानी-अडाणीसारखे मूठभर भांडवलदारांचं हित केंद्रस्थानी आहे. हे लक्षात घेतलं तर गांधी विचार आणि संघ विचार यात किती भेद आहे हे लक्षात येतं. त्यामुळेच हा विचार संपवण्यासाठी संघाचे हरतऱ्हेने  प्रयत्न सुरू आहेत. भाजपची सत्ता आहे तिथं प्राधान्याने हे नथुरावणाचं उदात्तीकरण, पूजा केली जाते. असं केल्यावर आपल्याला काहीही होणार नाही, याची खात्री राज्यसंस्थेकडून मिळत असल्यानं हे प्रकार होत आहेत.

हेही वाचा: गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

गांधीवाद्यांनी रस्त्यावर उतरायला हवं

गांधीद्वेषाने विकृत झालेले हे लोक हा नीच प्रकार करत असताना गांधींवर प्रेम करणारे कुठे आहेत? त्यांचं मौन ही त्यांची संमती मानली जात आहे. हे सुद्धा त्यांना न कळण्याइतपत गांधीप्रेमी असंवेदनशील आहेत का? अहिंसक मार्गाने हे प्रकार उधळून लावणं आणि कायदेशीर मार्गाने खटले दाखल करून दहातोंडी नथुरावणांचा बंदोबस्त करायला हवा.

आता गांधीवाद्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. जर भारत देश महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानतो तर आपल्या बापाची हत्या करणाऱ्याची पूजा करणं, त्याचा जयजयकार करणं मुळात हा देश खपवूनच का घेतो?

'अमृतसरमधे जाऊन कुणी जनरल डायर जिंदाबादचे नारे लावू शकतो का? अमेरिकेत जाऊन ओसामा बिन लादेन जिंदाबादचे नारे लावू शकतो का? मग गांधींच्या देशात गोडसे जिंदाबादचे नारे कसे लावले जाऊ शकतात? आणि हे होत असताना सरकार झोपा का काढतंय?' असे मार्मिक प्रश्न ज्येष्ठ पत्रकार श्रवण गर्ग यांनी एका चर्चेत सहभागी झाल्यावर विचारला आहे.

नथुरावणांचं कायदेशीर दहन

भारताच्या राजमुद्रेचा, तिरंग्याचा अवमान हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रोटेक्शन ऑफ नॅशनल एम्ब्लेम कायदा आहे. जसा तिरंगा, राजमुद्रा ही भारताची ओळख आणि अभिमानाचा विषय आहे, तसं राष्ट्रपिता गांधीही आपली ओळख आणि अभिमानाचा विषय आहेत. तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी आपण जसे प्रसंगी प्राणही पणाला लावतो तसं गांधीजीच्या बाबतीतही आपल्याला करायला हवं. महात्मा गांधींचा अवमान, त्यांच्या खुन्याचं उदात्तीकरण हा सुद्धा गुन्हा ठरवायला हवा, असं मला वाटतं.

गोडसेची पूजा, उदात्तीकरण करणं हा प्रकार राष्ट्रद्रोह मानून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारा एक स्वतंत्र कायदाच संसदेत, विविध राज्यांच्या विधानसभेत पारीत व्हायला हवा. यासाठी स्वतःला गांधींचे अनुयायी मानणारे आणि समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रात गांधींचं नाव घेणारे सर्वांनी यासाठी एकजूट होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी सन्मान संरक्षण कायदा संसदेत पारीत करून घ्यायला हवा.

संसदेत मोदी सरकारचं बहुमत असल्याने ते या मागणीसाठी तयार होणार नाही, हे लक्षात घेऊन गांधींवर खरं प्रेम असलेल्या पक्षांनी आपापली सत्ता असलेल्या राज्याच्या विधिमंडळात हा कायदा पारीत करून आपल्या राज्यातल्या नथुरावणांच्या कायदेशीर दहनाची तयारी करायला हवी.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटनेनं दिलं असलं तरी याच घटनेनं आणि नंतर न्यायालयांनीही हे स्वातंत्र्य अनिर्बंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन एका खुन्याचं, जातीयवादी, धर्मांध नथुरावणाचं कृती, साहित्य, नाटक, सिनेमा यांच्या माध्यमातून उदात्तीकरण करण्याची अनुमती कधीही दिली जाऊ नये.

हेही वाचा: 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी हा लेख दैनिक अजिंक्य भारतसाठी लिहिलाय)