नव्या डेल्टा प्लसमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट?

०५ जुलै २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झालाय. या डेल्टा प्लसवर लस काम करत नाही. त्यामुळे भारतात तिसरी लाट येणार आहे अशी उलटसुलट चर्चा सध्या सुरूय. हा डेल्टा प्लस पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीलाही निष्क्रिय करतोय असं काही निरीक्षणांवरून दिसून आलं असलं तरी त्यावर आताच्या लसी प्रभावी ठरतायत.

फेब्रुवारी २०२१पासून भारतात कोरोना वायरसने संक्रमित झालेल्या पेशंटच्या संख्येत वाढ दिसून यायला लागली. एप्रिल आणि मे महिन्यात पेशंटची संख्या अतिशय वेगाने वाढून दररोजचा आकडा जवळपास चार लाखांपर्यंत पोचला. त्यानंतर हळूहळू कमी होत आता दररोज साधारणतः ५० हजारांच्या आसपास पेशंटची संख्या आणि ८००-९०० मृत्यूंची नोंद होतेय.

पेशंटची वाढ अचानक का होतेय, लॉकडाऊन कमी केला म्हणून वाढली, की अजून काही दुसरं कारण होतं याचा शोध घेताना काही ठळक गोष्टी दिसून आल्यात. भारतात लॉकडाऊन कमी केला हे पेशंटची संख्या वाढण्यामागचं एक कारण होतं.

हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

इंडियन वेरियंटचं नामकरण

कोरोना वायरसच्या मूळ स्वरूपात बदल होऊन तो अधिकच वेगाने पसरेल अशा प्रकारचे बदल त्याच्यात झाले होते. यालाच शास्त्रीय भाषेत म्युटेशन किंवा नवीन वेरियंट म्हणतात. जगभरातले लोक त्याला ‘इंडियन वेरियंट’ म्हणू लागल्यानंतर त्यावर वादविवाद होऊ लागले. शेवटी त्याचं नाव डेल्टा वेरियंट असं ठेवण्यात आलं.

याच डेल्टा वेरियंटमुळे इंग्लंडमधे तिसरी लाट सुरू झाली. तर अमेरिकेतही पेशंटची संख्या वेगाने वाढू लागली. विशेष म्हणजे या दोन्ही देशांच्या लसीकरणाचा वेग जगात सर्वात जास्त आहे.

इंग्लंडमधे सध्या दररोजच्या पेशंट संख्येपैकी ९१ टक्के पेशंट हे डेल्टा वेरियंटचे आहेत. भारतात डेल्टा वेरियंटबद्दल लोकांना माहिती होऊ लागली तोच त्यामधे पुन्हा बदल दिसून येऊ लागले आणि त्याचं नामकरण डेल्टा प्लस वेरियंट असं झालं.

जिनोम सिक्वेन्सिंगची गरज

सध्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे डेल्टा प्लस वेरियंटबद्दलची खूपच कमी माहिती आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नक्की हा वेरियंट कुठं आणि कसा तयार झाला याची अपुरी माहिती. त्याचबरोबर देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या कोविड पेशंटमधून कोरोना वायरसचं फारच कमी होणारं जिनोम सिक्वेन्सिंग.

वास्तविक पाहता जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानामुळे वायरसमधे होणारे बदल, त्याची तीव्रता वाढतेय की कमी होतेय, हे समजायला मदत होते. भारत सरकारच्या नवीन नियमावलीनुसार नुकताच डेल्टा प्लस वेरियंट हा वेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजेच आरोग्यासाठी हानिकारक किंवा काळजी करण्यासारखा असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

याची कारणं देताना भारत सरकारनं जाहीर केलंय की, डेल्टा प्लस हा डेल्टा वेरियंटपेक्षा अधिक वेगाने पसरतोय. याची पेशंटच्या शरीरात प्रवेश करण्याची क्षमता वेगवान आहे. तसंच फुफ्फुसांमधल्या पेशीत प्रवेश करण्याची क्षमताही जास्त आहे. सध्या आढळणार्‍या कोरोना वायरसच्या सगळ्या रूपांमधे म्युटेशनचे क्लस्टर आढळतायत.

हेही वाचा: राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

अँटीबॉडीही निष्क्रिय

डेल्टा प्लस वेरियंटमधे मूळ डेल्टा वेरियंटपेक्षा ‘के ४१७ एन’ नावाचं अतिरिक्त क्लस्टर आहे. नेहमीच्या डेल्टा वेरियंटपेक्षा वेगळं असून ते प्रोटीनवर परिणाम करताना दिसून आलंय. स्पाइक प्रोटीन हा वायरसचा एक भाग आहे. तो वायरसला पेशींमधे वेगाने संक्रमित व्हायला मदत करतो. डेल्टा प्लसमधे झालेलं क्लस्टर स्पाईक प्रोटीनशी संबंधित आहे.

सध्याच्या काही शास्त्रीय निरीक्षणावरून असं दिसून आलंय की, हा वेरियंट पेशंटच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडींनाही निष्क्रिय करतोय आणि त्यामुळेच तो वेगाने पसरतोय. पूर्वीच्या डेल्टा वेरियंटमधे म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला असल्यामुळे त्याचे बरेचसे गुणधर्म हे आहे तसेच आहेत.

उगमाबद्दल वेगवेगळी मतं

सध्या डेल्टा प्लस वेरियंटच्या घातकतेबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काही सरकारी आरोग्य यंत्रणेचं म्हणणं आहे की, हा वेरियंट घातक नसून तो वेगाने पसरत नाही. याउलट भारतातल्या खासगी आरोग्य यंत्रणा आणि इतर देशातल्या सरकारी आरोग्य यंत्रणेचं म्हणणं आहे की हा वेरियंट घातक असून तो अतिशय वेगाने पसरेल.

भारतातल्या सरकारी आरोग्य यंत्रणेचं म्हणणं आहे की, हा वेरियंट मार्च २०२१ पासूनच समजत असून तो तेव्हाच युरोपियन देशांमधेही होता. तर काही निरीक्षणांवरून असं दिसून आलंय की, हा वेरियंट नेपाळमधून भारतात आलाय. एकंदरीत सध्या तरी याच्या उगमाबद्दल खूपच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

हेही वाचा: किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

काळजी करण्यासारखा वेरियंट

आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार केला तर मूळ डेल्टा वेरियंट हा जगातल्या ८० देशांमधे पसरलाय आणि त्याच्या पेशंटची संख्या कितीतरी लाखांमधे आहे. याउलट नवीन डेल्टा प्लस वेरियंट हा सध्या भारत, अमेरिका आणि युरोपमधले काही देश मिळून एकूण अकराच  देशात आहे. त्याच्या पेशंटची संख्या २०० च्या आसपास आहे. फक्त भारतात या वेरियंटमुळे एका मृत्यूची नोंद झालीय. यामधे मात्र दररोज वेगाने वाढ होतेय.

मार्च २०२० मधे कतारमधे सापडलेल्या एका मूळ कोरोना वायरसमधेही अशाच प्रकारचं क्लस्टर दिसून आलं असून, पूर्वी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा सापडलेल्या बीटा वेरियंटमधेही असेच नवीन बदल झालेत. याबद्दलची माहिती २३ जूनला लंडनमधल्या युनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या सायन्स मीडिया सेंटरने जाहीर केली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमधल्या सरकारी पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार डेल्टा प्लस वेरियंटची नोंद जगातल्या वेगवेगळ्या देशांनी केलीय. कॅनडा, जर्मनी आणि रशियामधल्या प्रत्येकी एका पेशंटचा समावेश होता. भारतात ६, पोलंडमधे ९, नेपाळमधे २, स्वित्झर्लंडमधे ४, पोर्तुगालमधे १२, जपानमधे १३ आणि अमेरिकेत १४.

२५ जूनपर्यंत अमेरिकेने ८४ पेशंटमधे आणि भारताने ४८ पेशंटमधे जिनोम सिक्वेन्सिंग करून डेल्टा प्लस वेरियंटची नोंद केलीय. संपूर्ण भारतात १२ राज्यांमधे २८ प्रयोगशाळेत एकूण ४५,००० पेशंटचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं गेलंय. यात ४८ डेल्टा प्लस वेरियंट सापडलेत. इंग्लंडमधे ही संख्या ४१ इतकी आहे. अलीकडेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही डेल्टा प्लसला ‘वेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणून जाहीर केलंय.

लस प्रभावी ठरेल?

साधारणपणे डिसेंबर २०२० पासून जेव्हा केव्हा कोरोना वायरसचे नवीन वेरियंट आले तेव्हा सर्वांच्या मनात एकच शंका आली, यावर लस उपयोगी पडणार का? डेल्टा प्लसबद्दलही हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आजच्या दिवसापर्यंत जगातल्या जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त लोकांना सहा वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे एक किंवा दोन डोस मिळालेत.

भारताचा विचार केला तर सुमारे १९ टक्के लोकांना एक डोस तर फक्त ४ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळालेत. भारतात सर्वाधिक दिलेली लस म्हणजे कोविशिल्ड. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोविशिल्डचा एक डोस डेल्टा वेरियंटवर ७० टक्के परिणामकारक आहे. म्हणजेच एका डोसमुळे ७० टक्के लोकांना जरी डेल्टा वेरियंटचा संसर्ग झाला तरी त्यांना हॉस्पिटलमधे दाखल करण्याची गरज लागत नाही.

दुसरीकडे इंग्लंडमधे लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर हेच प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या माहितीनुसार, सध्याच्या सगळ्या लसी या कोरोनामुळे होणारा गंभीर संसर्ग आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी सक्षम आहेत. आत्तापर्यंत जवळपास कोरोना वायरसची १० हजारांहून अधिक प्रकारची म्युटेशन्स सापडलीयत आणि या सगळ्या प्रकारांविरोधात लसी प्रभावी आहेत.

डेल्टा प्लस या नवीन प्रकारातल्या कोरोना वायरसवर लसी प्रभावी ठरतील की नाही यासाठी अधिक माहितीची वाट पहावी लागेल, असं डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलंय. चांगली गोष्ट म्हणजे सध्या डेल्टा प्लसची जागतिक स्तरावर वर्णन केलेली फारच कमी प्रकरणं आहेत. तरीही जगातले सगळेच देश लसी आणि डेल्टा प्लस या दोन्हींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

वेगवेगळ्या लसी देणं फायद्याचं

२८ जूनला ला ऑक्सफर्ड युनिवर्सिटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार असं आढळलंय की, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका म्हणजेच कोविशिल्ड आणि फायझर या दोन वेगवेगळ्या लसींच्या वैकल्पिक डोसमुळे कोरोना वायरस विरुद्ध तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण होतेय. ‘लॅन्सेट’ या मेडिकल क्षेत्रातल्या जगप्रसिद्ध जर्नलच्या प्रिप्रिंटमधे याचे निष्कर्ष २८ जूनला प्रसिद्ध झालेत. सध्या कोरोना वायरसचे जे नवनवीन स्ट्रेन तयार होतायत, त्यासाठी पुन्हा नवीन लसी तयार कराव्या लागतील का किंवा तिसरा, चौथा बूस्टर डोस द्यावा लागतोय की काय, अशी भीती निर्माण झालीय.

अशा वेळी या प्रयोगाचा हा फायदा म्हणजे नवीन लस किंवा अधिक डोस देण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या लसी दिल्या तर त्या नवनवीन स्ट्रेनवर फायदेशीर ठरतील. याचा भविष्यामधे भारतासह नेपाळ, ब्राझील, मेक्सिको आणि आफ्रिकन देशांना फायदा होण्याची शक्यता दिसून येतेय.

भारतामधे सध्या ज्या तीन लसी उपलब्ध आहेत, त्यामधे कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि काही प्रमाणात स्पुत्निक यांचा समावेश आहे. यामधली कोविशिल्ड आणि स्पुत्निक या एकाच प्लॅटफॉर्मवर किंवा तंत्रज्ञानावर आधारित असून कोवॅक्सिन मात्र संपूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे भारतामधेही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन किंवा कोवॅक्सिन आणि स्पुत्निक अशा प्रकारचे संयुग करता येईल. याचबरोबर कोविशिल्ड आणि स्पुतनिक या दोन लसींमधे काही मूलभूत फरक असल्याने या दोन लसींचेही वेगवेगळे डोस देता येतील.

घाबरायची गरज नाही

भारतामधे सध्या तरी दुसरी लाट ओसरू लागलीय. भारतामधे दुसरी लाट ही डेल्टा वेरियंटमुळे आली. पण तिसरी लाट ही डेल्टा प्लस वेरियंटमुळेच येईल हे नक्की नाही किंवा लसीकरण वेगाने झालं तर तिसरी लाट अतिशय सौम्य प्रकारची असेल. उदाहरणच द्यायचं झाले तर इंग्लंडमधे पहिला डोस ७५ टक्के लोकांना तर दुसरा डोस ५० टक्के लोकांना दिलाय. मे महिन्यात दिवसाला फक्त २००० नवीन पेशंट आणि ३० ते ५० दरम्यान मृत्यू नोंद केले जात होते.

जूनपासून पेशंटची संख्या पुन्हा वाढू लागली. मात्र मृत्यू दर कमी होत गेला. ३० जूनला इंग्लंडमधे २० हजार पेशंटची संख्या नोंदवली गेली. पण मृत्यू फक्त १०. तर संपूर्ण इंग्लंडमधे एक हजारच्या आसपास कोरोना संसर्गित पेशंट हॉस्पिटलमधे दाखल आहेत.

यावरून असं दिसून येतं की, जरी नवीन वेरियंट आले तरी आत्ता आहेत त्याच लसी प्रभावी ठरतायत. त्यामुळे भारतातल्या लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

हेही वाचा: 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

(लेखक ऑक्सफर्ड युनिवर्सिटी इंग्लंड इथं मेडिकल सायन्स विभागात मेरी क्युरी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत)