पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी ‘न्यू इंडिया’ शब्द उच्चारत असतात. यालाच आपल्या हिंदी सिनेमामधे ‘नया हिंदुस्तान’ म्हटलं जातंय. सध्या तर हिंदी सिनेमांच्या डायलॉग्जमधे याचा सर्रास वापर होतो. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदी सिनेमांमधे चित्रित होणाऱ्या या नव्या हिंदुस्तानची झलक, त्यामागची भावना, आकांक्षी आणि समस्यांकडे बघायला पाहिजे. कारण हे जग खूप मजेशीर, रोचक आहे.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सिनेमा निर्मिती सुरू झाली तसं आता आपण सिनेमाकडेही समाजाचा आरसा म्हणून बघतोय. टेक्नॉलॉजीमुळे साहित्य आणि सिनेमा यांच्यात एक बदल झालाय. आरशात समाजाचं प्रतिबिंब हे वास्तवापेक्षा छोटंमोठं, उभंआडवा किंवा अनेकदा एखाद्या साखळीसारखंही असं शकतं. या घडामोडीकडे बारकाईने बघितलं तर आपण आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाच्या खोलात, मुळापर्यंत जाऊ शकतो. इथे आपण केवळ जानेवारी २०१९ ते आतापर्यंत रिलिज झालेल्या हिंदी सिनेमांच्या संदर्भात चर्चा करूत.
गेल्यावर्षी जानेवारीमधे ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा एक सिनेमा आला. या सिनेमातला एक ‘हाऊ इज द जोश’ हा डायलॉग तर आपल्या पंतप्रधानांना फायद्याचा वाटला म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी तो वापर केला. या सिनेमातल्या एका सीनमधे सैन्यदलातला एक सिनिअर ऑफिसर काहीशा धीरगंभीर आवाजात म्हणतो, ‘हा नवा हिंदुस्तान आहे. इथे घरात घुसतात आणि मारतातही.’
सिनेमात तर या डायलॉगचा वापर पाकिस्तानसाठी करण्यात आला होता. पण नव्या हिंदुस्तानातले सत्ताधारी आपल्याच देशात विरोधात बोलणाऱ्यांना त्यांच्या घरांमधे आणि परिसरात घुसून मारताहेत, हे चित्र आपण बघतोय. देशाच्या जनगण कडून आक्रोश होतोय. तरीही ‘हुकुमशाह’चं ‘मन’ पूर्ण विध्वंस झाल्याशिवाय शांत होणार नाही असं दिसतंय.
राजकारणात न जाता आपण सिनेमाबद्दल बोलू लागतो तेव्हा आपल्याला दिसतं की हा बनावट राष्ट्रवाद वास्तविकपणे हिंदू म्हणजेच सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे. कंगना रानावतचा ‘मणिकर्णिका’ सिनेमा आपल्याला आठवत असेल. या सिनेमात ‘आझादी’चे नारे हळूहळू ‘हर हर महादेव’च्या हुंकारामधे बदलतात. एवढंच नाही तर महाराणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदानानंतर ते ‘ॐ’ मधे रूपांतरीत होतात.
आताच आलेल्या ‘तान्हाजीः द अनसंग हीरो’ या सिनेमातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातल्या स्वराज्याच्या बाता करत दिल्लीचा शासक औरंगजेबाचा उल्लेख परदेशी शासक असा करणंही आझादीच्या नाऱ्याहून फारसं वेगळं नाही.
औरंगजेबाचा साम्राज्यविस्तार आणि शिवाजी महाराजांच्या राज्याची सुरक्षा यातला संघर्ष आपल्याला हिंदू राष्ट्रवादाच्या दृष्टीकोनातून दाखवला जातोय. मग देशभरातले बहुसंख्य प्रेक्षक याच भावनेच्या लाटेवर स्वार होतात. ‘तान्हाजीः द अनसंग हीरो’ या सिनेमाच्या जबरदस्त यशामागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ‘पानिपत’ सिनेमात आशुतोष गोवारीकर यांनी संयम बाळगत वस्तुनिष्ठ चित्रण केलं तर त्यांच्या सिनेमाला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचाः हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?
गेल्यावर्षी सामरिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलल्या सिनेमांसोबतच कौटुंबिक आणि सामाजिक सिनेमांमधेही राष्ट्रवादाचा स्वर घुमताना दिसला. ‘केसरी’, ‘ठाकरे’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘रोमियो अकबर वाल्टर’, ‘कलंक’, ‘मिशन मंगल’, ‘वार’ आणि ‘कमांडो’ या सिनेमांमधे वेगवेगळ्या स्वरात आपल्याला राष्ट्रवादाचा सूर घुमताना दिसतो. काही सिनेमात तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले. कधी एखाद्या कलाकाराच्या रूपात तर कधी सदेह. सत्ताधारी पक्षाला हे चांगलं माहीत आहे की सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सिनेमा हे सशक्त माध्यम आहे. ते याचा पुरेपूर वापर करतात.
देशाचे पंतप्रधान ऐन सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी आपला पहिला इंटरव्यू देण्यासाठी कुणा मीडियावाल्याला नाही तर एखाद्या सिने कलाकाराला निवडतात हे आपण गेल्यावर्षी बघितलंय. हे काही सहज घडलेलं नाही. या इंटरव्यूच्या आधी आणि नंतरही पंतप्रधान वेळोवेळी सिनेकलाकारांना वैयक्तिक पातळीवर किंवा सामूहिकरित्या भेटत राहिले. ही गोष्ट वेगळी आहे, की आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानंतर अनेक गोष्टींना यूटर्न आलाय.
सत्ताधारी पक्षाने अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांना सिनेमातल्या मंडळींना आपल्या बाजूला आणता आलं नाही. अनेक जण तर उघडउघड विरोध करताहेत. जे बोलत नाही तर पडद्यामागे शांत राहण्याची भूमिका घेताहेत. त्यांच्या शांत राहण्यातच एक प्रकारे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मूक विरोध आहे.
प्रेक्षकांच्या आवडी, निवडीच्या आधारावरच बघितलं तर बऱ्याशा प्रेक्षकांची परंपरावादी, प्रतिगामी आणि हलक्या फुलक्या सिनेमांना चांगली पसंती मिळते. ‘कबीर सिंह’ ला मिळालेल्या तुफान प्रतिसादातूनही आपल्याला हेच दिसतं. ‘टोटल धमाल’ आणि ‘हाउसफुल ४’ यासारख्या कुठलंही धड अंग नसलेल्या कॉमेडी सिनेमांच्या यशामागे दुसरी कुठली कारणं असू शकतात? ‘पागलपंती’ ला प्रेक्षकांना नाकारलं हे तरी बरं झालं.
आपण भले नाव ठेवू आणि विरोधात आणि समीक्षेच्या पातळीवर लिहत राहू, पण हलक्या दर्जाचं मनोरंजन ही आपल्या देशातल्या प्रेक्षकांची पहिली पसंती आहे, हे वास्तव आपण कसं नाकारू शकू. याच कारणामुळे काही निर्माते नवे विषय आणि प्रयोगांवर वेळ आणि पैसा खर्च करत नाहीत. ते अशा नॉनसेन्स सिनेमांनाच प्रोत्साहन देत आहेत. अशा सिनेमांच्या ट्रेंडवरून आपल्या देशांतल्या प्रेक्षकांच्या संवेदनांची पातळीच दिसते, ही गोष्टी स्पष्ट आहे.
हेही वाचाः ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!
बहुसंख्य प्रेक्षकांच्या पसंतीला पार करून आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला काही प्रेक्षक दर्जेदार, गंभीर आणि नव्या प्रकारच्या सिनेमांना कौल देताना दिसतात. अशा प्रेक्षकांची संख्या कमी असल्याने असे सिनेमाही आपल्याला कमी दिसतात. तरीही आता ही संख्या एवढी झालीय की एखाद्या सिनेमाला ते हिटच्या कॅटेगरीमधे आणून बसवतात. त्यांचा फेवरेट हिरो आयुष्मान खुराना आहे.
अशाच प्रेक्षकांमुळे ‘आर्टिकल १५’, ‘बाला’, ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’, ‘बंबरिया’, ‘नक्काश’, ‘सोनी’, ‘सोनचिड़िया’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘हामिद’, ‘फोटोग्राफ’, ‘सुपर ३०’, ‘जजमेंटल है क्या’, ‘सेक्शन ३७५’, ‘द स्काई इज पिंक’, ‘झलकी, ‘सांड की आंख’ यासारखे सिनेमे बऱ्यापैकी धंदा करत आहेत. वास्तविकपणे ‘नव्या हिंदुस्ताना’च्या आसमंतात असे सिनेमे एखाद्या ताऱ्यासारखं लख्खपणे चमकतात हीच समाधानाची गोष्ट आहे.
सारं काही संपलं नाही, हीच गोष्ट असे सिनेमे अधोरेखित करतात. आशा टिकून आहे. यापैकी काही सिनेमांनी हेल्दी मनोरंजन केलंय. तर काही सिनेमांनी प्रेक्षकांना जागरूक आणि विवेकी बनवलंय. काही सिनेमांनी अनावश्यक समजल्या जाणाऱ्या गोष्टींविषयी संवेदनशील बनवण्यात मोलाचा वाटा उचललाय.
आधुनिक समाजाची आव्हानं आणि समस्या अनेकपदरी आहेत. देशातले नागरिक त्यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर लढत आहेत. त्यांच्या या संघर्ष आणि द्वंद्वाला सिनेमामधे रोचक आणि हलक्या फुलक्या पद्धतीने सादर केलं जातंय. यादृष्टीने २०१९ मधले ‘आर्टिकल १५’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘सोनी’, ‘हामिद’ और ‘सांड की आंख’ हे सिनेमे उल्लेखनीय आहेत. या सिनेमांमधे देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या चिंता, आकांक्षा आणि यश याकडे बघू शकतो.
‘तान्हाजीः द अनसुंग हीरो’ यासोबतच आलेल्या दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चा उल्लेख आवश्यक आहे. या सिनेमाने महिलांवर होणाऱ्या एसिड अटॅकबद्दल प्रेक्षकांमधे जाणिवा तयार करण्याचं काम केलंय. या सिनेमाला कुठल्याही कारणावरून विरोध करणारे लोक आपल्या सामाजिक आयुष्यातही कधी ना कधी असे एसिड अटॅकरच आहेत, ही गोष्ट प्रेक्षक, वाचकांनी विसरायला नको. ते अशा सिनेमांच्या भावनेविरोधात आहेत.
हेही वाचाः नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर
हिंदी सिनेमात भारताचा विचार, ज्ञानशास्त्र आणि चिंता यांना सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या कौशल्याने चित्रित केलं जातंय. ते आमच्या विविधतेचे चांगले चित्रकार आहेत. आजचा सिनेमावाला आपल्या काळापासून वेगळा नाही. तो काळ निरपेक्ष नाही. हलक्या फुलक्यापासून गंभीर सिनेमापर्यंत त्याची सामाजिक सक्रिया आपण बघू शकतो. मूळातच देशाच्या बहुढंगी छटा आणि दशा यांच्या अनुरूप सिनेमे बनत आहेत. नेहमीच सिनेमाचा परिवर्तनशील हस्तक्षेप कमी राहिलाय.
अगोदर परिवर्तनशील हस्तक्षेपासोबतच सरकारी यंत्रणांची सहयोगाची भूमिका राहायची. विद्यमान सरकारने मात्र आपल्या या जबाबदारीतून हात झटकलेत. प्रगतीशील मूल्यं आणि परिवर्तनाची भूमिका घेणार्या सिनेमांशी त्यांचं काहीएक देणंघेणं राहिलं नाही.
ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यामुळे सिनेविश्वाला एक नवी वाट मिळालीय. आता सिनेमांना वितरक, प्रदर्शक आणि थिएटर यांच्या दयायाचनेची गरज उरली नाही. सिनेमा आता थेट प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो. बदलत्या काळानुसार आपले प्रेक्षकही या नव्या पर्यायाला पसंती देताहेत. आम्ही ‘गंदी बात’ चा उल्लेख करतो, पण ‘लैला’ला विसरतो. ‘लैला’ने आपल्यापुढे २०५० मधल्या भारताचं भयावह चित्र आणि खरंखुरं जग मांडलंय.
हेही वाचाः
तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा
#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?
सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला
पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?
(अजय ब्रह्मात्मज हे हिंदीतले आघाडीचे सिनेसमीक्षक आहेत. हिंदीतल्या सिने पत्रकारितेला गांभीर्याच्या पातळीवर नेणाऱ्या आघाडीच्या पत्रकारांमधे त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा मूळ हिंदीमधे असलेला हा लेख नवजीवन इंडिया या वेबपोर्टलवरून घेतलाय.)