बालपणी हॉकीपटू असलेला रॉस टेलर उद्या बनणार क्रिकेटमधला विश्वविक्रमवीर

२० फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सिरिजला शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून सुरवात होतेय. दोनपैकी पहिली मॅच उद्या वेलिंग्टन इथे खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमधे मैदानात पाऊल ठेवताच न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रॉस टेलर एक मोठा इतिहास रचेल. काय आहे हा विक्रम?

कोणताही खेळ असो तिथं आकड्यांना खूप महत्त्व असतो. मग आपल्या आवडीच्या क्रिकेटमधे तर आकड्यांचं मोल कुणाला सांगायचीच गरज नाही. दांडपट्टा बॅट्समन अशी ओळख असलेला न्यूझीलंडचा रॉस टेलर उद्या असाच एक आकड्यांचा विश्वविक्रम करणार आहे. रॉसने काही काळ न्यूझीलंडच्या टीमचा कॅप्टन म्हणूनही जबाबदारी सांभाळलीय.

रॉस उद्या आपल्या कारकिर्दीतली शंभरावी टेस्ट मॅच खेळायला मैदानावर उतरणार आहे. शंभर टेस्ट खेळणारा रॉस हा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरणार आहे. यासोबतच त्याच्या नावावर आणखी एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होणार आहे. तो त्याचदिवशी क्रिकेटच्या टी२०, वनडे आणि टेस्ट अशा तीनही फॉर्ममधे १०० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनेल. म्हणजेच रॉसच्या नावापुढे शंभर नंबरी टॅग लागेल.

हेही वाचाः ट्रम्प यांचं एअर फोर्स वन विमान म्हणजे उडतं व्हाईट हाऊसच!

पहिल्याच टेस्टमधे ठरला होता अपयशी

८ मार्च १९८४ मधे न्यूझीलंडमधील लोअर हट इथे रॉसचा जन्म झाला. सध्या पस्तिशीत असलेल्या रॉसने आतापर्यंतच्या टेस्ट कारकिर्दीमधे ९९ मॅच खेळल्यात. २००७ मधे त्याने आपल्या करिअरमधली पहिलीवहिली टेस्ट मॅच खेळली होती. पण पहिल्या टेस्टमधे रॉसला पुरेशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

दक्षिण आफिकेविरुद्ध जोहान्सबर्ग इथल्या मैदानावर झालेल्या त्या टेस्टमधे रॉसने पहिल्या डावात १५ तर दुसर्‍या डावात केवळ ४ रन काढले. त्यानंतर सेंच्युरियन इथे झालेल्या टेस्टमधे त्याला पहिल्या डावात १७ तर दुसर्‍या डावात फक्त आठच रन काढता आले. त्यामुळे त्याला काहीसे नैराश्य आलं. आता काही आपण टेस्ट क्रिकेटमधे तग धरू शकणार नाही, असं त्याचं मत झालं. अलीकडेच त्याने आपल्या तेव्हाच्या मनस्थितीबद्दल बोलूनही दाखवलंय.

आत्ता आपण रॉसला अव्वल नंबरी क्रिकेटपटू म्हणून ओळखतो. पण लहानपणी रॉस हॉकीपटू होता. त्याच्या प्रशिक्षकांनी रॉसमधलं क्रिकेटिंग स्किल ओळखलं. आणि जगाला रॉस टेलर नावाचा दांडपट्टा स्टाईल बॅटिंग करणारा क्रिकेटपटू मिळाला.

सध्या रॉस आहे जबरदस्त फॉर्ममधे

टीम इंडियाचा सध्या न्यूझीलंड दौरा सुरू आहे. आतापर्यंत टी२० आणि वनडे सिरिज झालीय. आता टेस्ट सिरिज शिल्लक आहे. यामधे भारताविरुद्ध पाच टी-२० आणि तीन वनडे मॅचमधे रॉसची कामगिरी चांगली राहिलीय. टी-२० सिरिज गमावल्यानंतर वनडेमधे भारताला ‘क्‍लीन स्वीप’ करण्यात रॉसचं योगदान मोठं आहे.

खेळपट्टीवर एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर रॉसने लेग साईडला मारलेले फटके नेहमीच नेत्रदीपक असतात. मग पिचवर स्थिरावलेल्या रॉसला बॉल टाकणं भल्या भल्या बॉलर्सनाही धडकी भरवणारं ठरतं. बॉलच्या आणि बॉलर्सच्या मनसुब्यांच्या अगदी चिंधड्या उडवतो. आपल्या शंभराव्या टेस्टमधे त्याचा खेळ कसा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचाः शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

‘रॉस द बॉस’ची क्रिकेट कारकीर्द

टेस्ट: रॉसने टेस्ट क्रिकेटमधे २००७ मधे पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत ९९ टेस्ट खेळल्यात. यामधे त्याला १७५ डावांमधे हजेरी लावायला मिळालीय. शिवाय २० वेळा नाबाद राहून ७ हजार १७४ रन्स त्याने काढलेत. टेस्टमधे त्याने नोंदवलेली सर्वोच्च धावसंख्या २९० आहे. त्याच्या धावांची सरासरी ४६.३ अशी असून, स्ट्राईक रेट ६०.०० असा आहे. आतापर्यंत रॉसने टेस्ट मॅचमधे १९ शतक ठोकलेत. त्याचबरोबर त्याने टेस्टमधे ३३ अर्धशतकदेखील फटकावलेत.

वन-डे: रॉस टेलरने २००६ मधे वनडे इंटरनॅशनल मॅचमधे पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत २३१ वनडे मॅच खेळल्यात. त्यामधे २१५ डावांमधे ३९ वेळा नाबाद राहून ८ हजार ५७० रन्स काढलेत. वनडे मॅचमधे त्याने नाबाद १८१ धावांची सर्वोच्च खेळी केलीय. ४८.७ च्या सरासरीने ८३.५ च्या स्ट्राईक रेटसह २१ शतकं आणि ५१ अर्धशतकं नोंदवलीत.

टी-२०: रॉसने २००६ मधे पहिली टी-२० मॅच खेळली. १०० मॅचमधे त्याने ९२ डाव खेळत १ हजार ९०९ रन काढलेत. यापैकी २० वेळा तो नाबाद राहिलाय. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने टी२० मधे सर्वाधिक ६३ रन काढलेत. २६.५ च्या सरासरीने १२२.७ च्या स्ट्राईक रेटने ७ अर्धशतकं ठोकलीत. पण त्याला आतापर्यंत एकही शतक ठोकता आलं नाही.

हेही वाचाः 

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?