कोरोना वायरसने जगाला काही धडे दिलेत. त्यातून नवनवी संशोधनं उभी राहिली. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक नवं कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. या सॉफ्टवेअरमुळे भविष्यात कोरोनासारखा एखादा साथरोग, त्याचे दमछाक करणारे वॅरियंट शोधणं सहज शक्य होईल या संशोधकांना वाटतंय. तसं झालं तर ही कम्प्युटर विज्ञानातली एक क्रांती ठरेल.
कोरोना वायरसमुळे जग काही काळ ठप्प झालं होतं. कोरोनाच्या लाटांमुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले. आपलं भटकणं थांबलं. रोजीरोटीवर परिणाम झाला. जगभरातल्या अर्थव्यवस्थांची दिवाळं निघाली. या कोरोना वायरसनं सगळ्यांनाच घाम फोडला होता.
अजूनही लाटेची भीती असली तरीही कोरोनाचा हा ग्राफ हळूहळू खाली येतोय. सुरवातीच्या काळात नवनवे शब्द सातत्याने आपल्या कानावर पडायचे. टेंशन वाढायचं. हे वाढलेलं टेंशन लस, त्यावरची संशोधनं, औषधं यामुळे कमी होत गेलं. त्यामुळेच या सगळ्यातून आपण हळूहळू सावरतो आहोत.
पुढे येणाऱ्या अनेक साथी टाळण्यासाठी म्हणून कोरोनाच्या साथीने जगाला काही धडे दिलेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात वैज्ञानिक पद्धतीने झालेला अभ्यास, संशोधनं, निष्कर्ष याच्या तळाशी आहेत. कोरोना सारख्या साथरोगांचा शोध घेण्यासाठी आलेलं नवं सॉफ्टवेअर याचं फलित म्हणायला हवं.
हेही वाचा: या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय
तंत्रज्ञान बदलतंय. या बदललेल्या तंत्रज्ञानाचे चांगले-वाईट अनुभव आपण घेत आहोत. मागच्या दोन वर्षातल्या कोरोना काळानं आपल्याला नव्यानं विचार करायला, स्वतःमधे डोकावून पहायला भाग पाडलंय. त्यातूनच नवनवे शोध पुढे येतायत. पुढेही येत राहतील.
अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एक कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलंय. स्पॅनिश फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू, इबोला, स्वाईन फ्ल्यू आणि आता कोरोना अशा अनेक साथ रोगांचा अनुभव जगाने घेतलाय. अशीच एखादी साथ पुढच्या काळात आलीच तर त्याचा त्याआधीच शोध घेण्याचं काम हा सॉफ्टवेअर करू शकेल असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
'जर्नल ऑफ कम्प्युटेशन बायोलॉजी'नं जॉर्जिया युनिवर्सिटीच्या संशोधकांचा रिसर्च पब्लिश केलाय. कोरोनासारखे वायरस जगभर पसरण्याचा आधीच त्यांचा शोध लावून त्यावर तत्काळ उपाययोजना करणं या सॉफ्टवेअरमुळे शक्य होईल असंही या संशोधनामधे म्हटलंय.
जिनोम सिक्वेन्सिंग या तंत्रज्ञानामुळे वायरसमधलं म्युटेशन, त्याची तीव्रता समजते. याआधीच्या कोणत्याच वायरसमधे कोरोना वायरसच्या म्युटेशन इतके बदल झाले नव्हते असं लॅन्सेट या जगप्रसिद्ध आरोग्यविषयक मॅगझिनमधेही म्हटलं होतं. एका म्युटेशनचा शोध लागेपर्यंत दुसरं म्युटेशन हजर असतं. त्यामुळे जगभरातल्या आरोग्य यंत्रणेसमोरचं हे एक मोठं आव्हान होतं.
जॉर्जिया युनिवर्सिटीच्या संशोधकांनी बनवलेलं सॉफ्टवेअर वायरसमधल्या जिनोमची तत्काळ नोंद घेऊ शकतं असं इथल्या कम्प्युटर विज्ञान विभागाचे प्रोफेसर आणि यातले महत्वाचे संशोधक अलेक्झांडर झेलिकोवस्की यांनी या रिसर्च पेपरमधे म्हटलंय. तसंच वायरसच्या म्युटेशनबद्दल जी काही नवी आव्हान निर्माण होतायत त्यासाठी हे संशोधन फार महत्वाचं असल्याचं झेलिकोवस्की यांना वाटतंय.
हे नवं सॉफ्टवेअर कम्प्युटरपेक्षाही अधिक वेगाने काम करू शकतं असंही हे संशोधन केलेल्या टीमचं म्हणणं आहे. जिनोम सिक्वेन्सिंगचं कामही हा सॉफ्टवेअर अगदी दोन तासांपेक्षा कमी वेळात करत असल्यामुळे जगभरातल्या देशांसाठी वायरसवर संशोधन करणं सोपं जाऊ शकेल.
हेही वाचा: ईबोलापासून नायजेरियाला वाचवणाऱ्या डॉक्टरच्या सन्मानाबद्दल अबोला
कोरोना वायरसच्या जगभरातल्या वेगवेगळ्या लाटांमधे अनेक प्रकारचे वॅरियंट आढळून आले. भारतातला डेल्टा, ब्राझीलमधे गामा, दक्षिण आफ्रिकेत बीटा, इंग्लंडमधे अल्फा हे यातले प्रमुख प्रकार होते. या वॅरियंटमुळे कोरोना वायरसच्या मूळ रचनेत झालेले बदल संशोधकांच्या काळजीचं कारण होतं. त्यामुळे संशोधकांना नेमका अंदाज लावायला अडचणी येत होत्या.
जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी ३ लाखांपेक्षा अधिक वॅरियंटचं त्यांच्या उपप्रकारांचं विश्लेषण केल्याचं म्हटलंय. त्याचा एक डाटाही त्यांनी तयार केलाय. 'जगभरातल्या वैज्ञानिकांना हे आश्चर्यकारक वाटत असलं तरीही त्यांच्यासाठी हा डाटा फायदेशीर ठरेल. त्यासाठी हे सॉफ्टवेअर महत्वाचं ठरणार आहे.' असं झेलिकोवस्की यांना वाटतंय.
कोरोना वायरस आपल्या मूळ रचनेत बदल करून जगभर पोचला. भारतातल्या डेल्टा वॅरियंटनं तर जगभर कहर केला होता. या सॉफ्टवेअरमुळे वायरस नेमका कशा पद्धतीने आपला आकार बदलतोय तसंच त्यावर लक्ष ठेवणं सहजशक्य होईल. शिवाय हा सॉफ्टवेअर अगदी फ्रीमधे डाऊनलोड करता येईल असं जॉर्जियाच्या संशोधकांनी म्हटलंय.
कुणाला काही कल्पना नसताना कोरोना वायरसनं जगाला कवेत घेतलं. जग बेसावध होतं. भारतानेही या सगळ्याचे परिणाम भोगलेत. लस आल्यामुळे आपल्यावरचं संकट कमी झालं. पण ते पूर्णपणे टळलेलं नाही. हा वायरस कायम राहील असं या साथरोग तज्ञांना वाटतंय.
याआधीही असे वायरस आलेत. त्यामुळे पुढच्या काळातही ते येत राहतील. त्यासाठी आतापासून सावध रहायला हवं. प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. त्याचाच एक भाग म्हणजे जॉर्जिया स्टेट युनिवर्सिटीच्या संशोधकांनी बनवलेलं हे सॉफ्टवेअर असल्याचं अलेक्झांडर झेलिकोवस्की यांना वाटतंय.
या कम्प्युटर सॉफ्टवेअरमुळे साथरोगांचा पाठलाग करणारं शक्य होईल. जगभरातल्या देशांना आपली धोरणं आखता येतील. भविष्यात अशी कोणती साथ आलीच तर लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स, आणि वेगवेगळ्या चाचण्या यासंबंधी वेळीच उपायही केले जातील. हा सॉफ्टवेअर कम्प्युटर विज्ञानात झालेल्या क्रांतीचा परिणाम आहे.
हेही वाचा:
थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?
कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?
आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?