नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

०५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. 

मराठा म्हणजे कोण? आज मराठा शब्द जातीवाचक झाला असला तरी मुळात तो समूहवाचक आहे. महाराष्ट्रातला बहुसंख्य शेतकरी समाज, जो प्रामुख्याने शेती करायचा आणि लढायाही मारायचा, तो मराठा. मरते दम तक जो नही हटता वो मरहट्टा. तोच मराठा. त्याअर्थाने रणांगण गाजवणारे पेशवेसुद्धा मराठाच! छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे अठरापगड जातीचे मावळेही मराठाच.

हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?

कालांतराने मात्र जातीव्यवस्थेत मराठा ही शेतकरी समुदायाची एक जात निर्माण झाली. सुरवातीच्या काळात ही जात सत्ताधारी राहिल्यामुळे तिची भरभराट झाली. पण पुढे कुटुंबविस्तार झाल्याने शेतीच्या वाटण्या होत होत जमीन कमी कमी होत गेली. या समाजावर आरक्षणासाठी आंदोलन करण्याची पाळी आली.

जुनं डीमके म्हणजे देशमुख, मराठा, कुणबी

कोकण आणि विदर्भ भागात मात्र हाच समाज बहुसंख्येने कुणबी नावाने ओळखला जातो. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या मूक क्रांती मोर्चाला नागपुरात कुणबी शब्द जोडावा लागला. कुणबी हे ओबीसी आरक्षणात आधीपासूनच आहेत.

एवढे प्रास्ताविक यासाठी की, पूर्वी विदर्भात डीएमके शब्दाचं चलन होतं. राजकारणात रस असलेल्या लोकांना डीएमके या संक्षेपाचा अर्थ माहीत आहे. तामिळनाडूतला हा एक पक्ष आहे. त्याचे पूर्ण नाव द्रविड मुन्नेत्र कळघम. एमजी रामचंद्रन या नेत्याअभिनेत्याने त्यातून वेगळी चूल मांडून एडीएमके नावाचा पक्ष काढला. सध्या तो सत्तेत आहे.

हेही वाचाः यवतमाळः निवडणुकीत शेतीऐवजी जातीचीच चर्चा ऐरणीवर!

पण नागपुरात डीएमके म्हणजे द्रमुक नाही. इथे डीएमके म्हणजे देशमुख, मराठा, कुणबी. एका व्यापक शेतकरी समाजाचे हे तीन वेगवेगळे भाग. जातीय व्यवस्थेत ते वेगवेळ्या नावाने ओळखले जातात. हे तीनही समूह स्वत:ला वेगवेगळे मानत असत. अगदी विदर्भाच्या राजकारणात सुद्धा याचे पडसाद उमटायचे. काळाच्या ओघात सीमारेषा मिटून मराठ्यांचं डीएमके मागं पडलंय.

नवं डीएमके – दलित, मुस्लिम, कुणबी

पण आताएक नवं डीएमके अस्तित्वात आलंय. ते समीकरण आहे, दलित, मुस्लिम, कुणबी. विशेषतः नागपूर मतदारसंघातले दिग्गज उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसने बाहेरून आयात केलेले नानाभाऊ पटोले रिंगणात आले आणि इथे डीएमकेची चर्चा सुरू झाली. बहुजनांचे नाव घेत पटोले आणि काँग्रेस डीएमकेचं जातीय कार्ड खेळत आहे, अशी टीका होऊ लागली. 

हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

नानांनी हा आरोप फेटाळला. पण आमच्या माणसांनी तम्हाला म्हणजे गडकरींना मतं देऊन निवडून दिलं. त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं, असा प्रश्न विचारत त्यंनी अप्रत्यक्षपणे ओबीसीचा पत्ता टाकलाच. हेच ते डीएमके कार्ड. दलित मुस्लिम मतांवर काँग्रेस नेहमीच दावा सांगते. त्यात यंदा पटोलेंना नागपुरात आणून एका मोठ्या समूहाला आपल्याकडे ओढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतोय. 

आंबेडकरांचं डीएमओ – दलित, मुस्लिम, ओबीसी

ओबीसी म्हणजे कुणबी याच्या पुढे जाऊन आता मात्र व्यापक अर्थाने ओबीसीसंज्ञा वापरली जाते. त्यातून यावेळी नवा डीएमओ शब्द उदयास आलाय. त्याचा अर्थ दलित, मुस्लिम, ओबीसी. विशेषत: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी यांच्या बहुजन वंचित आघाडीने हे डीएमओ कार्ड लोकांपुढे मांडलंय. आपल्या उमेदवारांची जातच त्यांनी जाहीर करून टाकली. त्यातून आघाडीने निवडणूक आचारसंहितेला थेट आव्हानच दिलं, असंही म्हणता येईल.

नागपूर हे विदर्भातलं सर्वात मोठं महानगर आहे. सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांमधल्या घडामोडी मोठ्या प्रमाणात इते होत असतात. त्यामुळे विदर्भाच्या सर्व भागांमधून लोक नागपुरात आले आणि इथेच स्थायिक झाले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधल्या मूळ रहिवाशआंची आज नागपुरात भरपूर संख्या आहे. सरासरी एकेक लाख इतर जिल्हावासी आता नागपूरकर बनले आहेत. 

हेही वाचाः महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

यात सर्व जाती, धर्म, पंथांचे लोक आहेत. परिणामी नागपूरला कॉस्मोपॉलिटन लूक आलाय. आणि हे नागपूर राजधानी असतानापासून म्हणजे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच लोकशाहीच्या राजकारणात नागपूर शहर नेहमीच सर्वसमावेशक राहिले. जातीपातीचं कार्ड इथे चाललं नाही.

उत्तर आहे टीएमके – तेली, माळी, कोष्टी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि धम्मचक्रप्रवर्तनाची दीक्षाभूमी असलेल्या नागपूर मतदारसंघात याआधी कधीही डीएमके, डीएमओच नाही, तर हिंदुत्वाचंही कार्ड निवडणुकीत चाललं नाही. एक पोटनिवडणूक धरून एकूण सतरा निवडणुकीतल्या नऊ खासदारांपैकी सहा जण संख्येने खूप छोट्या असलेल्या समाजांचे खासदार निवडून आलेत. आणि फक्त तिघेच बहुसंख्याक समाजांचे खासदार आहेत.

गेल्या ६७ पैकी फक्त वीस वर्ष नागपूरचं प्रतिनिधित्व बहुसंख्याक समाजाने केलं. हा इतिहास असताना यंदा मात्र नागपुरात डीएमके, डीएमओ कार्ड खेळलं गेलंय. त्याला उत्तर म्हणून टीएमके अर्थात तेली, माळी, कोष्टी कार्ड मैदानात येऊ शकतं, अशीही स्थिती दिसतेय. याचा अर्थ, नागपूरची निवडणूक पूर्णपणे जातीय वळणावर नेण्यात आलीय. 

हेही वाचाः नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत?

संघाला घेरण्यासाठी हे घडवून आणण्यात आलंय की काय, अशी शंका घ्यायलाही वाव आहे. कारण प्रकाश आंबेडकर गेल्या काही दिवसांपासून संघाला टार्गेट करताहेत.तर काँग्रेस उमेदवार नाना पटोले हेही भाजपा आणि संघ परिवारावर सातत्याने टीकेची झोड उठवत आलेत. त्यांना भंडाऱ्याहून नागपुरात आयात करण्यात आलं, ते उगाच नाही! 

भाजपाचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची यावेळी भारीच परीक्षा आहे. नागपूरच्या सुज्ञ मतदारांचीही तेवढीच परीक्षा होणार आहे! जातीचं कार्ड नाकारून नागपूरकर परंपरा जपतात की बदल स्वीकारतात, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

हेही वाचाः उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच

 

(लेखक नागपूर येथील ज्येष्ठ संपादक आहेत.)