आजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले

२४ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


मध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय? ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.

कार्यक्रमः विश्ववेध व्याख्यानमाला

ठिकाणः रुईया कॉलेज, माटुंगा (पूर्व), मुंबई

वेळः २२ जानेवारी २०१९, सकाळी १०:३०

वक्तेः निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार

विषयः मध्यपूर्वेतला गोंधळ आणि तुम्ही आम्ही

काय म्हणालेः आताच्या जगातलं वास्तव सांगणारी निरीक्षणं

मुंबईतल्या ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशन अर्थात ओआरएफच्या मराठी विभागाने विश्ववेध ही जागतिक घडामोडींचा वेध घेणारी व्याख्यानमालिका सुरू केलीय. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निळू दामले यांनी मध्यपूर्वेतल्या घडामोडींचा वेध घेतला. त्यांच्या भाषणातले हे सहा मुद्दे.

आजचं जग कसं आहे?

आजच्या जगाचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं, तर आपल्याला सारं जग अशांत, अस्वस्थ आहे, असं म्हणता येतं. ही अशांतता फक्त सिरियातपुरती नाही. जर्मनी, अमेरिका, ब्रिटन यासोबतच युरोप आणि आफ्रिकेतही पसरली.

या सगळ्यात मध्यपूर्वेतली परिस्थिती मात्र अधिक बिकट आहे. कारण जगभरातल्या सत्ताकेंद्रांचे आर्थिक हितसंबंध हे मध्यपूर्वेत गुंतलेले आहेत. सिरियातल्या संघर्षाची सगळी पाळंमुळं तिथल्या आर्थिक सुधारणांच्या अभावामधे आहेत. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारने त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सिरियामधे अराजक माजलं.

जगावर मालकी सांगण्याचा खटाटोप

मानवी संघर्षाचं मुख्य कारण हे आर्थिक असतं. आपल्याकडे पूर्वी गायी पळवून नेल्या जायच्या. आता मात्र जमीन, तंत्रज्ञानावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. साधनांवर मालकी सांगण्याचा माणसाचा हा खटाटोप तसा खूप जुना आहे.

जगाच्या कोणत्याही भागात अराजकता माजली की त्याची सर्वात मोठी झळ पोचते ती तरुणांना. हेच तरुण पहिल्यांदा बंड करून उठतात. मध्यपूर्वेत ट्युनिशियापासून सुरू झालेली क्रांती हे असंच तरुणांचं बंड होतं. पण ते चिरडलं गेलं. कारण तिथल्या या क्रांतीला कुठलंच सूत्र नव्हतं. विचारधारा नव्हती.

टेक्नॉलॉजीने नवी आव्हानं

औद्योगिकीकरणानंतर जगाचा परीघ विस्तारला आणि पंचक्रोशीपुरतं असणारं जग संपलं. पण या विस्तारलेल्या जगावर कोणाचं नियंत्रण असणारं हा कळीचा मुद्दा बनला. या जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेली कित्येक दशकं संघर्ष सुरू आहे. जागतिकीकरणानंतर नव्या टेक्नॉलॉजीने निर्माण केलेल्या नव्या प्रश्नांना आपण कसं सामोरं जाणार यावर हा संघर्ष उभा आहे.

पाणी हे मानवी जीवनासाठीचं महत्वाचं साधन आहे. दिवसेंदिवस पाण्याचा दुर्भिक्ष्य होतंय. त्यामुळे भविष्यात पाण्यावरून संघर्ष होणं अटळ आहे. आज जगभर पसरणारा दुष्काळ हे त्या संघर्षाचंच तर चिन्ह आहे.

शेतीचा प्रश्नही असाच गुंतागुंतीचा बनलाय. शेतकऱ्यांनी कितीही सबसिडी द्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, आणि सुटणार नाहीत. शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, त्याला बरं जगवायचं असेल तर या देशाच्या अर्थव्यवस्थेतमधे स्ट्रक्चरल बदल करावे लागतील. देशाची अर्थव्यवस्था तुम्हाला शेतीपासून दूर नेऊन उद्योगांकडे आणि शहरांकडे न्यावी लागेल. तिथे या माणसांना सामावून घ्यावं लागेल. त्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही.

आर्थिक प्रश्नाला अस्मितावादाचं उत्तर कुचकामी

कोणत्याही समाजाची पाटी कधीच कोरी नसते. तिच्यावरच्या इतिहासाच्या खाणाखुणा पुसता येत नाहीत. सिरियातचा अडीच तीन हजार वर्षांचा इतिहास समजून घेतला तर तिथल्या गोंधळाची मुळं आपल्याला सापडायला लागतात.

ज्याच्या हातात लाठी असते तो डोकं वापरत नाही. बांबू उगारला की लोक ऐकतात. चर्चा केली तर विचारांचा प्रश्न उभा राहतो. माणसांचे प्रश्न आर्थिक असतात. पण संघर्षाच्या वेळी मात्र ते आर्थिक न राहता सांस्कृतिक म्हणून जगापुढे आणले जातात. आज जगभरात आर्थिक आणि सांस्कृतिकची सांगड घातली जाते, असं कुठं दिसत नाही. ती कशी घालायची, हा आजच्या जगापुढला महत्वाचा प्रश्न आहे.

आर्थिक प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी आपण अस्मितांची शस्त्रं बाहेर काढतो आणि संघर्ष मूळ मुद्यापासून दूर जातो.

धर्म, संस्कृतीपेक्षा समानता महत्त्वाची

संस्कृती आणि धर्म यांचा उपयोग सत्ता मिळवण्यासाठी करणं हे आज आपल्याला जगभर सगळीकडे दिसतं. धर्म, संस्कृती याच्यावर समानता आहे. समानता हे आधुनिक काळाचं तत्व आहे. आज याच मुद्यावर जगभरात संघर्ष होताना दिसतोय.

राज्यघटनेचा मुख्य पाया हा माणसाची समानता हा असतो. म्हणून राज्य या संकल्पनेचा आधार हा कायमच समानता हा राहिलाय. पण आधुनिक काळात संस्कृतीचा दाखला देऊन समानता नाकारली जाते आणि संघर्षाला तोंड फुटते.

जगाचे नागरिक असल्याचं भान हवं

आजच सारं जग एकमेकांमधे गुंतलेलंय. कुणीही वेगळं राहू शकणार नाही. अशा वेळी सगळ्या अस्मिता मग त्या प्रादेशिक असो, धार्मिक असो, जातीय असो की भाषक असो या अस्मितांचा संघर्ष हाताळण्यासाठी नवी व्यवस्था उभी करावी लागणार आहे.

आजचं जग हे अनंत अल्पसंख्य समुदायाचांचं मिळून बनलेलंय. या पुढे कोणत्याही एका समुदायाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे या समूहांच्या सहअस्तित्वातच जगाचं भलं आहे.

आज माणसाने विचार करू नये, अशी परिस्थिती निर्माण केली जातेय. मनोरंजनाची माध्यमं, आसपासची व्यवस्था ही अशा पद्धतीने नियंत्रित केली जातेय की, माणसानं मेंदूचा वापरच करू नये. आज आपण जगाचे नागरिक आहोत. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना आपल्यावर परिणाम करणारी आहे, याचं भान आपल्या सर्वांना यावंच लागेल.