निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?

०१ जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मोदी राजवटीत निर्मला सीतारामन यांना जितकी बढती मिळाली तितकी इतर कुणालाच मिळाली नाही. भाजपचं प्रवक्तेपद सक्षमपणे सांभाळल्याचं बक्षीस म्हणून त्यांना मोदी सरकार १.० मधे वाणिज्य खात्याचं मंत्रिपद मिळालं. नंतर तर संरक्षमंत्री म्हणून लॉटरीच लागली. आता मोदी सरकार २.० मधे तर त्यांना अर्थमंत्रीपद मिळालंय. पण त्या खरंच देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत का?

नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी आपल्या दुसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज मंत्रिमंडळ बैठकीआधी खातेवाटपही केलं. यामधे गेल्या वेळच्या अनेकांची खाती यंदाही कायम ठेवण्यात आलीत. काही जणांच्या खात्यामधे बदल केलाय. मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं, तर नव्यानेच आलेले अमित शहा गृहमंत्री बनले. संरक्षणमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार देत मोदींनी सगळ्यांना धक्का दिला.

हेही वाचाः नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची पाच वैशिष्ट्यं

देशाची अर्थव्यवस्था अडचणीत

अर्थ खात्यासोबतच सीतारामन यांच्याकडे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाचीही सुत्रं देण्यात आलीत. गेल्या वेळचं मोदी सरकार वेगवेगळ्या कारणांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलं. जगभरातल्या आर्थिक घडामोडींचा, मंदीचाही भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. अजूनही मंदीचा प्रभाव आहे. बेरोजगारीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होतोय. अशावेळी सर्वांत महत्त्वाचं मंत्रिपद कुठलं असेल तर ते अर्थमंत्री.

अशा या सर्वांत महत्त्वाच्या खात्याचा कारभार मोदींचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्याकडे सोपवला जाईल, असं बोललं जातं होतं. शहा यांना घरातूनच व्यापाराचं बाळकडू मिळालं. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी वडिलांकडून शेअर मार्केटच्या धंद्याची सुत्रं हाती घेतली. शहांना अर्थमंत्री करून पंतप्रधान मोदी जागतिक अर्थव्यवस्थेला एक स्ट्राँग मेसेज देतील असं मानलं जातं होतं. पण मोदींनी अर्थशास्त्राच्या अभ्यास सीतारामन यांच्याकडे देशाचा जमाखर्च ठेवण्याची जबाबदारी दिली.

सीतारामन शिकल्यात जेएनयूमधे

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी अर्थात जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमएची पदवी मिळवली. तसंच एमफीलही केलं. जेएनयूमधे शिकतानाच त्यांची डॉ. पराकाला प्रभाकर यांच्याशी भेट झाली. पुढे दोघांनी लग्न केलं. प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी केली. त्यामुळेच हॉवर्डपेक्षा हार्डवर्कवर भरोसा असणाऱ्या नरेंद्र मोदींनी अर्थशास्त्राच्या अभ्यासक सीतारामन यांच्यावर विश्वास दाखवला, असं बोललं जातंय.

लग्नानंतर काही वर्ष लंडनमधे काम केल्यावर सीतारामन भारतात परतल्या. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी सरकार असताना २००३ ते २००५ या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. पुढे २००८ मधे भारतीय जनता पार्टी जॉईन करणाऱ्या सीतारामन यांना नंतर मागे वळून बघावंच लागलं नाही. पक्ष जॉईन केल्यावरच त्यांच्याकडे दिल्लीत प्रवक्तेपदाची जबाबदारी आली. फर्राटेदार इंग्रजी आणि जोडीला कामचलाऊ हिंदीच्या जोरावर टीवी स्क्रीनवर त्यांचा चेहरा झळकू लागला.

हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री, अर्थमंत्री

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही सीतारामन कॅबिनेट मंत्री होत्या. वाणिज्य आणि उद्योग तसंच कार्पोरेट अफेअर्स खात्याचा कारभार त्यांच्याकडे आला. नंतर मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाल्याने ३ सप्टेंबर २०१७ ला त्यांच्याकडे संरक्षणमंत्रीपद आलं. यानिमित्ताने पहिली पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री होण्याचा मान सीतारामन यांना मिळाला. तसं बघितलं तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पहिल्या महिला संरक्षणमंत्री आहेत. पण त्या पूर्णवेळ संरक्षणंत्री नव्हत्या. त्यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कारभार होता.

१९७०-७१ मधे पंतप्रधान असताना इंदिरा गांधींनी अर्थमंत्रीपदही स्वतःकडेच ठेवलं. १६ जुलै १९६९ ते २७ जून १९७० या काळात त्यांनी अर्थ खात्याचाही कारभार सांभाळला. त्यामुळे सीतारामन यांच्या नावावर पहिल्या महिला अर्थमंत्री नाही तर पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान नोंदवला गेला.

Cabinet portfolio allocation LIVE updates: List of ministers out

Minister of State #CabinetAnnoucement #Cabinet2019 pic.twitter.com/NNNW6oPnUS

— PIB India (@PIB_India) May 31, 2019

चार अर्थमंत्री झाले पंतप्रधान

अर्थखातं खूप मोठमोठ्या लोकांनी सांभाळलंय. आर. के. षण्मुखम चेट्टी हे देशाचे पहिले अर्थमंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, इंद्रकुमार गुजराल आणि मनमोहन सिंग या पंतप्रधानांनीही आपल्या कारकीर्दीत काही काळ अर्थमंत्रीपद सांभाळलंय. एवढंच नाही तर चार अर्थमंत्र्यांना पुढे जाऊन पंतप्रधान होण्याचीही संधी मिळालीय. त्यामधे मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, वी. पी. सिंग आणि डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.

तमिळ ब्राम्हण कुटुंबातून येणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी दहा वर्षांपूर्वी राजकारण आणि भाजपमधे एंट्री केली. दशकभराच्या काळातच त्यांच्या राजकारणाचा चढता आलेख बघता येत्या काळात त्या पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणूनही पुढे येऊ शकतात. पण त्यासाठी त्यांना अर्थमंत्री म्हणून दमदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. आणि त्यासाठीच त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवलेलं असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधींच्या नावावर असलेलं पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधानपदाचा रेकॉर्डही सीतारामन मोडू शकतात.

हेही वाचाः 

चला, आज तरी मासिक पाळीवर चर्चा करूया

नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

साधंसरळः राफेल ऑडियो टेपचं गोवा कनेक्शन काय?

डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकरः गोव्याचे तपस्वी इतिहास संशोधक

क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर