तर नितीन गडकरीच होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

०६ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.

आजचा दिवस महाराष्ट्रातल्या सत्तापेचाला वळण देणाऱ्या गाठीभेटींनी गाजला. सकाळी सकाळीच संजय राऊत आपली नियमित पत्रकार परिषद आटोपून शरद पवारांच्या भेटीला गेले. निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अतिवृष्टीआडून शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मंत्रीमंडळ बैठक घेत होते. अशातच गेल्या १४ दिवसांतली सगळ्यात पॉवरफूल ब्रेकिंग न्यूज आली. ती म्हणजे काँग्रेस नेते अहमद पटेल हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला गेल्याची.

अचानक गडकरींचं नाव चर्चेत

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन येत्या काळात काँग्रेस आघाडीची राजकीय चाल कशी असणार यावर चर्चा केली. या चर्चेत शिवसेनेला पाठिंबा देण्यावर चर्चा झाल्याचं बोललं गेलं. आतापर्यंत निव्वळ चर्चाच सुरू असलेल्या या प्लॅनवरचा अंतिम तोडगा दृष्टिपथात असतानाच पटेल-गडकरी भेटीने सारी चर्चाच वेगळ्या दिशेला नेऊन ठेवलीय.

इतके दिवस निव्वळ मुख्यमंत्री फडणवीसांभोवती फिरणारी सत्तापेचाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून गडकरींभोवती फिरू लागलीय. गडकरीच या पेचातून मार्ग काढू शकतात, असं सांगितलं जातंय. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी टीवी९ मराठीशी बोलताना तर नितीन गडकरी एका झटक्यात सध्याच्या पेचप्रसंगावर तोडगा काढू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मुख्यमंत्री फडणवीस सध्याच्या पेचप्रसंगात एकाकी लढा देत असल्याच्या गोष्टीवर जोर दिला जातोय. लोकसभेच्या बोलणीवेळी राज्यात फिफ्टी फिफ्टी सत्तावाटपात मुख्यमंत्रीपदाचा विषयच नसल्याचं फडणवीस म्हणाले. या प्रतिक्रियेमुळे शिवसेना नेतृत्व फडणवीसांवर नाराज झालंय. सत्तावाटपाच्या बोलणीसाठीच्या बैठकीलाच न जाण्याची भूमिका शिवसेनेने घेतलीय.

मुख्यमंत्र्यांचा फोनही मातोश्रीवरून घेतला जात नसल्याची हतबल प्रतिक्रिया फडणवीसांचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. यावरून फडणवीस आणि शिवसेनेत किती फाटलंय याची कल्पना येऊ शकते. अशावेळी गडकरींकडे संकटमोचक म्हणून बघितलं जातंय.

हेही वाचाः तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

ठाकरे घराण्याशी रोडकरी कनेक्शन

गडकरींचे ठाकरे घराण्याशी खूप जुने आणि चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गडकरींच्या रस्तेकामाचा गौरव रोडकरी अशा शब्दांत करायचे. ते अनेकदा गडकरींचा लाडाने रोडकरी असाच उल्लेख करायचे. बाळासाहेबांसोबतचे हे संबंध गडकरींनी उद्धव ठाकरेंशी जोडून घेतले. गडकरी मातोश्रीवर गेल्यावर अख्खं ठाकरे कुटुंब त्यांच्या स्वागताला तयार असायचं. तसे फोटोही आपल्याला इंटरनेवर सापडतात.

विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात खूप चांगलं ट्यूनिंग असल्याचं पत्रकारांकडून वेगवेगळ्या टीवी चर्चांमधे सांगितलं जायचं. त्यासाठी तसे दाखलेही दिले जायचे. पण आता त्याच फडणवीसांचा कॉल मातोश्रीवरून उचलला जात नाहीय. शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर अडून बसलीय. दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रीपद सोडून बोला अशा मूडमधे आहे.

गेल्या पाच वर्षांतला भाजपचा देशभरातला राजकीय व्यवहार बघितला तर ते  काही केल्या आपल्या हातची सत्ता सोडत नाहीत. शक्य नसलेल्या ठिकाणीही ते स्वतःही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण महाराष्ट्रात भाजपला काही केल्या बहुमताच्या आकड्याची गोळाबेरीज करता येत नाही. शिवसेनाही चर्चेला तयार होत नाही.

शाह मातोश्रीवर गेले आणि जादूची कांडी फिरली

शिवसेनेला चर्चेसाठी तयार करायचं असेल तर गडकरी आपले हितसंबंध पणाला लावून ती किमया साधू शकतात. फडणवीसांवर नाराज असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलण्याची ऑफर देऊन आपण स्वतःच दावेदार असल्याचं सांगून गडकरी ही नाराजी दूर करू शकतात. लोकसभा निवडणुकीवेळीही आता युती तुटणार असं चित्र असतानाच भाजपाध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर गेल्यावर जादूच्या कांडीसारखं साऱ्या गोष्टी नीट झाल्या होत्या.

गेल्या १४ दिवसांपासूनच्या सत्तासंघर्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बघ्याची भूमिका घेतलीय. पक्षाध्यक्ष असूनही अमित शाहसुद्धा मौनात गेल्याचं दिसताहेत. तुमचं तुम्ही मुंबईत मिटवा अशी त्यांची भूमिका असल्याच्या बातम्याही आल्यात. त्यामुळे सध्याचा पेच आणखी गंभीर झालाय.

भाजपच्या कुठल्या नेत्याने मीडियामार्फत एखादा प्रस्ताव मांडला तर लगेच शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत तो प्रस्ताव आपली ‘जैसे थे’ भूमिका सांगून फेटाळून लावतात. जसं अमित शाह मातोश्रीवर गेल्यावर जादूची कांडी फिरली तशीच एक कांडी आता भाजपकडे आहे. ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलून शिवसेनाफ्रेंडली गडकरींना सीएम करण्याची.

हेही वाचाः स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

शिवसेना चार पावलं मागं घेऊ शकते

शिवसेना-भाजप युतीमधे गेल्या पाच वर्षांत मोठा भाऊ कोण यावरून नेहमीच संघर्ष होत आलाय. आपणच मोठा भाऊ असल्याचं सांगण्यासाठी शिवसेनेने वेळप्रसंगी भाजपवर जहरी शब्दांत टीका केलीय. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावरही टीकेचे आसूड ओढलेत. थोडंसं कुरवाळल्यास शिवसेनेचा हा वाघ गुरगुरणं कमी करतो, असे प्रसंग गेल्या पाच वर्षांत बघायला मिळालेत.

हाच अनुभव गाठीशी असलेल्या भाजपमधल्या राज्यातल्या नेत्यांनी सध्याच्या पेचप्रसंगात शिवसेनेच्या आरेला कारे म्हणायचं नाही, अशी भूमिका घेतलीय. पण काही केल्या शिवसेना नमतं घ्यायला तयार नाही. अशावेळी गडकरींचं नाव पुढे आल्यास काही करूनही सत्तेत बसायला तयार असलेल्या शिवसेनेलाही काहीसा सत्तामार्गाचा श्वास मिळू शकतो. महायुतीत निवडणूक लढवलेल्या शिवसेनेवर सध्या मोठी बाका परिस्थिती ओढवलीय. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असलेल्या शिवसेनेसाठी असा तोडगा विन विन परिस्थितीसारखा असू शकतो.

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मला सत्ता हवीय असं सांगितलंय. सध्याच्या परिस्थितीत सहजरित्या सत्ता हवी असल्यास शिवसेनेसाठी गडकरींच्या नेतृत्वात सत्तास्थापनेचा हा पेपर सोडवणं सोप्पं असू शकतं. आपण फडणवीसांना घालवलं ही भावना शिवसेना आणि शिवसैनिकांना खूप बळ देणारी आहे. या बळापोटी शिवसेना काहीसं नमतंही घेऊ शकते. आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेत आपलं भाजपमधल्या जुन्या नेत्यांशी वाडकं नसल्याचंही अधोरेखित केलंय.

प्रशासक म्हणून दमदार कामगिरी

गडकरींकडे केंद्र आणि राज्य सरकारमधे दहाबारा वर्षांचा कामाचा मोठा अनुभव आहे. या काळात त्यांनी आपल्या कामातून आपले नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवलेत. या कामातून त्यांचा एक उत्तम प्रशासक असा नावलौकिक झालाय. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी देशभरातल्या रस्त्यांच्या कामांची ब्ल्यूप्रिंट ठरवण्यासाठी गडकरींना बोलवून घेतलं होतं.

सध्या राज्य आर्थिक संकटात सापडलंय. उद्योगस्नेही चेहऱ्याच्या गडकरींमधे राज्याची आर्थिक घडी बसवण्याची ताकद आहे. गेल्या पाच वर्षांमधे राज्यात एकही मोठा उद्योगधंदा आला नाही. उद्योगधंद्याच्या रूळावरून घसरलेली ही गाडी गडकरी रूळावर आणू शकतात.

दमदार कामगिरी असलेले गडकरी एक दिलदार माणूस म्हणूनही ओळखले जातात. फडणवीसांवर पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी सुडाचं राजकारण करून आपल्या विरोधकांना संपवण्याचे आरोप झाले. मोकळ्या ढाकळ्या स्वभावासाठी ओळखले जाणारे गडकरी कधी तसल्या आरोपांमधे अडकले नाहीत.

हेही वाचाः २२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?

सर्वसमावेशक ब्राम्हण चेहरा

मराठा, दलित, मुस्लिम, ओबीसी जातींच्या तुलनेत संख्येने कमी असलेल्या ब्राम्हण जातीतल्या माणसाला २०१४ मधे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवून भाजपने सगळ्यांना चकीत केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीने भाजपमधल्या बहुजन नेतृत्वाचाही निकाल लावलाय. सर्वांना मान्य होईल, असं बहुजन नेतृत्वच भाजपमधे उरलेलं नाही.

तिकीट न दिल्याने एकनाथ खडसेंचा पत्ता आपोआप कट झालाय. पराभूत झाल्याने पंकजा मुंडेंच्या नेतृत्वालाही मर्यादा आल्यात. दुसरीकडे फडणवीसांना तडकाफडकी बाजूला सारून भाजप नेतृत्व ब्राम्हण वोटबँकेची नाराजी ओढवून घेण्याच्या मूडमधे दिसत नाही. अशावेळी गडकरींसारखा सर्व जातीजमातींना सोबत घेऊन जाणाऱ्या सर्वसमावेशक ब्राम्हण नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून भाजप नेतृत्व सध्याच्या पेचावर तोडगा काढू शकतं.

नागपूरला आरएसएसचं मुख्यालय असलं तरी तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला जिंकून गडकरींनी आपण मासलीडर असल्याचं सिद्ध केलंय. दुसरीकडे भाजपने फडणवीसांच्या नेतृत्वात लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत गडकरींना दूर ठेवण्यात आलं. गडकरींना विदर्भापुरतं मर्यादित करण्यात आलं. भाजपला याचा मोठा फटका बसला. विदर्भातूनच भाजपच्या जागांमधे मोठा खड्डा पडलाय. गडकरींना मुख्यमंत्री करून भाजप पुन्हा एकदा विदर्भातलं आपलं राजकारण मजबूत करू शकते.

विरोधी पक्षांसाठी ‘सब चंगासी’ फिलिंग

गडकरींकडे सर्वपक्षीय चेहरा म्हणूनही बघितलं जातं. महायुतीसोबतच विरोधी पक्षांनाही गडकरींमुळे ‘सब चंगासी’ वाटू शकतं. सध्या काही झालं तरी भाजपचं सरकार नको म्हणतं काँग्रेस, राष्ट्रवादीची नेतेमंडळी शिवसेनेला डोळा मारण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री म्हणून गडकरींचं नाव समोर आल्यास हीच नेतेमंडळी आपल्या कारवाया थांबवून गडकरींसोबत कामाला लागू शकतात.

गडकरींचे शरद पवारांसोबतच काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. आज अहमद पटेलांच्या भेटीने या सर्वपक्षीय संबंधांवर शिक्कामोर्तबच केलंय.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्याच्या पेचप्रसंगावर भाजपची नेतेमंडळी मौनात गेलीत. जे काही बोलताहेत ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारच. ते रोज थोडं थांबा लवकरच गोड बातमी मिळेल, असं मीडियाशी बोलताना सांगताहेत. सध्याच्या गुंतागुंतीच्या घडामोडींमधे मुनगंटीवारांच्या बोलण्याला एक वेगळी राजकीय किनार आहे. कारण मुनगंटीवार हे कट्टर गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात. गडकरी गट ही गोष्ट ध्यानात घेऊनच आपण सध्याच्या बोलाचालींकडे बघितलं पाहिजे.

हेही वाचाः लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

पंतप्रधानपदाच्या दावेदारीचं काय होणार?

६२ वर्षांच्या नितीन गडकरींकडे पंतप्रधान पदाच्या रेसमधला घोडा म्हणूनही बघितलं जातं. एबीपी माझाने आपल्या स्टोरीत येत्या काळात पंतप्रधान होण्याची आपली दावेदारी सोडून गडकरी महाराष्ट्रात येणार नाहीत, असं म्हटलंय.

मोदी सरकारच्या कार्यकाळात केंद्रातून राज्यात जाऊन मुख्यमंत्री होण्याची प्रथा आपल्या शेजारच्या गोव्यातच आहे. मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोडून भाजपची सत्ता टिकवण्यासाठी छोट्याशा गोव्याला परतून मुख्यमंत्री झाले होते. तसंच गडकरींच्या बाबतीतही होऊ शकतं. मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न विकला. तसंच गडकरीही आपली पीएमपदाची दावेदारी आणखी मजबूत करण्यासाठी स्वतःचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ तयार करू शकतात.

उद्या, गुरुवारी भाजपची नेतेमंडळी मुंबईत राज्यपालांची भेट घ्यायला जाणार असतानाच नितीन गडकरी दिल्लीहून नागपूरला येणार आहेत. इथे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसही मंगळवारी रात्री उशिरा विमानाने नागपूरला जाऊन भागवतांना भेटून आलेत. आरएसएसकडूनही महायुतीचं सरकार यावं यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या बोलणीत गडकरींना मुख्यमंत्री करण्याच्या तोडग्यावरही चर्चा होऊ शकते.

हेही वाचाः 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी

आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

शेतकऱ्याच्या पोराने मातब्बर कृषीमंत्र्याला हरवलं, त्याची गोष्ट

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?