चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

०६ जून २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.

‘मिलिटरी ऑफेन्सिव’ हा शब्दाचा संबंध भारतीय तत्काळ चीनशी जोडतात. १९६२ चं सीमायुद्ध किंवा ज्याला आपण ‘लडाखच्या गलवान खोऱ्यातलं आक्रमण’ असं म्हणतो, त्याचा विचार त्यामागे असतो. याउलट ‘चार्म ऑफेन्सिव’ असा शब्द मात्र आपण आपल्या या बलवान कम्युनिस्ट शेजाऱ्याच्या संबंधाने वापरत नाही. त्यामुळेच नुकतेच भारतीय माध्यमांना चिनी विद्वानांनी आणि राजकीय मुत्सद्यांनी दिलेल्या मुलाखतींना आलेला ऊत पाहणं आश्चर्यकारक होतं.

चिनी विद्वानांचे दावे

एका ज्येष्ठ चिनी विद्वानाने ‘द हिंदू’शी बोलताना असा दावा केला की, त्यांच्या देशानं कोरोना विषाणूच्या या महामारीला पाश्चिमात्त्य देशांहून अधिक चांगल्या प्रकारे हाताळलंय. ४० हून अधिक देशांना चीनने विविध प्रकारची वैद्यकीय मदत पुरवलीय, असा दावाही त्यांनी केला. त्यानंतर असं ठामपणे प्रतिपादन केलं की, चीनविषयी नकारात्मक दृष्टी बाळगणाऱ्या देशांपेक्षा सकारात्मक दृष्टी बाळगणाऱ्या देशांची यादी बरीच मोठी आहे.

यादरम्यान भारतातले चीनचे राजदूत स्वतःच्या देशाच्या बाजूने शक्य तितकं चांगलं प्रदर्शन करण्यासाठी एका भारतीय दूरचित्रवाणी वाहिनीवर जाऊन पोचले. भारताला मदत पुरवण्यासाठी आणि मदतीचा हात देण्यासाठी चीन तयार आहे, असं ते म्हणाले. या साथीवर भारताने लवकरात लवकर विजय मिळवावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ते पुढे म्हणाले की, चीनमधील वैद्यकीय सामग्री भारताला खरेदी करता यावी, यासाठी आम्ही मार्ग खुला केलाय.

वैद्यकीय क्षेत्रामधे साह्य म्हणून विशिष्ट मदत देऊ करून ‘हिंदी चिनी भाई भाई’ या आता बऱ्याच अंशी विस्मृतीत गेलेल्या बंधाला हे राजदूत आवाहन करताना दिसले. १९६२ च्या युद्धापूर्वी तो प्रचलित आहे असं मानलं जात होतं. त्यामुळेच ते म्हणाले की, चीन आणि भारतादरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला याच वर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. आपण केवळ शेजारीच नाही तर चांगले मित्र आणि सहयोगीही आहोत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे, दोन प्रगतीशील देश म्हणून चीन आणि भारताने परस्पर सहकार्याने या साथीविरोधातल्या लढ्यात विजयी झालं पाहिजे.

हेही वाचाः छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

संकुचिततावादी प्रजासत्ताकाची पाठराखण

चिनी प्रस्थापित व्यवस्थेने अमेरिकेच्या प्रस्थापित व्यवस्थेशी अशीच ओघवती बोलणी सुरू केली आहेत. एका उच्चपदस्थ चिनी राजकीय व्यक्तीने ‘द वॉलस्ट्रीट जर्नल’मधे संकुचिततावादी प्रजासत्ताकाची पाठराखण करत असा दावा केला की, पश्चिमेकडील माध्यमांमधे अनाठायी त्यांच्या देशाची राक्षसी प्रतिमा झालेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाशी कसं लढावं याबाबतीत चीन हा आदर्श आहे. त्यांनी असंही नोंदवलं की, कोरोनाच्या पहिल्या लाटेने ज्या देशांना तडाखा दिला त्यामधे चीनने ‘पुस्तक बंद ठेवून’ परीक्षा दिली. आणि त्याच्या उंचावणाऱ्या निकालांनी चीनपाठोपाठ इतर देशांनी ‘पुस्तक उघडं ठेवून’ दिलेल्या परीक्षांमधे त्यांचे निर्णय घेण्यासाठी माहिती पुरवली. वुहानमधील लोकांची त्यांनी प्रशंसा केली.

त्यांच्या मते, वुहानमधील लोक हे ‘जबाबदारपणा, आत्मत्याग आणि ऐक्याचं उत्कृष्ट उदाहरण’ होते. त्यामुळेच साथीशी परिणामकारक रीत्या लढण्यासाठी त्यानी जगाला प्रेरित केले. ‘स्वतःचं मॉडेल आणि यंत्रणा निर्यात करण्याचा चीनचा कधीही उद्देश नव्हता’, असं सांगतं ते पुढं लिहितात, ‘कोरोनाविरोधात जीव वाचवण्याच्या या लढाईतली चीनची कार्यक्षमता, चैतन्यभावना आणि जबाबदारीची जाणीव हे सर्व स्वाभाविक होते.’

चीनची त्यांच्या बाजूने केली गेलेली ही प्रसिद्धी मोहीम नेहमीपेक्षा वेगळी आहे. काहीशी अस्वस्थता आणि अपराधीपणाची भावनादेखील त्यातून सूचित होते. काही स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेले अहवाल असं दर्शवतात की, चीनची राज्यव्यवस्था बाकी काहीही असलं तरी, ही साथ हाताळण्याच्या बाबतीत जबाबदार, खुली आणि पारदर्शक होती. खरं तर ज्या जंगली प्राण्यांच्या मांस-बाजारातून ही साथ उद्‌भवली ते बाजार उघडावेत, यासाठी त्यांना जंगली प्राण्यांची तस्करी पुन्हा सुरू करू देणं, हेच मोठं बेजबाबदारपणाचं गुन्हेगारी कृत्य होतं. त्यानंतर ही साथ सर्वत्र पसरली तेव्हा चीनने स्वतःच्याच डॉक्टरांना शिक्षा केली होती, ज्या डॉक्टरांनी धोक्याची सूचना आधीच दिली होती आणि चीनने इतर जगापासून ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट काही आठवडे लपवून ठेवली.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कुछ वायरस अच्छे होते है!

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

एकविसावं शतक चीनचं असणार?

चीनमधील राजकीय व्यक्ती आणि विद्वानांचं असं बाहेर येणं हेच दाखवतं की, या साथीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या देशाच्या सामाजिक स्थानावर परिणाम होऊ शकतो, याविषयी ते चिंतीत आहेत. गेली काही दशकं चिनी प्रस्थापित व्यवस्थेनं जागतिक व्यवहारांतलं स्वतःचं वाढतं महत्त्व गृहीत धरलं होतं. संरक्षणाबाबतीतील प्रगती आणि तंत्रज्ञानातील कार्यक्षमता याबरोबरीने चीनने साधलेली नेत्रदीपक आर्थिक प्रगती यांनी राजकीय नेतृत्वाला आत्मविश्वासाची वाढती जाणीव दिलीय.

स्वतःच्या संस्कृतीच्या पुरातन असण्याविषयीचा अभिमान हा नेहमीच चिनी मूल्यांच्या मध्यवर्ती राहिलाय. आता आर्थिक समृद्धी आणि लष्करी कौशल्य यांना जोडणाऱ्या बंधाने ‘जगाला कह्यात ठेवण्याचा आणि आकार देण्याचा’ विश्वास त्यांच्या स्पष्ट विधिलिखितामधे बळकट केलाय.

जागतिक महानतेच्या या अपेक्षेचं स्वतः चिनी नसलेल्या अनेक लेखकांनीही समर्थन केलंय. मोठ्या प्रमाणावर असं घोषित केलं गेलं की, एकोणिसाव्या शतकाने ग्रेट ब्रिटनला जागतिक महासत्तेच्या रूपात पाहिलं. विसाव्या शतकाने त्याच भूमिकेत अमेरिकेला अनुभवलं, तसं आता एकविसाव्या शतकात ही जबाबदारी चीनकडे म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हस्तांतरित होईल.

ब्रिटीश, अमेरिकी आणि चिनी संस्कृतीतला फरक

सध्याच्या या साथीच्याही बरंच आधीपासून मी या दाव्यांविषयी साशंक होतो. पृथ्वीवरील सर्वाधिक प्रभावशाली देश म्हणून चीन सहजासहजी अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन यांच्यावर मात करेल असं मला वाटत नव्हतं. याचं कारण असं की, सर्व प्रकारची आर्थिक प्रगती आणि लष्करी ताकद लक्षात घेऊनही चिनी संस्कृती ही चीनबाहेर तितकीशी आकर्षक नव्हती, जितकी ब्रिटिश संस्कृती एकेकाळी ब्रिटनबाहेर होती किंवा अमेरिकन संस्कृती अमेरिकेबाहेर अजूनही आहे.

हार्वर्डमधील विद्वान जोसेफ नाय यांच्या शब्दांत सांगायचं तर, जागतिक व्यवहारांवर वर्चस्व राखू शकणारी ‘हार्ड पॉवर’ चीन असेलही; पण त्यासाठीची ‘सॉफ्ट पॉवर’ चीनपाशी नाही. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनने जगावर जय मिळवला तेव्हा त्यांनी स्वतःसोबत शेक्सपियर, डिकन्स यांचं साहित्य तसंच क्रिकेट, टेनिस, फुटबॉल आणि इतरही बरंच काही आणलं. विसाव्या शतकात अमेरिकेनं जगावर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी स्वतःसह हॉलिवूड, जॅझ, निळी जीन्स, तसंच फॉकनर आणि हेमिंग्वे, इतरही अनेकांच्या कादंबऱ्या आणल्या.

जगातील महानतम संस्कृतींपैकी एक असण्याची अभिमानस्पद बाब चीनजवळही नक्कीच आहे. मात्र ज्या व्यक्तीने कम्युनिस्ट चीन घडवला, त्या माओ झेडाँगने इतिहासातली कला, स्थापत्य आणि साहित्य रानटीपणे नाकारले. त्यांचे पुसटसे अवशेषही संपूर्णतया पुसून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला. या बाबतीत तो त्याच्या दुसऱ्या म्हणजे सोविएत टोकाहून पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी स्वतःचा श्रीमंत रशियन वारसा सांस्कृतिक निर्यातीच्या स्वतःच्या डावपेचाचा भाग बनवण्याचा सक्रिय प्रयत्न केला.

१९५० आणि १९६० मधे जागतिक प्रभावस्थानासाठी सोविएत युनियनने अमेरिकेशी निकराची झुंज दिली, तेव्हा त्यांनी आपल्यावतीने महान रशियन संगीतकार आणि कम्युनिस्टपूर्व काळातले महान रशियन कादंबरीकार यांना आमंत्रण दिलं.

हेही वाचाः मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

चीन जगाला काय देऊ शकतं?

ब्रिटिश, अमेरिकन आणि रशियनांनी आशिया आणि आफ्रिकेत आपली राजकीय पदचिन्हं वाढवण्याचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यांच्या संबंधाने त्यांची भेट भीती आणि असुरक्षिततेशी झाली. परंतु त्यांच्याकडे असणाऱ्या आकर्षक सांस्कृतिक उत्पादनांमुळे त्यांची भेट ममत्वाच्या आणि प्रेमाच्या भावनेशीही झाली. त्यांचे खेळ, त्यांची पुस्तकं, त्यांचं संगीत आणि त्यांचे सिनेमे या सगळ्या गोष्टींनी इतर देशातल्या व्यक्तींना त्यांच्या प्रभावक्षेत्रात खेचले.

मागील महासत्तांनी अर्पण केलेलं जे विशाल सांस्कृतिक देणं आहे, त्याच्याशी तुलना करता चीनकडे जगाला देण्यासारखे जे काही आहे, ते म्हणजे त्यांच्या पाककृती. आणि हे त्यांच्या वर्चस्ववादी आणि धाकदपटशाहीच्या मार्गांशी जुळवून घेण्यासाठी नक्कीच पुरेसं नाही. दुसरीकडे, ब्रिटन आणि अमेरिकेचा जागतिक प्रभाव टिकून राहिला, याचं कारण त्यांचं राजकीय वर्चस्व हे सांस्कृतिक धुरीणत्वासह होतं. विएतनाम आणि इराक इथल्या अमेरिकन धोरणांना विरोध करतानाही आम्ही जीन्स घालत होतो. कोकाकोला पीत होतो. रॉक संगीत ऐकत होतो. क्लाईन इस्टरवूड आणि मेरियल स्ट्रीपचे सिनेमे बघत होतो. अमेरिकेच्या संस्कृतीतलं सौंदर्य आणि वैविध्य यांचा गौरव करतानाच अमेरिकन राज्यव्यवस्थेचा तिरस्कार आम्ही करू शकतो.

तुलनात्मकदृष्ट्या सातासमुद्रापार हृदयं आणि मनं जिंकण्यासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या शोधामधे ‘सॉफ्ट पॉवरची’ असणारी तौलनिक उणीव चीनला गंभीररीत्या नुकसानीची ठरणार आहे. कोविड-१९ विषयी कुणाला माहिती असण्याच्या पूर्वींही हे ठीक होतं आणि ही साथ उलटल्यानंतरही ते तसंच असणार आहे. चिनी आपल्या सीमेनजीकच्या भागांत सध्या गोंधळ माजवत नसले, तरीही ‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. अगदी आशियाच्या आणि आफ्रिकेच्या इतर भागांतील लोकांनाही.

चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.

हेही वाचाः 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

(रामचंद्र गुहा हे ज्येष्ठ इतिहासकार असून त्यांचा हा मूळ लेख साप्ताहिक साधनाच्या ६ जून २०२० या अंकात आलाय. सुहास पाटील यांनी या लेखाचा अनुवाद केलाय.)