या तीन लेखिका जग गाजवत आहेत

१८ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


सर्वच क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी दिसते. तशी ती साहित्य क्षेत्रातही होती. ‘होती’ कारण आता ज्याप्रकारे महिला साहित्यिक पुढे येतायत. त्यावरुन नक्कीच हे क्षेत्र महिला गाजवणार. सध्या ओल्गा टोकार्झुक, मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो या तीन लेखिकांनी बूकर आणि नोबेल पारितोषिक मिळवून गाजवलं. आपण त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्यायला हव्या.

‘मुलगी शिकली प्रगती झाली’ हे वाक्य आपण रिक्षाच्या मागे लिहिलेलं खूपदा बघितलं. हे वाक्य अगदी जगभरात तंतोतंत खरं होतानाही आपण बघतोय. महिला वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करतायत. यावर्षी तर साहित्य क्षेत्र अक्षरश: महिलांनी गाजवलंय. मार्गारेट अटवुड, बर्नार्डिन इवरिस्टो यांना बूकर आणि ओल्गा टोकार्झुक यांना साहित्यातलं नोबेल असे सर्वोच्च पुरस्कार जाहीर झालेत.

ओल्गा टोकार्झुक यांची थ्रिलिंग पुस्तकं

ओल्गा टोकार्झुक या पोलंड देशातल्या. तिथेच २९ जानेवारी १९६२ ला त्यांचा जन्म झाला. त्या सुरवातीपासूनच डाव्या विचारांच्या, फेमिनिस्ट आणि शाकाहारी आहेत. त्यांचं शिक्षण वॉरसॉ युनिवर्सिटीत झालं. त्या ट्रेंड सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांचं साहित्यात करिअर सुरू होण्यापूर्वी त्या काही काळ थेरेपिस्ट म्हणून काम करत होत्या. या क्षेत्रातले स्विस सायकॉलॉजिस्ट कार्ल जंग हे ओल्गा यांच्यासाठी गुरूस्थानी होते.

ओल्गा यांचं पहिलं पुस्तक १९८९ ला आलं. तो ‘सिटीज इन मिरर’ नावाचा कवितासंग्रह होता. त्यांनी जवळपास सर्वच पुस्तकं पोलंडच्या भाषेत म्हणजेच पोलिशमधे लिहिली. साहित्य क्षेत्रात त्यांची सुरवात कवितासंग्रहाने झाली असली तरी त्या कादंबरीकार म्हणूनच फेमस आहेत.

त्यांच्या लेखनात पौराणिक गोष्टी नेहमी येतात. त्या कथेतल्या पात्रांमधे जीवनातले वेगवेगळे रंग आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांची पात्र इतकी स्ट्राँग असतात की महाराष्ट्रात बसून वाचणाऱ्यालासुद्धा ती आपलीशी वाटतात. त्या लेखनात स्थानिक भाषांचाही वापर करतात. त्या अगदी सहज सोप्पं लिहितात. आणि मुख्य म्हणजे पुस्तकातल्या आशयाची विशिष्ट प्रकारे मांडणी केल्यामुळे वाचताना थ्रिल वाटतं, असं इंग्लंडमधल्या द गार्डियन या वर्तमानपत्राच्या बातमीत लिहिलंय.

ओल्गा यांच्या बऱ्याचशा पुस्तकांपैकी बेस्ट सेलर ठरलेली पुस्तकं म्हणजे ‘हाऊस ऑफ डे, हाऊस ऑफ नाईट’, ‘ड्राईव युअर प्लो ओवर द बोन्स ऑफ डेड’, ‘प्रायमेवल अँड अदर टाइम्स’ आणि ‘फ्लाईट्स’ इत्यादी पुस्तकांसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत.

त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधले तीन महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे २००८ ला मिळालेला निके लिटररी पुरस्कार. हा पोलंडमधला सगळ्यात मोठा आणि मानाचा साहित्यातला पुरस्कार. त्यानंतर २०१८ ला बूकर पुरस्कार मिळाला. आणि जगातला सगळ्यात मोठा नोबेल पुरस्कार. जो आहे तर २०१८ चाच पण २०१९ च्या सोहळ्यात मिळेल.

आज ओल्गा टोकार्झुक संपूर्ण जगात विचारवंत, अॅक्टिविस्ट आणि लेखिका म्हणून ओळखल्या जातात.

हेही वाचा: जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

पुरुषांबद्दल लिहिणाऱ्या फेमिनिस्ट मार्गारेट अटवुड

मार्गारेट अटवुड कॅनडातल्या. त्या कवयित्री, कादंबरीकार, साहित्य समीक्षक, निबंध लेखिका, शिक्षिका आणि पर्यावरणवादी आहेत. नुकतंच त्यांना साहित्यातला सगळ्यात मोठा बूकर पुरस्कार जाहीर झाला.

मार्गारेट यांचा जन्म कॅनडात १८ नोव्हेंबर १९३९ ला झाला. त्यांनी इंग्रजी भाषेत एमएची पदवी घेतली. द इंग्लिश मेटाफिजिकल रोमॅन्स या विषयावर संशोधन करत होत्या. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही.

त्या १६ वर्षांच्या असल्यापासून कविता आणि लेख लिहू लागल्या. कॉलेजच्या अंकांमधे त्यांचं लेखन प्रकाशित व्हायचं. साहित्य क्षेत्रात करिअर होण्यापूर्वी त्या युनिवर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियामधे प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. त्यांचं लेखन, कविता सतत कुठे ना कुठे प्रकाशित होत होतं. पण लग्नानंतरच त्यांनी साहित्यक्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं.

लग्नानंतरच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९६९ ला मार्गारेट यांची पहिली कादंबरी ‘द एडिबल वुमन’ आली. आणि त्यानंतर त्यांना उंच भरारी घेण्यापासून कोणीच थांबवू शकलं नाही. आतापर्यंत त्यांच्या नावावर १७ कवितासंग्रह, १६ कादंबऱ्या, १० नॉन फिक्शन पुस्तकं, ८ लघुकथा संग्रह, ८ लहान मुलांची पुस्तकं, १ चित्र कादंबरी इत्यादी साहित्य खजिना आहे.

त्यांचे ‘द हँडमेडस टेल’ हे पुस्तक १९८५ मधलं पुस्तक खूप गाजलं. पुढे त्या पुस्तकावरुन टीवी शोसुद्धा आला. त्यांच्या साहित्यातल्या कामाला २७ पुरस्कार मिळालेत. त्यांच्या साहित्याबद्दलची सर्व सविस्तर माहिती त्यांच्या मार्गारेट अटवुड या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मार्गारेट यांच्या पुस्तकांत समांतर घटना आणि प्रतीकात्मकता वाचताना जाणवते. त्या फेमिनिस्ट आहेत. आणि महिलांवर लिहितात हे खरं असलं तरी त्या पुरुषांना कधीच विसरत नाहीत. समाजातल्या पुरुषांबद्दलही त्यांनी लिहिलं.

मार्गारेट त्यांच्या लेखनात ‘गॉथिक’पण आहे. आपल्याला गॉथिक शिल्पकला माहितीय. कारण मुंबईतल्या बऱ्याच वास्तु त्या पद्धतीच्या आहेत. पण इथे गॉथिक म्हणजे समाजाचं वास्तव आणि समाजातल्या लोकांच्या जगण्याविषयी केलेली मांडणी. यामुळेच त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाल्याचं रॉबर्ट पिन्सकी यांनी लिहिलं. ते साहित्य समीक्षक आहेत. आणि त्यांनी किबीन वेबसाईटच्या लेखात हे लिहिलं.

हेही वाचा: #NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

बर्नार्डिन इवरिस्टोंचा फिक्शन लेखनात हातखंडा

यावर्षी आणखी एका महिला साहित्यिकाला बूकर पुरस्कार जाहीर झाला. त्या म्हणजे इंग्लंडच्या कादंबरीकार, कवयित्री, नाट्यलेखक, समीक्षक आणि शिक्षिका बर्नार्डिन इवरिस्टो. त्यांचा जन्म १९५९ ला लंडनमधे झाला. त्यांना एकूण ७ भावंडं आणि त्यात त्या चौथ्या. त्यांची आई ब्रिटीश होती. आणि आईकडून त्यांना ब्रिटीश, आयरीश आणि जर्मन वारसा मिळाला. तर वडील नायजेरीयन. आणि वडलांकडून त्यांना नायजेरीयन आणि ब्राझिलियन वारसा मिळाला.

बर्नार्डिन यांनी गोल्डस्मिथ युनिवर्सिटी ऑफ लंडनमधून क्रिएटीव रायटींगमधे पीएचडी मिळवली. त्या कॉलेजमधे असताना थिएटरमधे काम करत होत्या. सध्या त्या बर्नेल युनिवर्सिटी ऑफ लंडनमधे क्रिएटीव रायटींगच्या प्रोफेसर म्हणून काम करतात. तसंच त्यांनी इंग्लंडमधली पहिली ‘ब्लॅक वुमन थिएटर’ कंपनी सुरू केली.

आतापर्यंत त्यांच्या नावावर आठ पुस्तकं आहेत. त्याव्यतिरीक्त नाट्य सेखन, नभोवाणी लेखन, निबंध, साहित्य समीक्षा, रेडिओ स्क्रिप्ट लेखन केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांनी १५ पुरस्कार मिळालेत. १९९४ मधे त्यांचं पहिलं पुस्तक ‘आयलँड ऑफ अब्राहम’ आलं. त्याचं २००१ मधे आलेलं ‘द एम्परर्स बेब’ आणि २०१० मधे आलेलं ‘हॅलो मम’ या पुस्तकावरुन बीबीसी रेडिओवर कार्यक्रम करण्यात आले. सध्या त्यांचं गाजत असलेलं आणि बेस्ट सेलर यादीतलं पुस्तक म्हणजे ‘गर्ल, वुमन, अदर’

बर्नार्डिन यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे त्यांनी लहानपणी जे पाहिलं त्याचे संदर्भ त्यांच्या लेखनात दिसतात. तसंच त्या थिएटरशी निगडीत असल्यामुळे त्यांच्या पुस्तकात कॅरेक्टरायझेशन खूप चांगलं असतं. त्यांचं पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. आपण त्या गोष्टीत खूप सहज गुंतून जातो. फिक्शन हा त्यांचा हातकंडा आहे, असं ब्रिटीश लिट्रेचर काऊंसिलच्या वेबसाईटवर लिहिलंय.

हेही वाचा: 

भीम परतून आल्यासारखं वाटतंय!

आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

स्त्रीवादी कामिनी रॉय यांच्या डूडलमधून गुगलला काय सांगायचंय?

नोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो?