स्टॉकहोम सिंड्रोमची पन्नाशी आणि आपण!

२३ ऑगस्ट २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


पन्नास वर्षापूर्वीचा दिवस. २३ ऑगस्ट १९७३. स्टॉकहोममधील बँकेवर दरोडा पडतो. दरोडेखोर चौघांना ओलीस ठेवतो. सहा दिवस चाललेल्या थरारनाट्यानंतर अखेर पोलीस दरोडेखोराला पकडतात, पण… खरा ट्विस्ट इथंच आहे. त्या ओलीस ठेवलेल्यांना त्या दरोडेखोराबद्दल आत्मियता वाटू लागते. ते त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या वागण्याला मानसशास्त्रात स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव मिळालं, ते अजरामर झालं.

मन म्हणजे काय? याचं कोणतंही उत्तर चुकीचं असूच शकत नाही, असं अनेक मोठमोठ्या मानसोपचारतज्ज्ञांचं मत आहे. कारण मन म्हणजे काय? याच्या आजवर शेकडो व्याख्या करून झाल्यात. त्यावर हजारो पुस्तकं लिहिली गेलीत. त्यावर लाखो प्रयोग झालेत. तरीही माणसाचं मन पूर्णपणे कळलंय, असा दावा कुणीच करू शकत नाही.

माणसाच्या मनाच्या अशाच एका अवस्थेला नाव मिळालंय 'स्टॉकहोम सिंड्रोम'. मानसशास्त्रातील सर्वात चर्चिला गेलेला हा सिंड्रोम असंही म्हणता येईल. आजवर अनेक कादंबऱ्यांचा, सिनेमांचा, सिरिअल्सचा आणि वादविवादाचाही विषय झालेला असा हा मानसशास्त्रीय गुंता आहे. माणसाच्या मनाचा हा गुंता ज्या घटनेवरून ओळखला जाऊ लागला, त्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण झालीत. 

काय आहे स्टॉकहोम सिंड्रोम?

साधारणतः ज्या माणसाकडून आपल्याला त्रास होतो, त्या माणसाबद्दल आपल्याला राग येतो, त्याचं तोंड पाहावसं वाटत नाही. पण असं नेहमीच होत नाही. काहींच्या बाबतीत असं आढळतं, की त्या त्रास देणाऱ्या माणसाबद्दल आदर वाटू लागतो, त्या माणसाबद्दल आपुलकी वाटते, काहींच्या बाबतीत तर प्रेमभावनाही निर्माण होते.

आता हे अशक्य आहे असं काहींना वाटेलही. पण आपल्या आयुष्यातही अनेकदा, आपण जवळच्या व्यक्तिंकडून होणारा त्रास बिनबोभाट सहन करतोच की. कारण तेव्हा ते नातं आपल्याला त्या त्रासापेक्षा जास्त जवळचं वाटतं. याची आत्यंतिक पराकोटीची अवस्था म्हणजे स्टॉकहोम सिंड्रोम. ज्यात ज्या माणसानं आपलं अपहरण केलंय, आपला छळ केलाय त्या माणसाबद्दलच जवळीक वाटू लागते.

१९७३ मधे युरोपातील स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोममधे घडलेल्या घटनेने या मानसिक अवस्थेला, नाव दिलं स्टॉकहोम सिंड्रोम. या घटनेत ज्या दरोडेखोरानं बँक लुटण्याचा प्रयत्न केला, ज्यांना त्यानी ओलीस ठेवलं, त्याच्याबद्दलच त्या ओलीस ठेवणाऱ्यांना विश्वास वाटू लागला. हा विश्वास एवढा होता की, त्याला पोलिसांनी गोळ्या मारू नये म्हणून त्या दरोडेखोराला शरण येताना त्या ओलिसांनी त्याला मिठ्या मारून बाहेर आणलं.

काय होती ही दरोड्याची घटना?

ही घडला घडली स्वीडनमधील नॉर्मलमस्टोर्ग स्क्वेअर येथे. त्यामुळे या दरोड्याला नॉर्मलमस्टोर्ग रॉबरी असंही म्हणतात. सर्वात मुख्य म्हणजे थेट टेलिव्हिजनद्वारे कव्हर केलेली स्वीडनमधील ही पहिली गुन्हेगारी घटना होती. त्यामुळे जवळपास सहा दिवस सलग आणि नंतर कितीतरी महिने कोर्टामधील खटल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना लोकांनी प्रत्यक्ष पाहिली.

जॉन एरिक ओल्सन नावाच्या तुरुंगातून सुटीवर बाहेर असलेल्या गुन्हेगाराने क्रेडिटबँकेन बँकेवर दरोडा टाकला. या दरोड्यात त्यानं बँकेच्या सुरक्षा रक्षकाला जखमी केलं आणि बँकेतील चौघांना ओलीस ठेवलं. घटनास्थळी पोलीस पोहचले. पण ओलीस सुरक्षित राहावे म्हणून त्यांनी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला. यात दरोडेखोराने पोलिसांकडे आपल्या काही मागण्या मांडल्या.

या मागण्यांमघे त्याचा तुरुंगातील सहकारी क्लार्कला मुक्त करावं. तीस लाख स्वीडिश क्रोनर, दोन गाड्या, दोन बंदुका, बुलेट प्रूफ वेस्ट आणि बँकेतून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित रस्ता मागितला. ओलीस ठेवलेल्या लोकांमध्ये तीन महिला आणि एक पुरुष होता. त्यामुळे अपहरणकर्ता ओलिसांसोबत काहीतरी अनर्थ घडवेल असं सर्वांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात घडलं ते वेगळंच होतं.

दरोडेखोरानं त्या ओलिसांची काळजी घेतली

दरोडेखोर विरुद्ध पोलीस असा थ्रिलर प्रत्यक्षात आणि टीव्हीवर सुरू असताना, आत बँकेच्या सेफ्टी व्हॉल्टमधे भलतंच चाललं होतं. दरोडेखोर ओलीस ठेवलेल्यांची योग्यप्रकारे काळजी घेत होता. त्यातील एका महिलेला जेव्हा थंडी जाणवू लागली, तेव्हा त्यानं तिला जॅकेट दिलं. एक महिला घाबरली होती, तिला लहान मुलासारखं त्यानं शांत केलं. विश्वास वाटावा म्हणून, आपल्या बंदुकीतील एक गोळीही तिला भेट दिली.

तो प्रत्येकाची प्रेमानं विचारपूस करत काळजी घेत होता. त्यामुळे बाहेर पोलिसांसोबत वाटाघाटी सुरू असताना, आतमधे मात्र दरोेडेखोर आणि ओलीस यांची मैत्री झाली होती. सहवास माणसाबद्दलचं मत बदलतो, हे यातून अधोरेखित होत होतं. आता पोलीस बँकेत शिरले तर ते दरोडेखोराला ठार करतील, अशी भीती ओलिसांना वाटू लागली होती.

त्या ओलीसांपैकी एकाने तर थेट स्वीडनच्या पंतप्रधानांना फोन केला. त्यांना सांगितले की, आम्ही सुरक्षित आहोत. आमचा ओल्सनवर पूर्ण विश्वास आहे. या दरोडेखोराला सुरक्षित बाहेर जाऊ द्या. त्याच्यासोबत मी जायला तयार आहे. पण पोलिसांनी कारवाई केली, तर आमचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी काहीतरी आगळीक करू नये.

सहा दिवसानंतर थ्रिलर संपला, पण...

सहा दिवस चाललेल्या या थरारनाट्यात खूप काही घडलं होतं. पोलिसांनी बचाव म्हणून त्या दरोडेखोराच्या साथीदाराला तुरुंगातून सोडून बँकेत पाठवलं. पण बाकीच्या मागण्या नाकारल्या. असं करत करत शेवटी सहाव्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी बँकेत अश्रुधुरांच्या नळकांड्या टाकल्या. त्यानंतर तासाभरात दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केलं. 

पण या दरोड्यात ज्यांना ओलीस ठेवलं होतं, त्यांनी या दरोडेखोरांचा शेवटपर्यंत बचाव केला. यांनी आम्हाला कोणताही त्रास दिला नाही, त्यामुळे त्याला पोलिसांनी मारू नये, असं ते ओलीस असलेलेच सांगत होते. पुढे या दरोडेखोरांचा खटला लढण्यासाठी ओलिसांनीच पैसे जमवले, असाही एक संदर्भ सापडतो. तसंच नंतर ते त्यांना भेटण्यासाठी तुरुंगातही जात. काहींचे तर घरगुतीही संबंध तयार झाले.

मानसोपचारतज्ज्ञ निल्स बेजेरोट हे वाटाघाटी करणार्‍या टीमचे सदस्य होते. दरोडेखोर आणि ओलीस यांच्या वर्तनाचे विश्लेषण करणं, हे त्याचं काम होतं. त्यांनी या वर्तनाचा अभ्यास करून 'स्टॉकहोम सिंड्रोम' ही संज्ञा तयार केली. ही एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये अन्याय करणारा आणि ज्यावर अन्याय होतोय, ते एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जातात,  त्यांना परस्परांविषयी सहानुभूती  वाटते.

पुस्तक, सिनेमा आणि वेबसिरीजचा मसाला

या थरारनाट्यानंतर 'स्टॉकहोम सिंड्रोम' ही संकल्पना भन्नाट लोकप्रिय ठरली. त्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली.  डेव्हिड किंग यांचं ‘सिक्स डेज इन ऑगस्ट’ हे त्यातलंच एक गाजलेलं पुस्तक. यावर 'स्टॉकहोम' नावाचा सिनेमा आला.  एवढंच काय तर नेटफ्लिक्सवर गेल्या वर्षी 'क्लार्क' नावाची वेबसिरीजही आली. अशा अनेक कलाकृतींमधून हा दरोडा आणि हा सिंड्रोम मांडण्याचा प्रयत्न झाला.

या दरोड्याच्या थेट संदर्भात नसला, तरी या सिंड्रोमचा वापर करून हिंदीतही अनेक सिनेमे आले. इम्तियाज अलीचा 'हायवे' हा सिनेमा या सिंड्रोमवरच आधारलेला होता. त्यात वीराच्या भूमिकेत असलेली आलिया भटचं अपहरण होतं. त्या दरम्यान तो अपहरणकर्ता आणि वीरा यांच्यात नातं निर्माण होतं. प्रवासाच्या एका टप्प्यावर वीरा म्हणते की, 'जहां से तुम मुझे लाये हो, वहॉं मैं वापस नहीं जाना चाहती'. 

आपल्या आसपासही असं काही घडतं का?

हे सगळं काहींना विचित्र वाटलं, तरी हे घडू शकतं हेही नाकारता येत नाही. माणूस हे विचित्र रसायन आहे. त्यामुळे त्याच्या मनाचा थांग लागणं ही फार अवघड गोष्ट आहे. आपल्यावर अत्याचार होत असूनही सहन करणारी विवाहीत महिलाही, याच सिंड्रोमचा शिकार असतात, असेही काहींचे म्हणणे आहे. तसंच अनेक छळवादी राज्यकर्त्यांबद्दल किंवा बॉसबद्दलही अनेकांना हा सिंड्रोम जाणवतो, असाही एक दावा आहे.

अर्थात, या प्रत्येक वेळी हाच सिंड्रोम असेल हे सिद्ध करता येणं अवघड आहे. पण कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणं, त्यासाठी शरिराला तयार करणं हे माणसाचा मेंदूचं प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे टिकून राहण्यासाठी, प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी माणूस असं वागू शकतो. तसंच, प्रत्येक वाईटातही काहीतरी चांगलं असतंच, असाही त्याचा विश्वास असतो. 

या सगळ्यामुळेच माणसाच्या मनाची ही सगळी गुंतागुंत स्टॉकहोमच्या आधीपासून चालत आलेली प्रक्रिया आहे. गुहेत राहणाऱ्या माणसापासून मोबाईल वापरणाऱ्या माणसापर्यंत टिकून राहण्यासाठी मानवी मन अनेक गोष्टी करत राहतं. यापुढेही ही प्रक्रिया नवनव्या नावानं सुरू राहीलच. फक्त आपण जमेल तेवढी ती समजून घ्यायला हवी, एवढं नक्की.