किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?

२५ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय.

हिटलर, स्टॅलिन, बगदादी यांच्यासारख्या क्रुरकर्मा नेत्यांची आठवण करून देणारे उत्तर कोरियाचे ३६ वर्षांचे हुकूमशहा किम जोंग उन हे लहरीपणा, विक्षिप्तपणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या दुष्टपणाच्या खऱ्या खोट्या कथा न्यूजचॅनलमुळं भारतातली लहानसहान मुलंही चघळत असतात. मात्र आता हेच किम मरणाच्या दारात उभे असल्याची खबर आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथल्या डेली एनके या वेबसाईटनं दिलेल्या एका बातमीनुसार, किम जोंग उन यांची १२ एप्रिलला हर्ट सर्जरी झाली होती. पण त्यातून बाहेर पडण्याऐवजी त्यांची प्रकृती अजूनच खराब झालीय. त्यामुळं जगभरात उलटसुलट चर्चा सुरू झालीय. परवा डोनाल्ड ट्रम्प यांनाही पत्रकारांनी किम यांच्याबद्दल विचारलं. 

उत्तर कोरियाची निर्मिती

आत्ताच्या उत्तर आणि दक्षिण कोरियावर पूर्वी जपानची सत्ता होती. हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यावर जपाननं शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. जग अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्या नेतृत्वाखाली दोन विचारधारेत विभागलं गेलं. तसंच कोरियाही विभागला. कोरियाच्या उत्तर भागात सोविएतनं तर दक्षिण भागात अमेरिकेनं बस्तान मांडलं आणि शीतयुद्धाचा सर्वात पहिला संघर्ष सुरू झाला.

१९४८मधे किम इल संग यांनी म्हणजे किम जोंग उन यांच्या आजोबांनी सोविएत रशियाच्या मदतीनं कोरियाच्या उत्तर भागावर किम घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. १९५०मधे सोविएतच्या पाठिंब्यावर उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर दक्षिण कोरिया यांच्यात कोरियन युद्ध सुरू झालं.

तीन वर्षानंतर त्यांच्यात तडजोड झाली. या दोन देशांमधे २५० किलोमीटर लांब आणि ४ किलोमिटर रूंद डिमिलिटराईज्ड झोन जाहीर केला गेला. उत्तर कोरियानं साम्यवादी धोरणं स्वीकारून चीनच्या सहाय्यानं आपली वाटचाल सुरू ठेवली.

हेही वाचा : राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

किम घराण्यातली तिसरी पिढी

१९७०च्या काळात चीन-अमेरिका संवाद सुरू झाला. त्यामुळं उत्तर कोरिया सावध झाला. १९९१मधे सोविएत रशियाच्या पाडावानंतर उत्तर कोरियाभोवती जपान आणि दक्षिण कोरियात अमेरिकेचा लष्करी तळ कायम राहिला. त्यामुळं किम इल संग यानं उत्तर कोरियात अणवस्त्र निर्मीतीचा कार्यक्रम सुरू केला.

१९९४ला किम इल संग यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा किम जोंग इल सत्तेत आला. या किम जोंग यांना नीट बोलता येत नसे. म्हणून ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नसत. त्यांच्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला. दरम्यान उत्तर कोरियानं दोन अणवस्त्र चाचण्या घेतल्या. २०११मधे किम जोंग इल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून किम जोंग उन यांची निवड झाली.

किम जोंग उन यांचा प्रवास

किम जोंग उन यांचा जन्म ८ जानेवारी १९८३चा. पण त्यांच्या जन्मवर्षाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यांना एक मोठा भाऊ, एक लहान बहीण आणि तीन सावत्र भाऊ आहेत. किम यांना लहानपणापासूनच सत्तेसाठी तयार करण्यात येत होतं. त्यांच्या आठव्या वाढदिवसादिवशी त्यांना सैनिकी वेशभूषा घालून लष्कराच्या जनरलांनी सलामी दिली होती, असं सांगण्यात येतं.

किम यांनी आपली ओळख लपवून स्वित्झर्लंडमधे शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी उत्तर कोरियात परत येऊन लष्करी शिक्षण घेतलं. २०११ला किम जोंग उन हे वडलांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी बनले. पाश्चात्य जीवनशैली जगलेला, बाहेरचं जग पाहिलेला हुकूमशहा मिळाल्यानं आता उत्तर कोरियात काही बदल होतील, अशी अनेकांना आशा वाटत होती. पण सत्तेत येताक्षणी किमनं आपले संभाव्य स्पर्धक संपवायला सुरवात केली.

२०१३मधे त्यांनी आपले काका जँग साँग थाएक यांना सरळ गोळ्या घातल्या. नंतर त्याचं प्रेत कुत्र्यांना खायला टाकल्याच्या बातम्याही आल्या. ब्लुमबर्गच्या एका स्टोरीनुसार किम यांनी २०१७ला एका नर्व एजंट केमिकलच्या सहाय्यानं आपल्या सावत्र भावाची मलेशियाच्या एअरपोर्टवर हत्या घडवून आणली.

किम यांनी री सॉल जू या गायिकेशी लग्न केलं. त्यांच्यापासून त्यांना तीन मुलं असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. किम यांचं राहणीमान एकदम अलिशान आहे. त्यांच्या खाण्यावर आणि पिण्यावर मोठा खर्च करण्यात येतो. त्यांच्याकडे एकूण १७ राजवाडे, एक बेट, खासगी विमान आणि अगणित गाड्या असल्याचं सांगण्यात येतं.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

उत्तर कोरियातलं जीवन कसं आहे?

उत्तर कोरियाचं कागदोपत्री नाव हे डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया असं लांबलचक आहे. अडीच कोटी लोकसंख्या असणारा हा देश स्वत:ला लोकशाही म्हणवून घेतो. तिथं पाच वर्षातून एकदा निवडणूका होतात. पण एकच पक्ष आणि एकच उमेद्वार असतो. त्यामुळं त्यांनी स्वत:ला लोकशाही देश म्हणवून घेणं हास्यास्पद आहे. या देशात मानवी हक्क तर जवळपास नाहीतच. सत्तेविरोधात कुणी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर त्याची रवानगी सरळ तुरूंगात किंवा लेबर कँपमधे केली जाते. तिथून त्या माणसाची सुटका केवळ अशक्य आहे.

शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. पण शिक्षणात केवळ किम आणि त्याच्या पुर्वजांची गाथाच शिकवली जाते. तसंच कोरियात प्रवासही मोफत आहे. पण कुणाला कुठं जायचं असेल तर त्यासाठी आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते.

अणवस्त्र चाचणी घेतल्यानं अमेरिकेने उत्तर कोरियावर अनेक निर्बंध लादलेत. त्यामुळं या देशाच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर मर्यादा आहेत. देशाचा ८४ टक्के व्यापार हा एकट्या चीनसोबत होतो. देशाच्या धोरणांत लष्कराला सर्वोच्च प्राधान्य असल्यानं त्यांचा बहुतेक खर्च हा लष्करावरच होतो.

किम यांना देशात देवाचं स्थान आहे. त्यामुळं त्यांचेच फोटो आणि पुतळे सर्वत्र बघायला मिळतात. देशाच्या सीमा बंदिस्त असल्यानं आणि कुणालाच एंट्री नसल्यानं आतमधे काय चाललंय याची कोणतीच खबरबात जगाला नसते. अशी सगळी परिस्थीती असल्यानं उत्तर कोरिया जगातल्या सर्वाधिक गरीब देशांपैकी एक मानला जातो.

कोरोनाचे पेशंट कुठायत?

उत्तर कोरियात किम यांच्या हेअर स्टाईलची कुणीही कॉपी करू शकत नाही. त्यांच्यासारखी हेअरस्टाईल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसं केल्यास त्याला आपला जीव गमवावा लागतो. इथं पर्यटक येवू शकतात पण तिथला गाईड जेवढं दाखवेल तेवढंच त्यांना बघावं लागतं. सामान्य लोकांसाठी इंटरनेट बंद आहे. फक्त सरकारचेच टीवी चॅनेल दिसतात आणि तेच बघावे लागतात. एखाद्यानं गुन्हा केलाच तर त्याचे पालक, तो व्यक्ती स्वत: आणि त्याची मुलं अशा तीन पिढ्यांना शिक्षा दिली जाते.

किम यांच्या लहरीपणामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. आपल्या भाषणावर हळू टाळी वाजवली म्हणून किंवा मीटिंग चालू असताना डुलकी लागली म्हणून अनेक अधिकाऱ्यांना यमलोकी धाडण्यात आलंय. राजधानी प्योंगयांगमधे केवळ सरकारी अधिकारी आणि किमचे विश्वासू लोकच राहू शकतात आणि फक्त त्याच लोकांना खासगी वाहनं खरेदी करण्याची परवानगी आहे.

जगभरात कोरोनानं थैमान घातलं असताना चीनला खेटूनच असलेल्या उत्तर कोरियात मात्र कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नाही. किम यांनी अशा रूग्णांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले असल्याचं म्हटलं जातंय. किम यांनी मात्र हा आरोप फेटाळलाय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

जगाची डोकेदुखी

जगाचा विरोध असतानाही किमनं आपला अणवस्त्र कार्यक्रम रेटून नेला आणि अमेरिकेसह जगाची डोकेदुखी वाढली. उत्तर कोरिया हे एक बेजबाबदार अणवस्त्र राष्ट्र असल्यानं जगावर तिसऱ्या महायुद्धाची तलवार कायम टांगती आहे. २०१७मधे कोरियानं मध्यम दीर्घ पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल विकसित केली. तसंच हायड्रोजन बॉम्बची चाचणीही घेतल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं जगाची डोकेदुखी वाढलीय.

या अणवस्त्रांच्या जीवावर किम वेळोवेळी अमेरिका, दक्षिण कोरिया, जपानसह संपूर्ण जगाला वेठीला धरण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा धंदा चालवतात. देशांतल्या बहुतांश बातम्या अणवस्त्र चाचणी, मिसाईल लॉंच यासंदर्भातच असतात. म्हणूनच पाश्चात्य देश किम यांना न्यूक्लिअर ल्युनॅटीक, ओवरवेट मॅडमॅन अशी बिरूदं लावतात. डोनाल्ड ट्रंम्प यांनी किम यांना आत्मघातकी मिशनवर निघालेला रॉकेटमॅन असं संबोधलं होतं.

उत्तर कोरियाचे परराष्ट्र संबंध

उत्तर कोरियाचे चीनशी चांगले संबंध आहेत. उत्तर कोरिया हा चीनच्या हातातला बाहुला आहे, अशी टिंगल नेहमीच केली जाते. त्यामानानं कोरियाचे पाश्चात्य देशांशी असणारे संबंध फारसे चांगले नाहीत. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच युनोनं १९८८मधे उत्तर कोरियाचं नाव राज्य पुरूस्कृत दहशतवादी देशांच्या लिस्टमधे टाकलंय. तसंच अणवस्त्रांच्या चाचण्यांनंतर अनेकवेळा या देशावर निर्बंध लादलेत. त्यामुळं कोरियासोबत जगातल्या इतर देशांचे संबंध हे मर्यादीत आहेत. जे काही संबंध आहेत ते छुपे आहेत.

असं असलं तरी अलिकडच्या काळात या संबंधात काही प्रमाणात सुधारणा होतेय. एप्रिल २०१८मधे किम यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची दोन देशांतल्या डिमिलिटराईज्ड झोनजवळ भेट घेतली. ही भेट ऐतिहासिक मानली जाते. कारण कोरियन युद्धानंतर जवळपास ६५ वर्षानंतर उभय देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट होत होती. त्यानंतर दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलंपिकमधेही उत्तर कोरियाच्या संघानं भाग घेतला होता.

उत्तर कोरियाचे अमेरिकेसोबतचे संबंध हे अत्यंत टोकाचे होते. यात अलिकडं बदल होताना दिसतोय. जून २०१८मधे किम आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सिंगापूरमधे भेट झाली. त्यावेळी उत्तर कोरियानं आपला अणवस्त्र कार्यक्रम सोडून द्यावा. त्याबदल्यात त्यांच्यावरचे निर्बंध उठवले जातील या प्रस्तावावर चर्चा झाली. नंतर फेब्रुवारी २०१९ला या दोन देशांदरम्यान विएतनाममधे चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध किमान संवादाच्या पातळीवर आलेत हेही काही कमी नाही.

हेही वाचा : आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

किमच्या आजाराची बातमी फुटली कशी?

उत्तर कोरियातून एखादी बातमी बाहेर काढणं हे अशक्य समजलं जातं. सरकारी टीवी चॅनेल हा बातम्यांचा एकमेव स्त्रोत आहे. देशातल्या नरक यातनांना कंटाळून अनेक लोक चीन आणि दक्षिण कोरियात पळून जायचा प्रयत्न करतात. पण त्यात काही मोजक्या लोकांनाच यश मिळतं. अशापैकी काहींनी दक्षिण कोरियाच्या सेऊलमधे उत्तर कोरियासंबंधी माहिती देण्यासाठी ‘डेली एनके’ या नावानं वेबसाईट सुरू केली. त्यामुळेच उत्तर कोरियाच्या बातम्यांबाबत हा सोर्स अधिक खात्रीशीर समजला जातो.

याच डेली एनके वेबसाईटनं किम यांच्या ह्रदय शस्त्रक्रियेची बातमी दिलीय. सीएनएन या वृत्तवाहिनीनं अमेरिकन गुप्तचर विभागाचा हवाला देऊन या घडामोडीवर अमेरिका बारीक लक्ष ठेवून असल्याचं म्हटलंय. चीन आणि दक्षिण कोरियानं मात्रे हे वृत्त नाकारलंय.

उत्तर कोरियात १५ एप्रिल हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. उत्तर कोरियाचा संस्थापक आणि किमचा आजोबा किम इल संग याचा हा जन्मदिवस. हा दिवस एखाद्या सणाप्रमाणं साजरा केला जातो. आपल्यावर आपल्या वडलांपेक्षा जास्त आजोबांचा प्रभाव आहे, असं स्वतः किमसुद्धा सांगतात. म्हणूनच हा कार्यक्रम ते कधीच चुकवत नाहीत. पण यंदा पहिल्यांदाच ते या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. त्यामुळेच त्याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातम्यांना दुजोरा मिळतोय.

तर दुसरीकडे किम अधूनमधुन गायब होतात तसलाच हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. याआधीही २०१४मधे ते तब्बल चाळीस दिवस गायब होते.

आता पुढं काय?

किम यांची प्रकृत्ती खरंच गंभीर असेल किंवा ते कोमात गेले असतील तर त्यांचा उत्तराधिकारी निवडायची प्रक्रिया सुरू झाली असेल. किम यांच्या मोठ्या भावाला राजकारणात रस नाही. किम यांची लहान बहीण किम यो जंग ही वर्कर्स पार्टीत महत्त्वाच्या पदावर आहे. तिला राजकारणात आणि सॉफ्ट डिप्लोमॅसीत मोठा रस आहे. याआधीही ती किमसोबत अनेक कार्यक्रमात दिसलीय.

२०१८ मधे दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलंपिकमधे उत्तर कोरियाची टीम पहिल्यांचा सहभागी झाली होती. त्यावेळी देशाचं नेतृत्व किम यो जंग हिनं केलं होतं. ती देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किमच्या इमेज बिल्डिंगचं काम बघते. त्याअर्थी ती उत्तर कोरियातली दुसरी ताकदवान व्यक्ती आहे आणि कदाचित तीच उत्तराधिकारी असू शकते असा अनेकांचा कयास आहे. तसं झालं तर हुकूमशहा म्हणून एक महिला सत्तेवर येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

आपण ऑफिसमधे काम केल्यानंच आज वर्क फ्रॉम होम शक्यः सुंदर पिचाई

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी