चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

०४ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय.  आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वच पक्षांची वेगवेगळी प्रचाराची कॅम्पेन चालली. पण राज्यभर लक्षात राहिली ती एकच टॅगलाईन, `ए, लाव रे तो वीडियो.`

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात नव्हती. ना त्यांचा कुठे उमेदवार होता. तरीही राज ठाकरे या निवडणुकीतला सर्वाधिक चर्चेचा विषय बनले. त्यांच्या सभा गर्दीने तुडुंब भरल्या. नरेंद्र मोदींपासून प्रियंका गांधींपर्यंत कुणाचीही सभा किंवा रोड शो सुरू असेल, तर तो बंद करून मराठी न्यूज चॅनलवाल्यांनी राज ठाकरेंची सभा सुरू होण्याआधीच लाईव दाखवणं सुरू ठेवलं.

हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

वीडियोच्या शैलीमागेही बाळासाहेबांची प्रेरणा

न्यूज चॅनलवर पोसलेल्या आणि मोबाईलला सरावलेल्या पिढीला आवडेल अशी भाषणाची शैली राज ठाकरेंनी तयार केलीय. अर्थात त्यावरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आहेच. बाळासाहेब भाषण रंगात आलेलं असताना अचानक थांबायचे, हाक मारायचे, `म्हात्रे, दे रे ते कात्रण.` त्यांचे पीए म्हात्रे हातातली फाईल घेऊन धावत यायचे.

बाळासाहेब हातातलं कात्रण फडकवायचे, वाचून दाखवायचे. बोलता बोलता एखादी गोष्ट पुराव्यासह सिद्ध करण्याची ती स्टाईल होती. आज त्याचं मॉडर्न वर्जन राज ठाकरेंनी आणलंय. त्यामुळे भाजपची पळता भुई थोडी झाली.

गेली काही वर्ष राज्याच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या राज ठाकरेंना अचानक महत्त्व मिळालंय. काँग्रेसकडे राज्य पातळीवर ओळख असलेला एकही बरा वक्ता उरलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वक्तृत्व आहे, पण विश्वासार्हता नाही. त्यामुळे राज हेच यावेळेस विरोधकांचे सर्वात मोठे स्टार कॅम्पेनर होते. त्यामुळे ते देशभर चर्चेचा विषय बनले.

हेही वाचाः संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

पवारांची मुलाखत हा टर्निंग पॉईंट

राज ठाकरे म्हणताहेत की गेले सहा महिने त्यांची तयारी सुरू आहे. पण याची सुरवात गेल्यावर्षी फेब्रुवारीत झालीय, हे गुपित राहिलेलं नाही. पुण्यात जागतिक मराठी अकादमीच्या मंचावर राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली. तो राज ठाकरेंच्या राजकारणाचा नवा टर्निंग पॉईंट होता. पण त्यानंतरही त्यांना वाट पाहावी लागली. 

कारण तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड गर्दीच्या सभांसमोर चौकीदार चोर हैं म्हणत होते. पण अचानक त्यांचा स्वाभिमान गळपटला. त्यांनी शपथा मोडत भाजपसोबत युती केली. मोदीविरोधक म्हणून म्हणून सत्तेत राहूनही मिळवलेली स्पेस अचानक रिकामी झाली. ती भरून काढण्यासाठी राज ठाकरे तयारच होते.

कधी काळी ब्ल्यू प्रिंट बनवण्यासाठी अनिल शिदोरेंनी उभी केलेली महाराष्ट्र नवनिर्माण अकादमी मदतीला आली. शरद पवारांच्या भेटी सुरू होत्याच. व्यंगचित्रांमधून मोदी, शाह आणि उद्धव यांच्यावर यथेच्छ टीका केली. त्यात त्यांनी उत्तर भारतीयांचा मुंबईत मेळावा घेतला. हिंदीत भाषण केलं. आपला कट्टर मराठी बाणा सोडून संवादाची भाषा केली. तेव्हापासून जुने राज ठाकरे भाषणात दिसलेच नाहीत. ते जुनं सगळं सोडून लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय नीतिमत्ता, बेगडी राष्ट्रवाद अशा गोष्टींविषयी बोलू लागले.

हेही वाचाः राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत

भाजपचं गरज सरो, राज मरो

देश वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेवरून खेचा, हा त्यांच्या भाषणाचा मुख्य गाभा होता. विरोधी पक्षात असताना भाजपने शिवसेनेला डिवचण्यासाठी राज ठाकरेंचा वारंवार उपयोग केला होता. पण सत्ता मिळताच गरज सरो आणि राज मरो, असं म्हणत भाजपने त्यांना बाजुला टाकून दिलं. मनसेचे बहुसंख्य नेते गळाला लावले. त्यामुळे दुखावलेले राज आता त्याचं उट्ट सव्याज फेडताहेत.

राज्यभरातल्या लढती अटीतटीच्या होत आहेत. विशेषतः ग्रामीण मतदारांमधे सत्ताधाऱ्यांविषयी आक्रोश आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदारसंघात जिंकणाऱ्या उमेदवाराचं मताधिक्य काही हजारांमधे असण्याची शक्यता दाट आहे. अशा वेळेस मनसेची स्वतःची मतं आणि राज ठाकरेंनी फिरवलेली मतं ही बेरीज प्रभावी ठरू शकेल. अर्थात भाजपच्या परंपरागत मतांवर मोदींचं गारूड आजही आहे. पण कुंपणावरची विशेषतः तरुणांची मतं राज हलवू शकतात.

हुकूमशाहीविरुद्ध बोलण्याचा अधिकार आहे?

मोदी हिटलरसारखे लोकशाही संपवतील अशी भीती राज बोलून दाखवताहेत. गोबेल्सनीती समजावून सांगताहेत. हे चांगलं असलं तरी आपल्या देशाला काही काळासाठी हिटलरशाही हवीच, हे त्यांचं विधान काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय बनलं होतंच. हिटलरविषयी त्यांचं जुनं मत कायम आहे की आता त्यांच्यात खरोखर बदल झालाय, हे त्यांना कुणीतरी विचारायला हवंच.

राज ठाकरे यांचं स्वतःचं पक्षातलं वागणं हुकूमशाहीचंच होतं. फक्त १३ आमदार असतानाही त्यांची पत्रकार परिषदांतल्या गुर्मीचा फटका अनेकदा पत्रकारांना बसला. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडेंना त्यांनी दिलेली वागणूक हा अपवाद नव्हता. अशावेळेस २८२ खासदार जिंकलेल्या मोदींच्या गुर्मीविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का?

आजही त्यांच्या भाषणाची सरंजामी शैली कायम आहेच. ऐ लाव रे तो वीडियो, या वाक्यातही वीडियो लावणाऱ्याविषयीचा तुच्छताभावच आहे. प्रत्येक माणसाचा माणूस म्हणून सन्मान असतो. तो त्याला द्यायलाच हवा. ही नव्या युगाची भाषा राज स्वीकारायला तयार होतील का?

हेही वाचाः मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!

राज हिंदुत्ववादी आहेत की सेक्युलर?

राज ठाकरे शिवसेनेवर टीका करत होते तेव्हाही पुरोगामी कार्यकर्ते आणि विचारवंतांना त्यांच्याविषयी प्रेम उफाळून आलं होतंच. आता तर ते प्रेम पराकोटीला पोचलंय. पण ते करण्याआधी त्यांची मतं तपासून घ्यायला हवीत, याची गरज त्यांना वाटत नाही.

सावरकरांचा फोटो लावून पहिलं फेसबूक लाईव करणाऱ्या राज यांना अयोध्येत राममंदिर हवंय की नको? जातीवर आधारित आरक्षण नको ही त्यांची जुनी भूमिका बदललीय का? ते आज हिंदुत्ववादी आहेत की सेक्युलर? उत्तर भारतीय फेरीवाल्यांना मारहाण करण्याची कृती आतातरी त्यांना चुकीची वाटते का? त्यांना बाबासाहेब पुरंदरेंचे शिवाजी महाराज बरोबर वाटतात की गोविंद पानसरेंचे?

विशेषतः राज यांचा विरोध आहे तो मोदी- शाह या दुकलीला. तो फक्त त्या दोन माणसांना आहे की त्यांच्या पक्षाला आहे? मोदी आणि शाह हे फक्त चेहरेच आहेत. त्यांची विचारधारा राजना मान्य आहे की नाही? मोदींचं नेतृत्व तयार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी, त्यांच्या कामाविषयी आणि विचारांविषयी त्यांचं नेमकं मत काय?

या सगळ्यांची उत्तरं आल्यानंतर ज्यांना हवं त्यांनी राजना डोक्यावर घ्यायला हरकत नाही. नाहीतर फक्त भाजप शिवसेनेला हरवण्यासाठी पुरोगामी राज ठाकरेंचा वापर करत असतील, तर त्यांच्यात आणि भाजपमधे फरक तो काय उरला? राज ठाकरेंनीही कायम आपल्याला वापरू दिलंय. आधी शिवसेनेची मतं फोडण्यासाठी काँग्रेसने त्यांना वापरलं. नंतर भाजपने आणि आता भाजपविरोधक त्यांचा वापर निवडणुकीसाठी करून घेताहेत.

हा त्यांच्या राजकारणाचा एक भाग असेलही. त्यांना यातून पुढच्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईलही. पण दीर्घकालीन राजकारणासाठी त्यात काय हशील आहे? त्यांना आधी गावोगाव पसरून संघटन उभं करावं लागेल. त्याला पर्यायच नाही. नाहीतर अशा भाषणांनी चार दिवस टीवीवर लाईव होत राहील. सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनेल. सोबतचे खुशमस्करे अहंकार कुरवाळत बसतील. त्यानंतर काय होईल? पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या बातम्या पेपरांच्या पहिल्या पानांवरून मागच्या पानांवर जातील.

हेही वाचाः 

नक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही

शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना स्मृती दगा देतेय!

एक्झिट अंदाजः मुंबईसह चौथ्या टप्प्यावर राज्य कुणाचं?

इस्रायलला घडवणाऱ्या आयर्न लेडी गोल्डा मायर