बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणितातील संख्यावाचनात बदल करण्यात आलेत. या निर्णयामुळे एकच गदारोळ झालाय. यावर दोन्ही बाजूनं प्रतिक्रियाही उमटत आहेत. गणितीय पद्धत सुलभ करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तरीही या मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही.
गेल्या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात दोन विषयांवर सर्वात जास्त चर्चा झाली. पहिली भाषा संवर्धनाची आणि दुसरी म्हणजे गणित अधिक सोपं करण्याची. १९ जूनला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या गणितातील संख्यावाचनातील बदलाबाबत काही भाष्य केलं. ते करताना बावनकुळेऐवजी पन्नास दोन कुळे, फडणवीस ऐवजी फडण दोन शून्य, विसपुते ऐवजी वीस शून्य पुते असा उल्लेख केला.
त्यावर उत्तर देताना दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणित सुलभीकरणासाठी भाषा विषयातले काही सोपे दाखले दिले. उदा. शरद गवत आण, छगन कमळ बघ. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संदर्भात सभागृहात चर्चेला आलेला हा विषय जनमानसात चांगलात चर्चिला जातोय.
यंदा इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकामधे बदल करण्यात आलाय. २१ ते ९९ या संख्यांचं वाचन आणि शब्दांचं लेखन यात आहे. या संख्यांचं वाचन सत्तावीसऐवजी वीस सात असं दिलंय. सत्त्याण्णव ऐवजी नव्वद सात असं दिलंय. कारण या पद्धतीनं बरीचशी जोडाक्षरं गळतात. आणि यामुळे बोलणं आणि लिहिणं यांचा क्रम सारखा येतो.
उदाहरणार्थ पंचेचाळीसमधे आधी पाच आणि नंतर चाळीस येतात. पण ही संख्या ४५ अशी लिहिताना आधी चाळीसचा चार, नंतर पाच लिहिला जातो. शिवाय जोडाक्षरं असणारे शब्द उदाहरणार्थ अठ्ठ्याण्णव, त्र्याण्णव, सत्त्याऐंशी, त्रेसष्ठ इत्यादी पाठ करावे लागत नाहीत. पारंपरिक पद्धतीमधे दोन अंकी शिकणाऱ्याला डोळयासमोर एकूण ९० नावं लक्षात ठेवावी लागत होती. मात्र यामधे दशक पद्धतीतल्या २०, ३० ते ९० पर्यंत या आठ संख्या, संख्यानामं आणि १ ते १९ दरम्यानच्या संख्या आणि त्यांची नावंच लक्षात ठेवावी लागणार आहेत.
हेही वाचा: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे बिनपैशाच्या ओझ्याचं गाढव होणं
या पुस्तकात केलेला बदल खरं तर बदल म्हणता येणार नाही. केवळ विद्यार्थ्यांना गणित शिकणं सुलभ व्हावं म्हणून जुन्या पद्धती सोबत संख्यानाम अर्थात शाब्दिक संख्या वाचन देण्यात आलंय. ते लवकर अवगत व्हावं म्हणून जोडलेला किंवा पूरक असा हा भाग आहे. पुस्तकामधे शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांमधे तिसऱ्या क्रमांकाच्या ओळीत ‘या पद्धतीमधे बरीचशी जोडाक्षरं गळतात आणि बोलणं, लिहिणं यांचा क्रम सारखा राहतो.’ असं वाक्य दिलंय.
जोडाक्षरं गळतात या शब्दाचा विपर्यास भाषा पंडिताकडून करण्यात आलाय. त्यामुळे मराठी भाषा गणितामुळे धोक्यात आल्याचा कांगावा बऱ्याच भाषा प्रेमींनी केलाय. वास्तविक ज्या लोकांनी हा वाद निर्माण केला त्यांनी एक तर इयत्ता दुसरीचं गणित विषयाचं पुस्तक नीट बारकाईनं अभ्यासलं नाही किंवा त्यांचे कानावर आलेलं किंवा समाज माध्यमावरील वीडिओ बघून आपली मतं व्यक्त केल्याचं दिसतंय. जे प्रत्यक्षात मुलांवर ह्या पद्धतीने प्रयोग करून बघतात त्यांनी या बदलाचं स्वागतच केलंय.
हेही वाचा: नक्षलवाद संपवण्यासाठी आंध्रने केलं, ते महाराष्ट्राला जमलं नाही
आधी म्हटल्याप्रमाणं, ज्यांनी प्रत्यक्ष याबद्दल वाचलं नाही, प्रसारमाध्यमातून त्यांच्याच प्रतिक्रिया अधिक उमटलेल्या दिसतात. मात्र ज्यांनी प्रत्यक्ष हा बदल आपल्या मुलांसोबत अनुभवलाय, त्यांचं मत वेगळं आहे. त्याचं एक उदाहरण रायगडच्या पेन तालुक्यातल्या कारली जि. प. शाळेचं आहे. मोहन भोईर या प्राथमिक शिक्षकानं १९ जूनला आपल्या वर्गात एक गणितीय प्रयोग केला. शाळेमधे नव्यानंचं दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी १ ते १०० पर्यंत मणिमाळच्या माध्यमातन संख्या ओळखायला सांगितली.
मोहन, पूजा, अंकित, भाग्यश्री, समीर या पाच मुलांनी अगोदर परंपरागत पद्धतीनं मनी मोजले. यातली बरीचशी मुलं एकोणतीसपर्यंतची संख्या सहज ओळखू शकत होती. नंतर मात्र त्यांची गती मंदावत होती. यातल्या पूजाला तर तिचं गावाचं नाव पण नीट सांगता येत नव्हतं. मात्र नंतर मोहन भोईर या शिक्षकानं विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीबाबत अर्धा ते एक तास मार्गदर्शन केलं. पुन्हा त्यांना ती संख्या ओळखायला लावली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती न अडखळता सहज ओळखली.
दुसरं उदाहरण. अगदी अर्धवट शिक्षण घेतलेली आजीसुद्धा व्यवहार ज्ञानात ८२ ही संख्या ऐंशी दोन अशीच सांगते. तिनं तर या नवीन पद्धतीचे तांत्रिक धडेसुद्धा गिरवलेले नसतात.
हेही वाचा: मराठी टीवी सिरियलमधल्या मुली असं का वागतात?
दोन या संख्येसाठी बा, ब, बे आणि ब्या हे प्रकार आहेत. तीन या संख्यासाठी ते, तेहे, त्रे आणि त्र्या हे प्रकार आहेत. चारसाठी चो, चौ, चव्वे, चौ-या असे विविध संभ्रम निर्माण करणारे पर्याय उपलब्ध आहेत. एकोणसाठ म्हटलं तर ५९ लिहायचं की ६९ लिहायचं असं पण विचारणारे बहुसंख्य लोकं आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात अनुभवत असतो.
वास्तविक इयत्ता दुसरीच्या पुस्तकात करण्यात आलेला बदल यंदा जोडाक्षरांच्या निमित्ताने चर्चेत आला. हा बदल गेल्यावर्षीच्या इयत्ता पहिलीच्या पुस्तकांमधेही केला गेलाय. पान क्रमांक ४६, पान क्रमांक ४९ पासून ते ५९ पर्यंत हा बदल देण्यात आलाय. पुस्तकाच्या भाग दोनमधे पान क्र ४९ वर २१ ते ३० या संख्येची ओळख करून देताना दोन दशक एक एककासोबत, वीस एक आणि पुढे एकवीस असंही दिलेलं आहे.
त्यामुळे हा बदल होऊन एक वर्ष झालाय. शिवाय नवीन पद्धतीचा अवलंब करताना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करू नये असं कुठलंही विधान इयत्ता पहिली किंवा इयत्ता दुसरीच्या पुस्तकात केलेलं नाही.
ही पद्धती मूळ संस्कृत मधून घेण्यात आलीय. एरवी आपण लेखन डावीकडून नेहमी उजवीकडे लिहितो आणि वाचतो. पण संख्येतील अंक मात्र उलट दिशेने वाचावेत असा नियम मूळ संस्कृत विषयातून आलाय, असं गणित तज्ञांचं मत आहे. म्हणूनच ४५ ही संख्या आपण पंचेचाळीस अशी वाचतो. म्हणजे ५-४ असा अवलंबतो.
हेही वाचा: क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
शब्दांत संख्या लिहिताना विद्यार्थ्यांना नवीन पद्धत सोपी आहे हे अनुभवायला मिळतंय. इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलगु, मल्याळी, आणि तामिळ या दक्षिण भारतीय भाषांमधेही या पद्धतीनं संख्यावाचन केलं जातं. ते विद्यार्थ्यांना सोपंही जातंय. जोडाक्षरं असणारे अनेक शब्द हे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण होण्याचं एक कारण आहे. केवळ इंग्रजीत किंवा दक्षिण भाषांमधे आहे म्हणून नाही तर प्रत्यक्ष जसं लिहिलंय तसंच गणित मांडलं जावं म्हणून ही पद्धत स्वीकारलीय.
इंग्रजीत ट्वेन्टीफाईव म्हणतात त्यावेळी लेखन करताना आधी दोन नंतर पाच लिहिले जातात. असा सुसंगत क्रम दोन अंकी संख्यांसाठी मराठीत नाही. पंचवीसमधे बोलताना पाच आधी बोलतो पण लिहितांना दोन आधी लिहितो यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. गणितीय पद्धत सुलभ करण्यासाठीच ही पद्धत वापर करण्यात आल्याचं बालभारतीच्या गणित समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांनी स्पष्ट केलंय.
पारंपरिक पद्धतीनं संख्यावाचन शिकवू नये अशी सक्ती केलेली नाही. विद्यार्थ्यांना संख्याज्ञान सहज सोप्या पद्धतीनं व्हावं म्हणून ही दुसरी पद्धत दिलेली आहे. जुने शब्द काढून टाकलेले नाहीत. हा विषय केवळ गणित विषयापुरता मर्यादित असल्याचं विद्यापरिषदेचे संचालक डॉ. सुनीर मगर यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. गणित ही अमूर्त संकल्पना आहे. जे बोलतो ते मांडता आलं पाहिजे, जे मांडतो ते लिहिता आलं पाहिजे, असं झालं तर समजतं नाही. केवळ माहिती होते.
वेळ, पैसा, श्रम यांची बचत झाली पाहिजे. या विषयासंदर्भात सभागृहाचं एकमत झालं नाही तर तज्ञांची समिती गठीत करून योग्य निर्णय घेण्याचं सुतोवाच स्वत: मुख्यमंत्र्यांनी केलंय. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते सरकार काय निर्णय घेणार याकडे?
हेही वाचा: संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?
(लेखक हे शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक आहेत.)