लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण हाच लठ्ठपणा कोरोना वायरसलाही पोषक वातावरण निर्माण करू शकतो, असं संशोधनातून समोर आलंय. त्यामागची अनेक कारणंही समोर आलीयत. त्यामुळेच या कोरोना काळात लठ्ठ माणसांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काही साध्यासुध्या गोष्टी करू शकतो.
लठ्ठपणाचे तोटे तज्ञ, डॉक्टर्स वेळोवेळी सांगत असतात. लठ्ठपणा वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतो, हे तर जवळजवळ सगळ्यांना अगदी तोंडपाठ झालंय. वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या आरोग्य पुरवण्यांमधेही लठ्ठपणा कमी करण्याचे १०१ उपाय दिलेले असतात.
खरंतर, लठ्ठपणाबद्दल सरसकट बोलणं फार अवघड आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांची जाडी वाढत असते. काहींच्या बाबतीत ते आनुवंशिक असतं. तर काहींची कुठल्यातरी औषधांचा डोस थांबल्यामुळे अचानक जाडी वाढते. त्यामुळेच सगळ्या लठ्ठ माणसांना एकाच वर्गात बसवून कुठलाही सिद्धांत त्यांच्यावर सरसकट लादता येत नाही. तरीही, कोरोना वायरसबद्दल संशोधन करताना लठ्ठपणाचं असं सामान्यीकरण करावं लागतं. कारण, लठ्ठ लोकांना कोरोना वायरसचा धोका जास्त असतो, हे संशोधनातून सिद्ध झालंय.
हेही वाचा : कोरोनाः विटॅमिन डीची कमतरता वाढत्या मृत्यूदराला कारणीभूत आहे?
न्यूयॉर्कमधे केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आलीय. समजा, कोरोना वायरसची लागण झालेल्या ५ पेशंटना बाहेरून श्वास पुरवण्याची गरज पडत असेल तर त्यापैकी ३ पेशंट लठ्ठपणाने ग्रासले होते. तर फ्रान्समधल्या एका संशोधनात ९० टक्के लठ्ठ लोकांना यंत्राच्या सहाय्याने श्वास पुरवावा लागतो. तर लठ्ठ नसलेल्या ५० टक्के लोकांना वेंटिलेटरची गरज पडतेय.
बीबीसी इंग्लिशवर आलेल्या एका लेखात ब्रिटनमधल्या तीन महत्त्वाच्या संशोधनांचा निष्कर्ष दिलाय. पहिल्या संशोधनात १७ हजारापेक्षा जास्त लठ्ठ लोकांचा अभ्यास केला गेला. त्यापैकी ३० हून जास्त बॉडी मास इंडेक्स असणाऱ्यांचा मृत्यूदर सामान्य माणसापेक्षा ३३ टक्क्यांनी जास्त होता. दुसऱ्या आकडेवारीनुसार, कोरोना वायरसची लागण झालेल्या लठ्ठ पेशंटमधे इतर पेशंटपेक्षा दुप्पट मृत्यूदर दिसून येतो. तरी यात डायबेटिस, हृदयरोग असे आजार असणारे लठ्ठ पेशंट मोजले गेलेले नाहीत. त्यांची मोजणी केली तर हे प्रमाण अजून जास्त वाढेल.
तिसऱ्या संशोधनात ब्रिटनच्या आयसीयू विभागात भरती केलेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. तर त्यापैकी ३४.५ टक्के लोकांचं वजन जास्त होतं. ३१.५ लोक लठ्ठपणाने ग्रस्त होते. ७ टक्के लोक लठ्ठ होतेच वर त्यांना इतर आजारही होते. तर २६ टक्के लोकांचा बॉडी मास इंडेक्स अगदी नॉर्मल होता.
एखाद्या माणसाचं वजन जास्त असणं आणि लठ्ठ असणं यात फरक असतो. माणसाचं आदर्श वजन काय असावं हे ठरवताना त्याच्या उंचीचा आणि वयोगटाचा विचार केला जातो. यालाच बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय असं म्हटलं जातं.
सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या अमेरिकनं संस्थेनं मान्यता दिलेल्या मापदंडानुसार, एखाद्या माणसाचा बीएमआय १८.५पेक्षा कमी असेल तर तो माणूस कमी वजनाचा आहे असं म्हटलं जातं. १८.५ ते २४.९ इतका बीएमआय असणाऱ्या व्यक्तीचं वजन योग्य प्रमाणात असतं. २५ ते २९.९ बीएमआय असणाऱ्या व्यक्ती जास्त वजनाच्या असतात. तर ३० आणि त्यापेक्षा जास्त बीएमआय असणारी व्यक्ती लठ्ठ असते.
त्यामुळे आदर्श वजनापेक्षा जास्त वजन असलं तरी त्याचा अर्थ तो माणूस लठ्ठ असतो, असा होत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या २०१६ मधल्या एका अहवालानुसार, जगभरात १.९ बिलियन लोक जास्त वजनाची आहेत. त्यातली ६५० मिलियन म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोक लठ्ठपणानं ग्रस्त आहेत, असं डब्लूएचओचं म्हणणं आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचा:
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
‘कोरोना वायरसची लागण होणाऱ्यांपैकी सर्वाधिक टक्केवारी २५ पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्या पेशंटची आहे. बीएमआय जास्त असणं हे कोविड १९ हा आजार होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे, हीच गोष्ट अमेरिका, इटली आणि चीनमधे झालेल्या काही संशोधनातून सिद्ध होते,’ असं निरीक्षण वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने नोंदवलंय. इंग्रजीत लठ्ठपणाला ओबेसिटी असं म्हणतात.
लठ्ठ लोकांमधेच कोविड १९ची लक्षणं तीव्र स्वरूपात का दिसतात याची काही साधीसरळ, तर्कावर आधारलेली उत्तर देता येतील. द कन्वर्सेशन या वेबपोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, लठ्ठ लोकांना हृदयाविकार, हाय ब्ल प्रेशर, डायबेटीस असे आजार लगेचच धरतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हा लठ्ठपणा कोरोना वायरसला पोषक असतो.
दुसरं म्हणजे, लठ्ठ लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकूवत झालेली असते. वजन जास्त असणं म्हणजे एकप्रकारे शरीरावर दीर्घकाळ सूज असणं. याचा परिणाम असा होतो की या सुजविरोधात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सतत काम करत राहते. थांबतच नाही. मग एखादा गंभीर वायरस शरीरात येतो तेव्हा ही रोगप्रतिकारक शक्ती निटपणे काम करू शकत नाही. थोडक्यात, गाडी चालू ठेऊन दुकानात जायचं आणि इंधन जाळायचं. पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी इंधनाची खरंच गरज असते तेव्हा इंधन उरतच नाही.
लठ्ठपणा पोटाच्या घेरापाशी साठून राहिला असेल तर त्यामुळे फुफ्फुसांवरही ताण येतो. फुफ्फुसाचे पडदे मोठे होण्यात अडथळा आला की पुरेशी हवा म्हणजेच ऑक्सिजन फुफ्फुसात साठला जात नाही. त्यात कोरोना वायरस फुफ्फुसांवर हल्ला करून त्यांना अजून निकामी करतो. म्हणूनच लठ्ठ लोकांसाठी कोरोना जास्त धोकादायक आहे.
हेल्थलाईन या वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एन्डोक्रिनोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉक्टर कार्ल नॅडोलस्काय सांगतात, ‘लठ्ठ व्यक्तींच्या शरीरात चरबी साठून राहते. या अतिरिक्त चरबीमुळे ‘अँजिओटेन्सीन कन्वर्टींग इन्झायम २’ नावाचं एक प्रोटीन शरीरात जास्त प्रमाणात तयार होतं. हे प्रोटीन म्हणजेच ACE२ रिसेप्टर.’
हे रिसेप्टर श्वसनसंस्था आणि जठर आतड्यात जास्त प्रमाणात असतं. आपल्या शरीरात प्रवेश केल्यावर स्वतःची पिल्लं काढण्यासाठी कोरोना वायरसला एका पेशीची आवश्यकता असते. त्या पेशीत शिरायला त्याला हे एसीई२ रिसेप्टर उपयोगी पडतात. लठ्ठ माणसांकडे हे रिसेप्टर जास्त असतात म्हणूनच कोरोना वायरसची ऐश असते.
आधीच एसीई२ रिसेप्टर जास्त. त्यात वर सांगितल्याप्रमाणे डायबेटिस, ब्लड प्रेशर असे एकापेक्षा जास्त आजार असतील तर परिस्थिती फारच गंभीर होते, असं नॅडोलस्काय यांनी सांगितलंय. चीनमधे जमा झालेल्या डाटावरूनही हेच दिसून येतं, असं ते म्हणतात.
हेही वाचा : कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का
आता असं काही होतं म्हणून वजन जास्त असणाऱ्यांनी लगेच डायट, व्यायाम करून एका दिवसांत किंवा ७ दिवसांत सगळं वजन कमी करण्याचे उपाय करायचे, असा अतिरेक करणं बरोबर नाही. सगळ्यात आधी आपल्याला कोरोना वायरसची लागण होणार नाही याची काळजी घ्यायचीय. त्यासाठी वारंवार हात धुणं, फिजिकल डिस्टसिंग पाळणं हे काटेकोरपणे करायला हवं.
शिवाय, तारुण्यात असणाऱ्या लठ्ठ माणसांनी फारशी काळजी करायचं कारण नाही, असंही नॅडोलस्काय यांनी म्हटलंय. मेटॅबोलिझम म्हणजे पचन करण्याची क्षमता चांगली असलेल्या आणि नियमितपणे व्यायाम चालू असलेल्या तरूणांना कमी धोका आहे. तरीही इतरांप्रमाणे त्यांनीही फिजिकल डिस्टसिंगचे सगळे नियम पाळायला हवेत.
शिवाय जग लॉकडाऊन झाल्यामुळे एक आयती संधी आपल्याकडे चालून आलीय, असा विचार करून घरच्या घरी काही व्यायाम चालू करावेत. त्यासाठी सध्या इंटरनेटवरच्या वीडियोचा वापर करता येईल. आपल्या जीवनशैलीतही बदल करण्याची ही चांगली संधी असू शकते. फळं, भाज्या, धान्य अशा प्रोटीन देणाऱ्या गोष्टी खाव्यात. टेन्शन न घेता फिजिकल डिस्टसिंग पाळून लठ्ठ माणसंही कोरोना वायरसपासून वाचू शकतील. किंबहुना त्याचा वापर करून आपल्या लठ्ठपणापासून कायमची सुटका मिळवू शकतील.
हेही वाचा :
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?
अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा,
कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट
कोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती?
अमेरिकेत लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्पचा पाठिंबा का?
पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज