आज जागतिक पर्यावरण दिन. एकीकडे विकासाचं राजकारण सुरुय तर दुसरीकडे त्यातून निर्माण झालेले प्रश्नही आहेत. या दोन्हींमधे एक मध्यम मार्ग गरजेचा आहे. पायाभूत सुविधांची उभारणी करत असताना पर्यावरणाचा समतोलही राखणं आज कधी नव्हे तेवढं गरजेचं बनलंय.
चला, सर्वप्रथम आपण एक गोष्ट मान्य करुन टाकू, मुंबईसारख्या शहरांमधे पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणाला धक्का लागणारच. अर्थात, असा विषय कधीही न संपणारा वाद निर्माण करील आणि कुठलंही उत्तर न मिळता मुंबईचं अतोनात नुकसान होईल हेही तितकंच खरं.
मुंबई आगळीवेगळी आहे. साहजिकच, मुंबईला पायाभूत सुविधासुद्धा आगळ्या वेगळ्याच मिळायला हव्यात. त्याचबरोबर मुंबईचं पर्यावरणसुद्धा जपणं आवश्यक आहे. परंतु एक प्रशासक म्हणुन मी कशाला महत्व द्यायचं? पर्यावरणाला की अतिगर्दीमुळे उपनगरीय रेल्वेवर रोज नाहक जीव गमावणाऱ्या जीवांना? राज्य सरकारने अर्थातच २७५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला प्राधान्य द्यायचं ठरवलंय.
मेट्रो प्रकल्प पर्यावरणपूरक आहे आणि पर्यावरणाला फारसं धोक्यात न आणता मुंबईकरांचा प्रवाससुद्धा सुखकर करु शकणारा आहे.
हेही वाचाः युरोपात धावणारी ट्राम पुन्हा मुंबईची लाईफलाईन होईल?
पर्यावरणाचं काहीसं नुकसान होईल हे मीसुद्धा मान्य करतो पण ते भरुन काढण्यासाठी पुरेसे नियम, निर्बंध आणि अनिवार्य तरतुदीदेखील आहेत हे विसरता येणार नाही. मेट्रो प्रणालीमधे री-जनरेटीव ब्रेकिंगचा उपयोग होत असल्यामुळे ३० टक्के ऊर्जेची बचत होणार आहे. शिवाय या प्रकल्पात पर्यावरण नियंत्रण पद्धतींचासुद्धा वापर करण्यात येतो.
त्याचबरोबर इंडियन ग्रीन बिल्डींग काऊन्सिलच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जाते. यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान कमी प्रमाणात होतं. तसंच, मेट्रोसाठी कुठल्याही प्रकारचं जिवाश्म इंधन वापरलं जात नसल्यानं प्रदुषणात भर पडत नाही. म्हणूनच, पर्यावरणवादी आणि काही एनजीओंनी कितीही आकांडतांडव केले तरी मेट्रो प्रकल्पामुळे येणाऱ्या वर्षामधे अनेकानेक जीव वाचणार आहेत आणि पर्यावरणाचीही जोपासना होणार आहे हे मी ठामपणे म्हणू शकतो.
प्रगती आणि विकासाची जगाला गरज आहे. त्यामुळे एकूण समाजाची वाढ होत असते. समाजाचं जीवनमान बदलत यासाठी पायाभूत सोयी निर्माण करणं आवश्यक आहे. प्रो.जेरी नथान्सन न्यू जर्सी येथील क्रानफर्डच्या युनिअन काऊंटी कॉलेजमधे अभियांत्रिकी विषय शिकवतात. त्यांनी बेसिक एनवायरमेंटल टेक्नॉलॉजी नावाच पुस्तकही लिहिलंय. जीवनमान बदलून टाकणाऱ्या पायाभूत सोयींचं त्यांनी पर्यावरणवादी पायाभूत सुविधा असं नामकरणही केलंय.
शहर आणि गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि प्रदुषण रोखण्यासाठी ज्या पायाभूत सोयींची आवश्यकता असते त्या सोयींना ते ‘पर्यावरणवादी पायाभूत सुविधा’ असं म्हणतात. ज्या सोयींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास नियंत्रणात राहतो. आणि पर्यावरणाची मदत होते त्या सोयी पर्यावरणवादी पायाभूत सोयी आहेत असं ते निक्षून सांगतात.
हेही वाचाः रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
उपनगरीय रेल्वेतील भयानक गर्दीमुळे रोज असंख्य जीवांचा नाहक बळी जातो. ते मेट्रोमुळे नक्की वाचणार आहेत. म्हणूनच मेट्रो अत्यावश्यक आहे. उपनगरीय रेल्वेला आज अतिरिक्त प्रवासी वाहून नेणं शक्य नाही. मेट्रोसारख्या तत्पर आणि कार्यक्षम बहिणीची तिला गरज आहे. अन्यथा मुंबईसारखं कधीही हार न मानणारं शहर उदास, भकास आणि कृतीहीन होऊन बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मेट्रोमुळे उपनगरीय रेल्वेवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गावरुन मोठ्या आनंदाने प्रवास करणाऱ्या चार लाख लोकांना पाहिलं की नेमक हेच सिद्ध होतं. उपनगरीय रेल्वेवरील किमान ३५ टक्के प्रवासी हे मेट्रोने प्रवास करतील असा तर तज्ज्ञांचा अंदाज आहे. वातानुकुलित, आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित मेट्रोमुळे मुंबईकर आपापल्या गाड्या घरी ठेवण्यास प्रवृत्त होतील अशीही अपेक्षा आहे. त्यामुळे वाहनांवर, इंधनावर होणारा खर्च ते टाळू शकतील आणि पर्यावरणाला मदत करु शकतील. लक्षात घ्या, मुंबईकर काम करुन नव्हे तर कंटाळवाणा, हालाखीचा प्रवास करुन थकतो. त्याला हताश करणाऱ्या परिस्थितीमुळे थकतो.
मुंबईसारख्या शहरासाठी मेट्रोची नितांत आवश्यकता आहे. मात्र, अशा पायाभूत सुविधा चुटकी वाजवता क्षणी किंवा तुमच्या नियमित आणि सामाजिक जीवनाला धक्का लागल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. आपल्या मुंबईला अनेकानेक भौगोलिक आणि रचनात्मक निर्बंध आहेत. त्या सर्व निर्बंधांना सरेखीत करणं, त्याचं पुननिर्माण करणं आणि त्यांची पुनर्बांधनी करणं गरजेचं आहे. शहराच्या गरजा सातत्याने बदलतं आहेत.
मुंबईकरांनो, पर्यावरणवाद्यांनो आणि गैर सरकारी संस्थांनो आपल्या शहराच्या गरजा ओळखण्याचं आवाहन मी तुम्हाला करत आहे. अनंत लोकांसाठी मुंबई शहर हे रोजीरोटी देणारं शहरं आहे. या मुंबईचं जतणं करणं आणि तीचं लयाला गेलेलं वैभव परत मिळवून देणं आवश्यक आहे.
हेही वाचाः
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
आपट्याच्या पानांना नको, प्रथेलाच ऑप्शन हवा
कुमरी शेती सांगते, आपला समाज स्त्रीप्रधान होता
(लेखक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आहेत.)