ऑन द स्पॉट भीमा कोरेगावः भय संपवणारी अस्मितेची ओढ 

०२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


एक जानेवारी आली की आंबेडकरी जनतेला ओढ लागते ती भीमा कोरेगावची. विजयस्तंभाला अभिवादन करून पूर्वजांनी गाजवलेल्या शौर्याला डोळ्यात साठवून पुन्हा नव्या उमेदीने लढण्याची ऊर्जा घेऊन जाते. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरही आंबेडकरी जनता मागे हटलेली नाही. उलट देशभरातून जास्त संख्येने तिचा ओढा वाढलाय. भीमा कोरेगावचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट. 

‘आपल्या लोकाईनी आणि त्येह्या लोकाची लडाई झाली. आपल्या लोकांनी त्येह्या लोकांना हरवले. जीतले तर जीतले, पण ते झाकेल व्हतं. बाबासाहेबाने ते उघड केलं आणि आपल्या लोकाईले ते माहीत झालं. लै दिस झाले, मी इथे येतीय. तवा इथं कायबी नवतं. पयलं रेल्वेनी यायचो. आता गाडी घेऊन आलोय. पयले इथं इतकी गर्दी नवती. आता गर्दी वाढाया लागली. बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. आपण त्यासाठी इतकं बी करू नय का? म्हणून आमी इथं येतो. त्यांच्यामुळे आमी येतो. त्यांनी आपल्याला सगळं दाखवलं. आपुन आलो तर आपले मुलंबाळ येतील,’ कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करायला आलेल्या गंगुबाई डोंगरे बोलत होत्या.

गंगुबाई डोंगरे औरंगाबादहून आल्या होत्या. तिथे त्या लोकांच्या घरी धुणीभांडी करतात. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिल्याची आठवण त्या सांगतात. मिलिंद महाविद्यालयाचे काम सुरु होतं, तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना पाहिलं होतं. त्या तिथे काम करायच्या. कॉलेजचं काम सुरू असताना लोक बाबासाहेबांच्या पाया पडायला यायचे. ते त्यांना आवडायचं नाही. तेव्हा हातातल्या काठीने बाबासाहेब लोकांना मारायचे. बाबासाहेब म्हणायचे, मी काही देव नाही. माझ्या पाया पडायच्या नाही. त्यापेक्षा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 

मोठ्या उत्साहाने वाजतगाजत जय भीमच्या घोषणा देत माणसांचे जत्थेच्या जत्थे विजयस्तंभाच्या दिशेने येत होते. १ जानेवारी १८१८ला पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात ब्रिटिश सैन्यातल्या महार सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली होती. आपल्यावर केवळ जातीपायी अत्याचार करणाऱ्यांचे प्रतिनिधी असणाऱ्या पेशव्यांच्या विरुद्ध लढताना धारातीर्थी पडलेल्या आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी आज २०१ वर्षांनंतरही गर्दी उसळली होती. 

`आमाला जीवाचं भ्या वाटत नाय`

गेल्या वर्षी झालेल्या दगडफेकीची पुसटशीही भीती यातल्या कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हती. दगडफेकीची, दंगलीची भीती वाटत नाही का, असं विचारल्यावर शांताबाई सोनावणे म्हणाल्या, ‘गेल्यावर्षी आमच्या गाड्या तिकडे लावल्या होत्या. तिथे बिल्डिंगवरून दगड येऊ लागले. दगडांच्या भीतीने आम्ही पळालो. म्हणून यावर्षी यायला भीती वाटली नाही. आता कायबी होवो, घाबरायचं नाही. म्हणून आमी आलो. गेली पंधरा वर्षं आमी इथं येतोय. मुंबईची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षा भूमी सगळीकडे आम्ही जातो. आमाला जीवाचं भ्या वाटत नाय.’

भीमा कोरेगाव परिसराला यंदा छावणीचे स्वरूप आलं होतं. गेल्या वर्षीच्या दंगलीमुळे प्रशासनाने मोठ्याप्रमाणात फौजफाटा नेमला होता. इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली होती. वाढत्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन वापरले जात होते. खबरदारी म्हणून आजूबाजूंच्या गावातही पोलिस नेमले गेले होते. समता सैनिक दल या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटनेचे सैनिकही मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना सूचना देत होते. विजयस्तंभाजवळ जास्त गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. माइकवरून लोकांना सूचना दिल्या जात होत्या.

समता दल सैनिक म्हणून पुरुषांप्रमाणेच महिलांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नांदेड जिल्ह्यातून आलेल्या कमलाबाई नरवाडे गेल्या १० वर्षांपासून समता दल सैनिक म्हणून काम करतात. मुंबई, येवला, महाड, कोरेगाव भीमा, नागपूर, महू आणि चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या जातात. 

कमलाबाई सांगतात, ‘गेल्यावर्षी दगडफेकीत आमच्या समता दलाचे सैनिकही जखमी झाले होते. मात्र आम्हाला भीती वाटत नाही. बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं केलंय, तर आपण भ्यायचं कशाला? आम्हाला भीती वाटत नाही. हे तर आम्हाला नेहमीचं आहे. मागच्या वर्षी दगडफेक झाली तरी यावर्षी मोठया प्रमाणात लोक येताहेत.’

`कर्नाटकात इंटरनेटमुळे भीमा कोरेगावची माहिती`

विजयस्तंभाला अभिवादन करायला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकं आले होतेच. तसंच महाराष्ट्राबाहेरूनही आंबेडकरी जनता आली होती. रस्त्याने जाणाऱ्या जत्थ्यांमधे  एक जथ्था दक्षिणेतून आलेला होता. `जोर से बोलो जयभीम, प्यार से बोलो जयभीम!` अशा घोषणा देत प्रजा विमोचन चळवळीचे कार्यकर्ते चालत होते. 

कुठून आलात, याची चौकशी केल्यावर कुमार वी म्हणाले, ‘आम्ही कर्नाटकातून, बंगळुरूमधून आलोत. पूर्वी आम्ही केवळ आठजण यायचो. आता आम्ही ५५ जण आलोय. कोरेगाव भीमाविषयी आम्हाला इंटरनेटवरून आणि पुस्तकांमधून माहिती मिळाली. गेल्या वर्षीच्या दगडफेकीत आमचं नुकसान झालं नाही. आम्हाला त्याची भीती वाटत नाही. आम्ही चांगल्या कामासाठी आलोय. त्यामुळे आमच्या मनात भीती नाही.’

`आता नवपेशवाईशी लेखणीची लढाई`

विजयस्तंभाचा फोटो घेण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली होती. फोटो घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांना सूचना दिल्या जात होत्या. विजयस्तंभाला अभिवादन करून बाहेर पडल्यावर मागच्या मैदानात मोठ्या प्रमाणात स्टॉल उभे केलेले होते. इथे पुस्तक विक्रीची, समता दल सैनिक नोंदणीचे स्टॉल होते. लोकांना जेवणाची सोय केली होती. तसेच फोटो, पेढे, गोडशेव, चिक्की, भजी वडापाव, पाणी विक्रीचेही स्टॉल होते. पुस्तकं, बाबासाहेब आणि भगवान बुद्धांचे फोटो घेण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली होती.

गौतमीपुत्र कांबळे गेल्या तीन वर्षांपासून भीमा कोरेगावला पुस्तक विक्रीचे स्टॉल लावतात. मागच्या वर्षी झालेल्या वादाबाबत बोलतांना गौतमीपुत्र कांबळे सांगतात, 'अन्यायाच्या विरोधात माणसं अन्यायाने पेटून उठली काय करू शकतात, हे पेशव्यांच्या विरोधात लढल्या गेलेल्या लढाईतून दिसून येते. अगदी तसंच मागच्या वर्षी झालेल्या हल्ल्यातून झालेलं आहे. पूर्वी हत्यारे घेऊन लढाई लढली जायची. आता लेखणी आणि बुद्धीच्या हत्यारांनी लढाई लढावी लागणार आहे. मागच्या वर्षाच्या वादातून आंबेडकरी जनतेने प्रेरणा घेतली आहे. त्यामुळेच निर्भयपणे गर्दी करून नव्याने उदयाला आलेल्या पेशवाईला उत्तर दिलेलं आहे.’

गाव शांत, पण तणाव स्पष्ट 

विजयस्तंभाला अभिवादन करून माणसं पुढे भीमा कोरेगाव गावात जात होते. तिथून वढू येथे संभाजी महाराजांच्या आणि त्यांची समाधी बांधणाऱ्या गोविंद गायकवाड यांच्या समाधीला भेट देण्यासाठी जात होते. 

कोरेगाव भीमा गावात मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही बाजारातली दुकानं बंद होती. एक दोन चहा आणि नाश्त्याची दुकानं तितकी सुरु होती. काही तुरळक ठिकाणी स्थानिक लोक बसलेले दिसत होते. मात्र गेल्या वर्षीच्या दंगलीबाबत बोलत नव्हते. वातावरण शांत दिसत असलं, तरी वातावरणात असलेला तणाव स्पष्टपणे जाणवत होता.

नेहमीच गजबजलेला असणारा कोरेगाव भीमाचा बाजार सुना होता. बाजार का सुना आहे? दुकाने का बंद आहेत यावर हॉटेलवाला बोलायला तयार नव्हता. एका पान विडीचे दुकान चालवणाऱ्या विक्रेत्याला मात्र यावर बोलत केलं. समीर त्याचं नाव. समीर म्हणाला, 'मागच्या वर्षीच्या कारनाम्यामुळे बाजार बंद आहे. आमचं गाव शांत होतं. मात्र बाहेरच्या लोकांमुळे इथलं वातावरण बिघडलं. पूर्वी गर्दी कमी असायची, तरी गावात उत्साह असायचा. विजयस्तंभाजवळ जत्राच भरायची. पाळणे असायचे. गावातले लोकही मोठ्या उत्साहाने सहभागी व्हायचे. पण गेल्या वर्षीच्या घटनेनंतर सगळं बदललंय.’

दंगलीनंतर जमिनीचे व्यवहार थंडावले

प्रशासनाने वढूला येण्याजाण्यासाठी मोफत बसची व्यवस्था केलेली होती. यात पीएमपीएलच्या बस होत्या. तशा खाजगी कंपन्यांचाही बस होत्या. लोक संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी गर्दी करत होते. तिथे छत्रपती संभाजी महाराज की जय सोबतच गोविंद गायकवाड की जयच्या घोषणा दिल्या जात होत्या. 

खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. मात्र कुठलीही गडबड न करता लोकं शांतपणे दोन्ही समाधीस्थळांना अभिवादन करत होते. गेल्या वर्षीच्या वादाचा मागमूसही तिथे दिसत नव्हता. वढूमधली दुकानं सुरू होती. कुठेही तणाव जाणवत नव्हता. असं असलं तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वढूतही होता.

वढूत एका चहा दुकानावर काही लोकं बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारतांना कोरेगाव भीमात बंद असलेल्या दुकानांबद्दल विचारलं, तर त्यापैकी एकजण म्हणाला, ‘पूर्वी दुपारपर्यंत दुकाने सुरु असायची. दुपारनंतर गर्दी वाढली की लोक दुकानं बंद करायचे. आता मात्र भीतीने दुकानं बंद केली असावीत. गेल्या वर्षी झालेल्या दंगलीचा परिणाम गावावर झालेला आहे. पूर्वी याभागात जमिनींना चांगला भाव होता. खरेदी विक्रीचेही व्यवहार चालायचे. मात्र गेल्या वर्षीच्या दंगलीनंतर इथे खरेदीविक्रीचे व्यवहार खूपच कमी झालेले आहेत. इतर व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. गावाची बदनामी झालीय ती वेगळीच.’

प्रशासन सक्रीय, गावात शांतता

कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या चिथावणीला बळी पडून गेल्या वर्षी दंगल झाली खरी मात्र त्याचे परिणाम आजही येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. कोरेगाव भीमा हे दंगलीचं गाव म्हणून ओळखलं जातंय. हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न गावकरी करतायत, असं प्रशासन सांगतंय. गावांमधे  शांतता आणि सलोखा असावा म्हणून प्रशासन प्रयत्न करतंय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गावात वेळोवेळी बैठका घेऊन लोकांसोबत चर्चा केलीय.

दुपारनंतर विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढतच चालली होती. मोठ्या प्रमाणात लोक विजयस्तंभाच्या दिशेने येत होते. यात बस, कार, रिक्षा, दुचाक्या तर होत्याच, पण त्याचसोबत मोठ्या संख्येने लोक पायी चालत जात होते. वाघोलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विजयस्तंभाला अभिवादन करून परत जाणाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. गर्दीमुळे प्रशासनाने केलेली वाहनांची व्यवस्था कोलमडली होती.

आंबेडकरी नेत्यांचे वेगवगेळे गटांनी विजयस्तंभाच्या परिसरात सभामंडप घातले होते. बॅनर्स लावलेले होते. वेगवेगळ्या गटात विखुरलेल्या नेत्यांच्या मागे जाणारी आंबेडकरी जनता मात्र विजयस्तंभाला अभिवादन करताना गटतट विसरून एकत्र आलेली होती. खरं तर गटांना मागे सोडत बाबासाहेबांनी रुजवलेल्या विचारांशी बांधिलकी मानत  आंबेडकरी जनतेने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, या शिकवणीतला संघर्ष सुरूच ठेवण्यासाठी ऊर्जा घेऊन लोकं परतीची वाट चालत होते.  

(लेखक मुक्त पत्रकार आहेत)