प्रधानसेवकजी, मी एका विधवेची मुलगी लिहितेय

०९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


जयपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख `काँग्रेस की विधवा` असा केला. त्याची मेनस्ट्रीम मीडियाने फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडियातल्या तरुणांनी त्यावर टीकेची झोठ उठवली. त्याच संदर्भात एका पत्रकार मुलीने मोदींना लिहिलेलं हे पत्र.

श्रीयुत नरेंद्र मोदी,
प्रधानसेवक

`काँग्रेसची अशी कोणती विधवा आहे, जिच्या खात्यात निवृत्ती वेतनाची रक्कम जमा झाली?'  असा खडा सवाल तुम्ही जयपूरच्या प्रचारसभेत केला. आता निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप आलेच. पण तुम्ही ज्या भाषेत हे आरोप केले ती भाषा देशातल्या तमाम महिलांचा अपमान करणारी आहे, असं नाही का तुम्हाला वाटत? अर्थात तुम्ही हे मान्य करणार नाही, याची खात्री आहे. काँग्रेसची विधवा कोण? हा सवाल करताना तुमचा रोख हा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे होता. अर्थात हेही तुम्ही मान्य करणारच नाहीच याची तर पूर्ण खात्री आहे.

नेहमीप्रमाणे धडाकेबाज भाषण ठोकताना, आपण काय बोलतो, कोणते शब्द वापरतो, हे तुमच्या ध्यानात येत नसावं. चुकून आलंच, तर त्याने काय फरक पडतो, असंच तुम्हाला वाटत असणार. किंवा दुसऱ्या सभेत बोलताना पहिल्या सभेत काय बोललात, हे पूर्ण विसरुन जात असाल. निवडणुकीच्या धामधुमीत हे चालायचचं असं तुम्हाला वाटत असेल. किंवा तुम्ही हे सारं जाणीवपूर्वक करत असाल. 

अर्थात या देशात महिलेनं विधवा असणं किंवा महिलेला नवऱ्याने सोडून दिलेलं असणं, हे काय असतं, याची तुम्हाला कल्पना नसणारच. म्हणजेच आपल्या पत्नी जसोदाबेन यांना तुम्ही सोडून दिलेलं आहे. त्यामुळे नवऱ्याने सोडलेल्या बाईचं दुःख तुम्ही समजू शकणार नाहीच. मला कुणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. पण स्वतःच्या फायद्यासाठी वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी कुणी सार्वजनिक करत असेल, तर त्यावर नाईलाजाने बोलावं लागतं.

तुम्ही हिंदू धर्माचे तुम्ही सच्चे सेवक, पाईक वगैरे म्हणवून घेता ना! त्या हिंदू धर्मात विधवेला आणि परित्यक्तेला समाजात काय कुटुंबात सुद्धा सन्मानाची वागणूक मिळत नाही. याचा अर्थ नवरा असलेल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळतो असा होत नाही. पण त्यांच्याहून वाईट वागणूक इथला समाज विधवेला देतो. काय करणार पुरुषसत्ताक व्यवस्था आहे ना इथली! आणि तुम्ही या व्यवस्थेचे वाहक आहात. तुमच्या नेणिवेत आजही पुरुषसत्ताक व्यवस्था मुळासह रुजलेली आहे. 

ऐन तारुण्यात आपला नवरा गेल्यानंतर पोटच्या पोरांना वाढवताना आणि डोंगराएवढं स्वतःचं दुःख बाजूला सारून परिस्थितीशी झगडा देणाऱ्या विधवा तुम्हाला माहीत नसतील. म्हणूनच त्या तुम्हाला ऐतखाऊ वाटल्या असतील. त्यामुळेच तुम्ही असा खडा सवाल केलात. 

श्रीयुत प्रधानसेवक, वयाच्या पस्तिसाव्या वर्षी माझी आई विधवा झाली. आम्ही भावंडं बाप नसलेली पोरं आभाळाहून मोठं दुःख आमच्या आईच्या पदरात पडलो. आपला नवरा म्हणजे आपलं सर्वस्व, या पारंपरिक विचारात वाढलेली आमची आई. अचानक भूकंप व्हावा आणि होत्याचं नव्हतं व्हावं, असं तिच्या आयुष्याचं झालं. एका क्षणात सर्व काही बदलून गेलं. तीच काय तर या देशातील प्रत्येक स्त्री अहेवपणी म्हणजेच नवऱ्याअगोदर मरण मागत असते. नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं, यासाठी उपासतापास करत असते. 

बाई अहेवपणाच लेणं लेऊन गेली, असं मागच्यांनी म्हणावं, हे स्वप्न इथली प्रत्येक विवाहित स्त्री हयातभर जागतेपणी बघत असते. नुसती बघत नाही तर चारचौघात बोलूनही दाखवते. कारण नवऱ्यानंतर कोणी आपल्याला पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची म्हणून जिवंतपणी मरण यातना सोसायला लावू नयेत, यासाठी तिचा बापडीचा अट्टहास असतो. शेवटी सवाष्ण असणं आणि नॉन सवाष्ण असणं यात जमीन अस्मानाचं अंतर जे आहे. 

आमच्याकडच्या `तांबडी माती` या मराठी सिनेमात एक गाणं आहे. 
माझ्या कपाळीचं कुकू, कवतिकानं किती बाई निरखू, 
जीव भरला भरला, खरं वाटंना वाटंना...

हे तुम्ही ऐकलं, तर तुम्हाला समजेल, इथल्या स्त्रियांसाठी कपाळावर असलेलं लाल भडक कुंकू आणि गळ्यातल्या काळ्या मण्यांची पोत किती महत्वाची आहे. नुसती महत्वाची नाही, तर त्यांचं कुटुंबातलं, समाजातलं स्थान ठरवणारी आहे. आमच्या गावाखेड्यातल्या राबणाऱ्या माऊलीसाठी हेच कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातली अगदी फुटक्या काळ्या मण्यांची पोत सुद्धा ऑक्सिजन असतो हो. पण हे तुम्हाला नाही समजणार. 

पुरुषाशिवाय बाईच्या आयुष्याला अर्थ नाही, अशी समाजरचना शतकानुशतकं इथं रुजलीय. त्यामुळे बाईच्या आयुष्यात तिच्या नावामागे पुरुषाचं नाव असावंच लागतं. ते नसेल तर तिला किंमत उरत नाही. पुरुषाशिवाय बाई कर्तबगार होऊ शकत नाही. पुरुषाशिवाय बाईचं अस्तित्व असूच शकत नाही.  हीच तर या समाजाची रचना आहे.

पण ज्यावेळी एखादी स्त्री नवरा गेल्यानंतर सुद्धा ताठपणाने, जिद्दीने उभं राहात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते. नवऱ्यानंतर आपल्या मुलांना घडवते. त्यावेळी ती स्त्री प्रत्येकाच्या डोळ्यात सलत असते. स्वतःला उभं करत, नवरा नसताना कपाळावर कुंकू, गळ्यात काळी पोत घालून जेव्हा ही स्त्री घराचा उंबरा ओलांडते, तेव्हा तिच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र चौकाचौकात वाटणारे नैतिकतेचे ठेकेदार तिला भेटत असतात. त्यावेळी त्या विधवेला होणाऱ्या वेदना तुम्हाला नाही कळणार, श्रीयुत प्रधानसेवक. 

बाईने कोणत्याही बाबतीत पुरुषाच्या पुढे जाऊ नये. बाई ही दुय्यमच आहे.  आणि तिला  दुय्यमच ठेवायला हवं, असा संस्कार देणाऱ्या, नव्हे तर तो तुमच्या नेणिवेत रुजवणाऱ्या संघटनेचे तुम्ही एकेकाळचे पूर्णवेळ सेवक आणि आता त्याच संघटनेच्या राजकीय पक्षाचे प्रधानसेवक. तुमच्याकडून आम्ही स्त्रियांनी सन्मानाच्या शब्दांची अपेक्षा तरी कशी करावी?

त्यात सोनिया गांधी या तर विदेशी. परदेशातून इथे देशाची सून म्हणून आल्यावर सासूचा झालेला खून. त्या पाठोपाठ आयुष्याचा जोडीदार म्हणून ज्याच्यासाठी सातासमुद्रापार आपलं आयुष्य जगायला सुरवात केली, त्या पतीचा झालेला खून. विदेशी बाई म्हणून जवळच्यांकडून, पक्षातील सहकाऱ्यांकडून लावला गेलेला बोल. हे सगळं कानामागे टाकत, आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासूची ही सून ताठ मानेने उभी राहिली. नुसती उभी राहिली नाही, तर स्वतःचा मोडलेला संसार सांभाळत, देशाचा संसार तिने समर्थपणे सांभाळला. आज त्यांचा वाढदिवस काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करताहेत. ही गोष्ट तुमच्यासारख्या ५६ इंचांची छाती असणाऱ्या मर्दाला खटकणारच..! म्हणूनच तुम्ही जाहीरपणे 'काँग्रेसची विधवा कोण?' असा सवाल केला.

श्रीयुत प्रधानसेवक, तुम्ही 'बेटी बचाव, बेटी पढाव' हा नारा दिला. चांगलंय, पण बेटीच्या सन्मानाचं काय?  गाय तुमची माता आहे. त्यावर माझी हरकत नाही. तिचा अपमान झालेलं तुम्हाला चालत नाही. गाईचा सन्मान झाला पाहिजे, असं तुम्ही सांगता. मग  बाप नसलेल्या आमच्यासारख्या पोरांच्या आयांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?  

श्रीयुत प्रधानसेवक, आमची आई असेल विधवा, पण तिन सन्मानान आम्हाला वाढवलं. आई वडील या दोन्ही जबाबदाऱ्या तिने समर्थपणे पार पाडल्या. आजही पार पाडत आहे.  बाईने घरच सांभाळावं, विधवेने बेरंगी आयुष्य जगावं. असं मानणाऱ्यांचे तुम्ही प्रतिनिधी आहात. त्यामुळं राजकारणात स्वताची जागा मजबूत करण्यासाठी बाईचा अपमान करणं हे तुमच्यासारख्यांना सोयीचं असत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्यासारखी मानसिकता असलेले ५६ इंच छातीचे मर्द असंच करत असतात. 

श्रीयुत प्रधानसेवक, तुम्ही काँग्रेसच्या विधवेबद्दल विचारणा केली. काँग्रेसच्या विधवेने आपली कर्तबगारी आपल्या कामातून दाखवलीय. तशाच या देशातल्या इतर विधवाही पांढऱ्या कपाळाची हा शिक्का पुसून आपली कर्तबगारी सिद्ध करत आहे. तुम्हाला मोठं होण्यासाठी एका विधवा स्त्रीचा अपमान करावा लागतो, पण या विधवा पुरुषाशिवाय आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करतायेत. 

अश्विनी सातव - डोके, 
एका कर्तृत्ववान विधवेची मुलगी

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)