२६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी

०५ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या आठवड्यात एक बातमी येऊन गेली. पण ही बातमी टाटा, अंबानी, अदानीची नसल्यामुळे त्याकडे कुणाचं लक्ष केलं नाही. ती बातमी होती, २०२० च्या 'हुरन ग्लोबल रीच लिस्ट’मधे स्वबळावर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा तरूण अब्जाधीश म्हणून मान मिळवणाऱ्या रितेश अगरवालची. २६ वर्षाच्या रितेशची आज ४३ हजार ओयो हॉटेल्स आहेत. ब्रँड मिळवून देणाऱ्या या तरूणाच्या भन्नाट स्ट्रगलची ही स्टोरी!

एखाद्या कामानिमित्त आपण छोट्या मोठ्या शहरात जातो. प्रत्येक ठिकाणी आपले नातेवाईक किंवा मित्र नसतात. त्यामुळे राहयचं कुठं समस्या ही आपल्यापुढची सर्वात मोठी समस्या असते. अशावेळी कामाच्या ठिकाणाहून जवळपास असणारे आणि खिशाला परवडणारे हॉटेल शोधणं मोठ्या जिकिरीचं काम! वाढत्या महागाईमुळे अव्वाच्या सव्वा रक्कम भरून हॉटेलमधे रहावं लागतं. मोठी रक्कम देऊनही अस्वच्छता, चेक इन, चेक आऊट किंवा कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन अशा प्रकारच्या कटकटी असल्यास प्रचंड मनस्ताप होतो. पैसे खर्च होतात पण सोयीच्या नावाने सारी बोंबाबोंब होते.

आपल्यापैकी अनेकांना हॉटेल्सचा असा अनुभव कधी ना कधी येतोच. पण हॉटेल बुकिंगची ऑनलाईन सोय झाल्यापासून या अनुभवामधे बराच बदल झालाय. ऑनलाईन हॉटेल बुकिंगच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायाचा कायापालट केलाय तो ओयो कंपनीनं. ऑनलाइन रूम्स बुकिंगच्या माध्यमातून ओयो कंपनीनं मध्यमवर्गीयांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाची हॉटेल्स उपलब्ध करून दिलीयत. या लोकप्रियतेच्या जोरावर या कंपनीचा मालक आज जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत तरुण अब्जाधीश बनलाय.

हेही वाचा : ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

जगातला दुसरा तरूण अब्जाधीश

ओयो या कंपनीचे संस्थापक आणि मालक म्हणजे अवघा २६ वर्षांचा रितेश अगरवाल. रितेश अगरवालचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मधे ओरिसातल्या कटक इथं एका मध्यमवर्गीय मारवाडी कुटुंबात झाला. कटकमधे प्राथमिक शिक्षण झाल्यावर रितेशनं आपल्या पोरांसारखंच राजस्थानातलं कोटा शहर गाठलं. आणि आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. पण तिथे गेल्यानंतर त्याचा अभ्यास कमी आणि भटकंतीच जास्त सुरू झाली.

लहानपणापासूनच त्याला अभ्यासात कमी रस होता. एकदा कधीतरी त्यानं मोठ्या बहिणीच्या तोंडातून आंत्रप्रिनरशिप हा इंग्रजी शब्द ऐकला होता. या शब्दाचा अर्थ छोटा, घरगुती व्यवसाय करणारा उद्योजक असा होतो. त्यानंतर मोठ्या उत्सुकतेनं गुगलवरून त्यानं याची सगळी माहिती जमवली. शाळेत असताना मोठं झाल्यावर काय होणार या प्रश्नावर इतर मुलं डॉक्टर, इंजिनिअर होणार असं सांगायची. पण रितेशचं उत्तर मात्र मी आंत्रप्रिनर होणार असं असायचं.

मिंट या इंग्रजी बिझनेस पेपरमधे प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, 'हुरन ग्लोबल रीच लिस्ट २०२०'ने जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून रितेश यांची निवड केलीय.  रितेशची एकूण संपत्ती अंदाजे ७८०० कोटी रूपये इतकी आहे. कॉस्मेटिक उद्योग जगताची राणी कायली जेन्नर हीच रितेशच्या पुढे म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे.

रितेशच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याला काही टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्यासारखा घरंदाज वारसा मिळालेला नाही. रितेशनं स्वतःच्या हिमतीवर शुन्यातून हे स्वप्नवत विश्व उभं केलंय. आणि स्वतःच्या जीवावर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत तरुण अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय.

लीडर व्हायचं ठरवलं!

कोटा शहरात राहताना रितेश भरपूर फिरायचा. या भटकंतीत त्यानं अनेक बरे-वाईट अनुभव गाठीशी बांधले. अनेकदा भरपूर पैसे भरूनही हॉटेलमधे चांगली सेवा मिळत नाही. आणि अनेकदा कमी पैशातही आरामात राहता येतं, हे त्याच्या लक्षात आलं. कुठे बाथरूमच घाण असायचं. कुठे पंखाच सुरू नसायचा, कुठे दिवसभर लाईटचं यायची नाही.

काही ठिकाणी नळ गळत राहायचा आणि त्याच्या आवाजानं रात्री झोप यायची नाही. काही ठिकाणची रूम सर्विस अत्यंत वाईट असायची. तिथं काम करणारी माणसं खूप उद्धटपणे वागायची. अशा अनेक बहुरंगी, बहुढंगी गोष्टींचा अनुभव रितेशने घेतला.

रितेश हॉटेलमधे गेल्यावर एक गोष्ट आवर्जून करायचा. ती म्हणजे, हॉटेल मालकाची भेट. हॉटेलमधल्या बऱ्यावाईट गोष्टी त्यांच्या लक्षात आणून द्यायचा. एखाद्या हॉटेलमधे कमी पैशात जास्तीत जास्त सोयी मिळाव्यात यासाठी आपण भविष्यात काहीतरी करणार असंही तो या मालकांना सांगायचा. हे ऐकुन काही ठिकाणी त्याला डिस्काउंट मिळायचा तर अनेकदा त्याला वेड्यातही काढलं जायचं.

Innovation distinguishes between the Leader and the Follower हे स्टीव जॉब्सचं वाक्य त्याला नेहमी प्रेरणा द्यायचं. काहीतरी नवीन करताना नेता आणि अनुयायी यांच्यातला फरक स्पष्ट होतो असा याचा अर्थ. त्याने अनुयायी न होता नेता, लीडर व्हायचं ठरवलं.

हेही वाचा : ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्म बघण्यासाठी कुठल्याही समीक्षकाची गरज नाही

अर्ध्या किमतीत केलं हॉटेलचं बुकिंग

नंतरच्या काळात रितेशनं दिल्लीतल्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अँड फायनान्स या संस्थेत अॅडमिशन घेतलं. मोजून दोन दिवस तो तिथे रमला. नंतर कधीही तिकडे फिरकला नाही. चौकटीतलं ज्ञान त्याच्या पचनीच पडत नव्हतं. दिल्लीत आंत्रप्रिनरशिप संबंधित कुठंही परिषद असेल तर रितेश तिथं हजर व्हायचा. अनेकवेळा त्याल अशा परिषदांची फी परवडायची नाही. अशा वेळी तो चोरून त्या परिषदांना हजेरी लावायचा. त्याच्या घरच्यांना यातलं काहीही माहीत नव्हतं.

२०१२ मधे गुडगाव इथं 'ओरावेल स्टेज’ या नावानं त्याने ऑनलाईन हॉटेल बुकिंग करणारी एक लहानशी कंपनी सुरू केली. हळूहळू काही हॉटेल्ससोबत त्यानं भागीदारी केली. यातून ग्राहकांना अर्ध्या किमतीत हॉटेलमधली रूम उपलब्ध करून देणं त्याला शक्य झालं. त्यावेळी भारतात ही कल्पना एकदमच नवी अगदी कोरीकरकरीत होती.

अशा नवनव्या कल्पना देणाऱ्या स्टार्ट अपमधे गुंतवणूक करण्यासाठी काही संस्था तयार असतात. रितेशच्या स्टार्ट अपमधे वेंचर नर्सरी या कंपनीनं ३० लाखांची गुंतवणूक करून जोराची किक मारली. आणि त्यानंतर रितेशची गाडी सुसाट धावू लागली.

या गुंतवणूकीमुळे रितेशचा आत्मविश्वास वाढला. तो जोमाने कामाला लागला. पण काही दिवसांनी ती कंपनी तोट्यात आली आणि बंद करावी लागली. अगदी पोरकट वयात केलेल्या धाडसाला आलेलं हे पहिलं अपयश होतं.

स्कॉलरशीप मिळवणारा पहिला भारतीय

काहीतरी करण्याची धडपड, उमेद त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पूर्वीच्या चुकांचा, आलेल्या अनुभवाचा त्यानं बारकाईनं अभ्यास सुरू केला आणि पुन्हा एकदा धाडस केलं. अखेर २०१३ मधे ओयो ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. ओयो म्हणजे ऑन युवर ओन. तुमची स्वतःची खोली. या कंपनीचा उद्देश कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या रूम उपलब्ध करून देणं हा होता.

याच काळात त्याने थीएल फाउंडेशनची 'थिएल स्कॉलरशिप' जिंकली. थिएल फाऊंडेशनतर्फे व्यवसायाच्या नवीन कल्पना मांडणाऱ्या जगातल्या २० वर्षाखालील आंत्रप्रिनर्सना एक लाख डॉलर्सची स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप जिंकणारा रितेश हा पहिला भारतीय आहे. या पैशाचा वापर करून रितेशने ओयोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवलं.

२०१६ ला सॉफ्टबँक या एका जपानी मल्टीनॅशनल कंपनीने ओयोत सात अब्ज रुपयांची गुंतवणूक केली. नव्यानंच चालू झालेल्या कंपनीत याआधी कुणीही इतकी मोठी गुंतवणूक केली नसेल. पहिल्या कंपनीच्या वेळी झालेल्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाहीत यासाठी रितेशने 'सेवेंटी एम एम' या कंपनीच्या सीईओ भावना अगरवाल यांच्या मदतीने व्यवसायातले बारकावे आणि मार्केटचा अभ्यास केला. त्याचा त्याला पुढे योग्य निर्णय घेण्यास भरपूर फायदा झाला.

हेही वाचा : परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?

ब्रँड वॅल्यू मिळवून दिली

श्रीमंत लोकांची पसंती ब्रँडेड हॉटेल्सना असते. त्या तुलनेत ब्रँड नसलेली पण मोठी प्रॉपर्टी असणारी अनेक हॉटेल्स दुर्लक्षित राहतात. रितेशने ओयोच्या माध्यमातून अशा ब्रँड नसलेल्या हॉटेल्ससोबत करार केला. आणि ओयोच्या ब्रँडखाली भारतातली सर्वात मोठी ब्रँडेड हॉटेल्सची चेन तयार केली. ओयोच्या केंद्रस्थानी भारतातला मध्यमवर्ग आहे. त्यांच्या सोयीसाठी ओयो इतर हॉटेल्सबरोबर टायअप करते.

देशातली ब्रँड नसलेली अनेक हॉटेल ओयोनं स्वतःच्या ब्रँडखाली आणली आणि त्याची गुणवत्ता आणि दर्जा वाढवून एक मोठी ब्रँडेड साखळी तयार केली.

कोणत्याही हॉटेलसोबत टायअप किंवा भागीदारी करण्याआधी ओयोची एक टीम तिथं पाठवली जाते. नियमांनुसार सगळी पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्यासोबत भागीदारी नक्की होते. त्यानंतर संबंधित हॉटेलच्या इंटेरियरमधे काही बदल केले जातात आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं.

ओयोमधे १० लाख रूम आहेत

२०१३ मधे फक्त एक हॉटेल आणि दोन कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं सुरू झालेली ही कंपनी सध्या भारतातल्या आणि जगातल्या मोठ्या कंपन्यांच्या रांगेमधे पोचलीय. ओयोचा विस्तार भारतासोबतच चीन, अमेरिका, आशिया, मध्य आशिया, जपान, युरोप आणि इतर जगभर झालाय.

सध्या ४३ हजाराहून जास्त हॉटेल्ससोबत ओयोची भागीदारी आहे. या हॉटेल्समधून जवळपास १० लाख रूम्स ओयो ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकते. जगभर ओयोचे २५ हजाराहून जास्त कर्मचारी आहेत. ओयोचा हा पसारा ८० देशातल्या ८०० शहरात पसरलाय. २०१९ मधे ओयोचा महसूल ९५१ मिलियन डॉलर्स इतका प्रचंड होता. ओयो अॅप हे जगातलं हॉटेल बुकिंग क्षेत्रातलं सर्वाधिक वापर होणारं तिसऱ्या क्रमांकाचं ॲप आहे.

ग्राहकांचं समाधान यातच आमचा देव हे वाक्य आपण आजपर्यंत अनेक दुकानांमधे वाचत आलोय. पण दुकानात हे वाक्य लावून तिथे ग्राहकांची जास्तीत जास्त कशी हेळसांड होईल याचीच पुरेपूर काळजी घेतली जाते. नेमकी हीच बाब हेरून ओयो कंपनीनं ग्राहकांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचं ठरवलं. त्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून बुकिंग पटकन आणि सहज व्हावं अशी सोय केली गेलीय.

हेही वाचा : नदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत?

व्यवसायाची दोन सूत्रं कोणती?

चीनमधल्या ऑनलाईन हॉटेल बुकिंग क्षेत्रात ओयो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि युरोपमधे विस्ताराचा प्रयत्न चालू आहेच. २०२३ पर्यंत जगातली सगळ्यात मोठी हॉटेल चेन बनण्याचं ध्येय ओयोनं ठेवलंय. 

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रितेश अगरवाल म्हणतात, ‘सुरवातीला हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना हा व्यवसाय इतका मोठा होईल याची खात्री नव्हती. परंतु ग्राहकांनी ओयोवर दाखवलेल्या विश्वासामुळे इतक्या पटकन हे यश कमवणं शक्य झालं.’ याच मुलाखतीत पुढे रितेश व्यवसायातल्या यशाची दोन सूत्र सांगतात.

व्यवसाय लवकरात लवकर सुरू करावा हे पहिलं सूत्र. त्यात लगेच अपयश आलं तरी चालेल कारण पहिल्या वेळी अपयश आल्यास झालेल्या चुकांतून शिकण्याची संधी मिळेल.

कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर चांगली टीम तयार करणं आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं आवश्यक आहे, हे दुसरं सूत्र.

ओयोच्या स्थापनेनंतर न्यूयॉर्क टाइम्सने भविष्यात यशस्वी होण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ओयोला समाविष्ट केलं होतं. २०१८ मधे इकॉनॉमिक टाइम्सने ओयोला 'स्टार्ट अप ऑफ द इयर' चं मानकरी ठरवलं होतं. तर २०१९ मधे ओयो भारतातली दुसऱ्या क्रमांकाची 'मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनी' ठरली होती.

एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी अर्ध आयुष्य खर्ची घालावं लागतं हा सर्वसाधारण समज आहे. पण अनेकांनी हा समज खोटा ठरवलाय. रितेश अगरवाल हे त्यापैकीच एक. बिजनेस माईंड, सातत्य, नाविन्य, कष्ट करण्याची आणि रिस्क घेण्याची क्षमता, धाडस, मार्केटचा अभ्यास, कोणत्याही समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता यांच्या जोरावरच रितेश आज स्वतःच्या हिमतीवर अब्जाधीश झालेत. यशाला वय नसतं, हेच आपण रितेशच्या उदाहरणावरून जगाला सांगू शकतो.

हेही वाचा : 

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार?

कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त

सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला