प्रिय `पु.ल.` आजोबा, आम्ही तुम्हाला मिस करतोय

०९ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी. आजही मराठीत पु.ल.च बेस्टसेलर लेखक आहेत. सर्वात लोकप्रिय स्टँड अप  आहेत. आजची तरुण पिढीही त्यांना मिस करतेय.

प्रिय `पु.ल.` आजोबा,

आज तुमचा वाढदिवस! आमच्यासाठी आनंददिवस. तुमच्या वाढदिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा वाढदिवस खूप खास आहे कारण तुमचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. बेंबट्या जोशीच्या भाषेत सांगायचं तर 'नेट पॅक रिचार्ज करा आणि लोकांचे बड्डे साजरे कराSSS', अशी काळानुरूप वेळ आलेली असतानाही तुमचा बड्डे मला आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी माणसांना थोडं हळवं व्हायला भाग पाडतो. तुम्हाला वाटेल, 'का बुवा? हळवं का?' तर तुमच्या निखळ निरागस विनोदाची प्रचंड गरज असताना तुम्ही सदेह नाहीय आमच्यात म्हणून.

'पु.ल. आपल्या साहित्यरूपाने अमर झाले आहेत,' वगैरे सखाराम गटणेछाप वाक्यं  बोलायला ठीक आहेत हो, पण सांप्रतकाळी जी विनोदनिर्मिती होते आहे ती बघता तुमचं सदेह असणं खूपच गरजेचं वाटतं. त्यामुळे तुमच्या वाढदिवसाला आणि तुम्ही गेलात तो दिवस, या दोन्ही दिवशी खूप हळवं व्हायला होतं. तुमच्या काळात माणसं कुणाच्यातरी आठवणीनं हळवी झाली की पत्रं लिहायची. मनातल्या भावनांना वाट करून द्यायची. हे पत्र त्याच प्रकारचं आहे. अनावृत्त पत्र म्हणून एक भानगड आहे मराठीत, तसलं काहीतरी आहे हे.

तुम्ही आम्हाला काय दिलं किंवा सखाराम गटणेच्या भाषेत सांगायचं तर 'तुमच्या साहित्यरुपी वटवृक्षाच्या छायेखाली अनेक पांथस्थ येतात. पण त्याची वटवृक्षाला काय कल्पना! तर ती कल्पना तुम्हाला नव्हे तर ती जाणीव स्वतःला करून द्यावी म्हणून हा पत्रप्रपंच.

आजोबा, तुम्ही आम्हाला निर्मळ हसायला शिकवलं. आपण खूपदा हसतो. भरपूर आनंद झाल्यावर.  कोणाची तरी फजिती केली किंवा झाली तर. कोणाचा तरी अपमान झाल्यावर किंवा असेच काहीसे प्रसंग आल्यावर. यातून एक नैसर्गिक प्रवृती दिसते ती म्हणजे इतरांची फटफजिती झाली की आपण हसतो. यामागे नेमकी काय भावना असते वगैरे सायकोलॉजिकल भानगडी राहुद्यात. पण यामधे निर्मळ हसू क्वचित असतं.

म्हणून जो आपल्या चेहऱ्यावर निर्मळ, निखळ हसू आणतो तो खूप ग्रेट असतो आपल्यासाठी. चार्ली, लॉरेल अँड हार्डी, हल्ली मिस्टर बिन हे सगळे आम्हाला खूप खूप आवडतात. कारण त्यांचे सगळे विनोद स्वतःवर असतात. स्वतःचा वेंधळेपणा दाखवून त्यातून विनोद निर्माण करणारे असतात. तुम्ही अगदी हेच मराठी साहित्य-नाटक-सिनेमांतून केलं.

तुमचा विनोद कोणाचीतरी खिल्ली उडवावी यापेक्षा माणसाच्या जगण्यातील विसंगती आणि दांभिकता यावर चिमटे काढणारा होता. आणि चिमटेही कसेंतर पेस्तनजींच्या बायडीने पेस्तनजींना काढलेल्या चिमट्यांसारखे. या चिमट्यांनी वेदना कमी आणि सुख जास्त मिळतं.

तुमचा धोंडो भिकाजी जोशी असो किंवा नाथा कामत, अंतूशेठ असो किंवा नारायण, शिव्यांचा अखंड कानडी झरा रावसाहेब असोत किंवा आमचा मधु मलुष्टे असो, हरितात्या असोत किंवा पेस्तनजी, बबडू असो किंवा चितळे मास्तर आणि सगळ्याच व्यक्ती, वल्ली आणि तुम्ही तुमच्या पुस्तकं, नाटक आणि सिनेमे यातून उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा खूपखूप हसवतात. शेवटी हृदयात एक बारीकशी कळ उठवून जातात.

हल्ली विनोद म्हणजे फक्त 'जबड्यांचा व्यायाम' बनत असताना तुमचा विनोद जबड्यासोबतच मेंदूलाही व्यायाम देतो आणि तोही योगासारखा. मोठाल्या महागड्या जिममधल्या एक्सरसाईजसारखा नाही हं!

तुमचा किंवा एकंदरीतच निखळ विनोद समजून घेणं, हे हसण्यावारी नेण्याइतकं सोप्पं नसतं. मग तुमचे विरोधक `पु.ल. आऊटडेटेड झालेले आहेत`, `पु.ल. म्हणजे ओव्हररेटेड साहित्यिक` असे भयंकर विनोद करून स्वतःच हास्यास्पद ठरतात. हेच बघा न, `अरें भाषण कसले देतोंस... राशन दे राशन...` असं म्हणणारा 'अंतू' आजच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराच्या संदर्भात कधी नव्हे इतका काळाशी सुसंगत वाटतो आणि आजच्या परिस्थितीत अगदी फिट्ट बसतो

पु.ल. आऊटडेटेड झाले असतील तर मग नवीन आणि काळाशी सुसंगत विनोदी साहित्याची निर्मिती करायला हवी ना टीकाकारांनी ? पण जिथं विनोद समजतच नसतील तर त्यात नवनिर्मिती व्हायची तरी कशी? आता हेच बघा ना,

`...आणि इथे ही मुख्याध्यापिका स्वतःचाच शेपटा खेळवत बोलत होती आणि तेही ओठाला ओठ न लावता......स्वतःच्या !`

आता तुमच्या या वाक्यात विनोद नेमका कुठं आहे हे कळलं पाहिजे. सरोज खरेमधे आहे की तिच्या लिपस्टिक्ड मराठीमधे आहे की तुम्ही 'ओठ' आणि 'स्वतःच्या' या दोन शब्दांत घेतलेल्या दीड दोन सेकंदांचा पॉजमधे आहे, हे कळायला हवं ना?

ज्याला पॉजमधे विनोद आहे, हे कळतं, तो वाह्यात विनोद करू धजत नाही. मुळात, तुम्हाला कुठं पॉज घ्यायचा आणि कुठे स्टॉप घ्यायचा हे परफेक्ट कळायचं म्हणून तुम्ही पु.ल. होतात. ज्यांना कळत नाही, असे विपुल होऊन गेले आणि होताहेत. तुमच्या अढळपदाकडे पाहून होणारा मत्सर जिथंतिथं व्यक्त करताना दिसताहेत.

आजोबा, तुम्ही आमच्यासाठी अजून काय केलं सांगू? तुम्ही आमच्या चिंता, स्ट्रेस, जगण्याची आवश्यक धडपड आणि त्यातून येणारी अस्वस्थता या सगळ्यातून निखळ हसू टिकवून ठेवलंत.

'दुःखं, दगदग, अडचणी विसरण्यासाठी भरपूर हसायला हवं', असली सायकॉलॉजिकल भानगड तुमच्या काळात अस्तित्वात नव्हती. लोक साध्या प्रसंगावर, एकमेकांच्या आणि स्वतःच्याही रोजच्या जगण्यातील विसंगतीवर हसायची आणि विशेष म्हणजे दुःखं फार मोठी होती आणि असलीच तर ती दूर करायला विनोद केलेच पाहिजेत अशी वेळ आलेली नव्हती की गरज बनली नव्हती.

पण काळानुरुप जगण्याचे संदर्भ, आयुष्याची गणितं बदलत गेली. आणि आयुष्यात बेरीज-वजाबाकी-भागाकार यायला लागला आणि जगणं बोअरिंग व्हायला लागलं तसं मग खळखळून हसण्याचं महत्व पटायला लागलं, पण त्यामुळे विनोद थोडासा बिघडत गेला. कोणतीही गोष्ट गरज बनली की त्या गरजेचा धंदा व्हायला लागतो. मग ती गरज कशीही पूर्ण करण्याकडे भर दिला जातो. मागणी तसा पुरवठा, हे हल्लीचं तत्त्व विनोदाला अधिकाधिक हास्यास्पद होत जातोय. अशावेळी तुमचा विनोद मात्र सुखद जाणीव करून देतो.

आजोबा, तुमच्या विनोदानं , 'विनोद ही जाणीव आहे, गरज नव्हे' हेच अधोरेखित केलं आहे. हल्ली विनोदाने माणसं एकमेकांची शत्रू होतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, इतका तो बिघडलाय. अशावेळी तुमचा विनोद माणसं जोडून ठेवतोय. अगदी टेक्नोसॅव्ही पिढीलाही. म्हणजे, हल्ली सोशल मीडियावर 'आयटी'तली आणि ऐटीतली माणसंदेखील तुमच्या विनोदाने एकमेकांशी सहज जोडली जातात.

तुम्हीच म्हणायचात, `माणूस हसला की आपला झाला.` अगदी तसंच आहे हे. ओठांवर स्मितरेषा आणणारा हवा, दोन माणसांच्यातील सीमारेषा वाढवणारा नव्हे. तुमचा विनोद अशा सीमारेषा मिटवणारा आहे.

हे झालं साहित्याचं, याजोडीला तुमची नाटक, सिनेमे, संगीत यातील चौफेर मुशाफिरी देखील आनंदाचा एक प्रचंड मोठा ठेवा आहे. म्हणजे 'बटाट्याच्या चाळी'तील एच्च. मंगेशराव आणि वरदाबाईंची 'तुम बिन मोरी' गाऊन तुम्ही आमचं हसून हसून पोट दुखवता. तुम्हीच 'नाच रे मोराया गदिमांच्या बालगीताला संगीत देऊन लहान मुलांना आनंदाने नाचायला लावता. तुम्हीच पाडगावकरांच्या 'माझे जीवनगाणे' संगीतबद्ध करून जीवनाचे सार संगीतमय करून टाकता. तुम्हीच 'शब्दावाचून कळले सारे' यातून आम्हा तरुणांच्या भावनांना संगीत देताना त्यातल्या 'मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले' यावर आम्हाला 'महिवरून' टाकता. तुम्हीच अगदी नास्तिक असून सुद्धा 'इंद्रायणी काठी' मधून वारकऱ्यांच्या भक्तीश्रद्धेला अगदी आमच्या विठ्ठलातुकेच साजिरे सूर देता.

मराठी समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी तुम्ही काही ना काही दिलं आहे. हे असं किती लोकांना जमतं हो, सगळ्यांना जे हवं ते देणं? तुम्ही अगदी लीलया केलंय हे सगळं, याचं कारण तुम्हाला स्वतःला त्यातून मिळणारा निर्मितीचा आनंद आणि सुखाची अनुभूती.

तुमच्या 'वाऱ्यावरची वरात' मधलं 'दिहिल देहेके देखो, मुहुजे महत रोहोको, मुहुजे पिलाहो एहेक कहप कोहोको' ऐकलं कि हातातलं काम सोडून नाचावं वाटत हो. बोरकरांच्या कविता तुम्ही आम्हाला इतक्या सुंदर समजावून दिल्या की 'पुलंनी बोरकरांच्या कवितांचं वाचन' केलं या चार शब्दांत ती घटना सांगणं हा नतद्रष्टपणा ठरतो.

आजोबा, हल्लीच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही मराठीतले पहिले 'स्टँडप कॉमेडीयन' होता आणि एकमेव दर्जेदार देखील. पण ते 'कॉमेडीयन' म्हणजे अगदीच हलका शब्द वाटतो तुमच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढे. खरंतर तुमच्या अष्टपैलू व्यक्तित्त्वापुढे साष्टांग नमस्कार घालण्यापालिकडे काहीच करू नये असंच खूपदा वाटतं.

किती आणि काय काय सांगावं तुमचं कर्तृत्व? अजून खूप खूप सांगावं वाटतं हो तुम्हाला, पण मग हे पत्र कमी आणि 'वर्तमानपत्र' जास्त वाटेल. (हसा ना हो, तुम्ही विनोदी लेखक दुसऱ्यांच्या विनोदांना हसतच नाही का? आठवलं का कोण ते?)

तुमच्या साहित्य, कला, नाटक, सिनेमा, संगीत इत्यादी क्षेत्रातल्या तुमच्या योगदानाबद्दल तुमचं कौतुक करायला, आभार मानायला शंभर वर्षदेखील कमी पडावीत इतकं सगळं करून ठेवलं आहे हो तुम्ही. एका वाक्यात सांगायचं तर , 'तुम्ही आम्हाला निर्मळ हसायला शिकवलं'

सोशल मीडियाच्या उत्क्रांतीनंतरची विनोदाची वाटचाल अजूनच गंभीर झालीय. वाटचाल आहे की विनोदाचा अंतिम प्रवास वेगाने सुरू झालाअसा प्रश्न पडावा इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालीय. म्हणजे सोशल मीडियावर टाकावा म्हणून विनोद निर्माण करावा, लिहावा तर तो विनोद लिहिताना त्यातील शब्दांच्या संख्येइतक्याच स्मायलीज, ईमोजी वगैरे टाकाव्या लागतात आणि इतकं करूनही समाधान होत नसल्यानं पुढे 'हाहाहाहाअसं हसण्याचं आवाहन करणारी अक्षरं लिहावी लागतात. सोबत कुठल्यातरी असाध्य रोगावरच्या गोळ्यांची किंवा हॉलिवूडमधल्या स्कायफाय सिनेमांची नावं वाटावी असे 'lol', 'lolz', 'ROFL'   इत्यादी शब्द देखील टाकावे लागतात. तेव्हा कुठं तो विनोद वाचणारी माणसं हसण्याची थोडीफार शक्यता निर्माण होते.

एकेकाळी दर्जेदार विनोदाची परंपरा असलेलं मराठी साहित्य-कलाविश्व आज उत्तम विनोदासाठी अक्षरशः दीनवाणं झालं. आता आपण कोणत्याही विनोदावर हसू लागलो  आहोत. 'सेन्स ऑफ ह्युमर' हा नॉन्सेन्स होऊ लागलाय. आपली सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती गंभीर आहेच, आणि याकाळात चेहऱ्यावर हसू आणायला उपयोगी पडणाऱ्या विनोदाचीही परिस्थिती गंभीर अशीच आहे. आपण केवळ परिस्थितीवर सूड उगवायचा म्हणून कोणत्याही विनोदावर नुसते हसत सुटलो आहोत.

थोडक्यात, आपण आणि आपला विनोद दिवसेंदिवस अधिकाधिक हास्यास्पद होत चाललो आहोत. असोच! आजोबा, नको हे चिंतन वगैरे, बस्स झालं! आम्हाला खळखळून हसवणाऱ्या वल्लीला हे असं गंभीर पत्र लिहू नयेच!

आजोबा, एक इच्छा आहे. तुम्ही, आमच्या उपदेशपांडे आज्जीबाई, बेंबट्या सहकुटुंब सहपरिवार, अंतूशेठ, दामले मास्तर, चितळे गुरुजी, सख्या, नाथा कामत, बबडू, नारायण, रावसाहेब, पेस्तनजी, हरितात्या, कायकेनी गोपाळ, अप्पा भिंगार्ड्या, मधु मलुष्टे, एखादी सुबक ठेंगणी, उस्मानशेठ, बगूनाना, झंप्या दामल्या, एच्च. मंगेशराव, वरदाबाई इत्यादी इत्यांदींसोबत 'त्नांग्री ते मुंबई' एसटी प्रवास करायचाय. ती म्हैस आडवी येईपर्यंत.

तुम्ही याल ना त्या बस मधून?

वाट बघतोय तुमच्या उत्तराची !

 

तुम्हाला आजोबा मानलेल्या लाखों नातवांपैकी एक नातू

सुहास

(कृपया अक्षरांस हसू नये, म्हणण्याची सोय आता राहिली नाहीय, हेही विशेष.)