सारनाथ इथल्या सिंहमुद्रेचं बदललेलं स्वरुप नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या आवारात उभारलं गेलंय. त्यावरून वाद निर्माण झालाय. ही सिंहमुद्रा वर वर सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेसारखी दिसत असली तरी त्यात असलेले सिंह निरंकुश सत्तेची लालसा, त्यासाठीचा आक्रमपणा, होणारी हिंसेची जरब दाखवून, माणसांमधे भीती अविश्वास पेरणारे असल्याचं मतं संजय सोनवणे व्यक्त करतात. त्यांची ही फेसबुक पोस्ट.
बुद्ध धम्मातल्या सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेतल्या चार सिंहाचं प्रतिक निश्चितच उर्जा, शक्ती, संयम, शांतता आणि शौर्याचं आहे. पण या शौर्यामागे संरक्षण आहे आक्रमकता नाही, दुसऱ्यावर विजय मिळवण्याचा आणि त्याला आपल्या कह्यात घेण्याचा अहंकारही या सिंहाला नाही. हा सिंह आक्रमक, भीती दाखवणारा, हिंसक नाही म्हणूनच त्या मूळ सिंहाखाली धम्मचक्रासोबत बैल, हत्ती आणि घोडा हे गवतभक्षी प्राणीही सोबतीला आहेत, कारण त्यांचा या सिंहाच्या ताकदीसोबतच त्याच्या विवेकावरही विश्वास आहे.
नव्याने बनवलेल्या रागीट, हिंसक, संतापलेल्या आणि सत्तेचा अहंकार असलेल्या तसंच इतरांना घाबरवण्यासाठी सिंहनाद छेडणाऱ्या आक्रमक सिंहाच्या जवळ हे कमी ताकदीचे प्राणी तरी का थांबतील? ते पसार होणार नाहीत का? सारनाथच्या अशोक स्तंभातही सिंह हा लोकशाही आणि त्यावरच्या जनतेच्या विश्वासाचं प्रतिक आहे. त्यामुळे हे प्राणी सारनाथच्या सोज्वळ सिंहाच्या पायथ्याशी शोभून दिसतात. नव्याने बनवलेल्या संतापलेल्या सिंहाच्या पायाजवळ हे प्राणी थांबतील तरी का? हा परस्पविरोध नव्या सिंहमुद्रेत स्पष्ट दिसतो.
हेही वाचा: ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त
सारनाथमधले सिंह संयमी आणि शांत आहे. बुद्धानेही स्व, व्यक्ती दुर्बल आणि समाजाच्या संरक्षणाला नाकारलेलं नाही. बुद्धाने जीव हत्येचे समर्थन केलेले नाही. पण जीवहिंसा ही व्यक्तीगत अहंकाराने प्रेरित नसावी, अशी हिंसा अखेरचा पर्याय म्हणून जरी असली तरी त्यामागची कारणं किंवा होणारी हिंसा हा प्रतित्य समुप्पाद सिद्धांतातल्या आधीच्या घटनेचा परिणाम असल्यामुळे आधीची घटनेच्या अनुषंगाने होणारी हिंसा टाळण्यासाठी ही साखळी तुटायला हवी. ही बुद्ध शिकवण आहे.
न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं।
अवेरेन च सम्मन्ति एस धम्मों सनन्तनों।
विकार, द्वेष आणि बदल्याची भावना ही पुढच्या हिंसेची साखळी मजबूत करते, यापासून अलिप्त राहाण्याची शिकवण म्हणजेच बुद्धांचा धम्म. हिंसेला कारण ठरणारी कारणं, आसक्ती, अहंकार, विकार, द्वेष, ईर्ष्या अशी असू शकतात. त्यांचं विरेचन, शिकण्याची पद्धती म्हणजे धम्म.
सिंहांच्या हिंसेची कारणं वेगवेगळी आहेत. नैसर्गिक अन्नाची भूक, मादीला आकर्षित करण्यासाठी इतर सिंहांसोबत होणारं युद्ध, स्वतःच्या जीवाला आणि संततीला धोका वाटल्यास सिंह आक्रमक होतो. तरीही सिंहापेक्षा हत्ती हा शक्ती, अहिंसेमुळे बुद्ध तत्वाच्या जवळ जाणारा प्राणी मानला जातो, त्याची छबीही उद्या आक्रमक आणि हिंसक दाखवली जाऊ शकते. असो. विषय सिंहाचा आहे.
सिंह चालून गेल्यावर झालेल्या प्रवासाचे मागे पडलेल्या वाटेकडे पाहतो, हे अवलोकन करणं म्हणजे सिंहावलोकन म्हटलं जातं. धम्मामधे मानवी विकार त्यांची दुःखाला कारण ठरणारी कारणं यांचंही असंच सिंहावलोकन करण्यात आलंय. ज्या वनात सिंह असतो, ते वन निसर्गसाखळीत परिपूर्ण मानलं जातं.
त्याअर्थानेही बुद्ध धम्म हा सिंहासारखाच मानवी आणि समग्र जीवांसाठी जीवनतत्व म्हणून निसर्गजीवनात परिपूर्ण मानला जातो. म्हणूनच सारनाथ इथल्या सम्राट अशोकाने उभारलेल्या धम्म स्तुपावरची सिंहमुद्रा शांत, संयमी आणि उर्जेची प्रतिक आहे.
हेही वाचा: बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?
सिंहाला कुणावरही विजय मिळवल्याचा अहंकार नसतो. सिंहनाद हा इतर प्राण्यांना भीतीखाली ठेवण्याचा इशाराही नसतो, मुळातच वनात सर्वशक्तीमान प्राणी सिंह असल्याने त्याला स्वतःची तुलना इतर कोणत्याही प्राण्याची करण्याची गरज नसावी आणि सिंहनाद करून आपण शक्तीशाली असल्याचं जगाला दाखवण्याच्या कारणाचीही सिंहाला गरज नसते.
सारनाथ इथल्या सिंहमुद्रेचं जे बदललेलं स्वरुप नव्याने उभारलेल्या संसद भवनाच्या आवारात उभारलेलं आहे, ते जाणीवपूर्वक आहे. संदर्भ, भाषेचे अर्थ बदलल्यास इतिहास बदलणं सोपं जातं, जसं की सातत्याने दशकानुदशके कानावर पडल्यामुळे फोटोकाॅपीला झेराॅक्स म्हटलं जातं, झेराॅक्स हे फोटोकाॅपी काढणाऱ्या मशीनच्या ब्रँडचं नाव आहे. जे आज फोटोकाॅपीला पर्यायी झालेले आहे. असंच लोखंडी कपाट म्हणजे गोदरेज, बिस्लेरी म्हणजे हवाबंद बाटलीतलं पाणी.
येणाऱ्या शंभर वर्षानंतर नव्याने उभारलेली सिंहमुद्रा म्हणजेच बुद्धांच्या धम्माची सिंहमुद्रा असा त्याचा अर्थ बदलला जाण्याचा धोका आहे. मूळ सिंह मुद्रा अशी बदलल्याने येत्या काळात बुद्धांचा धम्मही आक्रमक, हिंसेचा पुरस्कार करणारा, अहंकारी असल्याचा विचार पेरण्याचा मार्ग यातून मोकळा होण्याची भीती आहे. हा इतिहासालाच असलेला सर्वात मोठा धोका आहे. त्यानंतर समकालीन वर्तमान आणि भविष्याचा विचार न करणाऱ्यांना अशा बदललेल्या इतिहासाच्या तथाकथित शौर्याची उदाहरणं देऊन भ्रमित करणं सहज शक्य होतं, जे आजही सुरू आहे.
आपल्या देशातले बहुसंख्य लोक आपल्या वर्तमानातल्या दुर्दशेबाबत इतिहासालाच दोष देण्यात धन्यता मानतात आणि आपल्या वर्तमानातल्या दुर्दशेला दूर करण्याचा प्रयत्न टाळून याआधीच्या काळात आम्ही किती श्रेष्ठ आणि धनवान, शक्तीशाली होतो अशा इतिहासात रमणे पसंद करतात, अशा मानसिकतेसाठीही नव्याने दाखल झालेली सिंहमुद्रा कमालीची धोकादायक ठरू शकते.
भारतातून बुद्ध धम्म कमी झाला, याचं कारणच मुळी बुद्ध धम्म इतर तथाकथित सांप्रदायांप्रमाणे आक्रमक नव्हता हेच आहे. पण त्यामुळे बुद्ध धम्म हा सत्तेच्या राजकारणाचा कधीही पाया राहिला नाही, हे ही त्यातून सिद्ध व्हावं. धम्म मानवी मन आणि निसर्ग यांना जोडणारा दुवा आहे. त्यात अहंकार, ईर्ष्या, दुस-यावर विजय मिळवण्याची आणि इतरांना आपल्या ताब्यात घेण्याची अर्थात सत्तेची लालसा नाही. म्हणूनच सारनाथ इथल्या अशोक स्तंभावरच्या मूळ सिंहमुद्रेमधे हे भाव नाहीत.
हा केवळ निर्जीव सिंहमुद्रेच्या पुतळ्याचा विषय नाही. ज्यांनी याविपरित भाव असलेली सिंहमुद्रा साकारलेली आहे. ती वर वर सारनाथच्या मूळ सिंहमुद्रेसारखी जरी दिसत असली तरी त्यात असलेले सिंह निरंकुश सत्तेची लालसा, त्यासाठीचा आक्रमपणा, होणारी हिंसेची जरब दाखवून, माणसांमधे भीती अविश्वास पेरणारे आहेत. त्यासाठी मानवी अहंकारातून आव्हान देणारे आहेत, नव्याने बनवलेले हे सिंह बुद्धाच्या आणि लोकशाहीच्या शिकवणीचे शिलेदार नक्कीच नाहीत. लोकशाहीत नागरिकांना अर्थात सिंहमुद्रेतल्या बैल घोडा यांना राज्यकर्ते, सरकार यांची म्हणजेच सिंहाची भीती वाटता कामा नये, हा सिंह भीती दाखवतो.
हेही वाचा:
६ डिसेंबर १९९२ला नेमकं काय झालं?
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग १
एका उद्ध्वस्त मशिदीची गोष्ट : भाग २