पंतप्रधानांना देशातल्या तिन्ही सैन्यदलांचा एकच प्रमुख का हवाय?

१६ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सातव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण दिलं. यावेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. तिन्ही सैन्य दलांमधे समन्वय साधण्यासाठी नवं पद निर्माण केलं जाणार आहे. त्यांच्या या घोषणेकडे सैन्यदलांमधली खूप मोठी सुधारणा म्हणून बघितलं जातंय.

काल १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन. प्रथेप्रमाणे दरवर्षी आपले पंतप्रधान दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून भाषण करतात. २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेत आलं. तेव्हापासून एक बदल झाला. १५ ऑगस्टच्या महिनाभर आधी पंतप्रधान देशातल्या लोकांना विचारतात की भाषणात कोणत्या विषयावर बोललं पाहिजे.

मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

लोकांकडून आलेल्या सूचना आणि सध्याची स्थिती लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरवून भाषण बनवलं आणि नरेंद्र मोदी यांनी ते सादर केलं. बऱ्याचदा त्यांनी भविष्यात होणाऱ्या गोष्टींची हिंटही आपल्या भाषणातून दिली. कधी स्वानुभव सांगितला. कालचं त्यांचं भाषण हे ९२ मिनिटांचं होतं. यावेळी देशातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

७३ व्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी आपल्या सैन्य दलांचं भरभरून कौतुक केलं. आणि सुरक्षा दलांमधील सुधारण हा विषय काढला. येत्या काळात तिन्ही संरक्षण दलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस हे पद नव्याने बनवलं जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. गेल्या काही वर्षांत अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आणि चीन या देशांनीसुद्धा सीडीएसची नेमणूक केलीय. याचं यादीत आता भारताचंही नाव जोडलं जाईल.

हेही वाचा: अभिनंदन यांना वीर चक्र, जवानांना कोणकोणते पुरस्कार मिळतात?

म्हणून संरक्षण दले प्रभावी काम करतील

संकटाच्या काळातही देशात शांतता ठेवण्यासाठी सर्व जवानांनी आपल्या आयुष्यातला वर्तमानकाळ देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अर्पण केलाय. त्या सर्वांना मी सलाम करतो असं मोदी भाषणात म्हणाले. मात्र त्याचबरोबर योग्यवेळी सुधारणा करण्याचीही गरज असल्याचं ते म्हणाले.

आपल्या देशात बऱ्याच काळापासून संरक्षण दलांमधील सुधारणांवर चर्चा सुरू होती. आणि भरपूर आयोगांनी दिलेल्या अहवालांमधेही काही गोष्टी हायलाईट केल्या होत्या. आपल्या सुरक्षा दलांमधे आणखी चांगला समन्वय निर्माण करण्यासाठी सुरक्षा दल प्रमुखाचं पद निर्माण करावं अशी सूचना अहवालांमधे केली. असं केल्यास संरक्षण दलं आणखी प्रभावी पद्धतीने काम करतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हेही वाचा: जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

सैन्याला एकत्र यावं लागेल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ मधे युद्ध झालं. ६५ दिवस चाललेल्या या युद्धात भारताने विजय मिळवला. पण नुकसानही भरपूर सहन करावं लागलं. ज्यावेळी २००१ मधे युद्धाचं विश्लेषण करण्यात आलं. त्यावेळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि मंत्र्यांनी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली, ती म्हणजे तिन्ही दलांमधे समन्वय नव्हता.

सुरक्षा दलं एकमेकांना हवी तेवढी एकमेकांस पूरक ठरली नाहीत. म्हणूनच देशाला एवढं नुकसान सहन करावं लागलं. त्यावेळी पहिल्यांदा चीफ ऑफ डिफेन्स हे पद असावं असं म्हटलं गेलं. मात्र यावर पहिल्यांदा सेनेतल्याच अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सुचना रेंगाळली, अशी माहिती इंडिया टुडेने आपल्या वेबसाईटवर दिलीय.

लष्कर, नौदल आणि वायू दल या तिन्हीमधे समन्वय गरजेचा आहे. आज जसं जग बदलतंय तसं युद्धाचं स्वरुप आणि क्षेत्रही बदलतंय. तंत्रज्ञान आधारीत व्यवस्था निर्माण होत आहेत, अशावेळी भारतालाही तुकड्या तुकड्यांमधे विचार करुन चालणार नाही. आपल्या संपूर्ण सैन्य शक्तीला एकत्र येऊन एकाच दिशेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा: पुरुषोत्तम बोरकरांचं जगणं वावटळीतल्या दिव्यासारखं

सैन्य दलांना प्रभावी नेतृत्व मिळेल

२०१२ मधे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. नरेश चंद्र यांच्या टास्क फोर्स समितीने चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी बनवण्याचं सुचवलं होतं. याचा उद्देश्यही तिन्ही दलांमधे समन्वय राखणं हाच होता. या स्टाफ कमिटीत नौदल, हवाईदल आणि लष्कर या सैन्यदलांचे प्रमुख असतील.

तिन्ही दलांच्या प्रमुखांपैकी सगळ्यात सिनियर असेल त्यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचं अध्यक्ष बनवावं. सध्या एअर चीफ मार्शल बीएस धनोआ हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष आहेत. पण त्यांच्याकडे कोणतीच पॉवर नाही. त्यामुळे तिन्ही दलांची परिस्थिती जैसे थे आहे.

‘चीफ ऑफ डिफेन्स’ पदाची निर्मिती झाल्यानंतर तिन्ही सैन्य दलांना एक प्रभावी नेतृत्व मिळेल. २०१६ मधे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना याबद्दलचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे देण्यात आला होता. तसंच फेब्रुवारी २०१८ मधे संसदेतही हा मुद्दा उचलण्यात आला होता. खरंतर गेल्या तीन महिन्यांपासून संरक्षण मंत्रालय यावर काम करतंय. या प्रमुखांचा दर्जा हा कॅबिनेट सचिवाएवढा असेल, अशी शक्यता द प्रिंट वेबसाईटने व्यक्त केलीय.

आणि शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येताहेत. येत्या काळात कशाप्रकारे चीफ ऑफ डिफेन्सचं कार्य चालेल हे समजेलच.

हेही वाचा: 

पाकिस्तानातल्या कलाकारांच्या स्मृती जतन करायला हव्यात

मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?

टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे

वाजपेयींसोबत काम केलेले दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद