बॅडमिंटनमधली ‘सिंधू संस्कृती’ ऑलिम्पिकमधेही पोचावी

३० जुलै २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे पी. वी. सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारं आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता २०२४मधे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.

जागतिक क्रमवारीमधल्या अवल दर्जाच्या खेळाडूंना कधी कधी निराशाजनक कामगिरीला सामोरं जावं लागतं. पण अशा कामगिरीने मनाचा संयम आणि समतोल ढळू न देता हे खेळाडू पुन्हा जिद्दीला अफाट कष्टाची जोड देत विजयपथावर येतात. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणार्‍या पी. वी. सिंधू हिने पराभवाच्या मालिकेनंतर नुकतीच सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आणि पुन्हा स्वतःला विजयपथावर नेलंय. यंदाच्या मोसमात होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांच्या द‍ृष्टीने तिचं हे यश अपेक्षा उंचावणारंच आहे.

हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

दोन्ही स्पर्धा महत्वाच्या

जागतिक स्तरावरच्या बॅडमिंटन स्पर्धांच्या मालिका नेहमीच आव्हानात्मक समजल्या जातात. काही वेळेला या स्पर्धेत ऑलिम्पिक किंवा जागतिक पदक विजेते खेळाडू नसतील, पण भावी काळातल्या काही महत्त्वपूर्ण स्पर्धांच्या द‍ृष्टीने अशा मालिकांमधे विजेतेपद मिळवणं ही इतर खेळाडूंच्या द‍ृष्टीने आवश्यक गोष्ट असते.

यंदाच्या मोसमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन्ही स्पर्धा सिंधूसाठी आणि पर्यायाने भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घेतलं, तर सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे सिंधूसाठी आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य उंचावणारंच आहे.

पुढे ढकलण्यात आलेली आशियाई क्रीडा स्पर्धा आता २०२३मधे होणार आहे. ही स्पर्धाही सिंधूच्या करिअरमधली आणखी एक प्रतिष्ठेची स्पर्धा असणार आहे. या सर्व स्पर्धांमधे तिचं यशापयश आपल्या देशासाठीही महत्त्वाचं आहे. कारण अशा मोठ्या स्पर्धांमधे आपल्या देशाच्या पदकाच्या आशा कायमच एक-दोन खेळाडूंपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.

सिंधूचं सिंगापूर स्पर्धेतलं यश

सिंधूला यंदाच्या मोसमात विजेतेपदाने अनेक वेळेला हुलकावणी दिली आहे. सिंगापूर स्पर्धेपूर्वी हंगामात सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस खुली स्पर्धा या दोनच स्पर्धांमधे तिला अजिंक्यपद मिळवता आलं होतं. मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे बहुतांश परदेशी खेळाडूंनी पाठ फिरवली होती. साहजिकच लुटुपुटुची लढाई ठरलेल्या या स्पर्धेत सिंधूने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिला पराभूत केलं होतं.

स्विस खुल्या स्पर्धेत तिने प्रभावी खेळ दाखवत विजेतेपदावर नाव कोरलं. चीन, दक्षिण कोरिया, जपान या देशांचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमधे अनपेक्षित पण चमकदार कामगिरी करत असतात. काही वेळेला फारसे परिचित नसलेले त्यांचे खेळाडूही अजिंक्यपदावर नाव कोरत बॅडमिंटन पंडितांना आश्‍चर्याचा धक्‍का देतात.

यंदाच्या मोसमामधे सिंधूला काही वेळेला तिच्या मानांकन आणि अनुभवाच्या द‍ृष्टीने नवख्या असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हे लक्षात घेतलं, तर सिंगापूर स्पर्धेतलं विजेतेपद हे तिच्यासाठी आणि पर्यायाने भारतासाठीही अपेक्षा उंचावणारं यश आहे.

हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या देशासाठी पदक मिळवण्याचं हुकमी व्यासपीठ मानलं जातं. यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होतेय. यापूर्वी सिंधूने २०१८ला झालेल्या स्पर्धेत भारताला सांघिक गटात विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. पण या स्पर्धेतल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता. सिंधूकडून यंदा वैयक्‍तिक क्रीडा प्रकारातही सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे.

ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षाच असणार आहे. सहसा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती टिकवण्याच्या द‍ृष्टीने जागतिक विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकेतल्या तीन-चार स्पर्धांमधे भाग घेत नाहीत. अशा खेळाडू या विश्रांतीच्या काळात आपल्या कौशल्यातल्या उणिवा दूर करण्यावर अधिकाधिक भर देत असतात.

जागतिक स्पर्धेत या खेळाडू पूर्ण तयारीनिशी सहभागी होत असतात. हे लक्षात घेतलं, तर सिंधूलाही आतापासूनच या स्पर्धेची भक्‍कम तयारी करावी लागणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधे दोन पदकं मिळवणारी सिंधू ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. २०२४ मधे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतही पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे आहे. आजपर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला वैयक्‍तिक क्रीडा प्रकारांमधे ऑलिम्पिकची तीन पदकं मिळवता आलेली नाहीत. साहजिकच, सिंधूकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.

सिंधूसाठी जमेची बाजू

खरं तर जपान, चीन, इंडोनेशिया, स्पेन या देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत सिंधूला चांगली उंची आहे. त्याचा फायदा तिला परतीचे फटके आणि स्मॅशिंगचे बिनतोड फटके करण्यासाठी होऊ शकतो. नेटजवळ उडी मारून ड्रॉपशॉट्सचा खणखणीत फटकाही ती सहज मारू शकते.

ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक विमलकुमार हे पुण्यामधे काही वर्षांपूर्वी प्रकाश पदुकोण अकादमीच्या कनिष्ठ आणि युवा गटातल्या खेळाडूंना मार्गदर्शन करत होते. एक दिवस त्यांनी या खेळाडूंना सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरच्या हॉलीबॉल क्रीडांगणावर बोलावलं होतं.होते. तिथं या खेळाडूंना त्यांनी, हॉलीबॉलच्या नेटच्यावर हात जाईल अशा उंच उड्या मारायला सांगितलं होतं.

उंच उडी घेऊन स्मॅशिंग किंवा परतीचा फटका मारला, तर त्यावर प्रतिस्पर्धी खेळाडूला उत्तर देणं अवघड जातं हाच त्यामागचा उद्देश होता. हे कौशल्य आत्मसात करणं सिंधूसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सिंधूला काही महत्त्वाच्या स्पर्धांमधे तिच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आघाडी घेण्याबरोबरच ती टिकवणंही महत्त्वाचं असतं.

हेही वाचा: फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

प्लेसिंगचा अंदाज हवा

आजपर्यंत अनेक वेळा सिंधूने महत्त्वाच्या स्पर्धांमधले अंतिम सामने आघाडी घेऊनही गमावलेत. तीन-चार वेळा तर तिने भक्‍कम आघाडी असताना आणि एकतर्फी विजय मिळवण्याची संधी असतानाही पराभव ओढवून घेतला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा सिंधूच्या कोर्टमधल्या कॉर्नरजवळ प्लेसिंग करतात, अशा वेळी या प्लेसिंगचा अंदाज सिंधूला घेता आलेला नाही. या चुका टाळल्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

विजेतेपद मिळवण्यासाठी भक्‍कम आत्मविश्‍वासाची आवश्यकता असते. अंतिम फेरीत सकारात्मक वृत्तीने चेहर्‍यावर आत्मविश्‍वास ठेवून खेळलं पाहिजे, तसा आत्मविश्‍वास तिच्याकडून बरेच वेळेला दिसून आलेला नाही. सिंधूच्या चेहर्‍यावर खूप मानसिक दडपण असल्याचं दिसून येतं. शटल बदलण्याचं निमित्त करून घाम आणि रॅकेट पुसण्याची कल्पकता तिने दाखवली पाहिजे.

यशाचं शिखर गाठण्याचं ध्येय

प्रकाश पदुकोणनंतर ऑल इंग्लंड विजेतेपद मिळवणारा गोपीचंद तयार होण्यासाठी २१ वर्षांचा काळ जावा लागला. आजही पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये ऑल इंग्लंडच्या विजेतेपदासाठी वाटच पाहावी लागत आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी मालविका बनसोड, पूर्वा बर्वे, आकर्षी कश्यप, तारा शहा या उगवत्या खेळाडूंकडे आशेने बघता येऊ शकते.

बॅडमिंटनमधे करिअर करणार्‍या खेळाडूंची संख्या वाढत आहे. त्यांना प्रोत्साहन देणारे पालकही आहेत. अगदी लहान गटापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धांचीही संख्या वाढली आहे.

पदुकोण किंवा गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंनी केवळ स्थानिक स्पर्धांपुरतं आपलं यश मर्यादित न ठेवता सतत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्वोच्च यशाचं शिखर गाठण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. बॅडमिंटनमधे निर्माण झालेली ‘सिंधू संस्कृती’ ही ऑलिम्पिक पदकांची संस्कृती कशी होईल, याचा विचार बॅडमिंटन संघटकांनी केला पाहिजे.

हेही वाचा: 

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

(दैनिक पुढारीतून साभार)