धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक पद्मश्री इब्राहिम मुल्ला सुतार यांचं ५ फेब्रुवारीला निधन झालं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. कर्नाटकासोबतच भारतभर हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा उफाळून येत असताना समन्वयवादाचा पुरस्कार करणाऱ्या इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे.
मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब प्रकरणावरून सध्या कर्नाटक पेटलंय. त्याचे थोडेफार पडसाद आता महाराष्ट्रासोबत देशभर उमटत आहेत. महात्मा बसवण्णा आणि इतर शरणांच्या म्हणजेच लिंगायत संतांच्या भूमीत ‘जय श्रीराम’ आणि ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा परस्पर द्वेषाचा अजेंडा रेटण्यासाठी व्हाव्यात यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.
आजच्या विखारी वातावरणात अधिक गरज असतानाच धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे उपासक इब्राहिम मुल्ला सुतार यांचं जाणं मनाला चटका लावणारं आहे. खरं तर ८१ वर्षांचं समृद्ध आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. शरीराने आणि मनानेही ते खंबीर होते. पण हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांची इहलोकाची यात्रा संपली.
पद्मश्री इब्राहिम सुतार हे मूळचे कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातले होते. त्यांचा जन्म १० मे १९४० रोजी मुधोळ तालुक्यातल्या महालिंगपूरमधे गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे इब्राहिम सुतार यांना शिक्षण घेता आलं नाही. पण फक्त तिसरीपर्यंत शिकले असले तरी ते जगण्याच्या विद्येत पारंगत होते.
लहानपणापासूनच त्यांच्या मनावर महात्मा बसवण्णा आणि शरण परंपरेसह सुफी विचारांचा प्रभाव होता. तेव्हापासूनच त्यांना भजनाची आवड होती. भजन आणि प्रवचन परंपरेला त्यांनी एक वेगळीच उंची दिली. त्यांनी १९७०मधे ‘भावैक्य जानपद संगीत मेळा’ नावाचं एक पथक तयार केलं.
संस्थेच्या नावाबरोबरच महालिंगपूरमधल्या त्यांच्या घराचं नावही ‘भावैक्य निलय’ असं आहे. भावैक्य म्हणजे वेगवेगळ्या भावभावनांमधली एकात्मता, सलोखा. यावरून इब्राहिम सुतार यांचं जीवनध्येय सामाजिक सलोखा, एकात्मता असल्याचं सहज लक्षात येतं. विशेषत: हिंदू-मुस्लिम एकोप्यासाठी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं.
हेही वाचा: महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष
इब्राहिम सुतार यांचं प्रवचन संवादी स्वरूपाचं असायचे. साधारण कीर्तनासारखंच ते प्रवचन करायचे. यात असलेल्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामुळे ते लोकांना खिळवून ठेवायचे. मेळ्यातले इतर सहकारी जनतेच्या मनातले प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तरं देत इब्राहिम सुतार प्रवचन खुलवत न्यायचे. ग्रामीण भाषेचा लहेजा, दैनंदिन जीवनातील उदाहरणं, रूपकं आणि कथा सांगत प्रेक्षकांना हसवत ठेवायची ताकद सुतार यांच्याकडे होती.
कर्नाटकाबरोबरच इतर राज्यातल्या कन्नड भाषिकांसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यांच्या प्रवचनांमधे नर्मविनोदांची पेरणी असायची. बसवादि शरणांच्या वचनांसोबत म्हणी, लोककथा आणि लोकगीतांचा समावेश त्यांच्या प्रवचनात असायचा. त्यांनी वादग्रस्त आणि भडक विधानं कधी केली नाहीत. आयुष्यभर कुठल्याही वादापासून ते दूरच राहिले.
सर्व स्तरांतून आणि वैचारिक समूहातून त्यांना लोकप्रियता मिळाली. अनेक आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या प्रवचनांच्या कॅसेटची निर्मिती केली. बदलत्या माध्यमांचीही त्यांना जाणीव होती. त्यांनी स्वत:ची वेबसाईटही सुरू केली होती. टीवी वाहिन्यांवरील रिअॅलिटी शोमधे ते आवर्जून सहभाग घ्यायचे. रिअॅलिटी शोमधे असणार्या तरुण प्रेक्षकांपर्यंत आपला विचार पोचवायला या प्लॅटफॉर्मचा उपयोग होत असल्याची त्यांची भूमिका होती.
१९९५मधे कर्नाटक सरकारने त्यांना प्रतिष्ठेच्या राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केलं होतं. २०१८मधे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. जनसामान्यांमधे ते ‘कन्नड कबीर’ या नावाने लोकप्रिय होते. पण त्यांनी संत कबीराइतकीही विद्रोही भूमिका कधी मांडली नाही. ते समन्वयवादी होते. शरणांच्या वचनांसोबतच ते वेदांत तत्वज्ञानही सांगायचे.
१९व्या शतकातील महान संत शिशुनाळ शरीफ साहेब यांनी दिलेला सुफी परंपरेच्या लिंगायत विचारांशी समन्वय साधणारा वैचारिक वारसा इब्राहिम सुतार यांनी समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शिशुनाळ शरीफ शिवयोगींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यभावना मांडताना बाराव्या शतकातले अल्लमप्रभू आणि अल्ला यांच्यात साम्य असल्याचा संदेश दिला होता. हे अल्लमप्रभू गोरक्षनाथांचा अहंकार दूर करणारे नाथयोगी होते.
महात्मा बसवेश्वर, संत अक्कमहादेवी आणि अल्लम प्रभू यांना लिंगायत समाज त्रिमूर्तीचा मान देतो. इतकंच नव्हे तर अल्लम म्हणजे देव असंही समजलं जातं. सुतार यांच्या रूपाने शिशुनाळ शरीफ शिवयोगींनंतर ‘अल्लम आणि अल्ला’ एकच असल्याचे सांगणारा दुवा निखळला आहे. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते अल्लमाशी एकरूप झाले. कर्नाटकमधे धार्मिक सलोखा संकटात असताना इब्राहिम सुतार यांचं नसणं अधिक दुःखद आहे.
हेही वाचा:
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?
गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
आजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात? : अरुणा सबाने
(लेखक पत्रकार असून महात्मा बसवेश्वर आणि शरण साहित्याचे अनुवादक आणि अभ्यासक आहेत)