पाकिस्तानमधे लष्कराची सत्ता येणार?

०६ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


पाकिस्तानमधलं इम्रान खान सरकार अल्पमतात आलंय. मागच्या ६ महिन्यांपासून तिथं सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष पहायला मिळतोय. बहुमत डळमळीत झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संकल्प गुर्जर यांनी 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर केलेलं हे विश्लेषण.

सध्या पाकिस्तानात राजकीय संकट आलंय. तिथलं इम्रान खान यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. पाकिस्तानमधे जे काही घडतं त्याचा थेट परिणाम भारताच्या राजकारणावरही होत असतो. त्यामुळे तिथं नेमकं काय घडतंय याकडे भारतासोबत जगाचंही लक्ष लागलंय.

डॉ. संकल्प गुर्जर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. त्यांनी दिल्लीच्या सार्क युनिवर्सिटीतून आंतरराष्ट्रीय संबंधांमधे मास्टर्स केलंय. पाकिस्तानमधल्या सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'थिंक बँक' या युट्युब चॅनेलवर त्यांचं विश्लेषण आलंय. त्यातले काही महत्वाचे मुद्दे.

जून २०१८मधे पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार सत्तेवर आलं. त्याला चार वर्ष पूर्ण होतायत. सरकारची सध्याची स्थिती नाजूक आहे. पाकिस्तानची संसद असलेल्या 'नॅशनल असेंब्ली'तलं सत्ताधारी इम्रान खान यांचं बहुमत डळमळीत झालंय. त्यामुळे कदाचित इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागण्याची चिन्ह आहेत.

पाकिस्तानमधे सरकार पडलं तर नवं सरकार बनेल. कुणालाच सरकार बनवता आलं नाही तर पुन्हा निवडणुका होतील. त्यामुळे पाकिस्तानमधे राजकीय अस्थिरतेचा नवा अध्याय सुरू झाल्याचं सध्याचं वातावरण आहे. गेले काही महिने हे संकट सुरू होतं. अविश्वासदर्शक ठरवामुळे त्याची उत्कंठा शिगेला पोचली होती.

पाकिस्तानमधल्या अस्थिरतेची कारणं

२०१८ला पाकिस्तानमधे इम्रान खान सरकार सत्तेत आलं. त्यावेळी 'नवा पाकिस्तान' घडवणं हा त्यांचा प्राथमिक अजेंडा होता. भ्रष्टाचारविरोध हे त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचं एक महत्वाचं अंग होतं. त्यावेळी इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचं मानलं गेलं होतं.

इम्रान खान यांच्याआधी नवाज शरीफ यांचं सरकार होतं. त्याआधी बेनझीर भुट्टो, आसिफ अली झरदारी यांची सत्ता होती. ते नकोसे झाल्यामुळे एक तिसरा राजकीय पर्याय म्हणून इम्रान खान यांना लष्करानं पाठींबा दिला होता.

मागच्या ६ महिन्यांमधे पाकिस्तानचं लष्कर आणि सरकार यांच्यात मतभेद वाढले. अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर पडल्यामुळे पाकिस्तानचं महत्व खूपच वाढलं. त्यावेळी पाकिस्तानी आयएसआयचे चीफ जनरल फैज हमीद काबुलमधे गेले होते. काबूलच्या एका हॉटेलात हातात कप घेतलेला त्यांचा फोटो प्रचंड वायरल झाला होता. त्यांना बदलण्याचा निर्णय लष्करानं घेतला होता. त्याला इम्रान खान यांचा विरोध होता.

पाकिस्तानी लष्कराच्या निर्णयांमधे तिथल्या पंतप्रधानांनी हस्तक्षेप करायचा नसतो असा संकेत आहे. तो इम्रान खान यांनी केला. त्यामुळे वातावरण त्यांच्याविरोधात तयार होत गेलं. पाकिस्तानमधलं आर्थिक संकटही यामागे होतं. यासंदर्भात २०१८पासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करत होतं. यासोबत महागाई, देशांतर्गत असुरक्षितेचं वातावरण अशीही काही कारणं होती.

हेही वाचा: कंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा

पुढचं राजकीय चित्र

पाकिस्तानमधे कायमच आतल्या आत धुसफूस चालू असते. पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ जागा आहेत. त्यात इम्रान खान यांच्या पक्षाकडे १५५ जागा आहेत. नवाज शरीफ यांच्या 'पाकिस्तानी मुस्लिम लीग'कडे ८४ तर बेनझीर भुट्टो यांच्या मुलाकडे म्हणजे बिलावल भुट्टो यांच्या पक्षाकडे ५६ जागा आहेत. सरकार बनवायचं तर या तीनपैकी दोन पक्षांना एकत्र यावं लागेल. त्यासोबत अपक्ष आणि इतरही छोट्या पक्षांचा पाठिंबा लागेल.

सरकार बदलायचं याबद्दल नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांचं एकमत आहे. पण पुढे काय होईल याविषयीची कोणतीच खात्री नाहीय. त्यामुळे कुणीही सत्तेत येऊ शकतं. एक नक्कीय की लष्कर स्वतः सत्ता ताब्यात घेणार नाही. थेट सत्ता ताब्यात घेण्यापेक्षा लोकांचं सरकार असणं बरंय असं पाकिस्तानी लष्कराला वाटतं. तसं झालं तर आंतरराष्ट्रीय दबावही टाळता येतो.

पाकिस्तानच्या घडामोडी आणि भारत

फेब्रुवारी २०२१मधे भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या लष्कराला भारतासोबतची सीमारेषा शांत रहावी असं वाटत असल्याचं चित्र होतं. इम्रान खान यांना मात्र यात रस नसल्याचं वाटत होतं. त्यामुळे नवं सरकार आलं तर भारतासोबतच्या संबंधांमधे होणारे बदल नाकारता येत नाहीत.

आंतरराष्ट्रीय राजकारणही वेगाने बदलतंय. युक्रेनचं युद्ध सुरू आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आहेत. इथं येण्याआधी ते पाकिस्तानमधे गेले होते. अमेरिका पाकिस्तानच्या राजकारणातला एक महत्वाचा घटक आहे. तसाच भारतही पाकिस्तानच्या राजकारणात महत्वाचा घटक आहे. पाकिस्तानच्या लष्करावर टीका करण्यासाठी इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं होतं. हे इथं समजून घेणं महत्वाचं आहे.

या शक्यतेकडे बघितलं जात नाहीय. पण सरकार टिकूही शकतं. इम्रान खान आणि पाकिस्तानचं लष्कर यांच्यात काहीतरी डिल झालं तर हे होऊही शकतं. पाकिस्तानमधे १७२चं बहुमत आहे. इम्रान खान यांना फक्त १७ जागांची गरज आहे. त्यांना ते मॅनेज करता येतंय का पहावं लागेल. त्यामुळे सध्यातरी भारताच्या संदर्भात फार मोठं काही घडेल अशी शक्यता फार कमी आहे.

हेही वाचा: 

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान

फुटीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान आंदोलनांनी अस्वस्थ

क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस

गोताबाया श्रीलंकेचे अध्यक्ष बनलेत, याची चिंता भारताने करावी?