माणसांना सीसीटीवीत कैद करा, असं जेरेमी बेन्थम का म्हणाला?

१५ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज १५ फेब्रुवारी. ब्रिटिश फिलोसॉफर जेरेमी बेन्थम यांची जयंती. ब्रिटिशांकडून जगाने अनेक बऱ्यावाईट गोष्टी घेतल्यात. त्यापैकीच एक म्हणजे बेन्थमची पॅनेप्टीकोनची संकल्पना. पॅनेप्टीकोन म्हणजे सगळ्यांवर एकाचवेळी लक्ष ठेवणं. सीसीटीवीसारखं माणसांवर लक्ष ठेवणं. आता तर अनेक सरकारांनाही बेन्थम हा आपला डार्लिंग वाटू लागलाय. बेन्थमने असं काय सांगून ठेवलंय, की ज्यामुळे तो हेरगिरीखोरांचा डार्लिंग झालाय?

आपण घरात किंवा खोलीत एकटे असलो की काय करतो? उड्या मारतो, नाचतो, गातो, कंबर हलवतो, वाकुल्या दाखवतो, आरशात तोंडं वेडीवाकडी करून बघतो. नुसती धम्माल! घरात एकटे असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण ‘आपण’ असतो. आपल्याला कुणी पाहत नसतं. त्यामुळे आपल्या वागण्याचा कोण काय विचार करतंय याचा विचार आपण करत नाही. एकदम निवांत असतो.

पण हेच आपल्यावर कुणी सतत लक्ष ठेवत असेल तर? तर आपणच आपल्या वागण्यावर बंधनं घालून घेतो. दुसऱ्याला आपण विचित्र वाटणार नाही असं वागण्याची काळजी घेतो. नीट अंग सावरून बसतो, अदबीने उठतो. मध्यम आवाजात स्पष्ट बोलतो. त्यामुळे घरी किंवा खोलीत एकटं असणं आपल्याला फार आवडतं. पण ब्रिटिश फिलॉसॉफर जेरेमी बेन्थमला माणसांवर सतत कुणीतरी लक्ष ठेवायला हवं, असं वाटायचं. त्यातूनच त्याने पॅनेप्टीकोन नावाची संकल्पना मांडली.

ब्रिटिश कायदा म्हणजे राक्षसच

आज या जेरेमी बेन्थमचा बड्डे आहे. १५ फेब्रुवारी १७४८ ला लंडनमधल्या हाउन्सडिच शहरात त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच हा जेरेमी फार हुशार आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेला म्हणून ओळखला जायचा. त्याकाळी इंग्लंडमधे टोरी नावाचा एक राजकीय पक्ष होता. सध्या जगातला सगळ्यात कन्झरवेटीव म्हणजे सनातनी विचारधारा असलेला पक्ष म्हणून टोरीकडे बघितलं जातं. या टोरी पार्टीचं कट्टर समर्थन करणाऱ्या एका श्रीमंत घरात बेन्थमचा जन्म झाला होता.

वडलांच्या अभ्यासाच्या टेबलवर बसून त्यांचे इंग्लंडचा इतिहास सांगणारे मोठमोठाले ग्रंथ वाचायला त्याला फार आवडायचं. आपल्याकडे संस्कृत तशी पाश्च्यात्य देशात लॅटिन भाषा असते. तीन वर्षाचा असतानाच जेरेमीने अवघड अशी लॅटीन भाषा शिकायला सुरवात केली. थोड्याच दिवसांत त्याने लॅटिन आत्मसातही केली.

लंडनच्या प्रसिद्ध वेबमिनिस्टर शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याच्या वडलांनी त्याला ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजला पाठवलं. तिकडून बेन्थमने कायद्याची पदवी घेतली आणि तो वकील झाला. ब्रिटिश कायद्याचा तो तिटकारा करायचा. ब्रिटिश कायद्यातली गुंतागुंत त्याच्यासारख्या हुशार माणसालाही कळत नव्हती. गमतीने तो ब्रिटिश कायद्याला चिकेनचा राक्षस असं म्हणायचा. चिकेन म्हणजे वळणावळणाचा, अवघड रस्ता. बेन्थमने कधीही वकिली केली नाही. पण कायद्याचा बारकाईने अभ्यास असलेल्या बेन्थमला कायदेतज्ञ म्हणून नेहमी मागणी असायची.

हेही वाचा: कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!

राज्य आणि चर्च यांच्यात अंतर ठेवावं

बेन्थमने माणसाच्या राजकीय आयुष्यात मोलाची भर टाकणाऱ्या अनेक गोष्टींचा शोध लावला. बेन्थम मुख्यत्वे ओळखला जातो तो त्याच्या युटिलिटॅरीझम म्हणजेच सुखवादाच्या सिद्धांतासाठी. जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त चांगलं होईल असं आपलं वागणं असलं पाहिजे असं तो म्हणत. त्याचा जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त सुख हा सुखवादी विचार पुढे खूप गाजला.

याशिवाय, माणसाचे मुलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, जोडीदाराशी पटत नसेल तर घटस्फोट घेण्याचा हक्क, फाशीच्या शिक्षेला, गुलामीला विरोध, जनावरांचे हक्क, समलैंगिक संबंधांना मान्यता अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर त्याने आपल्या लेखनातून स्पष्ट भूमिका मांडली.

महत्त्वाची गोष्ट अशी की, चर्च आणि राज्य या दोन वेगळ्या संस्था कराव्यात, असं त्यानं सुचवलं होतं. एखाद्या देशावर राज्य करताना त्यात चर्चने म्हणजे धर्माने हस्तक्षेप करू नये असा त्याचा आग्रह होता. त्याच्या या भूमिकांमुळे आणि अफाट लेखनामुळे, कायद्यातल्या समजुतीमुळे तो मोठा तत्त्वचिंतक म्हणून प्रसिद्ध झाला. त्यातच त्याने पॅनेप्टीकॉन नावाची संकल्पना मांडली.

पॅनेप्टीकोन म्हणजे एक गोलाकार जेल

१७८५ ला बेन्थम रशियामधल्या ख्रिश्चेव या भागात आपल्या सॅम्युअल नावाच्या भावाला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी राजकुमार प्रोटेमकीन हा रशियाच्या लष्करी विभागाचा मुख्य अधिकारी होता. बेन्थमचा भाऊ सॅम्युअल या प्रोटेमकीनसोबत काम करायचा.

१७८६ च्या सुरवातीला बेन्थम ख्रिश्चेवमधे पोचला आणि पुढची दोनेक वर्ष तो तिथेच राहिला. बेन्थम रोज त्याच्या भावाला कामगारांवर लक्ष ठेवताना बघत असे. आपले साहेब आपल्यावर लक्ष ठेवतायत याचं भान असणारे कामगार सतत चांगलं वागत, आपलं काम चोख करत. यावरून बेन्थमला पॅनेप्टीकोन ही संकल्पना सुचली.

पॅनेप्टीकोन म्हणजे एक गोलाकार जेल. ग्रीकमधल्या पॅनेप्टोस या शब्दावरून पॅनेप्टीकोन हा शब्द आलाय. पॅनेप्टोस म्हणजे सगळं बघणं. एका कटाकक्षात सगळं बघणं. क्रिचेवमधून परत इंग्लंडला आल्यावर आपल्या भावासारखं मॉडेल आरोपींवर वापरायचं असं बेन्थमने ठरवलं. आणि आपल्याला एक पॅनेप्टीकोन जेल बांधून द्यावं अशी मागणी त्यावेळच्या अधिकाऱ्यांकडे केली.

एकाचवेळी हजार माणसांवर लक्ष ठेवायचं

एक गोलाकार बिल्डिंग बांधायची. त्यात जेलच्या खोल्या बांधायच्या. त्या बिल्डिंगच्या बरोबर मध्यभागी एक मनोरा उभा करायचा. त्या मनोऱ्यात एक खोली करायची आणि त्या खोलीत एक पोलिस अधिकारी नेमायचा. मनोऱ्यावरच्या पोलिसाला जेलमधली सगळी माणसं एका जागेवर थांबून, एकाचवेळी दिसणार. म्हणजे एकाचवेळी सुमारे शंभर, हजार माणसांवर एकटा जेलर लक्ष ठेवू शकेल.

जेलर आरोपींवर लक्ष ठेवेल. पण जेलर आपल्याकडे नेमका कधी बघणार हे जेलमधल्या आरोपींना कळणार नाही, अशी त्या पॅनेप्टीकोनची रचना होती. जेलर आपल्याकडे कधी बघणार आहे हे माहीत नसल्यामुळे आरोपी नेहमी चांगलं आणि योग्यच वागतील, असं बेन्थमचं मत होतं. सत्ता किंवा पॉवर वापरण्याचा त्याचा हा प्रकार होता.

हेही वाचा: समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

शिक्षेचे पॅटर्नही बदलतात

साधारण १६ व्या शतकाच्या आधी सगळ्या जगभरात राजेशाही पद्धत होती. राजे आपली पॉवर किंवा सत्ता लोकांवर प्रस्थापित करण्यासाठी शारीरिक बळाचा वापर करत. राज्यात कुणी काही चूक केली की त्याला राजाचे सैनिक पकडून आणायचे आणि त्याला मोठी शिक्षा करायचे. त्यावेळच्या शिक्षा या शारीरिक इजेशी निगडीत होत्या. उकळत्या तेलात बुडवायचं, हात पाय कापायचे, हत्तीच्या पायाखाली द्यायचं, फाशी द्यायची वगैरे वगैरे.

पण १६ व्या शतकात फ्रेंच राज्यक्रांती झाली. जगाला लोकशाहीवादी मूल्यं मिळाली. हळूहळू राजेशाही नाहीशी होऊ लागली. आणि शिक्षा करण्याचा पॅटर्नही बदलला. तेव्हापासून अगदी आजच्या काळापर्यंत शिक्षा देण्यासाठी शारीरिक शिक्षेपेक्षा मानसिक ताण देण्याची पद्धत वापरली जाते.

हीच स्ट्रॅटेजी ओळखून बेन्थमने पॅनेप्टीकोन बांधलं. पॉवर ही जाणवणारी पण न दिसणारी गोष्ट असावी, असं बेन्थमचं मत होतं. पॅनेप्टीकोनच्या जेलमधे मनोरा हा पॉवरचं दृश्य स्वरूप होता. आपल्यावर कुणाची तरी पॉवर आहे हे आरोपींना जाणवायचं. पण पॉवर वापरणारा तो कोण आणि तो ती पॉवर कधी वापरणार हे दिसणार नाही.

इंग्लडमधे पहिलं पॅनेप्टिकोन १८१३ मधे उभं राहिलं. साधारण त्या काळात इंग्रजांनी भारतावर राज्य करायला सुरवात केली. त्यामुळे लगेचच ५ वर्षांनी १८१७ मधे असं पॅनेप्टीकोन दिल्लीत उभारलं गेलं. आज अंदमान, निकोबार आयलॅंड वर असणारं जेल हे या पॅनेप्टीकोनचंच उदाहरण आहे.

संपूर्ण समाजच पॅनेप्टीकोन झालाय

गंमत म्हणजे, बेन्थमची ही संकल्पना फक्त आरोपी आणि जेलपुरती मर्यादीत राहिली नाही. तर कामगार ही त्यात आले. लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठीही या पेनेप्टीकोनचा वापर करायला सुरवात झाली. इतकंच काय, तर याच पेनेप्टीकोनवरून आजची ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाहीची पद्धत सुरू झाली.

आज आपण सगळे पॅनेप्टीकोन झालेल्या समाजात जगतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. समाजातल्या रूढी परंपरा, माणसं ही सुद्धा आपल्यासाठी पॅनेप्टीकोन आहेत. जाणवणारी पण न दिसणारी अशी पॉवर त्यांनी आपल्यावर प्रस्थापित केलीय. त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर इतका खोलवर झालाय की कुणी आपल्याला पाहत नसेल तेव्हाही चांगलं, सिविलाईज्ज वागायचा आपला प्रयत्न असतो. आणि यालाच आपण चांगलं किंवा नीतीनं वागणं असं म्हणतो.

पण खरंतर आपली नीती ठरवायची संधी आपण परंपरेला देत असतो. ती आपली आपण ठरवत नाही. आजच्या डिजिटलायझेशच्या जगात सोशल मीडिया आणि सीसीटीवी नावाचा नवा पॅनेप्टीकोन आपण आपल्या जगण्यात आणलाय याची आठवण बेन्थमच्या बड्डेला करायलाच हवी. पॅनेप्टिकोनची आजच्या काळातली अद्ययावत आवृत्ती म्हणजे सीसीटीवी.

आजकाल सीसीटीवी लावून समाजावर, कामगारांवर, मुलांवर लक्ष ठेवायला खूप आवडतंय. एका अर्थाने वेगवेगळ्या माध्यमातून सगळा समाज एकमेकावर लक्ष ठेवून असतो. एकमेकांच्या मागावर, ट्रॅकवर असतो. सरकारलाही आपले नागरिक कायकाय करताहेत, ते कुठं आहेत याचं लोकेशन माहीत करून घेणं, नागरिकांवर वॉच ठेवणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखं वाटतंय. हे लक्ष ठेवणं चांगलं की आपल्या खासगीपणावरचा घाला या प्रश्नाची उकल आजही होत नाही. 

हेही वाचा: 

आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

लोकसंख्या नियंत्रणाने देशापुढच्या अडचणी वाढणार तर नाहीत ना?

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?